कै. आप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त  विविध केंद्रांवर झालेले कार्यक्रम

स्पर्धा परीक्षा केंद्र अधिकारी संपर्क भेटी – दिवाळीच्या सुट्टीमध्ये नियमित वर्गाचे 77 विद्यार्थी विविध जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणार्‍या केंद्राच्या 87 अधिकार्‍यांना भेटले. त्यांच्या मुलाखती घेतल्या. अधिकार्‍यांना प्रशासनात काम करताना येणारे अनुभव, त्यांनी राबविलेल्या योजना व त्यामधील लोकांचा सहभाग, वरिष्ठांची मदत, कठीण  प्रसंग  आल्यास  त्यांनी  कशा पद्धतीने परिस्थिती हाताळली याची माहिती मिळाली. मुलाखतींना जाण्यापूर्वी प्रा. सविताताईंनी प्रश्‍नावलीच्या आधारे ‘मुलाखत कशी घ्यावी’ याविषयी प्रशिक्षण दिले. सर्व विद्यार्थ्यांनी गटश: बसून स्वत: सविस्तर प्रश्‍न काढले. महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील 45 तालुक्यामधील अधिकार्‍यांशी संपर्क झाला. विवेकसर व सविताताई यांच्याविषयी असणारा आदर अधिकार्‍यांच्या बोलण्यातून जाणवत होता असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. अधिकार्‍यांनी केलेल्या सहकार्याने व त्यांच्या ज्ञान प्रबोधिनीवरील प्रेमाने विद्यार्थी भारावून गेले आहेत. विद्यार्थ्यांनी मुलाखतींचे अहवाल हस्तलिखित स्वरूपात दिलेले आहेत.

नागरी वस्ती अभ्यासगट युवती प्रेरणा जागृती मेळावा  – सौर आश्‍विन 26 (18 ऑक्टो.) रोजी शारदोत्सव युवती प्रेरणा जागृती मेळावा झाला. या मेळाव्यामध्येे सात वस्या, 8 संस्था व महाविद्यालयांमधून 113 युवती व कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यातील प्रदर्शनामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र, नेतृत्व संवर्धन केंद्र, नागरीवस्ती, युवती विभाग व कै. आप्पांचा कार्यपरिचय देणारे तक्ते लावण्यात आले होते. त्यानंतर प्रबोध सभागृहात किशोरी मेळाव्याची चित्रफीत पाहिली व ज्योतीताई कानिटकरांनी मार्गदर्शन केले. नंतरच्या सत्रात पारंपरिक खेळाचा व भोंडल्याचा आनंद युवतींनी घेतला. मातृभूमिपूजनाच्या कार्यक्रमातून मुलींनी सामूहिक संकल्प केले व मा. संचालकांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की स्वतःसाठी काम करताना काळजीपूर्वक केले जात नाही व इतरांसाठी काम करतानाची प्रेरणा ही कायम जास्त असते. ही प्रेरणा अशीच टिकवून ठेवून स्वतःचाही विकास साध्य करता आला पाहिजे.
ग्राम प्रबोधिनी विद्यालय, साळुंब्रे : ग्राम प्रबोधिनीचा रौप्य महोत्सव व कै. आप्पासाहेब पेंडसे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आंतरशालेय संगणक बुद्धिमत्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील सहा शाळा व 50 विद्यार्थी सहभागी होते. या सर्व शाळांमध्ये  ग्राम प्रबोधिनीचे इ. 10 वी मधील प्राची घोजगे 90 गुण मिळवून प्रथम तर इ. 9 वी तील अभिजित वाघमारे याचा द्वितीय क्रमांक आला. विद्यालयाचे एकूण बारा विद्यार्थी एकूण शाळांच्या 50 विद्यार्थ्यांमध्ये बक्षीस पात्र ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांना आय. सी. टी. शिक्षिका सारिकाताई उजगरे यांनी मार्गदर्शन केले.
सौर अग्रहायण 21 (12 डिसें.) रोजी कै. वि.वि. तथा आप्पासाहेब पेंडसे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विद्यालयात रंगभरण चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 248 विद्यार्थी सहभागी झाले होते.

ज्ञान प्रबोधिनी, सोलापूर
1) सौर 9 अग्रहायण (30 नोव्हें.) रोजी व्याख्यान झाले. वक्ते श्री. विनयजी हर्डीकर व प्रमुख पाहुणे म्हणून आ. लताताई यांची उपस्थिती  होती. श्री. विनयजी हर्डीकर यांनी  लिहिलेल्या ‘नव्या युगाचे पाईक आम्ही’ या पद्याने कार्यक्रमास सुरुवात झाली. कै. आप्पांच्या आठवणी सांगत असताना त्यांनी आप्पासाहेब हे कसे काटकसरी होते, नावीन्य व कल्पकतेची जाण असणारे होते याबाबतचे प्रसंग, त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा याविषयीचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
2) सौर 4 अग्रहायण (25 नोव्हें.) रोजी चरित्र कथनाचे आयोजन केले होते.  1947 च्या भारत-पाक युद्धात सेनापती असणार्‍या जनरल थिमय्या यांच्या चरित्रकथनाचा कार्यक्रम झाला. श्री. राहुल कोकीळ यांनी जनरल थिमय्या यांच्या चरित्रकथनाद्वारे विद्यार्थ्यांना युद्धातील प्रसंग, त्यांनी केलेला संघर्ष, युद्धाची आखणी याविषयी सांगितले.
3)    ऐतिहासिक  महापुरुषांच्या चरित्रकथनावर आधारित व्याख्यानांचे या वर्षी आयोजन होत आहे. सौर 18 अग्रहायण (9 डिसें.) रोजी या व्याख्यानसत्रामध्ये  शीख  पंथातील गुरू गोविंदसिंग यांचे  चरित्रकथन करण्यासाठी निगडी  गुरुकुलाचे  प्रमुख श्री. आदित्यदादा शिंदे हे वक्ते म्हणून लाभले. या चरित्रकथनाद्वारे गुरू गोविंदसिंग यांच्या अलौकिक कार्याची ओळख करून दिली व त्यांच्या काही कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या. ‘क्रौर्याशी झुंज द्यायला मी शौर्य गाजवेन’ असे गुरू गोविंदसिंग यांचे विचारही विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले.

विस्तार केंद्र, बोरीवली : सौर 22 अग्रहायण (13 डिसें.) रोजी जयराजनगर येथे प्रतिज्ञाग्रहणाचा कार्यक्रम झाला. केंद्रातील दोन सदस्यांनी व भाईंदर येथील संवादिनी गटातील सहा सदस्यांनी प्रथम प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर मा. संचालकांनी मार्गदर्शन केले व कै. आप्पा पेंडसे यांच्या सोबतच्या आठवणींचे कथन केले. तसेच स्वतःच्या घडणीतील कै. आप्पांच्या सहभागाबद्दलही सांगितले.

प्रबोधिनीचे काही माजी विद्यार्थी आणि पुण्यामधील विविध सामाजिक व राजकीय पार्श्‍वभूमी असलेले हितचिंतक यांनी मिळून स्थापन केलेल्या“डॉ. वि. वि. तथा आप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दी समिती’’तर्फे पुढील दोन कार्यक्रम आयोजित केले होते.
परिसंवाद  :    सौर 28 अग्रहायण (19 डिसें.) “भारत 2050 – विश्‍वसत्ता’’ मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कूल (पर्वती) येथे झाला. या परिसंवादात डॉ. संजय देशमुख (कुलगुरु, मुंबई विद्यापीठ), प्रा. विवेक सावंत (संचालक, महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन), डॉ. राजस परचुरे (संचालक, गोखले इन्स्टिट्यूट) आणि डॉ. श्रीकांत परांजपे (प्राध्यापक संरक्षण अभ्यास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) सहभागी झाले होते. अध्यक्षीय भाषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि समारोप मा. संचालक वा. गिरीश श्री. बापट  यांनी केला.
आप्पा अभिवादन यात्रा : सौर 29 अग्रहायण (20 डिसें.) रोजी वेळ : सकाळी 9.30 ते 11.30 या वेळात न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथून सुरू होऊन बाजीराव रोड – मंडई – लक्ष्मी रोड – केळकर रस्त्याने ज्ञान प्रबोधिनी चौकातून  न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथेच समाप्त झाली. यामध्ये स्वरूपवर्धिनी, ज्ञान प्रबोधिनीच्या पुणे, निगडी, साळुंब्रे, शिवापूर व वेल्हे भागातील गट, आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि पुणेकर नागरिक अशा साधारण 1,000 व्यक्तींनी यात उत्स्फूर्तपणे घोषणा देत सहभाग घेतला. अभिवादन  यात्रेची  सांगता  शिक्षणतज्ज्ञ  मा. प्र. ल. गावडे  व  प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व आप्पांचे सहकारी मा. यशवंतराव लेले यांनी आप्पांच्या प्रतिमेला पुष्पसमर्पण करून केली. प्रार्थना होऊन कार्यक्रम संपला.