मागे वळून बघताना ४: औपचारिक शिक्षण! 

गेल्या भागामध्ये मुलींचे शिक्षण ‘आई पालिकांच्या’ आग्रहाने निवासाच्या रुपात कसे प्रत्यक्षात आले ते पाहिले. ही सोय अशा आईसाठी केली जी स्वतः शिकणार नाही, अशा वयात किंवा मनस्थितीत पोचलेली आहे. 

    औपचारिक शिक्षणाचा असाच एक प्रयोग गेल्या काही वर्षात स्त्रीशक्ती प्रबोधन ग्रामीण विभागाने केला. महिलांना कायमच कमी शिक्षण असल्यामुळे येणाऱा न्यूनगंड वेगवेगळ्या माध्यमांतून डोकावत असतो. या न्यूनगंडावर उतारा म्हणून ग्रामीण महिलांना औपचारिक रचनेतून शिकवायचे असे ठरवले!

लिहीता वाचता येत असले तरी औपचारिक शिक्षण कमीच. बचत गटाच्या कामात वावरणारी कोणी चौथी पास होती तर कोणी सातवी, कोणाची शाळा आठवीत सुटली होती तर कोणी दहावी नापास होती.. पहिल्यांदा त्यांना पटवावे लागले की तुमचे शिक्षण थांबले त्याला तुम्ही जबाबदारी नाही कारण तेव्हा तुम्ही किती शिकायचे हे तुम्ही ठरवलं नाही.. पण आता संधी मिळाली आणि तुम्ही ती घेतली नाही तर मात्र तुम्ही जबाबदार!

एकदा हे पटलं की मार्ग काढायची जबाबदारी प्रबोधिनीचीच… कारण दुसरं कोण मदत करणार? मग माहिती काढली, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक याची आणि असं कळलं की चौथी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण झाले असेल तरी १८ वर्ष पूर्ण झालेल्यांना थेट प्रथम वर्षामध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो जर विद्यापीठाची १२वी समकक्ष प्रवेश परीक्षा पास झालेली असली तर! मग मार्गच मोकळा झाला असे वाटायला लागले. प्रयोग म्हणून काही जणींनी या परीक्षेला बसायचे ठरवले आणि त्या लिहित्या वाचत्या असल्याने सहज पास झाल्या, मग त्यांनी प्रथम वर्षात त्यांच्याच भाषेत सांगायचे तर १३वीत प्रवेश घेतला. 

गेल्या एका वर्षात १५ जणीं समकक्ष परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्या. आजपर्यंत आपल्या प्रयत्नाने १२ वी समकक्ष परीक्षा पार करणाऱ्या किमान १७५ पेक्षा जास्त जणी झाल्या. बहुतेक सगळ्या वेल्हे म्हणजे मागास तालुक्यातल्या… आख्या तालुक्यात एकच पदवीपर्यंत शिकता येणारं कॉलेज असणाऱ्या भागातल्या! 

आपल्या प्रयत्नाने ११ जणींनी पदवी मिळवली तर सध्या १८ जणी पदवी मिळवण्याच्या मार्गावर आहेत! दोघांनी समाजशास्त्र विषय घेऊन MA सुध्दा झाले. अजाण वयात कळत नसल्यामुळे शाळा सुटल्याचा सल अलगद पुसला गेला. सन्मानाने जगण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची संधी अशा एकत्र प्रयत्नांमुळे मिळाली. ‘मी गटातून बसले म्हणून पास झाले, नाहीतर नापास होण्याच्या भितीने बसलेच नसते!’ असं सांगणाऱ्या काही थोड्या नव्हत्या. पुन्हा शिक्षण प्रवाहात येण्याने अनेकींची आयुष्य बदलली म्हणून या प्रक्रियेवर अभ्यास करुन एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पेपर मांडला. त्या अभ्यासात समकक्ष परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती घेतल्या. खूपच नवीन माहितीचं संकलन झालं. 

बहुतेकींनी घरी सांगितलेच नव्हते की त्या परीक्षेला बसल्या होत्या. दहावी पास नवरा असल्याने कमी शिक्षणाचा कौटुंबिक सल वेगळाच होता. पण जेव्हा त्यांना पास असं प्रमाणपत्र हातात मिळालं तेव्हा मात्र आता आमच्या पिढीतली सगळ्यात जास्त शिकलेली मी आहे’ असं म्हणत त्यांनी आपली मार्कलिस्ट कुटुंबाला दाखवली… परिणाम आता सासू पण ‘विचारते’ असं  सांगताना तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.

   चाळीशी ओलांडलेली गावासाठी धडपडणारी ताई म्हणाली, ‘मी महिला राखीव मधून सरपंच पदाला उभी राहू शकते…. सरकारने मागेपुढे या पदासाठी शिक्षणाची अट घालती तर अडायला नको म्हणून परीक्षा देऊन ठेवली! मला २ पोरं… ती बाजू जमणारी आहे’ (३ पोरं असणारीला निवडणूक लढवू शकत नाही….हे तिला माहिती होतं ), अनेक अंगणवाडी ताईंनी या प्रयत्नांमुळे परिक्षा दिली, त्यांना पगार वाढ झाली. काही तर सासू-सूनांनी एकत्र परीक्षा दिली. हे सगळं बघून काही आई दहावी नापास मुलग्यांना घेऊन आल्या आणि ड्रायव्हर करीयर करायचे असले तर लायसन्स काढायला हवे त्यासाठी (हल्ली दहावी पास असल्याशिवाय लर्निंग लायसन्स मिळत नाही) त्यांनी या गटातून मुलग्यांना परीक्षा द्यायला लावल्या, आता ते सन्मानाने चांगली ड्रायव्हरची नोकरी करत आहेत. कुटुंब प्रमुख म्हणून तेही जास्त जबाबदार झाले!

बचत गट हे निमित्त आहे! या गटातून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीमुळे, आणि प्रेरणेमुळे हे सगळे घडले-घडवता आले. 

विभागाचं कामंच प्रबोधनाचं आहे… कोणाच्याही आत्मसन्मानाचं काम ‘दुसरं कोणी करु शकत नाही… त्यासाठी आवश्यक तो अवधी आणि संधी जिला-तिला देता यायला हवी!

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६