नागरी वस्ती अभ्यास गटाचे काम हे २००२ पासून चालू आहे. वस्ती भागातील कौटुंबिक जीवन, सामाजिक, राजकीय, धार्मिक व आर्थिक घटकांमधील वातावरण याचा सर्वांगीण अभ्यास लोकांशी संवाद साधून केला जात आहे. स्थानिक गरजांवर स्वयंप्रेरणेने विधायक विचार व कामे करणारे कार्यकर्ते तयार व्हावेत या दृष्टीने विभाग प्रयत्न करत आहे. तसेच कुटुंबातील सर्व वयोगटातील घटकांसोबत काम सुरू आहे.
‘सावित्री दल’ या नावाने हे काम केले जाते. विभागातील युवतींच्या महिला पालकांच्या पुढाकाराने सावित्री दलाची कामे सुरू झाली. विविध वस्त्यांमधील निवडक महिलांची दरमहा बैठक व वर्षगभरात दोन मोठे कार्यक्रम योजले जाऊ लागले.
पुण्यातील १६ वस्त्यांमध्ये बाल विकास प्रकल्प नागरी वस्ती अभ्यास गटातर्फे चालवला जातो. १६ वस्त्यांमधील एकूण ३५० विद्यार्थी या प्रकल्पात वर्ष २०२३-२४ मध्ये सहभागी झाले.
आनंदी शिक्षण प्रकल्पांतर्गत शहरी वस्त्यांमधील इयत्ता ३री व ४थी च्या मुलांसाठी भाषा व गणित या विषयांसाठी अभ्यासक्रम तयार करून मुलांना खेळाच्या व व्हिडिओच्या माध्यमातून शिकवले गेले. व्यक्तिमत्त्व विकास सत्रे, विविध क्षमता विकसन कृतिसत्रे व कला प्रशिक्षण अशी विविध प्रशिक्षणे प्रकल्पात घेतली गेली.
मागील २-३ वर्षात नागरी वस्ती गटाने २ शाळांमध्ये विद्याव्रताची प्रक्रिया चालू केली व वर्ष २०२३ मध्ये एकूण १२३ मुलांचे विद्याव्रत घडवून आणले.