मागे वळून बघताना ३ – वेल्हयाचा सहनिवास

बचत-कर्ज व्यवहार करण्यासाठीच महिला गटात यायच्या. लग्नाचा सिझन यायच्या आधीच गटातल्या गप्पागप्पामध्ये कळायचे की यंदा कोणाकोणाच्या घरी ‘कर्तव्य आहे!’..आणि ठरणाऱ्या लग्न निमित्ताने कर्ज लागणार आहे…. ‘ठरलं तर..’ अशी कर्जाची मागणी असायची. अशी मागणी करणाऱ्या एखादीची मुलगी १८ वयाखालची असायची… मग चर्चा व्हायची की जी गोष्ट कायद्याला मान्य नाही ती कशी करायची? ‘पोरीचं लग्न’ हा  तर अगदीच जिव्हाळ्याचा विषय!

बैठकीत बसलेल्या बहुतेक सगळ्याच १८ पूर्ण व्हायच्या आत उजवलेल्या! ‘काय कळत होतं तेव्हा…. लग्नात नटायला मिळतं याचंच कौतुक म्हणून मी तयार झाले लग्नाला!’ असं अगदी मोकळेपणाने सांगणारी एखादी असायचीच गटात. अशा ‘अनुभवी’ आईला लग्न-वयाचा कायदा सांगणंही अवघड…. तरी ‘पोरीच्या आरोग्यासाठी १८ संपूदे’ असं म्हंटलं तर एखादी म्हणायची, ‘ताई आपल्याच मुलींचं लवकर लग्न करून तिला सासरी पाठवावं असं वाटतं म्हणून आम्ही लवकर लग्न करतो? नाही हो! आम्ही शेतकरी माणसं दिवसभर शेतावर जातो मुली शाळेमध्ये जातात पण ज्या मुलींना शिक्षणाची आवड नसते, शाळेत डोकंच चालत नाही त्या घरात बसून काय उद्योग करतील याची खात्री वाटत नाही. त्यापेक्षा लग्न केलेलं बरं! आज नाहीतर उद्या नवऱ्याच्या घरी जायचंच आहे तर मग सुरक्षित आजच जाऊदे’ हा त्या मागचा विचार असतो. 

यातून मला कळलं की जर मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत सुरक्षित राहील अशी हमी आईला मिळाली तर अशा कुठल्याही मुलीचं अठरा वर्षाच्या आत लग्न होणार नाही! या संवादातून मला नवीन विश्वास मिळाला. एकीने पुढे असंही सांगितलं की ‘आता आम्हालाच ‘आई’ या नात्याने वाटतं ना की पोरीनं शिकावं. अडाणी असलं की कसं फसवतात हे आम्हीच अनुभवलं आहे ना!’ जरी ती बोलली नसली तरी शिक्षण कमी झाल्यामुळे आलेल्या न्युनगंडाला ‘ती’ कशी सामोरी गेली ही तिच्या डोळ्यासमोरुन तरळून गेलेलं असतं. या वयात ती तर शिकू शकणार नाही म्हणून ती मुलीच्या शिक्षणाची काळजी करत असते. 

हे आणि असे समांतर संवाद वारंवार गटात ऐकून मे २०१२ मध्ये वेलहयात मुलींचे निवासी शिबिर घेतले, त्याला ३५ मुली आल्या. दोन दिवसाचे शिबिर संपताना सगळ्या म्हणाल्या, ‘असे एकत्र राहून शिकायला आवडेल!’ आईची तयारी बचत गटाने केलेली होती तशी मुलींची पण परीक्षा झाली, आता सुरुवात करायलाच हवी असे वाटून, ज्ञान प्रबोधिनीने २०१२-१३ पासून मुलींच्या शिक्षणासाठी वेल्हे गावात, तालुक्याच्या ठिकाणी मुलींसाठी निवास चालू केला. 

खरं सांगायचं तर ज्ञान प्रबोधिनीच्या पदाधिकार्यांनी ठरवलं आणि निवासाचे काम सुरू झालं असं झालं नाही तर ज्ञान प्रबोधिनीच्या नावानं गावागावात जमणाऱ्या स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी ठरवलं. ज्यांना ज्यांना शिक्षणाचे महत्त्व पटलं होतं त्या म्हणाल्या, ‘आमच्या मुलींना शिकवायचं असेल तर तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल सुरू केल्याशिवाय पर्यायच नाही. ताई आपणच हॉस्टेल सुरू करू!’ असा आग्रह त्यांनी मांडला आणि अर्थातच तो मान्य ही झाला! आणि हॉस्टेल सुरू झालं. 

पहिल्या वर्षी ७ जणी, दुसऱ्या वर्षी १२ असे करत करत १५ जणींसाठी सोय केली पण प्रत्यक्षात पाच वर्षांतच २५-३० जणी राहायला लागल्या. मुलीच्या प्रवेशासाठी जी आई यायची ती सांगायची की, ‘जर हिला प्रवेश दिला नाही तर तिचं शिक्षणंच थांबणार आहे. रोज उन्हापावसाचं १२-१५ किमी चालून ती काही शिकणार नाही….!’ मग ठरवलं जिला शिकायला शाळेत जायला रोज १०-१२ किलोमीटर चालावे लागते तिच्यासाठी निवासाची सोय करूया!

आज म्हणता म्हणता निवासाची दशक पूर्ती होते आहे. आज पर्यन्त गेल्या १० वर्षात मिळून साधारण ४० गावातून ९२ मुलींचे प्रवेश झाले. सध्या २९ जणी शिकत आहेत. काहीचे पदवी पर्यन्त शिक्षण झाले तर काही नोकरीला लागल्या काही लग्न होऊन स्थिरावत आहेत. 

दशकपूर्ती मेळाव्याला बोलावताच इथे राहून गेलेल्या अनेक जणी जणू माहेरी हक्काने आल्या सारख्या निवासी आल्या. गप्पांना रात्र पुरली नाही. त्यांच्या सोबत राहाणाऱ्या ताया.. लक्ष ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना इथे राहून गेलेल्या सगळ्यांचे निवांसाच्या सोयीमुळे आयुष्य किती विधायक बदलले हे दिसत होते. निवासामुळे शिकून नोकरी करणारी सांगत होती, ‘माझ्या घरात एवढे पैसे मिळवणारी मी पहिलीच!’ ‘इथली शिस्त बाहेर गेल्यावर कळते’.. कोणी संगत होती, ‘इथले दिवस मी कधीच विसरू शकणार नाही!’ सन्मानाने जगताना त्यांना मिळत असणारा आनंद निवासातल्या लहान मुलीना ‘ताई’ नात्याने त्या सांगत होत्या. 

मुलींचा निवास सुरू करताना जोखीम वाटत होती खरी पण हे सारं ऐकताना वाटत भरून पावलं..!!

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६