DOMBIWALI KENDRA UPAKRAM

दि. ८ मार्च २०२० महिला दिनाचे औचित्य साधून ज्ञानप्रबोधिनीच्या डोंबिवली विस्तार केंद्राच्या \”संवादिनी\” गटाने \”कार्पोरेट किर्तनकार \” या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या श्री समीर लिमये यांचे,  कानविंदे व्यायामशाळेच्या तळमजल्यावरील सभागृहात व्याख्यान आयोजित केले होते. विषय फारच सुंदर होता … 
प्रबोधिनीच्या चार पथदर्शींमधील एक असलेले श्री रामदास स्वामी ! त्यांच्या ग्रंथराज दासबोधाच्याआधारे \” श्री समर्थांचे संघटन \”
         श्री लिमयेंसारखा अभ्यासु , दशसहस्रेशु वक्ता मग काय सगळा श्रोतृवर्ग जिवाचे कान करुन श्री समर्थांचे विचार ऐकण्यास अतिशय उत्सुक होता. 
          आपल्या सर्वांचे अगदी लहानपणापासून परिचित असलेले , शिस्तीचे मुर्तिमंत उदाहरण असलेले श्री समर्थ रामदास स्वामी ! पण त्यांच्याविषयीही आपल्याला पूर्ण माहिती नसते. त्यामुळे श्री लिमयांच्या व्याख्यानातून खरोखरीच खूप नविन माहिती कळली हे नक्की !
           श्री समर्थांनी सर्व भुप्रदेश पायी पादाक्रांत करुन त्यावेळच्या जनतेत एकत्र येण्याची भावना म्हणजेच संघटन करण्यासाठी जागोजागी शिष्यगण जमवून मठांची स्थापना केली.त्यामधे एकुण ४२ स्रिया होत्या , त्यात आठ स्त्रिया मठाधिपती होत्या. त्यामधे बालविधवा स्त्रियांचाही समावेश होता.
         स्रियांचा सन्मान म्हणजेच शारदोत्सव ! खूप सुरेख कल्पना मांडली श्री लिमयेंनी आपल्या व्याख्यानात ! श्री समर्थांना अभिप्रेत असलेल्या कलियुगातील दोन देवता …. १) गणपती – बुद्धीची देवता याचा लिमयांनी सांगातलेला अर्थ असा की आपण एखादी गोष्ट ऐकत असताना समजते किंवा अंत:करणापर्यंत लगेच पोहोचते तीच गणपती ही देवता ! 
  २) शारदा म्हणजे जे आपल्या अंत:करणाला आकलन झाले ते इतरांना सांगता किंवा समजवता येणे हीच शारदा !आणि याच शारदेचा उत्सव म्हणजे माणसातील शक्तीची पुजा !
   अंत:करण पंचक म्हणजे अंत:करण , मन,बुद्धी , चित्त वअहंकार म्हणजेच आपली वृत्ती ! त्या वृत्तीतूनच \”विद्या व अविद्या \” तयार होतात आणि राम व रावण अशी सात्विक व तामसी वृत्तीची निर्मिती होते. 
        श्री समर्थांनी आपल्या शिष्यगणांतील सुप्त गुण किंवा वृत्ती चातुर्य ओळखून त्यांना मठाधिपती किंवा संघटन कार्यासाठी प्रविण केले होते. समर्थांच्या दोन लाडक्या व प्रसिद्ध शिष्या म्हणजे आक्कास्वामी व वेण्णास्वामी !आक्कास्वामींमधील धिटाई व नेतृत्वाचा गुण पारखून त्यांना मठाधिपती केले आणि समर्थ बनविले तर वेण्णास्वामींचा गोड गळा आणि असीम भक्ती करण्याच्या गुणांमुळे ऊत्तम कीर्तनकार बनविले.आणि त्यायोगे ऊत्तम संघटनाचे कार्य करवून घेतले.
          श्री समर्थांनी रचिलेले मनाचे श्र्लोक त्याची अनुभुती …श्री समर्थांना अभिप्रेत असलेला प्रपंच व परमार्थ यांची हसत खेळत  आपल्या वृत्तीतील तंतोतंत पटणारी चपखल उदाहरणे देत देत श्री लिमये यांनी एकामागून एक सुंदर पदरांची ऊकल लीलया केली ! सर्व ऊपस्थितांच्या ह्रदयात ते विचार थेट जाऊन बसले हे नक्की ! 
         हे सर्व सांगत असतानाच श्री लिमये यांनी आपल्या प्रबोधिनीचे कार्य किती समर्थपणे व श्री समर्थांच्या शिकवणूकीतुन ऊतरत असल्याचाही विषेश ऊल्लेख केला ! त्यावेळी खूप समाधान व आनंदही वाटला ! \”कल्याणकरी \” प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली !
       खरेच कार्यक्रम खूप छान झाला ! लिहावे तेवढे कमीच वाटते आहे ! पण इथेच थांबते ! 
श्रीराम समर्थ ! श्रीराम !