मागे वळून बघताना ५: आरोग्याची मूलभूत गोष्ट… गाव विकासाची नवी व्याख्या!

बचत गटामुळे ग्रामीण महिलांची नात्यापलिकडच्या कारणांसाठी एकत्र यायला सुरुवात झाली. दर महिन्याला बचत गट होत होते. गटाचे व्यवहार चालू असताना पैशाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या २-३ जणी त्यात गुंतलेल्या असतात. बाकीच्या महिला फक्त गप्प बसू शकत नाहीत आणि त्यावेळी जी चर्चा होते त्यातून ग्रामीण महिलाविश्वातल्या जिव्हाळ्याच्या अनेक विषयांना वाचा फुटते.

आरोग्य हा विषय तर कायमच चर्चेतला विषय असायचा. ‘काम करुन अंग मोडून आलं’ अशा वाक्याने सुरवात होऊन वेगवेगळे उपाय सांगितले जातात…त्यातच एक गोळी खाऊन झोप असाही उपाय असतो… पण ‘गोळी आणायला सुध्दा जाववंत नाही!’ इथे थांबलेला संवाद…. ‘बाईपणाचे भोग अन् दुसरं काय!’ इथं संपतो!!

ग्रामीण महिलांच्या सोबत काम करताना लक्षात आले की आरोग्याचा प्रश्न वैद्यकीय नसून त्याला आर्थिक पैलू आहे, आजाराच्या परिणामाची भीती वाटणे असा मानसिक पैलू आणि डॉक्टर ‘पुरुष’ असणे असा लिंगाधारीत भेद अशीही कारणे तेवढीच महत्त्वाची आहेत.

१९९७-२००० काळात जेव्हा ज्ञान प्रबोधिनीने ग्रामीण कामाचा भाग म्हणून शासन पथदर्शी प्रयोगात आरोग्याचे काम करणारी आरोग्य प्रबोधिका गावातच उभी केली तेव्हा तिला प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात सर्दी, ताप, उलटी, जुलाब यावर गावातच कसे औषध द्यायचे हे शिकवले. त्यात बाळाला / लहानग्यांना ताप आला तर पातळ, गोड औषध द्यायचे तर मोठ्यांना ताप आला तर गोळी असे शिकवले. खोकला व तापाचे लहानांचे औषध लाल रंगाचे दिसले तरी औषध वेगळे असते इथून शिकवावे लागले. औषध गावातच मिळत असले तरी ‘औषध’ ही त्या काळात कोणाचीच गरज नव्हती…. तरीही अशी व्यवस्था आपण अनेक वर्ष सांभाळली कारण हा उपक्रम आरोग्य शिक्षणासाठी होता…. या यशस्वी प्रयोगानंतर शासनाने गावात ‘आशा’ नेमल्या! परिणामी पुढची पिढी आजाराला औषध मागणारी बनली!

आता आपण शासनाच्या आशा सेविकांसोबत ‘आरोग्य सखी’ गावागावात नेमली. जे काम शासनाच्या कामाचा भाग म्हणून आशा सेविका करत नाहीत, त्याचे प्रशिक्षण दिले. त्यामध्ये सकस आहारा पासून पाळीविषयी माहिती देण्या बद्दल विषय होते. गावातच रहाणारी असली की एक वेगळा विश्वास असतो, संवादात सहजता असते. अनेक बारीक बारीक प्रश्न तिला स्वाभाविकपणे विचारले गेले. त्त्यात सणवार जवळ आला की ‘पाळी पुढे ढकलायची गोळी कुठली?’ असा सगळ्यात जास्त विचारला जाणारा ‘अधुनिक’ सुनांचा प्रश्न होता हे लक्षात आले!

आरोग्य सखींच्या मदतीने नुकतेच एक सर्वेक्षण केले, लग्न होऊन साधारण ३-४ वर्ष झालेल्या महिलांचे! त्यात प्रश्न होता ‘सॅनिटरी नॅपकिन वापरता का?’ ‘हो’ उत्तर देणाऱ्यांना विचारले, ‘त्यासाठी महिन्याला लागणारे 35-40 रुपये तुम्हाला घरून मिळतात का?’ यासाठी/यावर ‘तुम्ही नवऱ्याशी बोलता का?’ इथे नोंदवायला खेद होतो की एकाही ‘अधुनिक’ सुनेने हा विषय आम्ही नवऱ्याशी बोलू शकतो आणि त्याच्याकडून घेऊन महिन्याला 35 40 रुपये खर्च करू शकतो असे उत्तर दिले नाही. या सुना ‘अधुनिक’ म्हणजे सासऱ्याच्या उपस्थितीत ज्या गाऊन घालू शकतात अशा होत्या. पेहराव अधुनिक होता पण या सुनांनाही ‘याच्याशी नवऱ्याचा काय संबंध?’ हे ‘कळत’ नव्हते…. अनेकींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच दिसत होते. लग्न झाल्यानंतर काही वर्ष माहेरून मिळणाऱ्या पैशातून अनेकजणी सँनिटरी नँपकीनसाठी लागणारा खर्च करत होत्या. मुलवाल्या मात्र रोजच्या किराण्याला नवऱ्याकडून मिळणाऱ्या पैशातून ‘पैसे वाचवून’ त्यातून हा खर्च करत होत्या.

त्यामुळे मासिक पाळी संबंधातील प्रश्न किती महिला धार्जिणा आहे असे आमच्या कार्यकर्त्यांच्या पुन्हा एकदा लक्षात आले!

गावातल्या दुकानात आरोग्याला हानीकारक असली तरी पुरुष माणसाची गरज भागावी म्हणून तंबाकूची पुडी अगदी सहज मिळते पण गरजेचे सॅनिटरी नॅपकिन मिळत नाही. त्यात कधीच न बोलला जाणारा ‘शिवाशिवी’चा भागही असतोच! त्यामुळे सँनिटरी नँपकीन खरेदीला लागणारे पैसे म्हणजे तिच्या गावापासून बाजाराच्या गावापर्यंतचा प्रवासखर्च सुद्धा धरायला हवा असे अनेकींनी सुचवले…. कारण या विषयाशी ‘संबंध नसणारा’ नवरा बाजाराला गेला तरी ‘हे’ आणू शकत नाही!

मग जरा चौकशीच केली की मेडिकल मधे मिळणारे अजून काय काय गावात मिळायला हवे? तर ताप, डोकंदुखी, अंगदुखी यावर उपाय करणारी रुपया-दोन रुपयाची गोळी असे उत्तर आले!शासनाने सर्वदूर राबवलेल्या ‘सर्व शिक्षा अभियाना’च्या कामामुळे म्हणा किंवा आरोग्य खात्याच्या कामामुळे म्हणा समाजात जागृती झाली आहे. आता ताप आला म्हणून कोंबडीचा नैवेद्य दाखवण्याऱ्या मागच्या पिढीपेक्षा आ़धी गोळी खाऊया असे वाटणारी नवी पिढी तयार झाली आहे. पण गावात गोळी मिळण्याची सोय नाही. गावातच शासनाची आशा वर्कर रहात असली, तिच्या स्टॉकमध्ये गोळी असली तर फुकट गोळी मिळेल. पण विकत मिळण्याची सोय नाही. वेल्हे तालुक्यात लोकसंख्या कमी आहे त्यामुळे साधारण ४०-५० गावात मिळून एक औषधाचे दुकान आहे…. बाईमाणसाला २₹ गोळी आणायला ३०-४०₹ खर्च किंवा २-३ तास चालत जावे लागते. ‘कोपऱ्यावरच्या दुकानात वाईन मिळावी ती कुठे दारु आहे?’ असे वाटणाऱ्या एकाही पुढाऱ्याला स्वाभिमानाने विकत घेऊ शकेल अशी ताप उतरवणारी गोळी गावात मिळावी असे काही करावेसे का वाटू नये? मला कळतच नाही.

जगभरच्या विकासाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर सरासरी आयुर्मर्यादा वाढयला हवी. त्यासाठी या विषयावर पंचतारांकीत हॉटेलमधल्या सेमिनारमध्ये तावातावाने मतप्रदर्शन करण्यापेक्षा तापाची-अंगदुखीची -डोकंदुखीवर उपाय करणारी गोळी गावात सहज मिळेल, महिलेला ‘सर्वार्थाने’ स्विकारले म्हणून सँनिटरी नँपकीनही गावात मिळतील असे करायला हवे. करोना काळात ‘ही’ गरज ओळखून आपण गावागावात आरोग्य सखीकडे विक्रीसाठी ठेवले. महिलांनी ते विकत घेतले. प्रत्येक वेळी गावात गोष्ट फुकटच हवी असं नसतं पण हवी असते हेही समजून घेतले पाहिजे!मला तर वाटते नवीन ‘विकासाच्या व्याखेत’ अशा गरजेच्या गोष्टी गावातच मिळायला लागल्या की गावाचा विकास झाला असे आपण म्हणायला हवे!!

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६