मागे वळून बघताना १६ – कातकरी

 

बचत गटाच्या कामाला सुरुवात झाली त्याला गावातल्या मुख्य गटाने प्रतिसाद दिला हे गेल्या लेखात आपण पाहिले. त्याकामात वंचित गटांसाठीच्या कामाची बरीच भर पडली गेली. गेल्या ८ वर्षा पासून प्रतिभाताईच्या पुढाकाराने वेल्ह्यातालुक्यात आपण कातकरी समाजासाठी काम सुरू केले. 

कातकरी समाज हा सामाजिक उतरंडीमध्ये सगळ्यात खाली त्यामुळे ‘विकास’ या  कुटुंबापर्यंत पोहोचलाच नाही. बहुतेक घरातल्या आई-वडील यांनी स्वतः कधी शाळा सुद्धा पाहिली नाही त्यामुळे जरी सर्व शिक्षा अभियानात मुलांनी शाळेत जायाला हवे असे सांगितले असले तरी पालक म्हणून त्यांना आग्रह धरणेही अवघडच होते. 

कातकरी लहान मुलांनी शाळेत जायचे का नाही? हा निर्णय ५-७ वर्षांच्या मुलांनी करायचा नसतो तर पालकांनी तो लावून धरायचा असतो. या वयात मूल शाळेत गेले नाही तर पुढे जाण्याची शक्यताच नाही. यासाठी पालक संवाद महत्वाचा हा संवाद बचत गटाच्या कामामुळे सोपा झाला. कधीच शाळेत न गेलेल्या माणसाला, वाचता सुद्धा येत नाही म्हणून कसे फसवले जाते त्याचा पालकांना अनुभव होताच पण शाळेत मुलांना पाठवण्याचा आग्रह आपल्या कामामुळे धरता आला. 

गावातल्या इतर मुलांच्या सोबत शाळेत जाऊन शिकण्यासाठी कातकरी मुलांना आंघोळ करणे, केस विंसरणे, दात घासणे अशा गोष्टी शिकवण्यापासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. जेव्हा मुलांचा गट एकदम नव्याने शाळेत जायला लागतो तेव्हा ‘गटाने जावे लागते’ म्हणजे शाळेत जायची प्रेरणा सुद्धा टिकेल असे समजून तायांनी मुलांची तशी तयारी करून घेतली, एवढेच नाही तर शाळेतल्या गुरुजींना भेटून सांगितले की, ‘आम्ही मुलांची तयारी करून पाठवत आहोत मुले बसतील असे बघा’ ज्या मुलांना वर्गात काय चाललं आहे ते कळलं ती टिकली, एवढा वेळ एकजागी बसायची सवयच नाही, वर्गात शिकवलेले काही कळत नव्हतं ती मात्र फार काळ जाऊ शकली नाहीत, शाळेला कंटाळली असंही झालं.  

ताईने युवती विकास उपक्रमात सहभागी होणाऱ्या युवतींचे ‘कातकरी’ अभ्यास शिबिरच घेतले. मग या वस्ती विकासाच्या कामामध्ये त्या युवती प्रशिक्षक म्हणून काम करायला तयार झाल्या. खरेतर त्यायुवतीही जवळपासच्या गावातल्याच होत्या लांबून वस्ती त्यांना माहिती होती पण तरीही त्या कधीही वस्तीवर गेल्या नव्हत्या. तिथले दारिद्र्य बघून त्यांनाही धक्का बसला. या कर्त्या गटाने मग वेल्हे भागातल्या सर्व वस्त्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून मुलांना खेळातून गोडी लाऊ.. मराठी गाणी शिकवू असे ठरवून गट कामाला लागला. 

आईच्या व्यसनांमुळे रात्रीचा स्वयंपाक घरात होईलच असे नाही असे लक्षात आल्यावर कातकरी वस्तीवर सकस आहार सुरू केला, नसरापूरला शाळा व वस्ती यामधून हायवे जातो, ‘पोरे रास्ता कशी क्रॉस करणार? म्हणून शाळेत जात नाहीत!’ असे पालकांनी सांगितल्यावर आपण वस्तीवर एक ताई नेमली जी शाळेच्या वेळेत मुलांना एकत्र करून शाळेत सोडेल व आणायला जाईल.. यामुळे २५-३० मुळे शाळेत जायला लागली. काही वस्त्यांवर बचत गट केले, काही ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली. अशा शिबिरांना पूर्वी अजिबात प्रतिसाद नसायचा पण आपण वस्ती विकासाचे काम सुरू झाल्यावर अगदी लहान मुलांच्या तपासणी शिबिराला सुद्धा आई मुलाला घेऊन यायला लागली, अपवादाने एखादी गरोदर महिला गर्भारपणात तपासणी शिबिरात यायला लागली, पण आरोग्याच्या काळजीने नाही तर ताईच्या आग्रहामुळे! स्वतःच्या आरोग्याकडे बघायला अजून वेल्हयातल्या कातकऱ्यांना शिकावे-शिकवावे लागणार आहे.  

सातत्याने ८ वर्ष असे काम सुरू आहे. वस्तीवर राहून मुलींनी शिकणे अजूनच अवघड आहे असे वाटले कारण अजूनही लहान वयात म्हणजे १४-१४ व्या वर्षी मुलींची लग्न होतात त्यामुळे एकीला पुण्यात कर्वे शिक्षण संस्थेत शिकायला पाठवले तिने ११ वी केले पण पुणे फार लांब वाटले म्हणून मग आपल्याच वेल्हे निवासात मुलींनी शिकायला यायचे आवाहन केले.. ४ जणींनी प्रयत्न केला पण एक जण टिकली चांगली शिकली, आज तिने दहावीची परीक्षा दिली. पुढेही शिकायचे नक्की ठरवले आहे. तिच्या शिक्षणाचा खर्च एका देणगीदारांनी उचलला त्यामुळेही शिकायचं उत्साह वाढला. तिच्यात झालेला चांगला बदल बघून आता तिची बहिणंही निवासात शिकायला आली आहे. 

शिकले की अनेक गोष्टी करता येतात, रोजगाराच्या संधीही बदलतात. काही गोष्टी बघून अनुभव विश्व विस्तारावे म्हणून दरवर्षी प्रतिभाताई या गटाच्या सहल काढते. ज्ञान प्रबोधिनीवरच्या विश्वासाने पालकही पाठवतात. या निमित्ताने कधी सिंहगड तर कधी सज्जन गड, कधी राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तर कधी पेशवे उद्यान असे काय काय पाहून झाले. फक्त ‘शाळेत जा’ असे सांगून पुरत नाही, शाळेत गेल्यामुळे शिक्षण मिळाल्यामुळे आयुष्य कसे बदलते हे हळूहळू सांगावे लागते. प्रतिभाताईला तर असे वाटायला लागले आहे की वस्तीच्या वातावरणामुळे शिकायचा वेग कमी होतो.. या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहच बांधायला हवे, नाहीतर आई-वडिलांचे रोजचे व्यसन बघून, आणि सहज मिळत असल्याने पुढच्या पिढीला व्यसन लागायला वेळ लागत नाही. आई-वडिलांची इच्छा असली तरी त्यांच्या वागण्यातही बदल लगेच होणार नाही हे आपणही स्वीकारले पाहिजे. 

गेली काही वर्ष आपण वस्त्यांवर दिवाळी साजरी करत आहोत. देणगीतून फराळ, रांगोळी, किल्ल्यांवरची चित्रे भेट देतो, किल्ले करून घेत आहोत, पणती लावायला शिकवत आहोत, एकत्र फराळ करायला शिकवत आहोत.. त्यावेळी अनेकांनी सांगितले की अशी गोड खाऊन आम्ही पहिल्यांदाच साजरी केली. अशा कार्यक्रमामुळे वस्तीवरचे वातावरण हळूहळू बदलायला लागले .. वस्तीवर स्वागत व्हायला लागले. 

अशा कामामुळे वस्तीवरचा वावर सहज झाला. प्रतिसाद सुधारला. मग युवक, पुरुष यांचा संवाद वाढवला आणि स्वयंरोजगार संधी बघायला वस्तीवरच्या २५-३० जणांची बाळासाहेब कोळेकरांचे कातकऱ्यांसाठी चाललेले काम बघायला गट महाडला जाऊन आला. उत्साह वाढला. योजनांची माहिती मिळाली पण कागदपत्रे नसल्यामुळे काहीच लाभ घेता येत नाही असे लक्षात आले. मग ही कागदपत्रे तयार करायचे काम जे अधिकारी करतात त्या तहासिलदारांशी संवाद साधला की कधीतरी फिरस्ती असली तरी आता ही मंडळी गेली अनेक वर्ष याच वस्तीवर रहात आहेत तर त्यांना या वस्तीवरचा राहिवासा पुरावा देऊया. त्यांचे आधार कार्ड काढूया. ठरले! मग आख्या वस्तीने शासकीय कार्यालयात येण्याऐवजी अधिकारीच वस्तीवर आले तर? असा प्रस्ताव अधिकाऱ्यांसामोर मांडला आणि अधिकाऱ्यांनी मान्य केला. त्या दिवशी स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी ६०-६२ कातकरी कागदोपत्री अस्तित्वात आले हा कामाचा मोठ्ठा टप्पा म्हणायला हवा! 

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६