ज्ञान प्रबोधिनी बालविकास मंदिर, माध्यमिक
इ. ५वी ते इ. १०वी मधील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान प्रबोधिनी बालविकास मंदिरची सेमी इंग्रजी माध्यमाची माध्यमिक शाळा आहे. शरीर, मन, बुद्धी, आत्मा या स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणा-या मानवी पैलूंचा विकास करण्याच्या दृष्टीने शारीरिक विकासासाठी योजना असते. एक तास क्रीडा दल असते. चरित्र कथन, व्याख्याने, व्यक्तीभेटी, स्थळभेटी, चर्चा या द्वारे मनाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. विज्ञान-गणित कार्यशाळा, स्पर्धा परीक्षा तयारी, स्वयंअध्ययन कौशल्य प्रशिक्षण, विषयानुसार कार्यशाळा इत्यादींद्वारे बौद्धिक विकासाकडे लक्ष दिले जाते. दररोज अर्धा तास प्रार्थना, श्रीमद्भगवद्गीता पठण, ध्यान तसेच दर शनिवारी गायत्री व शक्तिमंत्राची उपासना याद्वारे आत्मिक बल वृद्धीसाठी प्रयत्न केले जातात. तसेच कृतिशील राष्ट्रप्रेम जागृतीसाठी विविध शिबिरे, अभ्यास सहली, सेवाकार्य इत्यादींची योजना असते. मुलांना विषयांचे आकलन व्हावे, ते स्मरणात राहावेत, विश्लेषणात्मक व चिकित्सक विचार करता यावा, विविध बौद्धिक कौशल्ये वाढावीत व अभ्यासाची आवड व त्यातील गती वाढावी यासाठी कृतिप्रधान शिक्षण, प्रकल्प पद्धती, स्वयंअध्ययन इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो. समाजदर्शन उपक्रम, सामूहिक भजन उपासना, विद्याव्रत संस्कार, तंबू शिबिर, सहजीवन शिबिर, शालेय अभ्यास शिबिर, प्रकल्प शिबिरे, इलेक्ट्रॉनिक्स कार्यशाळा, अग्रणी योजना, गडसहली, मातृभूमी परिचय सहली, सायकल सहली, विज्ञान जिज्ञासा मंडळ, वक्तृत्व स्पर्धा, आंतरशालेय पुस्तक परिचय स्पर्धा, अध्यापक प्रशिक्षण शिबिरे व अभ्यास सहली ही विभागाच्या कार्यपद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत. दृकश्राव्य कक्ष, संगणक कक्ष, संगीत कक्ष, चित्रकला कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, मुक्तद्वार ग्रंथालय अशा विद्यार्थी केंद्रित सुविधा देखील विद्यालयात उपलब्ध आहेत.