१६. कार्यकर्त्याचा पाचवा गुण – प्रेरणा प्रवर्तन

कामामुळे मोठेपण वाढते :

गेल्या महिन्यात अंतर्गत पत्रव्यवहारात एक चिठ्ठी बघायला मिळाली. वर निरोप होता. खाली सही होती. त्याखाली शिक्का उमटवलेला होता. मोठ्या अक्षरात ‘लेखापाल‌’ हा शब्द आणि त्याच आकाराच्या अक्षरात विभागाचे नाव असे शिक्क्याचे स्वरूप होते. शिक्का पाहून जरा विचारात पडलो. ज्याने शिक्का केला त्याने अनवधानानेच केलेले होते. विभागापेक्षा पद मोठे असे करणाऱ्याच्या मनातही नसेल; पण शिक्का पाहताना तसे वाटत मात्र होते. शिक्क्याप्रमाणेच व्हिजिटग कार्ड, व्यक्तिगत कवा विभागाची पत्रमुद्रा यांध्येही बऱ्याच वेळा हे अवधान सुटल्यासारखे वाटते. सर्व सारख्या आकाराच्या अक्षरांध्ये केले तर काहीच अडचण नाही. लहान-मोठे करायचेच असेल, तर प्रबोधिनीचे नाव, मग विभागाचे नाव, मग पदनाम, मग व्यक्तीचे नाव या क्रमाने अक्षरांचा आकार कमी करत जावा. व्यक्तीचे नाव, पदनाम कवा विभागाचे नाव मोठे छापल्याने मोठेपण येत नाही. मोठेपण कामामुळे येते. आपण प्रबोधिनीमय झालो असलो तरी बारीक-सारीक कृतीतूनही आपण प्रबोधिनीचे अंश आहोत हेच व्यक्त व्हावे. प्रबोधिनीचा अंश म्हणवून घेण्यात धन्यता वाटली पाहिजे आणि तरीही प्रबोधिनीचे संपूर्ण तत्त्वज्ञान, सर्व दृष्टिकोन आपल्या वागण्यातून इतरांपर्यंत पोचले पाहिजेत.

पेरते व्हा, प्रवर्तक व्हा :

वाद्यघोषासाठी भारतीय संगीतावर आधारित अनेक रचना बसवणारे, संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार बसवणारे श्री. ह. वि. दात्ये यांच्या अमृतमहोत्सवाच्या समारंभात श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचे भाषण गेल्या महिन्यात झाले. त्या भाषणात त्यांनी सांगितले की, ‌‘जाणता राजा‌’चे प्रयोग बसवताना त्या नाट्यसंचात जी शिस्त, नेटकेपणा, नियोजन, वक्तशीरपणा असे गुण आलेले आहेत, त्याचे मूळ कारण बाबासाहेबांनी श्री. दात्ये यांच्या देखरेखीखाली केलेल्या घोषाचा सराव हे आहे. श्री. दात्ये यांनी काही गुण बाबासाहेबांध्ये पेरले आणि ते ‌‘जाणता राजा‌’च्या संचातील सर्वांध्ये बाबासाहेबांनी पेरले.

मागच्या उन्हाळ्यामध्ये प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. वसंतराव गोवारीकर यांची ‘इस्रोची कथा‌’ ही लेखमाला सकाळच्या सुट्टीच्या पानामध्ये क्रमश: येत होती. भारताच्या अंतरिक्ष क्षेत्रातील प्रगतीचे एक मोठे स्वप्न डॉ. विक्रम साराभाई यांच्या मनात होते. ते स्वप्न त्यांनी डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात कसे उतरवले याचे वर्णन डॉ. गोवारीकर यांनी एका ठिकाणी केले होते. डॉ. गोवारीकरांनी स्वत: तेच स्वप्न विक्रम साराभाई आंतरिक्ष केंद्रातील हजारो शास्त्रज्ञांच्या मनात कसे उतरवले याचेही वर्णन एका लेखात होते.

असे गुण पेरता येतात. अशी स्वप्ने पेरता येतात. पेरलेले शतपटीने उगवून येते. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांना असे गुण आणि स्वप्ने पेरता आली पाहिजेत. त्याहीपेक्षा राष्ट्रकार्याची प्रेरणा पेरता आली पाहिजे. धान्याचा जो दाणा पेरलेला असतो तो नाहीसा होतो; परंतु गुण, स्वप्ने कवा प्रेरणा पेरली तर ती नाहीशी होत नाहीत. पेरणाऱ्याच्या जवळ ते गुण कवा प्रेरणा थोडीही कमी न होता तसेच
राहतात.

भगवान बुद्धांनी धम्मचक्रप्रवर्तन केले होते. त्यांना गवसलेल्या आर्यसत्यांचा प्रचार करत ते स्वत: आयुष्यभर फिरत राहिले. अनेकांना भिक्षुपदाची दीक्षा देऊन फिरते केले. यंत्रामध्ये मास्टर गिअर फिरायला लागला, की दात्यात दाते अडकलेली अनेक गिअर्सची चक्रे फिरायला लागतात. मास्टर गिअरही फिरत राहतोच. स्वत:ची प्रेरणा जिवंत ठेवून इतरांध्ये प्रेरणेचे प्रवर्तन करणारा प्रवर्तक (रिजनरेटिव्ह) बनणे हे प्रबोधिनीच्या कार्यकर्त्याचे पाचवे लक्षण आहे. दक्ष, उत्कट, नवनिर्माता, सहयोगी आणि प्रेरणा-प्रवर्तक अशा जो आहे तोच प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचा आदर्श आहे.