मागे वळून बघताना १३  – आरोग्यदायक चूल

आरोग्यदायी चूल!

ग्रामीण महिले सोबत काम करताना ‘ती’चे कष्टप्रद जीवन सतत समोर दिसत असते. ‘ती’च्यांच शब्दांत सांगायचे तर ‘जीवाला कधीच उसंत नसते’. त्यामुळे बैठकीच्या निमित्ताने शारीरिक काम न करता नुसते बसले तरी तिला सहज डोळा लागतो.. कारण शरीर कायमच थकलेले असते!

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे सरपण-लाकूडफाटा भरून ठेवायचे दिवस. या १००-१२५ दिवसांत दुर्गम गावातल्या महिला वर्षभरासाठी किमान ५ टन लाकूड फाटा भरून ठेवतात. चुलीवर स्वयंपाक करायचा, रोज आंघोळीचे पाणी तापवायचे तर ५-६ माणसाच्या कुटुंबाला एवढे लागणारच!

आपण नेहमी बघतो ती सगळीकडे दिसणारी चूल, महिलेच्या आरोग्याला किती हानीकारक आहे यांची सुशिक्षित माणसाला कल्पनाच नसते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सप्टेंबर २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार भारतात दर वर्षी निदान ५ लाखाहून जास्त बायका-मुलं चुलीच्या धूरामुळे अकाली मृत्युमुखी पडतात तर जगातला हाच आकडा ४० लाखांवर आहे. (Pre-mature death because of indoor air polution), त्यातली ८% फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यामुळे तर २७% निमोनियाने… ही अतिशयोक्ती नाही. 

  बाई चुलीवर रोज स्वयंपाक करते तेव्हा चुलीचा जो धूर तिच्या फुफ्फुसात जातो, तो धूर जणूकाही रोज १०० सिगरेट ओढण्याइतका असतो, त्याने ‘ती’चे फुफ्फुस आतून हळूहळू निकामी करतो. चाळिशीच्या बाईचे फुफ्फुस किती कार्यक्षम आहे असे आपण दीनानाथ रुग्णालयात तपासले तर ३५ -४० वर्षांच्या बाईचे फुफ्फुस ८ वर्षांच्या मुलांच्या फुफ्फुसा इतके लहान झालेले असते. 

हा चुलीचा धूर जर डोळ्यात गेला तर डोळ्याचेही आजार बळावतात. आणि चुलीसाठी लाकडे वाहून कणा झिजतो. कारण ग्रामीण भागातले सर्वसाधारण कुटुंब वर्षभरासाठी किमान ५ टन म्हणजे ५००० किलो लाकूड वापरते. ही लाकडे डोंगरावरून आणण्याचे कामही ‘ती’लाच करावे लागते. लाकूड जवळच्या डोंगरावर जाऊन म्हणजे सरासरी ३ किमी. अंतरावरून डोक्यावरून वाहून आणावे लागते. एक मोळी साधारण ३०-३५ किलोची असते म्हणजे वर्षातले साधारण १००-१२५ दिवस रोज ४-६ तास ती बाई लाकूडफाटा आणणे असे ‘बिन पैशाचे’ काम करत असते! लाकूड फाटा आणताना २-३ तास वेड्यावाकड्या चढ-उतारांच्या रस्त्यावर हे ओझे ‘ती’च्या डोक्यावर असते. असे वजन सातत्याने वाहून आणल्यामुळे तिचा कणा झिजतो आणि त्यामुळे कण्याच्या त्रासाने ती बेजार असते.

या सगळ्या आरोग्यहानीचा परिणाम असा दिसतो की चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे वय, असलेल्या वयापेक्षा जास्त वाटते.. वार्धक्य लवकर येते. शहरात रहाणाऱ्या बाईपेक्षा गावातली बाई कमी जगते. कारण गरीबीमुळे अशा समस्यांना ‘ती’ला तोंड द्यावे लागते. जसजसे वय वाढते तसतसा वजन उचलल्यामुळे होणारा त्रास जास्त व्हायला लागतो आणि त्यामुळे स्वाभाविकच हे काम वयाने लहान असणाऱ्यांकडे जाते. हे चुलीसाठी लाकूडफाटा आणायचे काम इतके अपरिहार्य असते की अनेकदा गरोदर महिलांना सुद्धा हे काम करावे लागते. त्यामुळे आपल्या गारोदर पणाच्या तपासणीसाठी येणाऱ्या महिलांमध्येही गर्भपाताच्या समस्येला सामोऱ्या जाणाऱ्या काही थोड्या नाहीत. 

लाकूडफाटा तोडीने निसर्गाचीही हानी होते. एक घर किमान ५ टन लाकूड तोडते तसे आख्खे गाव लाकूड फाटा आणते. पण लाकूड तोडणारे घर वर्षाला ५ टन लाकूड तयार होईल एवढी झाडे लावत नाही. यामुळे लाकडे मिळण्याची ठिकाणे दिवसेंदिवस गावापासून लांब लांब जायला लागली आहेत. पूर्वी जंगले/ लाकडासाठीची माळराने जेवढी गावाजवळ होती तेवढी आता राहिली नाहीत, असे सर्वच ग्रामीण भागात वयाने मोठ्या असणाऱ्या महिला सांगताना दिसतात. फक्त ‘पर्यावरण दिवस’ साजरा करण्यासाठी केलेले वृक्षारोपण यासाठी उपयोगी पडत नाही. 

चुलीबद्दल वैज्ञानिक माहिती: आपण ज्या चुली नेहमी बघतो, ज्या चुलीवर ग्रामीण भागात स्वयंपाक केला जातो त्या चुलीचा जाळ चुलीवरचे भांडे जेवढे गरम करते त्यापेक्षा जास्त आजूबाजूची हवा गरम करते म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचे तर पारंपारिक चुलीची कार्यक्षमता (एफिशियंसी) फारच कमी असते. किती कमी असते तर फक्त १३-१४% असते. निळी ज्योत असणारे इंधन प्रदूषण मुक्त आहे पण परवडत नाही. इंधन म्हणून गॅस वापरायचा तर दिवसाची खर्च २०-२५ रुपये येतो तेवढा करता येत नाहीत अशी घरे अजून आहेत. एखाद्या संध्याकाळच्या हॉटेलच्या जेवणाचे दीड-दोन हजारांचे सहज बिल भरणाऱ्या हल्लीच्या मध्यमवर्गाला हे माहिती तरी आहे का? 

कार्यक्षमता चांगली असणारी चूल वापरणे हे अनेक आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या प्रश्नांचे उत्तर आहे ही लक्षात घेऊन स्त्री शक्ती प्रबोधनच्या कामाचा भाग म्हणून आपण आरोग्यपूर्ण, पर्यावरण पूरक चुली वाटप करण्याचे काम आपण केले, ही काम गेली ८ वर्ष सुरू केले आहे. माहिलांना आधुनिक चुलीचे प्रात्यक्षिक दाखवले. ती चूल अशी आहे की ज्या चुलीला खालून हवा येण्यासाठी पंखा आहे, तो चार्ज करायची सोय आहे. पंख्यामुळे चुलीतील इंधनाला जळताना पुरेशी हवा (ऑक्सीजन) मिळतो, त्यामुळे कार्यक्षमता ४०% पर्यन्त वाढली आहे. एरवी ७-८ किलो लागणाऱ्या लाकडं ऐवजी ८०० ग्रॅम इंधनकांडी मध्ये तेवढीच उष्णता मिळते, आधुनिक पंख्याच्या चुलीत इंधनकांडी वापरता येते जी शेतात तयार होणाऱ्या काडी-कचऱ्या पासून बनवता येते. या चुली वापराचा उद्देश एकच की ग्रामीण बाईचे आयुष्य सुधारले पाहिजे. 

अशा चूल वापरण्या बद्दल जाणीव जागृती केली. चूल वापरायची प्रात्यक्षिके गावोगावी करून दाखवली. एका कुटुंबासाठी कोणीतरी ७-८ हजारांची देणगी दिली तरी वापरणाऱ्या कुटुंबाने चूल नक्की वापरावी म्हणून ५०० रुपये तरी भरायचे. या प्रत्येकक्षिकांमुळे जाणीव जागृती तर झालीच पण नावनोंदणी सुद्धा चांगली झाली. सध्या भोर-वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागात अशा ३०० पेक्षा जास्त चुलींचे वाटप केले आहे. अपवाद वगळता सगळ्या वापरात आहेत. त्यामुळे बाईला रणरणत्या उन्हाळ्यात विश्रांती मिळाली आणि वेळही मिळाला. या प्रयोगासाठी आधी वैयक्तिक देणगीदारांनी पुढाकार घेतला यशस्वी होत आहे असे दाखवल्यावर कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी या उपक्रमाला दिला म्हणून हे जमले. तरीही ते सिंधूतील बिंदू इतकेही नाही! 

एका कुटुंबासाठी ५ टन लाकूड उत्पादन करायची व्यवस्था वृक्षारोपणातून करण्यापेक्षा, आहेत तिच झाडे तोडण्यापासून वाचवणे, हा हिरवाई टिकवण्याचा खात्रीशीर उपाय होऊ शकतो असे यातून लक्षात आले. 

या चुली वाटापाला पूरक असणारी इंधन कांडी बनवणारी २ युनिट भागातच चालू आहेत. त्या बद्दल पुढे कधीतरी ऐकूया! पण आशा अनेक उनिटस् ची गरज आहे ही तुमच्या लक्षात आले असेल.

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६