भाग ३- ७. कृतीचे ध्येयाशी अनुसंधान

विकासाचे व्यवसायीकरण :

एका मोठ्या कंपनीला आपल्या फायद्यातील काही भाग ग्रामविकसनाच्या कामासाठी वापरावा असे वाटले. त्यांनी प्रबोधिनीत चौकशी केली. आपण त्यांना आपल्या विविध योजना सांगितल्या. त्यातील एक कल्पना त्यांना आवडली. ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक मदत देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आपण त्यांना खर्चाच्या अंदाजासह योजना सादर केली. आर्थिक उलाढाली करणारी कंपनीच ती. त्यांचा सर्व विचार व्यापारी भाषेत चालायचा. आपल्या खर्चाच्या अंदाजाला त्यांनी दरपत्रक (कोटेशन) म्हटले. आपले दरपत्रक मान्य करून त्यांनी आपल्याकडे त्यांची मागणी (परचेस ऑर्डर) पाठवली. आता दोन गावांतील विद्यार्थी व महिलांचा विकास करून देण्याची त्या कंपनीची मागणी आपण पूर्ण करणार
आहोत.

स्वयंसेवी वृत्तीने, निर्वेतन काम करत ग्रामविकास करण्याची कल्पना एकीकडे आहे, तर दुसरीकडे दरपत्रक देऊन मागणीप्रमाणे पुरवठा करण्याची कल्पना आहे.

शिक्षणाचे व्यवसायीकरण :

मराठवाड्यातील निवडक जिल्ह्यांध्ये प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्याची एक योजना गेली दोन वर्षे चालू आहे. जागतिक बँकेची आर्थिक मदत त्या योजनेला आहे. योजना राबवताना कमी पडलेल्या गोष्टी भरून काढण्यासाठी इतर संस्थांची मदत घेण्याचे शासनाने ठरवले. ‌’काय काय मदत करू शकाल, याच्या योजना पाठवा अशी जाहिरात शासनाने दिली. जाहिरात पाहून आपण एक आवेदन दिले. मुलाखती होऊन निवडलेल्या अंतिम यादीमध्ये आपला समावेश झाला. त्यासंबंधी एका बैठकीसाठी प्रबोधिनीतून एक गट मुंबईला गेला. सर्व लेखी व्यवहारात आणि जाहिरातीत भाषा सहकार्याची होती; परंतु प्रत्यक्ष बैठकीत शासनाने या योजनेचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे असे लक्षात आले. या कंत्राटदाराचे प्रतिनिधी तिथे जमलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडे संभाव्य उप-कंत्राटदार या दृष्टीने बघून वाटाघाटी करायचा प्रयत्न करत होते.

शिक्षण म्हणजे विद्यादान अशी कल्पना एकीकडे आहे, तर दुसरीकडे शिक्षणाचे कंत्राट देण्याची कल्पना आहे.

ज्या गोष्टी आपण आपल्यापासून वेगळ्या करू शकतो त्या विकू शकतो. त्या गोष्टी वस्तूच असल्या पाहिजेत असे नाही. माहिती, प्रक्रिया, पद्धतीसुद्धा विकता येतात. काही वेळा कोणाला तरी हवे असलेले आपल्याकडे असते. ते आपण विकतो. विकलेल्या गोष्टीचा मोबदला म्हणून पैसे मिळवतो. व्यवहारात बऱ्याच गोष्टींची देवाण-घेवाण व्यापाराद्वारे होते. ध्येयवादातून सुरू होणाऱ्या कल्पनांचे व्यापारीकरण होणे हा एक सर्वसाधारण प्रवाह दिसतो. त्याची दखल आपण घेतली पाहिजे. शक्य तिथे त्याचा उपयोगही केला पाहिजे. ज्या गोष्टी आपण विकतो, त्या आपण स्वत: आपल्या विभागांध्ये काही वेळा वापरत नाही. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.

व्यवसायिकता आणि ध्येयनिष्ठा :

अनेक कल्पनांचे व्यवसायीकरण होताना दिसत असते. आपण या प्रक्रियेला सामोरे जायचे ठरवलेले आहे. पाठ फिरवून चालणार नाही; पण वरच्या परिच्छेदात विचारलेल्या पांच प्रश्नांसारख्या प्रश्नांचे काय? जे आपण बाहेर विकू शकतो, बाहेरच्यांना पटवू शकतो ते घरात का वापरत नाही? बाहेरच्यांशी जेव्हा देवाणघेवाणीचे व्यवहार होतात तेव्हा त्यांचे समाधान होईल अशी वस्तू, माहिती, प्रक्रिया किंवा पद्धत त्यांना आपण देत असतो. या व्यवहारात चोख असणे ही एकप्रकारची उत्तमता आहे. ती व्यवसायनिष्ठेतून (प्रोफेशनल वागण्यातून) येते. दुसऱ्या प्रकारची उत्तमता ध्येयनिष्ठेतून (मिशनरी वागण्यातून) येते. आपण बाहेरच्यांना ज्या गोष्टी देतो त्या चांगल्याच असतात. त्यांची उद्दिष्टपूर्ती होते म्हणून ते आपल्याकडून या गोष्टी घेतात. ज्या गोष्टी विकतो त्या आपण स्वत: वापरल्या तर आपल्यालाही उपयोग होईल; पण आपण त्या वापरत नाही . कारण अनुसंधान नसते.

ध्येयी अनुसंधान तुटो नेटू :

अनुसंधान म्हणजे अखंड जोडलेले राहणे. एखादा प्रकल्प पूर्ण झाला किंवा एखादे अभियान झाले की त्यातून अनेक गोष्टी निघतात. ज्यांचा आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी उपयोग आपल्या लक्षात आला त्या आपण आपल्याजवळ ठेवल्या.बाकीच्यांचा इतरांना उपयोग असला तर त्या त्यांना दिल्या असे बहुतेकवेळा घडते. ज्यांचा उद्दिष्टपूर्तीसाठी उपयोग लक्षात आला त्या गोष्टींचे ध्येयाशी अनुसंधान आपल्या लक्षात आले. त्या जपून ठेवल्या पाहिजेत. ज्या गोष्टींच्याबाबतीत वरील पांच प्रश्नांसारखे प्रश्न पडतात तिथे अनुसंधान नाही. अनुसंधान लक्षात आलेले नाही कवा अनुसंधान तुटले आहे. आपल्या कृतीचे ध्येयाशी अनुसंधान राखणे ही चोख व्यवहार करण्यासारखीच आणखी वेगळ्या प्रकारची उत्तमता आहे. व्यापारी संघटनांना चोख व्यवहारातील उत्तमता पुरते. ध्येयवादी संघटनांना कृतीचे ध्येयाशी सतत अनुसंधान राखणारी उत्तमतादेखील लागते.