मागे वळून बघताना ६ – नेतृत्व!

बचत गट बैठकीला आल्यावर, महिला ज्या गप्पा मारायच्या, त्यातून लक्षात यायचं की ग्रामीण महिलांचे भावविश्व खूप मर्यादित आहे. अशांना शासनाने आरक्षण देऊन नेतृत्वाची संधी दिली. आणि आपण कामालाच लागलो… कारण त्या काळात ग्रामीण महिलेला स्वतःलानेतृत्व करणारी’ या रुपात बघणे खूप अवघडच नाही तर अशक्य होते!

नेतृत्वावर काम करताना लक्षात आलं की नुसती संधी देऊन पुरत नाही तर प्रोत्साहनही द्यायला लागतं, नेतृत्व करण्यासाठी पोशक वातावरण तयार करायला लागतं! म्हणजे नेतृत्व करायची तयारी जशी महिलेची करावी लागते तशीच आजूबाजूच्या मंडळींची ‘ती’चे नेतृत्व स्विकारण्याची तयारी करावी लागते. महिला नेतृत्वाचा हा सामाजिक पैलू अनुभवातून लक्षात आला. अशा प्रकारे एखादीची घडण करायची तर काही एका दिवसात होत नाही त्याला सातत्याने वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतात. 

ग्रामीण महिलांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास व्हावा म्हणून आपण असे प्रयत्न सातत्याने गेली ३० वर्ष करत आहोत. या काळात ग्रामीण भागातील महिलांमधून स्थानिक पातळीवर नेतृत्व उभे रहावे यासाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी प्रेरणा जागरण करणाऱ्या व माहिती देणाऱ्या बैठकींची योजना केली. अनुभव सहली काढल्या. आधी ८०-८५ गावाच्या परिसरासाठी एक बैठक व्हायची आता ३० वर्षांनंतर अशा प्रकारच्या ३ स्वतंत्र बैठका तेवढ्याच संख्येने होतात. 

बैठक महिन्यातून फक्त एक दिवस ४ तास असते. पण बैठकीनिमित्ताने विषय कुठलाही असला तरी एकत्र यायची सवय लावावी लागते. बैठकीच्याच दिवशी पाहुणे आले तर पाहुण्यांचा पाहुणचार दुसऱ्यांवर सोपवून येणे ग्रामीण बाईला सोपे नसते. त्यामुळे हे सगळे जमवून बैठकीला वेळेवर उपस्थित राहून ज्यांनी ज्यांनी मनापासून सहभाग घेतला ती प्रत्येक जण घरात/भावकीत/ आळीत /गावात उठून दिसायला लागली.  तीच्यात लोकांना दिसण्यासारखे बदल घडून आले. कोणी स्वतःहून पुढाकार घेऊन औपचारिक शिक्षण घेतले तर बैठकीला आल्यामुळे कोणी विमानाचा प्रवास केला. कोणी गावातले पाण्याचे काम केले तर कोणी गावातल्या लोकांचे आधारकार्ड मोबाइलला जोडायचा आटापिटा केला, कोणी स्वतःचा उद्योग करून कंपनीत स्टॉल लावला तर कोणी बचत गटाला बँकेशी जोडून घेतले आणि लाखांनी कर्ज गटाला मिळवून दिले. ‘ती’च्या या बदललेल्या स्वरुपाकडे बघून ‘तिच्या’ सारखं व्हायचं आहे हिच पुढच्या गटाची मुख्य प्रेरणा ठरली! 

हे नेतृव विकसनांचे काम करताना काय समजलं तर ‘ती’चा या बदलाचा वेगही समाजाला झेपेल एवढाच असावा लागतो, तरच ‘ती’ला स्वीकारले जाते. त्यामुळे नेतृत्व बैठकीत येणाऱ्या प्रत्येक महिलेला, कुटुंबातून वाढता पाठिंबा मिळतोय ना, हे तपासावे लागते. सगळ्याच काही ‘गाव चालवण्याची’ आवड नसते पण तरीही नेतृव करणाऱ्या प्रत्येकीला गावात सन्मानाचे स्थान मिळतेच मिळते. 

गावाने तिचे नेतृत्व स्वीकारले की कुणाला, गावच्या निवडणुकीत कुठल्या महिला उमेदवाराला उभे करायचे याच्या बैठकीचे निमंत्रण येते तर कोणाला गावच्या जत्रेच्या तयारीच्या बैठकीत सन्मानाने बोलावले जाते. कधी कुणाच्या हस्ते शाळेत आलेल्या महिला पाहुण्यांचा शाल-नारळाने सत्कार होतो तर कुणाला शाळेतून पाल्याच्या वर्गाची पालक प्रतिनिधी बनवले जाते. असे कुठलेही काम ‘ती’ला आग्रहाने दुसरे कोणीतरी देते तेव्हा त्या कामास ती योग्य आहे असे सन्मानाने सांगितल्या सारखे असते. अशा प्रकारे गावात पुढारपण करण्याच्या संधी आपणहून चालत येतात. कार्यक्रमाला ‘कुठली साडी नेसू?’ या प्रश्नापलिकडे जाऊन जेव्हा महिला विचार करू शकतात तेव्हा ही संधी सार्थही असते. 

महिला नेतृत्व करायला शिकतात त्याआधी त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढतो, मग स्वतःच्या जबाबदारीवर त्या पैशाच्या उलाढाली करू शकतात, कुटुंबातल्या निर्णयांमध्ये सहभागी होतात, त्यानंतर सामाजिक विषयात शिरतात. त्या जेव्हा स्वतःला गरजेइतके पैसे खर्च करण्याची मुभा देतात तेव्हा त्यांचा ‘हा’ प्रवास सुरू झाला असं समजतं. मग तो खर्च साडी घ्यायला केलेला असो किंवा दवाखान्यात जायला असो.. प्रबोधिनीच्या या नेतृत्व विकसनांच्या कामात अजून एक गोष्ट लक्षात आली की ग्रामीण महिलेला ‘मी जबाबदार झाले’ असे वाटायला लागले की आईची आठवण होते मग कोणी आईला देवदर्शनाला नेऊन आणते तर कोणी तिचे मोतीबिंदूचे ऑपरेशन होईल असे बघते .. तर कोणी स्वतःच्या घरीच आईचे ‘माहेरपण’ करते. तिच्या खुलभर दुधाची कहाणी आशा तृप्त करणाऱ्या गोष्टीतून सुरू होते. 

आता स्थानिक राजकारणात सर्व पक्षात आपल्या बैठकीत प्रशिक्षण झालेल्या उमेदवार असतात. काही जणी निवडणूकीला ‘बिन विरोध केलेत तरच होईन!’ अशीही अट घालतात. काही झाले तरी आता ‘आपल्यां’ प्रशिक्षित महिलांना डावलता येत नाही, हे मात्र नक्की! या वर्षी शासनाने ग्राम पंचायतीच्या पातळीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला. आपल्या सोबत काम करणाऱ्या २०-२५ कार्यकर्त्यांना मिळाला. काहींनी ही संधी दुसऱ्यांना मिळूदे अशीही भूमिका घेतली! हाही एक नेतृत्वाचा प्रगल्भ अविष्कारच होता. 

नेतृत्वाच्या उपक्रमात सहभागी झाली की ‘मी गावातच रहाते, काय करू शकणार?’ अशी निर्वाणीची भाषा कोणीच करत नाही. तर सर्व मर्यादा सांभाळून ‘आपल्याच गावात नांदायचे थाटात, भिऊन शान आता भागायचे नाही!’ असा वसा गटाने घेतला आहे हे तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होत आहे!

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६