घटस्थापना‌

‌’घटस्थापना‌’ सार्थ विधी

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत नवरात्री उत्सव साजरा केला जातो. आश्विन शुद्ध दशमीला दुर्गाविजयस्मृति – विजयादशमी उत्सवाने याची सांगता होते. वर्षा ऋतूत सुस्नात होऊन सुप्रसन्न झालेली सृष्टी शारदीय चंद्रप्रकाशाने उजळून जाते आहे. वातावरणात उत्साहपूर्ण चैतन्यलहरी उसळून येण्याचा हा काळ आहे. नवरात्रोत्सवात शक्तीचे-महाशक्तीचे नाना आविष्कार आपल्या नजरेस पडतात. आसेतु-हिमाचल सारा देश आपापल्या वैशिष्ट्यानुसार या आदिशक्तीची उपासना करतो.

सुगीच्या काळात हा उत्सव साजरा होत असतो. खरीपाचे पीक हातात आलेले असते. मशागत करून रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकरी तयारीत असतो, या काळात दुर्गापूजा केली जाते. पीकचक्राचा तो अविभाज्य भाग आहे. दुर्गेचे वनस्पतींशी-वृक्षांशी व भूमीच्या सुपीकतेशी चिरंतन नाते आहे. तीच शाखांबरी आहे. तीच अन्नपूर्णा आहे. महालक्ष्मी, महासरस्वती महाकालीच्या रूपात तीच प्रकट होते. अशा या आदिशक्तीचे आवाहन व पूजन आता आपण करूया आपल्यामध्ये आदिशक्तीचे विविध गुण बाणविण्याचा संकल्प करू या.

* पूजेचे साहित्य : हळद-कुंकू, गंध, अक्षता, उदबत्ती घर, उदबत्ती, निरांजन, तूप, वाती, फुलवात, पंचामृत, नैवेद्य, विड्याची पाने, कापूर, सुपारी, फुले, कापसाची वस्त्रे, सुटी नाणी, देवीची मूर्ती, कलश, दोन ताम्हने, मातीचा कलश (घट), फुलपात्र, पळी, पत्रावळ, लाल अथवा काळी माती, सप्त धान्ये, फुलांची माळ, तांदूळ, पाट, समई, आंब्याची डहाळी, नारळ.

अध्वर्यू पाठोपाठ सर्वांनी त्रिवार ॐकाराचा उच्चार करावा.

हरिः | | |

आचमन

पहिल्या तीन नमनांच्या वेळेस आचमन करावे. चौथ्या वेळेस उदक सोडावे.

केशवाय नमः | नारायणाय नमः |

माधवाय नमः | गोविन्दाय नमः |

आता पूजेच्या आधी पूजा करणाऱ्याची आणि या परिसराची शुद्धी करूया. पूजा करणाऱ्यांनी फुलाने आपल्या मस्तकावर आणि नंतर चारी दिशांना पाणी शिंपडावे.

अध्वर्यू आणि उपस्थित :

पवित्र किंवा अपवित्र, असुदे स्थिती कोणती |

प्रभूला आठवीती जे, होती पावन सर्व ते

पहा निर्मळ दिशा दाही, अमंगल पळे दूरी |

अशा निर्मल स्थळी आता, वसावे तुम्हि गणपती

आता परब्रह्मस्वरूप गजाननाला वंदन करून पूजेचा संकल्प करू या.

अध्वर्यू पाठोपाठ सर्वांनी डोळे मिटून हात जोडून म्हणावे.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ |

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

अध्वर्यू :- कोटिकोटि सूर्याचे तेज धारण करणाऱ्या महाकाय श्रीगणेशा! आम्ही आज श्रीदुर्गेची प्रतिष्ठापना करून तिची यथासांग पूजा करणार आहोत. त्या पवित्र कार्यासाठी काहीही अडचण येऊ नये, अशी व्यवस्था आपण करावी ही प्रार्थना.

(आता श्रीगजननाचे पूजन करू या.)

* अध्वर्यू आणि पूजक :-

श्रीमन्महागणपतये नमः | सकल पूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि |

श्री महागणपतीला नमस्कार असो. पूजेसाठी गंध, अक्षता, फुले इ. अर्पण करतो.

श्रीगणाध्यक्षाय नमः | नैवेद्यं समर्पयामि |

हा नैवेद्य आम्ही आपल्यासाठी अर्पण करतो.

(आता आपण संकल्प करू या.)

संकल्प :- अध्वर्यू पाठोपाठ पूजक

अध्वर्यू :- या पृथ्वीवरील वैवस्वत मनूच्या काळात, जम्बूद्वीपात, भरतवर्षात, … नगरात/गावात, बौद्धावतारात, … नावाच्या संवत्सरात,… ऋतूत,. .. महिन्यात, … पक्षात….. तिथीस,…. वारी,…. नक्षत्रावर आमच्या परिवारास क्षेमकुशल, स्थिरता, उत्तम निरोगी आयुष्य, वैभव लाभावे व आमच्या सर्व प्रकारच्या दुर्बलतेचा निरास व्हावा यासाठी आणि श्रीदुर्गादेवीच्याद्वारे आमच्या शत्रूचा नाश व्हावा व आम्हास नावलौकिक लाभावा व पुरुषार्थ सिद्ध व्हावा यासाठी आजपासून नवमीपर्यंत महाकाली-महालक्ष्मी- महासरस्वतीच्या रूपात अवतीर्ण होणाऱ्या नवदुर्गेस प्रसन्न करून प्रतिदिन मालासमर्पण, अखंडदीप इत्यादी नियमांनी युक्त दुर्गानवरात्रपूजन आम्ही करणार आहोत.

अध्वर्यू : आपल्या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे आपण फक्त देवाच्या मूर्तीचीच नाही तर पूजेशी संबंधित सर्व साधनांचीही पूजा करतो आणि त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करतो. त्यामुळे आजच्या पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या कलश, शंख, घंटा, दीप इत्यादि साधनांची आधी पूजा करू या.

ज्या कलशातल्या पाण्याने आपण गणपतीला स्नान घालणार आहोत त्याची आता पूजा करूया. या कलशातील पाणी साधेसुधे नसून भारतातील सर्व पवित्र नद्यांतील जल या कलशात आहे अशी कल्पना करू या. (कलशाची पूजा करावी)

अध्वर्यू आणि उपस्थित :

सिंधू, कावेरी, नर्मदा, यमुने, गंगे, गोदे, सरस्वती|

देवासाठी तुम्ही ठेवा, धार भक्तीची वाहती

अध्वर्यू : आता शंखदेवाची पूजा करूया.

अध्वर्यू आणि उपस्थित :

जन्मला सागरापोटी, विष्णूने धरिला करी |

अशा त्या पांचजन्याला, नमस्कार असो सदा

अध्वर्यू : शुभशक्ती इथे याव्यात आणि दृष्ट किंवा अशुभ शक्ती इथून दूर जाव्यात म्हणून आपण घंटानाद करूया, (घंटेची पूजा करावी आणि घंटानाद करावा.)

अध्वर्यू आणि उपस्थित :

शुभाला बोलवीते  ती, अशुभा दूर सारते |

म्हणोनि घंटादेवीची, पूजा ही बांधली इथे |

अध्वर्यू : आता दिव्याची पूजा करूया. तेजाचे प्रतीक असलेल्या आणि अज्ञानाचा, मोहाचा अंधार दूर करणाऱ्या दिव्याकडे ज्ञान मागूया.

अध्वर्यू आणि उपस्थित :

दीपा, अज्ञानरात्रीच्या अंधारा नाशवी आता |

करी प्रकाश ज्ञानाचा, देई तेज प्रसन्नता

अध्वर्यू : पूजेच्या साधनांची पूजा केल्यावर आता मुख्य पूजेकडे वळूया.

नवरात्रपूजेच्या सुरुवातीला प्रतिपदेस करावयाचा कलशस्थापनेचा विधी करू या.

प्रथम कलशात पाणी घालावे. त्यात गंध, फूल, अक्षता, सुपारी, नाणे, कापूर इत्यादी घालावे. कलशावर पाच पाने असलेली आंब्याची डहाळी ठेवावी. त्यावर तांदूळ घालून ताम्हन ठेवावे. (पत्रावळीवर तांबड्या अथवा काळ्या मातीची वेदी तयार करावी.) असा कलश तांबड्या अथवा काळ्या मातीच्या वेदीवर स्थापित करावा. कलशाला दोन्ही हात लावून अध्वर्यू पाठोपाठ पुढील श्लोक म्हणावेत.

कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः |

मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः

अध्वर्यू :- कलशाच्या मुखस्थानी विष्णू, कंठस्थानी शिव आणि मूलस्थानी ब्रह्मदेव आहेत. मध्यस्थानी मातृगणांचा निवास आहे.

श्रीवरुणाय नमः | सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि |

अध्वर्यू :- वरुणदेवतेला नमस्कार असो. पूजेच्या सर्व उपचारांसाठी गंध, अक्षता, फुले वाहतो.

आता कलशातील ताम्हनावर तांदुळावर कुंकवाने अष्टदल काढून त्यावर देवीची मूर्ती स्थापन करावी.

अशाप्रकारे देवतास्थापन विधी संपन्न झाला.

यानंतर घटाभोवती तांबडी वा काळी माती पसरावी. त्या मातीत नवधान्य, भात, गहू, मका, मूग, हरभरे इत्यादी पेरावे. त्यावर पुन्हा माती पसरावी.

आवाहन :-  जी देवी भूतमात्रात बुद्धिरूपात राहते |

 नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः |

जी देवी भूतमात्रात शक्तिरूपात राहते |

नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः |

जी देवी भूतमात्रात लक्ष्मीरूपात राहते |

नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः |

विश्वाला व्यापुनी पूर्ण जी राहे दिव्य चेतना |

नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः |

दीप स्थापना पूजा

जेथे दीपाची स्थापना करावयाची आहे. तेथे अक्षता ठेवाव्यात. त्यावर दीपाची स्थापना करून तो प्रज्वलित करावा व अध्वर्यू पाठोपाठ उपासकाने लोक म्हणावा.

दीपदेवतायै नमः | सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि |

 

अध्वर्यू :-                    एकाग्र चित्ताने व्रताचा

                                 निश्चये अंगिकार केला |

                                 अखंड दीप नवरात्रीचा

                                 आदिशक्तीसाठी उजळविला

आता आपण देवीचा ध्यानमंत्र हात जोडून म्हणू या. अध्वर्यू पाठोपाठ सर्वांनी म्हणावे.

* अध्वर्यू :-            सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सवार्थसाधिके |

                      शरण्ये त्र्यंबके गौरि, नारायणी नमोऽस्तुते ॥

सर्वांचे मंगल करणाऱ्या, सर्व हेतूंची पूर्तता घडवून आणणाऱ्या, सर्वजण ज्यांना शरण जातात अशा हे पार्वतीदेवी, हे लक्ष्मीदेवी, तुम्हांला नमस्कार असो.

* आवाहन आसन :- आता आदिशक्ती स्वरूपातील श्रीमहाकाली- महालक्ष्मी-महासरस्वतीचे व नवदुर्गांचे आवाहन करू या. हात जोडून सर्वांनी श्रीमहालक्ष्मी- श्रीमहाकाली-श्री महासरस्वतीला नवदुर्गाला म्हणजेच आदिशक्तीला येथे येण्याची विनंती करू या.

श्री आदिशक्त्यै नमः |

श्री आदिशक्तिम्‌‍ आवाहयामि |

आसनार्थे अक्षतान्‌‍ समर्पयामि|

श्री आदिशक्तीला नमस्कार असो. आदिशक्तीचे आवाहन करतो. आसनासाठी अक्षता अर्पण करतो.

श्रीमहाकाल्यै नमः| पादयोः पाद्यं समर्पयामि |

पाय धुण्यासाठी फुलाने पाणी शिंपडावे.

श्रीमहालक्ष्म्यै नमः | हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि |

हात धुण्यासाठी फुलाने पाणी शिंपडावे.

श्रीमहासरस्वत्यै नमः| आचमनीयं समर्पयामि |

पिण्यासाठी पाणी अर्पण करावे.

श्रीकालरात्र्यै नमः | स्नानीयं समर्पयामि |

स्नानासाठी फुलाने पाणी शिंपडावे.

श्रीमहागौर्यै नमः | पञ्चामृतस्नानं समर्पयामि |

फुलाने पंचामृत शिंपडावे.

श्रीसिद्धिदात्र्यै नमः | शुद्धोदकस्नानं समर्पयामि |

फुलाने शुद्ध पाणी शिंपडावे.

श्रीनवदुर्गायै नमः | उष्णोदकस्नानं समर्पयामि |

फुलाने गरम पाणी शिंपडावे.

श्रीचण्डिकायै नमः| अभिषेकस्नानं समर्पयामि |

अभिषेकासाठी फुलाने पाणी शिंपडावे.

श्रीकपालिन्यै नमः | वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि|

कापसाचे वस्त्र व उपवस्त्र अर्पण करते/करतो.

श्रीशैलपुत्र्यै नमः| विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि |

अंगाला लावण्यासाठी हे चंदन अर्पण करते/करतो.

श्री ब्रह्मचारिण्यै नमः |

हरिद्राकुंकुमादिसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि |

हळद-कुंकू (हिरव्या बांगड्या) इत्यादी सौभाग्यद्रव्ये अर्पण करते/करतो.

श्री चन्द्रघण्टायै नमः |

पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि |

ऋतूनुसार उपलब्ध फुले अर्पण करते/करतो.

श्री कूष्माण्डायै नमः | सुवासार्थे धूपम्‌‍ आघ्रापयामि |

सुवासासाठी उदबत्ती ओवाळते/ओवाळतो.

श्रीस्कंदमात्रे नमः | प्रकाशार्थे दीपं दर्शयामि |

प्रकाशासाठी दीप ओवाळते/ओवाळतो.

श्री कात्यायन्यै नमः| नैवेद्यं समर्पयामि|

                                प्राणाय स्वाहा | अपानाय स्वाहा |

                                व्यानाय स्वाहा | उदानाय स्वाहा |

                                समानाय स्वाहा| ब्रह्मणे स्वाहा |

परब्रह्मशक्तीला नैवेद्य अर्पण करते/करतो.

श्री जगदम्बिकायै नमः |

मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि|

दक्षिणां समर्पयामि |

मुखवासासाठी सुपारीसह विडा अर्पण करते/करतो. दक्षिणा अर्पण करते/करतो.

 

* मालाबंधन :- घटावर विविध फुलांची माळ लोंबती बांधणे हा महत्त्वाचा विधी आहे. अध्वर्यू पाठोपाठ सर्वांनी म्हणावे.

माला हि सर्वदेवानां प्रीतिदा शुभदा यतः |

लंबितासौ मया भक्त्या गृहाण जगदम्बिके |

श्री महाकालीमहालक्ष्मीमहासरस्वतीनवदुर्गा देवताभ्यो नमः |

प्रथमेह्नि पुष्पमालां समर्पयामि |

पुष्पमाला ही सर्व देवांचे प्रेम व कल्याण देणारी आहे म्हणून हे जगदम्बिके मी भक्तीने बांधलेली ही प्रथम माळ तू स्वीकारावीस पुष्पमाला अर्पण करते/करतो.

(दुसऱ्या दिवसापासून मालाबंधनाचे वेळी प्रथमेह्नि ऐवजी द्वितीयेह्नि, तृतीयेह्नि, चतुर्थेह्नि, पंचमेह्नि, षष्ठेह्नि, सप्तमेह्नि, अष्टमेह्नि, नवमेह्नि याप्रमाणे बदल करावा.)

* महानिरांजनदीप :- तबकात निरांजन व कापूर लावून घ्यावा. (सर्वांनी उभे रहावे.)

श्री प्रकृत्यै नमः |

महानिराञ्जनदीपं समर्पयामि |

* श्री देवीची आरती :-

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी | अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं |

वारी वारी जन्ममरणाते वारी | हारी पडलो आता संकट निवारी |

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी| सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी ॥1॥

त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही | चारी श्रमले परंतु न बोलवे काही|

साही विवाद करिता पडिले प्रवाही | ते तू भक्तालागी पावसि लवलाही | जयदेवी जयदेवी…॥2॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा| क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा |

अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा| नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा|  जयदेवी जयदेवी…॥3॥

                                कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्‌‍ |

                                सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि

* मंत्रपुष्प :- सर्वांनी पुढील मंत्र म्हणून घटावर फुले वहावीत.

 

महालक्ष्म्यै विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि |

तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥

श्रीमहाकालीमहालक्ष्मीमहासरस्वतीनवदुर्गा देवताभ्यो नमः |

मंत्रपुष्पं समर्पयामि |

* कुमारीपूजन :- देवीपूजनानंतर कुमारीपूजन करावे.

* कुमारी आवाहन :-             

मन्त्राक्षरमय, लक्ष्मीस्वरूप, मातृकांचे रूप धारण करणाऱ्या व साक्षात् नवदुर्गात्मिका अशा कन्येचे मी आवाहन करतो.

कुमारिकेला पाटावर बसवून पाद्यपूजन करावे, गंध-फूल-वस्त्र-पुष्पमाला- पंचामृत देऊन मिष्टान्न भोजन द्यावे.

 

* सायंकालीन पूजा *

सायंकाली पंचोपचार पूजा करावी.

शुचिर्भूत होऊन देवीसमोर बसावे. आचमन करावे. प्राणायाम करावा.

त्यानंतर देवीचे ध्यान करावे.

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः |

 नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्‌‍

 

                                ॐ श्री आदिशक्त्यै नमः| चन्दनं समर्पयामि |

                                श्री महाकाल्यै नमः| पुष्पं समर्पयामि |

                                श्रीमहालक्ष्म्यै नमः| धूपम्‌‍ आघ्रापयामि |

                                श्रीमहासरस्वत्यै नमः | दीपं दर्शयामि |

                                श्री नवदुर्गायै नमः | नैवेद्यं समर्पयामि |

यानंतर आरती करून मंत्रपुष्प अर्पण करावे.

 

* नवरात्रोत्थापन विसर्जन*

रोजच्याप्रमाणे षोडशोपचार पूजा, महानैवेद्य, मालाबंधन करून घटोत्थापनाचा संकल्प करावा.

संकल्प : या पृथ्वीवरील जंबुद्वीपात, भारत देशात, महाराष्ट्रात, ……… गावात, ….. नावाच्या संवत्सरात, …… ऋतुत, आश्विन महिन्यात, शुद्ध पक्षात, ….. तिथीस, ….. वारी, …… नक्षत्रावर आम्ही येथे श्रीमहाकाली-महालक्ष्मी- महासरस्वती-नवदुर्गादि देवतांचे उत्थापन करत आहोत.

* प्रार्थना :-       जाणे आवाहन वा विसर्जन |

                      पूजा जाणे तव तू जनार्दन

                      जाणे काही तुजविण ईश्वरा |

                      क्षमा करावी मज दीन पामरा

खालील मंत्र म्हणताना घट, देवी, नंदादीप यावर अक्षता अर्पण कराव्यात.

* विसर्जनमन्त्र :-    यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम्‌‍ |

                            इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय

प्रस्तुत पूजेचा स्वीकार करून श्री आदिमायेने स्वस्थानी परत जावे. पण आमच्या मनोकामनांची पूर्ती करण्यासाठी पुनश्च यावे.