मागे वळून बघताना १५ – वंचित गटांसाठीच्या कामाची सुरुवात..

 स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाला सुरुवात केली ती ग्रामीण महिलेसाठी, बचत गट करण्यापासून! तेव्हा वाटत होते की ही ग्रामीण महिला, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे तिने मुख्य प्रवाहात यायला हवे. पण जसजशी वर्ष जायला लागली, तसतसे लक्षात यायला लागले की या ग्रामीण महिलांमध्येही वेगवेगळे गट आहेत. ग्रामीण समाजातील महिलांमध्ये एकसंधता नाही. त्यामुळे उपक्रम एकच असला तरी बचत गटाचा फायदा सर्व गटांना सारखाच पोहोचला नाही! त्याच प्रमाणे गटाचा भाग झाल्या तरी सगळ्या सभासद सारखेच शिकल्या नाहीत!

ज्या महिला दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांचे आपण शासकीय योजनेसाठी स्वतंत्र बचत गट चालवले. त्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी शासनाने बचत गटाद्वारे वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. शासनाला त्यांचे ‘target’ पूर्ण करायला कुठल्यातरी गटाला फायदा मिळवून द्यायचाच आहे तर मग आपणच संघटीत केलेल्या गटांना त्याचा फायदा मिळवून देऊ म्हणजे शासनाच्या दप्तरी त्या गटांची नोंद होईल असे ठरवले. गटांना मिळणारी सबसिडी म्हणजे ‘परत न करायचे कर्ज’ सुद्धा आपण गटांना मिळवून दिली. सबसिडी घेणारा गट जरी ‘दारिद्र्य रेषेखाली’ असला तरी त्याला शिकवले की केवळ सबसिडी ‘खाऊन’ विकास होत नाही. विकास स्वकर्तृत्वावर करायचा असतो म्हणून दारिद्र्य रेषे खाली असणाऱ्या महिलांनाही दारिद्र्य रेषेवर असणाऱ्या सभासदांच्या गटात सुद्धा घेतले आणि कर्ज घेऊन व्याजासह चोख परत फेड करायला शिकवले!

तसाच दुसरा गट लक्षात आला तो म्हणजे ज्या एकल आहेत अशा महिला! काहीही कारण असले तरी.. एकल म्हणजे .. ‘सोडून’ दिलेल्या असतील, नवरा नांदवत नाही असे असेल, विधवा असतील, माहेरी रहात असतील किंवा नवरा असला तरी दारूडा/व्यसनी असल्याने यांनाच कुटुंबाला पोसावे लागत असेल…. तर अशा महिला म्हणजे एकल महिला! पर्यायच नाही म्हणून त्या सगळ्या अतिशय कष्ट करणाऱ्या आणि तरीही समाजात त्यांना ‘किंमत’ नाही, सन्मान नाही, अशा दुर्लक्षित महिला असतात. बचत गटांमुळे या गटाचे सगळ्यात जास्त कल्याण झाले कारण आपले बचत गट फक्त आणि फक्त महिलांचे होते.. कारभार बघणाऱ्याही सगळ्या महिलाच आहेत. आपल्या गावपातळीवरच्या कामातही पुरुषांचा कुठेही वावर कधीही नव्हता आणि नाही, त्यामुळे एकल माहिलांना सुरक्षित वाटायचे आणि मोकळेपणाने त्या त्यांची आर्थिक गरज सुद्धा मांडू शकायच्या. यातल्या अनेक जणींना फसवलेले असायचे. शिक्षण नाही आणि एक्सपोजर नाही त्यामुळे जगाची ओळखंच नाही…. अशा महिलांना आपला आधार वाटायचा! 

तिसरा गट गावातला अशा महिलांचा की ज्या सामाजिक उतरंडीमधल्या सगळ्यात तळाच्या गटात मोडतात, ज्यांना विकास प्रक्रियेत यायचे असते हेच माहीत नाही अशा! मागास समाजाच्या असल्यामुळे त्या गावातल्या व्यवहारातही सामावल्या जात नाहीत, दाखलपात्र नसतात अशा महिला. कधी धनगरांच्या, ज्या डोंगरावर छोटी वस्ती करून राहिल्याने गावापासून भौगोलिक अंतरानेही दूर असल्याने तुटलेल्या तर कधी कातकरी ज्या गावापासून दूर राहील्यामुळे वेगळा विचार करणाऱ्या ज्यांच्या अस्तित्वाचे पुरावेही अजून पर्यन्त निर्माण झाली नाहीत अशा महिला!

आणि चौथा गट असा की जो दारिद्र्यरेषे पेक्षा थोडासा वर असणारा आणि सामाजिक दृष्टीने अशा समाजाचा भाग की ज्याला समाजामुळे काही शासकीय योजनेतून सवलत मिळणार नाही. हा खरं धडपडा गट अनेकदा हा गट राजकीय पुढाऱ्यांच्या पासूनही सावध अंतरावर असतो. थोडक्यात काय तर हा गट स्वकर्तृत्वावर छोटी-मोठी स्वप्न बघत असतो. ही मंडळी शेती करत असतात पण जागा खातेफोड झाली नसल्याने त्यांच्या नावावर झालेली नसते. बँकेतून कर्ज काढावसे वाटते पण उत्पन्नाचा दाखला नसतो की जामीन राहायला कोण्या शासकीय नोकरदारांची ओळख असते! त्यामुळे यांना त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन विना तारण, माफक दरात कर्ज आणि मार्गदर्शन मिळाले तर कर्ज घेऊन स्वतःच्या कुटूंबांचे आयुष्य बदलू शकतात. बचत गटातील सहभागाने या गटातील महिलांना विशेष फायदा झाला.    

स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाला बचत गटांपासून सुरुवात केली आणि नेमके परिणाम कारक काम करायचे असेल तर अशा वेगवेगळ्या गटांसाठी, वेगवेगळे काम करण्याची गरज दिवसेंदिवस लक्षात यायला लागली. कामाच्या गरजेचे बारकावे लक्षात आल्यावर यातल्या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्रपणे कामाला सुरुवात केली, कारण एकल महिलांसाठी काम करायला लागल्यावर आशाताईंना ‘एकल’ महिलांचे वेगळे प्रश्न लक्षात आले तर दारिद्र्य रेषे खालच्या गटासाठी काम करताना भारतीताई यांना वेगळेच प्रश्न जाणवले आणि कातकरी महिलांसाठी कामाला लागल्यावर तर प्रतिभाताईला वेगळ्याच प्रश्नांची जाणीव झाली. 

आपण या प्रत्येक गटांसाठी स्वतंत्रपणे ज्ञान प्रबोधिनी म्हणून गेले ८-१० वर्ष काम करत आहोत. या कामाचा परिणाम म्हणून आता या प्रत्येक गटात किमान एक तरी ज्ञान प्रबोधिनीच्या गणवेशातली कार्यकर्ती आपल्याकडे आहे, जी तिचा प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडू शकायला लागली आहे. जसजसे मनुष्यबळ तयार होत गेले तसतसे काम त्या-त्या गटासाठी काम करणे सोपे झाले. खरेतर असे काम उभे करणाऱ्या प्रत्येकच ताईची कहाणी लिहिण्यासारखी आहे. आपल्याच गावात आपल्याच माणसात राहून बदलाचा विचार मांडत रहाणे सोपे नसते.. त्याला जवळचा गट/समाज आनंदाने स्वीकारतो असेही नाही.. ‘आली मोठी शिकवायला!’ अशी या शब्दांत मोठ्यांदा न बोललेली अवहेलनाही अनेकदा पंचवावी लागते. त्यामुळे सावकाश झाले तरी चालेल पण विरोध न होता कसकसे रचनात्मक काम केले ते येत्या १-२ लेखात आपण बघूया!

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६