आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला- भाग ४- प्रवृत्तीपर अध्यात्म-विचारांच्या सिंचनातून राष्ट्रयोगाची साधना
टीप – मा. श्री. गिरीश बापट यांच्या व्याख्यानाचे खाली दिलेले शब्दांकन स्वयंचलित पद्धतीने केलेले आहे. त्यात शुद्धलेखनाच्या व वाक्यरचनेच्या चुका असू शकतात. कृपया नोंद घ्यावी
नमस्कार,
आध्यात्मिक राष्ट्रयोग या व्याख्यानमालेतलं आजचं शेवटचं पुष्प आहे. मागच्या वेळचं व्याख्यान “आध्यात्मिक ते व्यावहारिक – एक सलग रेषा” या व्याख्यानानंतरही चॅट बॉक्समध्ये किंवा व्यक्तिशः काही प्रश्न आलेले नाहीयेत. त्यामुळे आजच्या भाषणाला लगेचच सुरुवात करतो.
इष्ट – पंथ – संप्रदाय – धर्म – योग – आध्यात्मिक राष्ट्रयोग
‘राष्ट्रयोग’ हा शब्द वापरताना जो वेगळा विचार केलेला होता, त्याच्यामध्ये एक विचार असाही केला होता की, आपल्याकडे भारतामध्ये “इष्ट” अशी संकल्पना आहे. “इष्ट” म्हणजे प्रत्येकाचा आध्यात्मिक आदर्श आणि तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकाने स्वतःचं इष्ट निवडायचं आणि त्या इष्टाची उपासना करायची, अशी कल्पना आहे. प्रत्येकाचं इष्ट वेगळं असलं तरी, तो उपासना कुठल्या पद्धतीने करणार, याचे अनेक प्रयोग झाल्यानंतर काही मार्ग निश्चित होत गेले. त्याला मार्ग किंवा पंथ असं म्हणता येईल आणि ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग असे मुख्य चार मार्ग आणि काही छोटे-छोटे इतर मार्ग अशी मार्गांची कल्पना आहे. मग इष्ट अनेक, मार्ग अनेक, प्रत्येकाने आपलं इष्ट निवडावं, आपला मार्ग निवडावा म्हणजे पद्धत निवडावी की, त्या इष्टापर्यंत कसं जायचं. पण अनेक लोकांना आपण सगळेजण एका मार्गाने चाललेलो आहोत, असं लक्षात आल्यानंतर एकत्र यावसं वाटतं आणि मग त्यातून संप्रदाय तयार होतात. मग त्यांचा स्वतःचा एखादा विशिष्ट पोशाख होतो, विशिष्ट पद्धत तयार होते, भोजनाची, भजनाची काही विशिष्ट पारिभाषिक शब्द येतात. त्यांचे काही आदर्श चरित्र ठरतात, काही वागायच्या पद्धती ठरतात, आणि त्या संप्रदायांना ठळक ओळख निर्माण होत जाते. पण इष्ट आणि मार्ग हे जास्त महत्त्वाचे. आपल्याला त्या मार्गाने जाण्यासाठी मदत होत असेल तर संप्रदायांचा उपयोग होतो. असे अनेक संप्रदाय समाजामध्ये असू शकतात, त्या सगळ्या संप्रदायांना कवेत घेणारा तो ‘धर्म’ अशी आपल्याकडची कल्पना आहे.
आध्यात्मिक राष्ट्र्ययोग
आध्यात्मिक ते व्यावहारिक सलग रेषा असं म्हटलं की, त्याच्यानंतर आपल्या इष्टापर्यंत पोहोचण्यासाठी ‘राष्ट्र’ हे एक सामुदायिक इष्ट सगळ्यांचे होऊ शकतं, अशी कल्पना विवेकानंदांनी मांडली. तुम्हाला व्यक्तिगत आपापल्या घरी पाहिजे त्या इष्टाची पूजा करा, परंतु सगळेजण बाहेर याल तेव्हा मातृभूमी हेच आपलं दैवत, हेच आपलं इष्ट असू द्या, सामुदायिक इष्ट असू द्या, अशी कल्पना मांडली. आणि म्हणून सगळे ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यासारखाच ‘राष्ट्रयोग’ असा शब्द वापरावा असं सुचलं.
आज ज्याच्या संबंधी बोलायचे ते म्हणजे आध्यात्मिक राष्ट्रयोग. त्याच्यामध्ये काय काय येतं, मुख्यतः त्याच्यात कुठल्या प्रकारचा आचार येतो आणि तो का करायचा याच्या संबंधी बोलायचं आहे. मग असा राष्ट्रयोगाचा आचरण कुठे होतंय, असा शोध घेतल्यानंतर मला असं वाटलं की, दूर कुठे जाण्यापेक्षा ज्ञानप्रबोधिनीतच या राष्ट्रयोगाचा आचरण कसं होतंय, याचा शोध घ्यावा आणि हा सगळ्यांच्या समोर मांडावा, असा विचार करायला सुरुवात केली.
पथकाधिपती आणि साधन-साध्य/उद्धिष्ट मांडणी
सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात आलं, की असा हा राष्ट्रयोग ज्ञानप्रबोधिनीच्या आधी कोणी मांडलाय का, वेगळ्या पद्धतीने त्या त्या काळाच्या परिभाषेमध्ये. आणि मग त्यांना विचारून आपण आपलं राष्ट्रयोगाचे आचरण करतोय का, आपल्याला काहीतरी स्वतंत्र सुचलंय. तर, अर्थातच मग प्रबोधिनीने जे आदर्श राष्ट्रपुरुष म्हणून स्वीकारलेले आहेत, त्यांची नावे डोळ्यासमोर येतात. त्याची गंमत अशी आहे की, हे प्रबोधिनीचे आदर्श राष्ट्रपुरुष म्हणून आपण नंतर प्रकटपणे मांडायला सुरुवात केली. सुरुवातीला ही चार नावे ज्ञानप्रबोधिनीची पुण्यातली प्रशाला सुरू झाल्यानंतर आप्पांचे नेतृत्व विकसनाचे प्रयोग सगळे पीएचडीच्या निमित्ताने अभ्यासून झालेले होते. त्याच्यात शाळेमध्ये कुलपद्धती किंवा पथक पद्धती असेल, तर त्यातून काही जणांना नेतृत्वाची संधी मिळते. आणि मग त्या पथकांना नाव काय असावं, तर ज्या नावातून काहीतरी स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल, मार्गदर्शन मिळेल, अशी नावं असावीत. अशा कल्पनेतून आप्पांनी काही नावं काढली होती, त्यामध्ये नेहरूंचं, सावरकरांचं, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं, जमशेदजी टाटांचे नाव होतं. अर्थातच ही नंतरची नावं निश्चित झाली – रामदास, दयानंद, विवेकानंद, अरविंद ही सगळी नावं निश्चित झाली. आणि मग आता या नावांमधून चार नावांची निश्चिती करताना, निवड करताना काहीतरी निकष लावले पाहिजेत. त्यात निकष लावले ते हे … सगळे पथकाधिपती जे निवडायचे, ते द्रष्टे म्हणजे राष्ट्रद्रष्टे असले पाहिजेत, आणि अर्थातच ब्रह्मद्रष्टे सुद्धा असले पाहिजेत. संन्यस्त वृत्तीचे असले पाहिजेत. संन्यासी असे म्हणायला हरकत नाही; पण रामदास आणि अरविंदांनी विधिवत संन्यास घेतलेला नव्हता. त्यामुळे संन्यस्त वृत्तीचे असे म्हणतो. तर अशा आदर्श राष्ट्रपुरुषांची, पथकाधिपतींची निवड करताना ते राष्ट्र राष्ट्रद्रष्टे असले पाहिजेत आणि संन्यस्त वृत्तीचे असले पाहिजेत, हे त्यांच्या निवडीसाठी निकष होते. मग या चौघांनी समान काय सांगितलेलं आहे, म्हणजे आणखीन नावांची भर घालायची झाली, निवड करायची झाली, तर मग हे पुढचे निकष सुद्धा विचारात घेता येतील. या चौघांनी विकसित व्यक्ती कशी असली पाहिजे, हे सांगितलेलं आहे. संघटक कसा असला पाहिजे, हे सांगितलेलं आहे. देशव्यापी संघटनेची आवश्यकता ही त्यांनी मांडलेली आहे आणि धर्मसंस्थापना हे उद्दिष्ट त्यांनी मांडलेले आहे. विकसित व्यक्तींनी संघटित होऊन किंवा अशा विकसित व्यक्तींना संघटित करून, अशी देशव्यापी संघटना करून काय करायचे? तर धर्मसंस्थापना करायची, हे उद्दिष्ट त्यांनी मांडलेले आहे.
रामदासांनी धर्मसंस्थापना शब्द वापरलेला आहे. विवेकानंदांनी वापरलाय, दयानंदांनी वापरलाय, अरविंद त्यांच्या परिभाषेमध्ये धर्मसंस्थापना करायची म्हणजे काय करायचं? तर अतिमानस शक्तीचं अवतरण झालं पाहिजे. त्याच्यातून आजचा माणूस हा आणखीन विकसित देवमानव झाला पाहिजे आणि अशा देव मानवांचा समाज तयार झाला पाहिजे, अशी कल्पना वाढलेली आहे.
प्रबोधिनीच्या संस्थापकांनी, म्हणजे आप्पांनी त्यांच्या प्रतिभेने या सगळ्याचे वर्णन “अतिमानस शक्ती अवतरो मानवतेमध्ये” अशा मंत्रांमध्ये केलेले आहे. हा मंत्र अजून कधी आपण उपासनेमध्ये म्हटलेला नाही. पण “माताजी अरविंद काय म्हणाले” हे पुस्तक आपण केले. त्याच्यात “अतिमानस शक्ती अवतरो मानवतेमध्ये” अशा मंत्राचा उल्लेख मुखपृष्ठावर आणि या प्रस्तावनेमध्ये सुद्धा केलेला आहे. पण ही खूप पुढची गोष्ट आहे. याच्या आधी काय करायला पाहिजे? तर त्या पूर्वी “परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये” हा मंत्र म्हटला पाहिजे. …’परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हटला पाहिजे म्हणजे काय तर हिंदू समाजामध्ये संघटना निर्माण व्हावी, हिंदू समाजातला पराक्रम वाढावा. हिंदू समाजातल्या सगळ्यांना स्वतःमधल्या आणि इतरांमधल्या ईश्वरी शक्तीची जाणीव व्हावी. हिंदू समाजाला, आपल्याला ही जी जाणीव झालेली आहे, ती सगळ्या जगाला करून देण्याची, विश्वविजयाची प्रेरणा निर्माण व्हावी, असं संघटना, पराक्रम, ईश्वरी शक्तीची जाणीव आणि विश्वविजयाची प्रेरणा ही हिंदू समाजातली वाढली, म्हणजे परब्रह्मशक्तीचे स्फुरण झालं, असं म्हटलेलं आहे.
हे जर का व्हायचं असेल हिंदू समाजामध्ये, तर हे कोणी करायचं? तर हे ‘प्रबोधिनी’ या संघटनेने करायचं. आणि त्याच्यासाठी त्यापूर्वी सुद्धा ‘परब्रह्मशक्ती प्रबोधिनीमध्ये’ अशाही मंत्राची रचना केली. परब्रह्म शक्तीचे स्मरण प्रबोधिनीमध्ये व्हावं म्हणजे काय व्हावं तर प्रबोधिनीचा विस्तार अखिल भारतीय व्हावा. इथे प्रबोधिनी या संघटनेतल्या सगळ्या व्यक्तींमध्ये प्रतिभाशक्ती वाढावी. त्यांनी विज्ञानाचा उपयोग करावा, विज्ञानाची कास धरावी, वेदांत तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी करावा, आपली नेतृत्वशक्ती वाढवावी, संघटना करावी, व्यक्तिगत आणि सामूहिक पराक्रम करावा. हे सगळं करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. जे हिंदुत्वामध्ये आलं पाहिजे, ते आलंच पाहिजे: संघटना, पराक्रम, ईश्वरी शक्तीची जाणीव आणि विश्वविजयाची प्रेरणा. पण त्याच्यासाठी प्रबोधिनीने अखिल भारतीय आधी होणं, प्रतिभा, विज्ञान, वेदांत, नेतृत्व, संघटना, पराक्रम आणि प्रयत्नवाद असं हे वाढावं, अशी कल्पना केलेली आहे.
अशा या राष्ट्रपुरुषांच्या मार्गाने आपण जायचं. तर मग शेवटी जो उल्लेख केलेला आहे की, पराक्रम आणि प्रयत्न, तर त्याच्यासाठी काय करायचं? तर समर्थ रामदासांनी त्यांच्या एका पदामध्ये थोडासा बदल करून आपण प्रबोधिनीमध्ये असं म्हणतो की, “भाग्यासी काय होणे वीर तत्वज्ञ कार्यकर्त्यावाचून राहिले.” समर्थांचं मुळातलं जे पद आहे, त्यात असं म्हटलंय, “यत्नाचा लोक भाग्याचा, यत्नेवीण दरिद्रता.” म्हणजे तुम्ही प्रयत्न केला, तर तुमचं भाग्य उजळेल, आणि नाही केला तर दारिद्र्य येईल. मग मुख्य यत्न विचाराचा – आधी यत्न करायचा म्हणजे काय करायचं? आधी विचारपूर्वक काम करायचं. आधी विचार करायचा, त्यावरी बोलणे बरे, विचार काय करायचा, हे आधी निश्चित करा. चालणे सत्य नेमाचे, नीती न्याय चुकू नये. प्रयत्न करताना काय लक्षात ठेवायचं? तर सत्याच्या मार्गाने जायचं, नीती न्याय धरायची, आणि तो चुकवायचा नाही…आणि मग असं म्हटलं: “भाग्यासी काय उणे यत्ना वाचून राहिले.” त्याची विस्ताराने व्याख्या अशी आहे: “वीर तत्वज्ञ कार्यकर्त्या वाचून राहिले.” म्हणजे, यत्न करणारे कार्यकर्ते पाहिजेत, ते वीर आणि तत्वज्ञ असले पाहिजेत.
वीर असावेत म्हणजे काय असावं?
वीर असावेत म्हणजे काय असावं? प्रबोधिनीमध्ये आता आपण वीरव्रताची कल्पना मांडलेली आहे, ती वीरवृत्ती म्हणजे काय असावं? त्यात काय असलं पाहिजे, हे आपण मांडून ठेवलेलं आहे. त्यांनी दुर्गुण सांगितलेले आहेत, ते दुर्गुण गेले आणि त्याच्या विरुद्धचे गुण आले म्हणजे ती वीरवृत्ती निर्माण होईल. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे बल आलं पाहिजे, आत्मविश्वास आला पाहिजे, उत्साह असला पाहिजे, उद्दिष्टाबद्दलची स्पष्टता असली पाहिजे, स्वदेशाभिमान असला पाहिजे, कर्तृत्व असलं पाहिजे, प्रतिभा असली पाहिजे. आणि या इतक्या सगळ्या गोष्टी असतील, तर मग त्याच्यानंतर विजय प्राप्त होईल, अशी वृत्ती तयार होईल. ती वीरासाठी अतिशय आवश्यकता आहे.
तत्वज्ञाकडे काय असलं पाहिजे?
तत्वज्ञाकडे काय असलं पाहिजे? तर, विश्वविजय करण्याची जी प्रेरणा आहे, ती अध्यात्माद्वारे विश्वविजय करण्याची प्रेरणा ही तत्वज्ञांकडे असली पाहिजे. यत्न करायचे, पण ते आपले कार्यकर्ते वीर आणि तत्वज्ञ असावेत आणि त्यांनी स्वदेशासाठी काम करावं, अशी यत्नांची कल्पना आहे.
‘मुख्य यत्न विचाराचा’, असं म्हटलेलं आहे. तर विचार कशाचा करायला लागतो? आणि केला पाहिजे. मला असं सहज वाटलं की, “जिज्ञासापूर्ती भाग एक” आणि “भाग दोन” अशी दोन पुस्तके आपण केली आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी विचारलेले प्रश्न त्यात येतात. तर, त्या प्रश्नांमध्ये काही गट पाडलेले आहेत. त्या प्रश्नांचे मग काय काय गट आहेत? त्यामध्ये हिंदुत्व आणि धर्मसंस्थापना याविषयीचे प्रश्न आहेत. संस्कार विधींविषयी प्रश्न आहेत, उपासनेविषयी प्रश्न आहेत, प्रतिज्ञेविषयी प्रश्न आहेत, संघटनेविषयी प्रश्न आहेत, आणि काही वैचारिक प्रश्न आहेत. मुख्य यत्न विचाराचा असं म्हटल्यावर मी असे काय काय प्रश्न वैचारिक स्वरूपाचे आलेले पाहिले, मग आपल्या कार्यकर्त्यांना पडलेले प्रश्न आणि आपल्याला जर राष्ट्रयोग आचरण करायचा असेल, तर ह्या सगळ्या विषयांचा विचार करून, त्यावरची काही भूमिका निश्चित करावी लागेलच. मानवी हक्कांसंबंधी प्रवृत्तीची काय भूमिका असावी, पर्यावरण रक्षण आणि संवर्धन याच्या वतीने काय भूमिका असावी, धर्मनिरपेक्षतेबाबत काय भूमिका असावी, आंतरराष्ट्रीय सामंजस्याबद्दल काय भूमिका असावी, स्त्रियांना 50 टक्के आरक्षण मिळावं, याबद्दल काय भूमिका आहे, अणुवस्त्रांवर आणि रासायनिक वस्त्रांवर बंदी आली पाहिजे, याबद्दलची काय भूमिका आहे?
काही तत्वसप्तक म्हणून वैचारिक मूलतत्त्वे मांडली आहेत. त्यात याचा काही उल्लेख नाही. पण आज हे जर तत्कालीन प्रश्न असतील, तर याच्याबद्दल काहीतरी आपण भूमिका केली पाहिजे. हा विचार करून मग प्रयत्न करायचे आहेत. अन्नसुरक्षा विधेयक आलं होतं, तेव्हाचा एक प्रश्न आहे. जादूटोणा विरोधी विधेयक महाराष्ट्रामध्ये आलं होतं, त्याच्याबद्दल काय प्रबोधिनीची भूमिका आहे? सक्तीचा शिक्षण कायदा आलाय, त्याबद्दल काय भूमिका आहे प्रबोधिनीची? किरकोळ विक्रीमध्ये (रिटेलिंगमध्ये) परदेशी गुंतवणूक यावी की न यावी, याबद्दल काय भूमिका आहे? असे विविध मुद्दे आहेत. त्यासाठी भांडणारे लोक असतात. ते कायदे कधीतरी संमत होतात, दुरुस्त्यांसह, आणि अंमलबजावणी सुरू होते. आपल्याला त्याचं काहीच घेणं देणं नाही का? आपल्याला त्याचं घेणं देणं असलं पाहिजे. काही फटाके विक्री, मोठ्या संख्येचे ढोल वादन, रासायनिक खते, कीटकनाशके – असे अनेक उपक्रम त्या काळात चालू होते. त्याबद्दल काय भूमिका असली पाहिजे?
तुम्हा सगळ्यांसाठी समान असा काही विषय जर मांडायचा असेल, समान सूत्र जर मांडायचं असेल, तर प्रत्येक विषयाच्या बाबतीत विचार करताना त्याची अंगभूत उपयुक्तता (intrinsic utility) काय, याच्या संबंधी काही सकारात्मक किंवा नकारात्मक कृती करायची ठरवली, तर त्याचा अंगभूत उपद्रव मूल्य (intrinsic nuisance value) काय आहे? कारण प्रत्येक गोष्टीला काही पांढरी, काही काळी बाजू असतेच. सर्व गुणसंपन्न असं काही नसतं. काही गुण असतात, काही दोष असतात. तर इंट्रिंझिक व्हॅल्यू (intrinsic value) काय? आणि मग या दोन्हीचा तरतम तुलना करून युटिलिटी (utility) जास्त आहे का, न्यूसेन्स (nuisance) जास्त आहे, हे पाहून जोपर्यंत nuisance पेक्षा utility जास्त आहे, प्रत्यक्ष नेट युटिलिटी जास्त आहे, तोपर्यंत ते करायचं. तर हा सगळा विचार आपण करतो का? कसा करतो? करायला पाहिजे, अशी भूमिका मांडलेली आहे. …तर मुख्य यत्न विचाराचा असं जे म्हटलं समर्थांनी, “यत्ना वाचून राहिले, वीर तत्वज्ञ कार्यकर्त्या वाचून राहिले” तर त्या कार्यकर्त्यांना या सगळ्या अशा प्रश्नांचा विचार करायला लागेल. हे राष्ट्रसंबंधित प्रश्न आहेत, त्यामुळे राष्ट्रयोगामध्ये या सगळ्याचा विचार करायला पाहिजे.
मार्गदर्शक तत्त्वे
या सगळ्याचा विचार करत असताना मार्गदर्शक तत्व काय असलं पाहिजे? तर मला वाटतं ज्ञानप्रबोधिनीच्या स्थापनेच्या आधीच आप्पांनी जो “राष्ट्रदृष्टी विवेकानंद” असं विवेकानंद चरित्र लिहिलं, त्या चरित्रामध्ये विवेकानंदांच्या विचारांचे काही संकलनही केलेलं आहे. त्यातून एक सूत्र शोधायचा प्रयत्न केला की, या सगळ्या मांडणीतून विवेकानंदांना काय म्हणायचं होतं? तर शीर्षक जरी “व्यावहारिक वेदांत” असलं, तरी विवेकानंदांना ‘Practicable Vedant’ असं म्हणायचं आहे. विवेकानंदांनी ‘Practical Vedant’ अशी चार व्याख्याने दिली. त्यात त्यांनी म्हटलं की, “मी Practical वेदांत म्हणतो म्हणजे तो Practicable वेदांत आहे. हा व्यवहारात आणणे शक्य आहे.” मराठी भाषांतर “व्यावहारिक वेदांत” असं केलं, तरी तो व्यवहारी वेदांत आहे, म्हणजे व्यवहारात आणण्यासारखे वेदांत तत्वज्ञान आहे, असं म्हटलं आहे. त्याला व्यवहारात आणण्यासाठी काय केलं पाहिजे? तर अद्वैत विचारात समता आणि संघटन या तत्त्वांची भर घालायला पाहिजे, असं विवेकानंद विचारांचे सार आहे, जे आप्पांनी काढलेलं आहे. व्यावहारिक वेदांतामध्ये विवेकानंदांनी असं जे काही म्हटलं, त्याचं सार असं आहे: अद्वैत विचार आहे, वेदांत व्यवहार आहे. पण तो व्यवहारात आणण्यासाठी त्या अद्वैत तत्वज्ञानाला समता आणि संघटन या तत्त्वांची जोड द्यायला पाहिजे.
आप्पांनी 1952 साली पहिल्यांदा म्हटलं होतं, त्यानंतर जवळजवळ 24 वर्षांनी आप्पांना जेव्हा एक्सलन्स अवॉर्ड उपराष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला, तेव्हा त्यांनी आणखीन विस्तार केला. समता तर म्हटलेलंच आहे, अद्वैत विचारात समता आणि संघटन या तत्त्वांची भर घातली पाहिजे. त्याशिवाय बंधुता आणि सामाजिक न्याय हे तत्त्व येणार. भारतीय अध्यात्म म्हणजे अद्वैत तत्वज्ञान फक्त बौद्धिक विलास नाही, तर प्रत्यक्ष अद्वैताची अनुभूती घेतली पाहिजे, असं भारतीय अध्यात्म म्हणतं. अद्वैत विचारा मध्ये ते आलं, आणि त्यानंतर भर घातली की विज्ञानातील उत्तमता. विवेकानंदांनी हे practicable वेदांत बोलताना, धर्मशास्त्राला सुद्धा शास्त्रीय कसोट्या लावल्या पाहिजेत. आणि जे शास्त्रीय कसोट्यांवर टिकेल, तोच खरा धर्म असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही विज्ञानातील उत्तमता हा सुद्धा अद्वैत विचारात समता आणि संघटनाची भर घालून झालेला विचार आहे…आणि आप्पांनी त्याचा विस्तार केला. समता, बंधुता, सामाजिक न्याय, विज्ञानातील उत्तमता आणि भारतीय अध्यात्म असा विचार मांडला.
हिंदू राष्ट्राचं ध्येय – धर्मसंस्थापना – समाजसंस्थापना
हिंदू राष्ट्राचं ध्येय काय? प्रत्येक राष्ट्राला त्याच्या अस्तित्वाचे काहीतरी ध्येय असलं पाहिजे. नुसतं टिकून राहायचं, निर्वाह असा मागच्या वेळी मी शब्द वापरला होता. तर हिंदू राष्ट्राचे ध्येय “मानव्य कल्याण,” सगळ्या मानवतेचे कल्याण म्हणजे सर्व जगात धर्म संस्थापना करणे म्हणजेच अतिमानस शक्ती अवतरू मानवतेमध्ये असा त्याचा अर्थ होतो.
हे सगळं जर करायचं असेल, धर्मसंस्थापना हा विषय जर आपल्याला आणखी समजून घ्यायचा असेल, धर्मसंस्थापना म्हणजे काय? तर धर्माची जी व्याख्या आहे की, जो समाजाची धारणा करतो, तो धर्म. धर्म संस्थापनेमध्ये समाजाची धारणा होणे, हे महत्त्वाचे आहे. धारणा या शब्दाची आणखीन फोड करायची झाली, तर समाजामध्ये स्थैर्य आणि संतुलन असलं पाहिजे. समाजाची प्रगती किंवा उत्क्रांती होत गेली पाहिजे. समाज धारणा म्हणजे प्रगतिशील संतुलन. समाजाचे टिकून राहणे आणि समाजाचा विकास हे दोन्ही होणं आवश्यक आहे. तर संघटनाशिवाय आणखी सेवा ही करायला लागते.
समाजसंस्थापनेचं उदाहरण – ज्ञानप्रबोधिनी हराळीतील काम
उदाहरण म्हणून मला असं वाटलं की, ज्ञानप्रबोधिनीचं हराळी केंद्र आहे, तिथलं काम सुरू झालं, त्यामध्ये हे सगळे टप्पे दिसतात. आधी भूकंप झाल्यानंतर अडचणीत सापडलेले लोक, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक यांची सुटका (rescue), मग त्यांचा सगळा संसारच नष्ट झालेला आहे, तर त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणं, म्हणजे रिलीफ वर्क (relief work). सुटका करायची संकटातून, मग मदतीचं वाटप करायचं, जीवनावश्यक वस्तूंचं. मग पुनर्वसन करायचं, की अन्न पाण्याची व्यवस्था झाली, आरोग्याची व्यवस्था झाली, की मग पुन्हा राहायला जागा निर्माण करायची. तर सुटकेचं काम तेव्हा आपल्याला फार नाही करायला लागलं, सैन्यानेच बरच केलं होतं. पण वाटप आणि पुनर्वसन हे काही प्रमाणात आपण केलं. पण त्यानंतर काय करावं लागतं? तर पुनर्निर्माण करावं लागतं. तर हे काम हराळीमध्ये आपण केलं, पण किती वर्ष करायचं? हराळीच्या म्हणजे किल्लारीच्या भूकंपाला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आलेले लेख वाचताना हे विचार समोर आले की, अजून पुनर्निर्माणाचे काम तिथे सुरूच राहणार का? मदतकार्य चालू राहणार का? भूकंपग्रस्त मदत कार्य असं अशा पद्धतीचे लेख आलेले होते.
तर आपण त्याच्यापुढे गेलो. पुनर्निर्माणापर्यंत कदाचित हे सगळं सेवा कार्य असतं, पण नवनिर्माणही करायला लागतं. सेवा, सुटका, वाटप, पुनर्वसन, पुनर्निर्माण – या सगळ्या प्रतिसादी सेवा आहेत. काहीतरी आपत्ती घडली, काहीतरी बदल घडला म्हणून प्रतिसाद म्हणून आपण सेवा केली; पण नवनिर्माणाचं काम आहे, ते मूलग्राही सेवा की पुन्हा अशी संकट आली तर लोक स्वतःचे स्वतः त्याला तोंड द्यायला समर्थ व्हावे. याच्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि हे नवनिर्माण समाजामध्ये काय काय होते याच्यावरती ती समाजाची उत्क्रांती प्रगती होत राहणार. नैसर्गिक आपत्ती असतील, राजकीय उलथापालत होईल, सामाजिक काही प्रश्न येतील, आर्थिक उलाढाली काही होत राहतील. या सगळ्याला प्रतिसाद दिला पाहिजे; पण याच्यातही काहीतरी नवनिर्माण करण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. हे सगळं करणं म्हणजे समाजाचे प्रगतिशील संतुलन. त्यामुळे धर्मसंस्थापना म्हणजे समाज संस्थापना – समाज प्रगतीच्या मार्गावर राहील, ढळणार नाही, आणि त्या त्या टप्प्याला तो संतुलित अवस्थेत राहील असं काम करायला लागेल.
उपासनेतून समाज संस्थापना – सांस्कृतिक बदल
नैसर्गिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक आपत्ती येतात, उलाढाली होतात, तसेच समाजामध्ये काहीतरी सांस्कृतिक बदल होत असतात. ते शिक्षण, संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान याच्यामुळे होत असतील, किंवा कला, मनोरंजन, क्रीडा, संस्कार याच्यामुळे होत असतील. किंवा नीतीमूल्य आणि अगदी संघर्ष टाळायचा, मतभेद टाळायचा विषय जर का म्हणून मांडायचा असेल, तर अस्तित्वाविषयीचे प्रश्न शोधण्याचा प्रयत्न हा सुद्धा सगळ्या समाजामध्ये सतत चालू असतो. विवेकानंदांनी शब्द वापरला की, सर्व समाजामध्ये अस्तित्वाविषयीचे प्रश्न असतात: “आम्ही कोण? आम्ही कुठून आलो? आम्ही पूर्वी कसे होतो? पुढे काय होणार आहे?” तर या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न त्याच्यासाठी वेगळी धर्म मते किंवा धार्मिक संप्रदाय प्रयत्न करत असतात, तत्वज्ञाने करत असतात आणि अध्यात्म त्याचे काही प्रयत्न करत असतात. धर्म, तत्वज्ञान, अध्यात्म हे संस्कृतीचे भाग असतात. वेगळ्या मार्गाने जाणारे लोक असतात; पण त्यातला मूळ हेतू म्हणजे अस्तित्वाविषयीच्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न.
बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या की, लोक याचा विचार करायला लागतात. त्यामुळे राष्ट्रयोग म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा प्रबोधिनी याच्यात घातलेली भर सांस्कृतिक आयामात पुनर्निर्माण आणि नवनिर्माण असं काय केले ,असं बघायला लागलो तर सामूहिक उपासना हा प्रबोधिनीने वाढवायचा प्रयत्न केलेला, पुरस्कार केलेला एक मार्ग आहे. समाज संघटनासाठी सामूहिक उपासना, समूह शक्ती जागरणासाठी सामूहिक उपासना. आपला हा राष्ट्रयोग असल्यामुळे त्या सामूहिक उपासनेमध्ये मातृभूमी पूजन याची भर आपण घातली. सुरुवातीची त्याची आवृत्ती महापुरुषपूजा अशी होती, सर्व-धर्म-प्रार्थना अशी होती. त्याच्यात मग प्रयोग करत करत मातृभूमी पूजन असा आपण संस्कार किंवा अशी एक सामूहिक उपासना वेगळी तयार केली. ती घरोघरी व्हावी असं आपण म्हणतो, कुटुंबा कुटुंबामध्ये व्हावी असं म्हणतो, आणि सार्वजनिक रित्याही व्हावी. सार्वजनिक ठिकाणी पाहिली तर आपल्या कुटुंबात व्हावी, अशी इच्छा निर्माण होऊ शकते. कुटुंबात होत असली नियमितपणे तर असं सार्वजनिक मातृभूमी पूजन हे सहज रुजू शकतं. जसा घरोघरचा गणेशोत्सव रस्त्यावर सार्वजनिक झाला, तसं घरोघरचं मातृभूमी पूजनही सार्वजनिक होऊ शकेल. आणखीन मग या सामूहिक उपासनांमध्ये काय केलं आपण तर नियमित सामूहिक उपासना काही असतात, वेगळ्या संस्कार, मोठ्या संस्कार विधींच्या निमित्ताने प्रासंगिक अशा सामूहिक उपासना होतात. त्याच्यामध्ये संस्कृत मधले काही म्हटलं पाहिजे आणि मातृभाषेतलं किंवा लोकभाषेत काही म्हटलं पाहिजे. पद्यातले काही म्हटलं पाहिजे आणि गद्यातले काही म्हटलं पाहिजे. उपासनेमध्ये स्वरचित असेही. तुम्ही काहीतरी प्रार्थना म्हणा, संकल्प करा, आणि पारंपारिक हजारो वर्ष जे संकल्प सगळेजण उच्चारात आलेले तेही पुन्हा म्हणा, असे आपण म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या संस्कार विधींमध्ये विज्ञानाभिमुखता असली पाहिजे. म्हणजे पूर्वी असं करत होते; पण आज आम्हाला नवीन ज्ञान झालेलं आहे. तर हे करायची आवश्यकता आहे का?
आज परिस्थिती बदललेली आहे. हे करण्याची आवश्यकता आहे का? गणपतीचे विसर्जन नदीतच करणे, ही परंपरा; पण घरातल्या बादलीत केलेलेही चालेल. कारण नदीत केलं तर पर्यावरणाचा रास होतो. हा आपण परिस्थितीनुसार केलेला बदल आहे. आणि आपल्याला शेकडो हजारो मूर्त्या जर का नदीमध्ये गेल्या तर नदीचे प्रदूषण होतं, हे कळल्यामुळे आपण केलं. हे असे बदल जे होतात संस्कार विधीमध्ये, ती आपली संस्कारांमधली विज्ञानाभिमुखता आहे. या उपासनेचा आपण इतका विचार प्रबोधनी मध्ये केलेला आहे, तो प्रबोधनेच्या सगळ्या सदस्यांच्या कृतीमध्ये उतरलेला असेल असं नाही; पण हे करायचं असं आपण म्हटलेले आहे.
आप्पांचे जे विचार आहेत, त्याचं संकलन आपण वेगळ्या शीर्षकांखाली केलेले आहे. तर राष्ट्रासंबंधीचे त्यांचे विचार आहेत, ते राष्ट्रार्थ भव्य कृती या नावाची एक पुस्तिका केलेली आहे. एक पद्य आणि तेरा उतारे वेचे त्याच्यामध्ये आहेत. ते वेचे मी सहज पाहत होतो तर त्याच्यामध्ये सात वेचे म्हणजे निम्मे वेचे असे आहेत की, जिथे राष्ट्रासाठी उपासनेची आवश्यकता सांगितलेली आहे. एक प्रकरण स्वयंप्रेरणा नावाचं, आपली स्वयंप्रेरणा राष्ट्रासंबंधीचे काम करण्याची वाढावी याच्यासाठी आपण सगळ्यांनी उपासना केली पाहिजे, असं त्याच्यामध्ये म्हटलेले आहे. आपली उपासना जेवढी उत्कट होईल, तेवढी आपली प्रेरणा जोरदार होईल, असं एका उताऱ्यामध्ये म्हटलेले आहे. सगळ्या समाजामध्ये जर काही बदल व्हायचे असतील तर राजकीय सामाजिक क्रांत्या होतात. त्याच्यात वरवरचे बदल होतात. समाजाचा मूलभूत पिंड जर का बदलायचा असेल तर तो अध्यात्म जागरणाने होईल, आणि असं अध्यात्म जागरण करण्याची शक्ती येण्यासाठी उपासना केली पाहिजे, असे एका उतारामध्ये म्हटलेले आहे. सगळ्या समाजातच हे वातावरण निर्माण होण्यासाठी ‘सामूहिक उपासना’ ही हजारो लाखो कोटी कोटी लोकांनी केली पाहिजे. ‘कोटी कोटी कंठ कर नाद कराले’, असं जे वंदे मातरम मध्ये म्हटलेले आहे, तर तशी आपली सामूहिक उपासना सुद्धा ही एकाच ठिकाणी कोटी लोकांची नाही व्हायची? पण एकाच वेळी कोटी कोटी लोकांची उपासना चाललेली आहे, असं व्हावं असं म्हटलेलं आहे.
असे बदल घडवण्यासाठी ज्या प्रकारचे नेतृत्व लागेल, ते नेतृत्व विकसन सुद्धा उपासनेनेच होईल, असं एका उताऱ्यामध्ये म्हटलेलं आहे. इतकं जर का उपासनामय वातावरण राष्ट्रामध्ये होऊ शकलं, तर त्या अध्यात्म प्रेरणेतून जग जिंकणं हे उद्दिष्ट सहज आपल्या डोळ्यासमोर येऊ शकेल. मानव्य कल्याण हेच आपलं राष्ट्रीय ध्येय आहे, असे त्या पुस्तिकेमध्ये म्हटलेलं आहे. 14 पैकी सात उताऱ्यांमध्ये आप्पांच्या राष्ट्रविचार आणि उपासना याचा संबंध आलेला आहे; पण हा सगळा उपासनेबद्दलचा, अध्यात्माबद्दलचा विचार हा जर का प्रत्यक्षात आणायचा असेल, तर उपासनेमधून सुद्धा प्रवृत्तीपर अध्यात्म विचारांचे सिंचन झालं पाहिजे, असं आपण म्हटलेलं आहे.
उपासना – प्रवृत्तीपर अध्यात्म विचारांचे/राष्ट्रकार्याचे सिंचन – वर्तन आदर्श
अगदी साध्या शब्दांमध्ये म्हटले की प्रवृत्तीपर अध्यात्म विचार म्हणजे काय? त्याचं समाजात सिंचन करायचं म्हणजे काय? तर दिवसाच्या 24 तासांपैकी एक तास वेळ उपासनेसाठी वापरायचा, द्यायचा, आणि बाकी सगळा 23 तासाचा वेळ हा प्रत्यक्ष कामामध्येच आपल्याला वापरायला पाहिजे. काम करत करतच या उपासनेतून जी प्रेरणा मिळेल, ती व्यवहारामध्ये येते; त्यामुळे अध्यात्म विचार हा एक तास आणि त्या प्रेरणेतून प्रवृत्तीपर राष्ट्रकार्य हे 23 तास म्हणजे काम करणे आणि त्याच्यासाठी चिंतन करणे असं झालं पाहिजे, असं म्हटलेलं आहे. अशी काम आणि उपासना यांची सांगड, त्याचं प्रमाण असं जर का घालायचा असेल, तर लोकांच्या समोर त्यासाठीचे वर्तन आदर्श लागतात. वागण्याचे आदर्श म्हणजे रोल मॉडेल लागतात.
त्यामुळे असे कार्यकर्ते तयार होणं, संघटनेत असं नेतृत्व करणारे कार्यकर्ते तयार होणे की जे स्वतः अशी उपासना ही नियमितपणे करतायत आणि राष्ट्रकार्याचाही विचार सतत करतायत, असं झालं पाहिजे. असं प्रवृत्तीपर अध्यात्मविचाराचे सिंचन जर का झालं, असे रोल मॉडेल – वर्तनादर्श जर का सतत इतरांच्या समोर उभे राहिले, अशा वर्तना आदर्शांच्या संगतीत राहून नवीन नवीन लोक हे शिकत गेले, तर त्यातून काय झालं पाहिजे? तर व्यक्तिगत आणि सामूहिक कर्तृत्व समाजातलं वाढलं पाहिजे, आणि व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्य हे वाढलं पाहिजे. असं काम आणि उपासना यांची योग्य सांगड घातलेल्या रोल मॉडेल च्या सहवासात राहण्याची संधी संघटनातून मिळते. त्यामुळे राष्ट्र घडवायचा असेल, समाज संघटित करायचा असेल, तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने प्रवृत्तीपर अध्यात्म विचाराचे सिंचन झालं पाहिजे.
राष्ट्रकार्य दिशा
नियमित उपासना आणि त्याच्याबरोबर त्या उपासनेच्या बरोबर नियमित काम असे झालं पाहिजे. हे काम करताना राष्ट्रयोगामध्ये कुठली कुठली काम करायला लागतील, तर राष्ट्रीय एकात्मता याच्यासाठी काम करायला लागेल. मुळात असलेल्या एकात्मतेची आठवण सगळ्यांना करून देणे असं करायला लागेल. विवेकानंदांनी याच्यासाठी सांगितलेले मार्ग काय? तर जास्तीत जास्त भारतीय लोकांना सामावून घेऊ शकेल असं प्रतीक म्हणजे ओम. ओम हे अक्षर जसं आपण काढतो, ते सगळ्यांना सामावून घेईल असं नाही; कारण भारतात जेवढ्या लिप्या आहेत, त्या प्रत्येक लिपीमध्ये ओम काढायची पद्धत वेगळी आहे. पण ओम हे ध्वनी रूप प्रतीक, हे सगळ्या भारतीयांना त्यांच्या त्यांच्या लिपीनुसार ओम काढला तरी त्याचा उच्चार सगळे भारतीय एकाच पद्धतीने करतील. त्यामुळे ओम हे सगळ्यांना सामावून घेऊ शकेल असं प्रतीक आहे.आणि मातृभूमी हेच दैवत, अखंड भारताची चित्रमूर्ती हे जास्तीत जास्त लोकांना सामावून घेऊ शकेल असं आहे. सगळ्यांना सामावून घेईल हा आदर्श आहे; पण आम्ही ओमच मानत नाही, असं म्हणणारे लोक आहेत आणि आपण त्यांचे स्वीकार करतो. आता अखंड भारत विसरा, आता जो काही भारत आहे तो स्वीकार, असं म्हणणारे लोक आहेत. अशा लोकांनाही आपण स्वीकारतो. मग जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणारी समान भूमिका म्हणजे ओम हे ध्वनिरूप प्रतीक आणि मातृभूमी हे दैवत. पण त्याच्याशिवाय बाकीचे आहेत, त्यांचं काय? सर्वेषाम अविरोध आणि अविरोध म्हणजे विरोध करायचा नाही, असं नसून अविरोधचा विधायक अर्थ मी असा घेतो की, सर्वेशाने म्हणजे ज्यांना हे ध्वनीरूप प्रतीक, ही चित्रमूर्ती मान्य नाही, त्यांच्याशी प्रेमाचं नातं, प्रेमाचा संवाद त्यांच्याबरोबर करणे, आत्मीयतेचा अनुभव त्यांना देणे, याच्यातूनच त्या सगळ्यांना जोडता येणार, या सर्वेषाम अविरोधे त्याच्यामुळेच. आपल्या राष्ट्रपुरुषांविषयी लेख आहे, त्याच्यामध्ये आप्पांनी म्हटले की, ‘एकं सत विप्रा बहुदा वदंती’ असं फक्त परमेश्वराच्या बाबतीत नाही, आपल्या राष्ट्राच्या बाबतीत सुद्धा असं आहे. त्यामुळे काही त्याला हिंदू म्हणतील, काही भारतीय म्हणतील, काही इंडियन म्हणतील, काही हिंदुस्तानी म्हणतील. पण ज्या कुठल्या राष्ट्राबद्दल, देशाबद्दल ते बोलतात, ते कुठलेही नाव असलं तरी त्या सगळ्यांवरती आपल्याला प्रेमाने त्यांचा स्वीकार करता आला पाहिजे.
हिंदू या नावाबाबत विवेकानंदांच्या वेळी प्रश्न निर्माण झालेला होता, आणि मग त्यांनी सरळ सांगितलेलं होतं की, हिंदू हा समाजवाचक शब्द आहे. सिंधू नदीच्या पलीकडच्या भूमीत राहणारे ते सगळे हिंदू. मग त्यातल्या बहुसंख्य हिंदूंचं जे धर्ममत होतं, त्यांना आम्ही वेदांती म्हणू. त्यामुळे हिंदुस्थानामध्ये वेदांती लोक अनेक आहेत, त्यांना हिंदू वेदांती म्हणायचं. तसेच हिंदू बौद्ध, हिंदू जैन, हिंदू वैदिक, हिंदू सिख, हिंदू लिंगायत, हिंदू वीरशैव, वैष्णव, शैव, शाक्त, अवधूत गण, दत्त संप्रदाय; पण ते सगळे हिंदू आहेत. आणि असंच हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन असंही जेव्हा भारतामध्ये म्हणता येईल, म्हणजे अमुस्लिम आणि अख्रिश्चन, मुस्लिम ख्रिश्चन यांना तुम्ही हिंदू मुस्लिम आणि तुम्ही हिंदू ख्रिश्चन असे म्हणू शकतील. आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन सुद्धा ‘हो, आम्ही हिंदू मुस्लिम आहोत, हिंदू ख्रिश्चन आहोत’, असं म्हणतील, तेव्हा भारतात खरी समाज संस्थापना झाली, असं आप्पांनी म्हटलेलं आहे.
हिंदुस्थानातली आणखी एक परंपरा कारण शेवटी राष्ट्राला भूमी लागते, समान परंपरा लागते, समान उद्दिष्ट लागते, आणि समान वर्तमान आपण अनुभवत आहोत. एकाच परंपरेत सगळे जात आहोत, असे लोकांना वाटलं पाहिजे. तर या सगळ्या आपल्या परंपरेमध्ये गुरुपूजन अशी एक कल्पना आहे. आणि मग या परंपरेत नवनिर्मिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली की, कोणी मानवी गुरु नाही. भगवा ध्वज हा गुरु आहे. तुकडोजी महाराजांनी एक बदल केला की, नुसती गुरुची गादी तिथे आहे, आणि तिथे समई लावलेली ज्योत आहे. आणि हे गुरुतत्व आम्ही मानतो; म्हणून मानवी गुरु नाही कोणी आणि ह्या गुरुतत्वाची सेवा करणं, अशी संघटना तुकडोजी महाराजांनी ‘गुरुदेव सेवा मंडळ’ या नावाने सुरू केली. आणि ही सेवा कशी करायची, तर त्यांनी ग्रामगीतेमध्ये सविस्तर मांडलेलं आहे. आपल्या हराळीच्या कार्यकर्त्यांनी मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ग्रामगीतेचा अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर त्यांच्या प्रेरणेमध्ये आणि त्यांच्या विचारपद्धतीमध्ये कसा बदल झाला, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर असं मला वाटलं की, राष्ट्रीय एकात्मतेसाठी जसं ओम आणि मातृभूमी हे दैवत जसं आहे, तसं काय काम करायचं. तसं ग्रामगीता हा अजूनही पन्नास-साठ टक्के भारतीयांसाठी तो एक मार्गदर्शक असा ग्रंथ होऊ शकेल. धर्मग्रंथ नाही म्हणत मी; मार्गदर्शक ग्रंथ, मॅन्युअल.
ग्रामगीतेमध्ये पाच पाच अध्यायांचे आठ गट केलेले आहेत. एका गटामध्ये आश्रम धर्म म्हणजे व्यक्तिगत जीवन कसा असलं पाहिजे, याच्याबद्दल सांगितलेले आहे. एका भागामध्ये सेवा आणि संघटन याची आवश्यकता काय आहे, कशी आहे, काय केलं पाहिजे हे सांगितलेले आहे. एक ग्राम निर्माण म्हणजे गावाचे पुनर्निर्माण, आणि गावाचे निवनिर्माण म्हणजे करायचं. याच्यात काय काय केलं पाहिजे गावातल्या आर्थिक, भौतिक सगळा विचार हा करायचा, तो त्याच्यामध्ये आलेला आहे. एक गावामध्ये व्यक्तिगत, कौटुंबिक आणि गावावरती सुद्धा काय संस्कार झाले पाहिजेत, याचा विचार केलेला आहे. गावातली सामूहिक प्रार्थना कशी असते पाहिजे, हे सांगितलेले आहे. एका ह्याच्यामध्ये प्रयत्नवादाचे महत्त्व सांगितलेले. ग्राम कुटुंब म्हणून राहता आलं पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे, असं सांगितलेले आहे, आणि एकाच वेळी व्यवहारातली उन्नती कशी करावी, आज ज्याला आपण भौतिक नैतिक विकास म्हणतो ते, आणि आत्मप्रचिती कशी घ्यावी, अध्यात्मापर्यंतचा विचार असा या आठ भागांमधून मांडलेला आहे. सात भाग मी बोललो. शेवटचा भाग तो क्रम बदलाय, पण मी शेवटी घेतलाय की, दृष्टी परिवर्तन, ज्याला आपण प्रबोधिनीमध्ये सध्या वृत्तिघडण असं म्हणतो. कुठल्या कुठल्या बाबतीत आजपर्यंत आपण जो विचार करतोय, मग गरीबी-श्रीमंती याच्याबद्दल आहे, जातीच्या विषमतेबद्दल आहे, स्त्री-पुरुषांमधल्या विषमतेबद्दल आहे. असं हे सगळं दृष्टी परिवर्तन गावात काय काय झालं पाहिजे, असं तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्येच स्त्री-शक्तीबद्दल सुद्धा सांगितलेला आहे. स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता ही एक महत्त्वाची दिशा समाज विकासासाठी आवश्यक आहे, समाज संघटनासाठी आवश्यक आहे. तसे स्त्री शक्ती प्रबोधन ही सुद्धा एक महत्त्वाची दिशा समाज विकासासाठी आवश्यक आहे.
स्त्रीशक्ती प्रबोधनाची प्रबोधनीमध्ये आपण छान चार सूत्रे शोधून काढली की, स्त्रियांचा आत्मसन्मान आधी वाढला पाहिजे. कुटुंब रचनेमध्ये विधायक बदल होऊन स्त्रियांना कुटुंबामध्ये सुद्धा सन्मानाचे समानतेचे स्थान मिळालं पाहिजे. समाजामध्ये स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करू शकल्या पाहिजे, आणि राष्ट्रजीवाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया सहभागी होऊ शकल्या पाहिजेत. हे सगळं जर का झालं, तर स्त्रीशक्ती प्रबोधन म्हणजे स्त्रियांमधल्या आत्मशक्तीचे प्रबोधन झालं, आत्मशक्तीचा प्रकटीकरण झालं. मागच्या व्याख्यानामध्ये सेल्फ ऍक्च्युअलायझेशनसाठी आत्मवास्तविकीकरण वगैरे असं मानसशास्त्रीय पुस्तकांमध्ये केलेलं भाषांतर मी वापरत होतो. पण आत्मशक्तीचं किंवा स्वशक्तीचं प्रकटीकरण असेही म्हणायला हरकत नाही. स्त्रीशक्ती प्रबोधन म्हणजे स्त्रियांमधल्या आत्मशक्तीचं, स्वशक्तीचं प्रकटीकरण असं झालं पाहिजे.
आध्यात्मिक राष्ट्रयोग – समग्र राष्ट्रयोग
राष्ट्रयोगाची मांडणी करत गेल्यानंतर आणि सुरुवातीला मी म्हटलं तसं इष्ट पंथ, संप्रदाय आणि धर्म संस्थापना. धर्म हे चार भारतीय विचारातले चार स्तर लक्षात घेतले तर राष्ट्र हे आपलं इष्ट सगळ्यांचं सामुदायिक, व्यक्तिगत वेगळं असलं तरी सामुदायिक इष्ट असलं पाहिजे. राष्ट्र हे इष्ट. योग हा शब्द मी पहिल्या व्याख्यानातच म्हटलं होतं की, आपल्या इष्टावरती एकाग्र होणं या अर्थाने योग हा शब्द आहे. पाच वर्षांपूर्वी मी जेव्हा बोललो होतो, तेव्हा म्हटलं होतं की, राष्ट्रयोग हा मध्यम पद लोपी समास आहे, असं समजूया आपण. म्हणजे तीन पद आहेत. एकूण त्यातलं मधलं पद हे नाहीसं झालं, आणि दोनच पहिलं आणि शेवटचं पद राहिलं. राष्ट्र हे पहिलं पद, योग हे शेवटचं पद, आणि मधलं पद ते राष्ट्र सेवा योग असं म्हणा, राष्ट्रयोग असं म्हणा, राष्ट्रभक्ती योग म्हणा, राष्ट्र चिंतन योग म्हणा. हे सगळं करायला लागेल. हे सगळं केलं म्हणजे ‘राष्ट्र’ या विषयावरती आपलं सगळं लक्ष एकाग्र होऊ शकेल. राष्ट्रयोग हा सगळ्यांना सामुदायिक इष्टासाठी जाण्याचा मार्ग आहे. आपल्याला तो संप्रदाय करायचा नाहीये.
मागच्या व्याख्यानामध्ये मी म्हटलं होतं की, अनेक सुधारणा करायच्या प्रयत्न आपल्या देशात झाले आणि त्याच्यातनं संप्रदाय झाले. त्यातल्या त्यात विवेकानंद आणि गांधीजींनी असा प्रयत्न केला की, नवीन संप्रदाय सुरू केला नाही. त्यांनी आणि सगळ्या समाजात आपल्याला बदल करायचे आहेत, असं म्हटलं. तसं राष्ट्रयोग हा काही वेगळा संप्रदाय आपल्याला करायचा नाही. व्यक्तीश: कुठल्याही कुठल्याही इष्टाची पूजा करा, तरी राष्ट्रयोगाचं आचरण करू शकता. तुमचा कुठलाही संप्रदाय असू दे, धर्म मताचा संप्रदाय असू दे किंवा राजकीय संप्रदाय असू दे, तरी तुम्ही राष्ट्रयोगाचा आचरण करू शकता. पाच वर्षांपूर्वी मला राष्ट्रयोगावरचे भाषण झाल्यानंतर प्रश्न विचारलेले होते. त्यातल्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिली होती.
एका प्रश्नाचे उत्तर द्यायचं राहिलं होतं की, योग म्हटला की मग त्याच्यासाठी यमनियम सांगतात. कुठलाही योग असेल तर त्याच्यासाठीचे यमनियम काय? तर मी विचार करत होतो की, यमनियम म्हणून अगदी दैनंदिन याच्यात तुम्ही काय करा. अगदी बारीक तपशील जर का सांगितली तर मग तो संप्रदाय व्हायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला थोडासा त्या यमनियमांचा अर्थ लावायला मोकळीक दिली पाहिजे, सवड दिली पाहिजे. मग अध्यात्मिक राष्ट्रयोग असं म्हटलं तरी, अध्यात्माचा अर्थ मी पाच वर्षांपूर्वी बोलताना म्हटलेलं होतं की अध्यात्माचा अर्थ आपण समग्रता या अर्थाने घेऊया. व्यक्ती आणि समाज. मूर्त दृश्य जगात यशस्वी होणं आणि अमूर्त फक्त बुद्धिगम्य अशा मध्ये सुद्धा समाधान मिळवून स्त्रिया आणि पुरुष, बालक आणि वृद्ध या सगळ्यांचा विचार ज्याच्यामध्ये होऊ शकेल, आणि सगळे ज्याचा आचरण करू शकतील असा तो आध्यात्मिक राष्ट्रयोग म्हणजे समग्र राष्ट्रयोग असा शब्द वापरायला हरकत नाही.
आपण प्रयोग करून पाहूया, आपल्याला कुठला शब्द जास्ती उपयुक्त ठरतोय तो; पण आध्यात्मिक राष्ट्रयोग म्हणतो म्हणजे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी तत्त्व आहे, अशी श्रद्धा ठेवून त्या तत्त्वाला पाहिजे ते नाव द्या. पण समग्र जीवनाचा विचार करताना त्याही तत्त्वाचा विचार केला पाहिजे, आणि त्याच्यासाठी काय करायचं, हे ठरवलं पाहिजे. तर मग आपल्या आयुष्यामध्ये समग्रता येऊ शकेल. त्याच्यावरती मतभेद आहेत की, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी याच्या पलीकडे तत्त्व काही नाही, शून्य आहे, असे काही जण म्हणतात. त्याच्या मागे जे आहे, तेच पूर्ण आहे, असे काही म्हणणारे आहेत. शून्याचा अर्थ काय, पूर्णचा अर्थ काय, तो अनुभव घेऊन ठरवावं प्रत्येकाने, पण समग्र विचार करणे हे जास्ती महत्त्वाचं. हे सगळ्यांना सहज स्वीकारता येईल, सगळ्यांना सामावून घेता येईल, असं आहे. त्यामुळे आध्यात्मिक राष्ट्रयोग म्हणजे समग्र राष्ट्रयोग. राष्ट्र हे सामुदायिक इष्ट आहे आणि योग म्हणजे या राष्ट्रासंबंधी चिंतन, भक्ती हे सगळं करायचा मार्ग. या मार्गाने जाणाऱ्यांचा वेगळा संप्रदाय आपल्याला करायचा नाहीये. कायम ती ओपन सिस्टीम असली पाहिजे. कोणी त्याच्यात कधी येऊ शकलं पाहिजे, आणि एखाद्याला रेंगाळावसं वाटलं, बाहेर पडावसं वाटलं, तर तोही बाहेर पडू शकला पाहिजे. पण अशा राष्ट्रयोगाचं आचरण करून समाज संस्थापना करता येईल. राष्ट्रघडण करता येईल, असं आपण म्हणतो, तर मग या समग्र किंवा अध्यात्मिक राष्ट्रयोगाचे यमनियम काय असा मागच्या वेळी अनुत्तरित राहिलेला प्रश्न यानी मी आजच्या व्याख्यानाचा शेवट करणार आहे.
अध्यात्मिक राष्ट्रयोगाचे यमनियम
आपल्या प्रबोधिनीच्या ज्या उपासना आहेत वर्षारंभ वर्षांताच्या, त्यांच्यामध्ये वेगळ्या श्लोकांचे उच्चारण आपण करतो, त्याचा अर्थ समजून घेतो. आणि त्या सगळ्या श्लोकांमध्ये त्या काळामध्ये जे स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता नव्हती, पण आज आपल्याला त्याची आवश्यकता वाटते, अशा सगळ्या कल्पना यानंतर गद्य प्रार्थनेमध्ये आपण बघतो. मगाशी म्हटलं तसं संस्कारांमध्ये पद्य आणि गद्य, संस्कृत आणि लोकभाषा, स्वभाषा, पारंपारिक रचना आणि आपण स्वतः केल्या रचना, असं सगळं आपण त्याच्यामध्ये एकत्र केलेले आहे. देवाच्या सतत सानिध्यात असणे हे सगळ्यांचे अंतिम ध्येय आहे, हे आपल्यासाठी संस्कृतीने शोधून काढलेलं आहे. आणि एकदम अंतिम ध्येयापर्यंत झेप घेता येत नाही, म्हणून मधली मधली ध्येय ही ठरवावी लागतात. एका ध्येयाकडून म्हणजे उपध्येयाकडून दुसऱ्या उपध्येयापर्यंत असं टप्प्याटप्प्याने प्रवास करत करत अंतिम ध्येयापर्यंत जायचं असतं. काही वेळा पहिल्या टप्प्याकडे जायच्या आधीच आपल्याला दुसरा, तिसरा टप्पा दिसायला लागतो. तर पुढचे टप्पे आहेत, याचं भान ठेवून काम करणं म्हणजे ती काम आणि उपासना याची सांगड – ‘प्रवृत्तीपर अध्यात्म’. एका ध्येयाचा ध्यास आपण घेतला की त्याच्यातून पुढचं ध्येय काय आपल्याला सुचू शकतं. कोणी सांगितलं नाही तरी आणि अंतिम तत्वाचं, परमेश्वराचं कायम सानिध्य आपल्याला मिळावं, हेच माझं ध्येय असं वाटणे ही सुद्धा उपासनाच आहे. या ध्येय मार्गावरचा, ज्याच्यात अनेक टप्पे आहेत, त्याच्यावरचा प्रवास व्यक्तिश: आणि समूह गटाने करणे, त्याच्यासाठीची प्रार्थना ही सुद्धा उपासनाच आहे. तर आपल्या या वर्षारंभ-वर्षांताच्या गद्य प्रार्थनांमध्ये अंतिम ध्येयापर्यंतचा शिडीवरील काही ध्येयांचा उल्लेख केलेला आहे. आणि त्या त्या टप्प्यासाठीचे काम करणं, करत जाणं हेच मला वाटतं. राष्ट्रयोगाचे, समग्र राष्ट्रयोगाचे यमनियम आहेत. शिडी उभी भिंतीला लावून ठेवली की, एकानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी अशी येते. शिडी आडवी दिसली तर सगळे टप्पे एकाच वेळी समोर दिसतात. त्याच्याकडे उभं बघायचं का आडवं बघायचं, हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. त्यामुळे पहिला टप्पा पूर्ण झाल्यावरच मी दुसऱ्या टप्प्यासाठी काम करीन, असं म्हणायचं कारण नाही. माझी शिडी आडवी ठेवलेली आहे आणि मी सगळ्या टप्प्यांसाठी एकटाच काही ना काहीतरी काम करेन, असेही म्हणता येईल. तर असे हे समग्र किंवा अध्यात्मिक राष्ट्रयोगाचे यमनियम असे पाहून आजच्या व्याख्यानाचा आपण समारोप करू या.
त्या गद्य प्रार्थनेमध्ये पहिला मुद्दा म्हटलेलं आहे, म्हणजे पहिले तर ‘राष्ट्रार्थ भव्य कृति काही पराक्रमाची’ राष्ट्रासाठी करायची आणि पराक्रमापासून सुरुवात करायची. मग बाकीचे सगळे उद्दिष्ट म्हणजे कृतिशीलतेपासून सुरुवात आहे. त्यातला पहिला टप्पा किंवा पहिला यम, नियम, पहिला नियम की, प्रत्येक व्यक्तीने बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि आत्मिक सर्व प्रकारे कार्यक्षम होणे, हा राष्ट्रयोगाचा पहिला नियम आहे.
विद्याव्रत संस्कारामध्ये आपण तेच सांगत असतो. मग असं सर्व प्रकारे जर का कार्यक्षम झालो आपण, तर या सगळ्या क्षमतांच्या मदतीने आपल्या जीवनात आपण जे काही काम करायचं ठरवू, त्यात परमोच्च यश मिळवू हा दुसरा नियम तर वृत्ती वीरवृत्ती सगळ्यांमध्ये निर्माण होईल. मग परमोच्च यश पहिल्यांदा लोकांनी ठरवलेलं असतं. सुवर्णपदक कशाला द्यायचं, क्वालिफाईंग काय वगैरे; पण त्याच्यानंतर आपण पदार्पण केलेल्या क्षेत्रात मौलिक आणि मूलगामी कार्य करणे हा तिसरा नियम आहे. लोक काही म्हणू देत, मला माहिती आहे, काय मूलगामी आहे. सगळे जे करतायत – खाली अनुदान घेऊन मिळवून संशोधन करणे किंवा काम करणे, जे आहे त्याच्यामध्ये कशाला अनुदान मिळतं, त्या प्रकारचा आपण प्रस्ताव लिहायचा अशी पद्धत असते. अनुदान मिळो किंवा न मिळो, मला माहिती आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि हेच काम मी करणार. जसं सगळ्या ज्ञानोप्रबोधिनीचे काम चालतं, त्याला कोणी नाही अनुदान दिलं तरी आम्ही काम करणारच आहोत. कारण हे मौलिक मूलगामी कार्य आहे. मौलिक म्हणजे अतिशय मोलाचं आणि मूलगामी म्हणजे फक्त वरवरची पानं खुडायचं काम नाहीये, तर मुळापाशी पाणी घालण्याचे काम आहे. त्याच्यात सगळं अमूलाग्र बदल होणार आहे. तर हा राष्ट्रयोगाचा तिसरा नियम. मग हे आपण जसं करतोय, तसं देशवासियांना जागृत करणे, सगळ्या देशवासियांना आणि स्वतःला कर्तृत्व, पराक्रम, ज्ञान, पौरुष यात पारंगत करणे हा चौथा नियम आहे.
ही पहिली जी चार ध्येय आहेत, चार टप्पे, चार नियम जे सांगितलेले आहेत. हे चार नियम जे मानणारे आहेत, त्या सगळ्यांच्या बरोबर संघटित होणे, आपण त्यांच्याशी जुळवून घेणे आणि आपल्या शक्ती याची त्यांची बेरीज आणि गुणाकार झाला पाहिजे, असं करणं हा राष्ट्रयोगाचा पाचवा नियम आहे. मग असं संघटित व्हायचं असेल तर काय करावं लागतं? तर आपलं स्वतःचं मन आणि इतरांचं मन संघटनेला आवश्यक असं लवचिक जुळवून घेणारं, परस्परांना प्रेमाने बांधणार आणि परस्परांपासून कोणत्याही कारणासाठी तुटणार नाही, भांडणार नाही, असं करणं हा त्याचा राष्ट्रयोगाचा पुढचा नियम. कारण राष्ट्र म्हणजे संघटित समाज, त्यामुळे ‘संघटन’ हे तत्व हे राष्ट्रयोगामध्ये अतिशय आवश्यक आहे. अशी मन घडवणे, ही वेगळ्याच प्रकारची मानसिक कार्यक्षमता आहे. सुरुवातीला मानसिक कार्यक्षमतेमध्ये मनाचे कठोर गुण आणि मृदू गुण वगैरे असा आपण बराच विचार करतो; पण त्याच्याशिवाय, ही वेगळीच मानसिक क्षमता आहे की, आपलं मन लवचिक जुळवून घेणारं, इतरांना प्रेमाने बांधणारं आणि कोणत्याही कारणासाठी इतरांपासून आम्ही तुटणार नाही.
असं मग आपण एका क्षेत्रात काम करत असू, पण आपण सगळेजण जर का एकत्र काम करायला लागलो, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही संघटना घडवू. त्याच्यासाठी मी काम करीन, ज्या ज्या क्षेत्रात जाईन, जिथे जिथे जाईन, तिथे मी संघटना करीन. कालच एक आपले मित्र आले होते माझ्याकडे आणि त्यांनी म्हटलं की, “मी आत्ता जे काम करतोय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटन करतोय आणि माझ्या व्यवसायातले माझ्या प्रकारचे काम करणारे जास्तीत जास्त लोक तयार व्हावेत असं करतोय.” तर हे आहे ना संघटन, म्हटलं, “हो तुझ्या क्षेत्रातला संघटनच.” प्रत्येक क्षेत्रात आपल्याला संघटन करायचं. मग समग्रता – आपण विचार करतोय, तर संन्यास घेणाऱ्या आणि संसार करणाऱ्या अशा दोन्ही लोक प्रकारच्या लोकांमधून धर्म सेवा करणारे, ईश सेवा करणारे, राष्ट्र कल्याण करणारे असे कोण कोण आहेत, असे आदर्श शोधणे, असे वर्तन, आदर्श असे रोल मॉडेल्स आपण शोधणे आणि त्यांच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा राष्ट्रयोगाचा नियम आहे.
आपला कणकण आणि क्षणक्षण परमेश्वरी प्रेरणेने राष्ट्रासाठीच कारणी लागणे, अशी स्थिती यावी हा सुद्धा राष्ट्रयोगाचा नियम आहे. तर असे हे त्या गद्य प्रार्थनेमध्ये जे नऊ टप्पे आहेत, तेच मला वाटतं की समग्र किंवा अध्यात्मिक राष्ट्रयुगाचे यमनियम आहेत. हे पाळायला आपण लागलो तर राष्ट्रयोगाची कल्पना आपल्याला अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. तर अशा पद्धतीने राष्ट्रयुगाचा एक नमुना आपण ज्ञानप्रबोधिनीमध्ये उभा करत आहोत. काही प्रमाणात केला आहे. असे अनेक नमुने देशभर तयार होणं, हे सुद्धा राष्ट्रयोगाचाच आचरण आहे, असं मला वाटतं. देशभरातल्या सगळ्या लोकांना करण्यासाठी अनेक संघटना लागतील. तर अशा संघटनांसाठी सुद्धा परस्पर पूरक बनणं हा समग्र राष्ट्रयोग आहे, असं मला वाटतं.
एवढं म्हणून मी चार भागांमधली राष्ट्रयोगाची मांडणी थांबवतो. आजही काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये टाकावेत, व्यक्तीश: लामा कळवावेत. पण मधल्या या दोन व्याख्यानांमध्ये काहीच प्रश्न नव्हते. त्यामुळे सगळ्या प्रश्नांचा एकत्र विचार करण्यासाठी आणखीन एखादं सत्र पुढच्या रविवारी काही मी घेणार नाहीये. पण कसे प्रश्न येतील त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन कशा पद्धतीने या चारही व्याख्यानांवर एकत्र काही चर्चा घडवायची, याच्याबद्दलचा निर्णय यथावकाश करू. ज्यांना ज्यांना या व्याख्यानाची सूचना येत होती, त्यांना अशी चर्चा जेव्हा योजली जाईल, तेव्हा चर्चेची सूचना आपल्याला मिळेल. तेव्हा ज्यांना काही प्रश्नोत्तर करायचे आहेत किंवा इतरांबरोबरचे प्रश्नोत्तर ऐकायचे आहेत, त्यांनी अशा चर्चेच्या वेळी सहभागी व्हावं. आजच्या व्याख्यानाला आणि चारही व्याख्यानाने जे उपस्थित होते, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो.
प्रवृत्तीपर अध्यात्म-विचारांच्या सिंचनातून राष्ट्रयोगाची साधना – आध्यात्मिक राष्ट्रयोग – भाग ४ टिपण
इष्ट – पंथ – संप्रदाय – धर्म – योग – आध्यात्मिक राष्ट्रयोग
इष्ट म्हणजे प्रत्येकाचा आध्यात्मिक आदर्श आणि तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. अनेक लोकांना आपल्या इष्टाची उपासना करताना आपण सगळेजण एका मार्गाने चाललेलो आहोत, असं लक्षात आल्यानंतर एकत्र यावसं वाटतं आणि मग त्यातून अनेक पंथ, संप्रदाय निर्माण होतात. आपल्या इष्टापर्यंत पोहोचण्यासाठी ‘राष्ट्र’ हे एक सामुदायिक इष्ट सगळ्यांचे होऊ शकतं. मातृभूमी हेच आपलं दैवत, सामुदायिक इष्ट असायला हवे आणि म्हणून सगळे ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यासारखाच ‘राष्ट्रयोग’ असा शब्द वापरावा असं सुचलं.
पथकाधिपती आणि साधन-साध्य/उद्धिष्ट मांडणी
या राष्ट्र योगाची या आधी कोणी मांडणी केली आहे. रामदास, दयानंद, विवेकानंद, अरविंद – हे चार पथकाधिपती. पथकाधिपतींची निवड करताना ते द्रष्टे म्हणजे राष्ट्रद्रष्टे असले पाहिजेत, आणि अर्थातच ब्रह्मद्रष्टे सुद्धा असले पाहिजेत. संन्यस्त वृत्तीचे असले पाहिजेतहे निकष. या चौघांनी समान काय सांगितले
- विकसित व्यक्ती कशी असली पाहिजे,
- संघटक कसा असला पाहिजे,
- देशव्यापी संघटनेची आवश्यकता
- धर्मसंस्थापना हे उद्दिष्ट
अरविंद त्यांच्या परिभाषेमध्ये धर्मसंस्थापना करायची म्हणजे काय करायचं? तर अतिमानस शक्तीचं अवतरण झालं पाहिजे. त्याच्यातून आजचा माणूस हा आणखीन विकसित देवमानव झाला पाहिजे आणि अशा देव मानवांचा समाज तयार झाला पाहिजे आप्पांनी त्यांच्या प्रतिभेने या सगळ्याचे वर्णन “अतिमानस शक्ती अवतरो मानवतेमध्ये” अशा मंत्रांमध्ये केलेले आहे.
‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हटला पाहिजे. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हणजे हिंदू समाजामध्ये संघटना निर्माण व्हावी, हिंदू समाजातला पराक्रम वाढावा. हिंदू समाजातल्या सगळ्यांना स्वतःमधल्या आणि इतरांमधल्या ईश्वरी शक्तीची जाणीव व्हावी. हिंदू समाजाला, आपल्याला ही जी जाणीव झालेली आहे, ती सगळ्या जगाला करून देण्याची, विश्वविजयाची प्रेरणा निर्माण व्हावी, असं संघटना, पराक्रम, ईश्वरी शक्तीची जाणीव आणि विश्वविजयाची प्रेरणा ही हिंदू समाजातली वाढली, म्हणजे परब्रह्मशक्तीचे स्फुरण झालं, असं म्हटलेलं आहे.
वीर तत्त्वज्ञ कार्यकर्ते – भाग्यासी काय उणे वीर तत्त्वज्ञ कार्यकर्त्यावाचून राहिले
अशा प्रकारे धर्मसंस्थापना किंवा समाज संस्थापना करणारे कार्यकर्ते कसे असले पाहिजेत – ते वीर आणि तत्त्वज्ञ असले पाहिजेत. मुख्य यत्न विचाराचा – विचारपूर्वक काम करायचं.
वीर असावेत म्हणजे काय असावं?
सर्व प्रकारचे बल, आत्मविश्वास, उत्साह, उद्दिष्टाबद्दलची स्पष्टता, स्वदेशाभिमान, कर्तृत्व, प्रतिभा, विजीगिषु वृत्ती
तत्त्वज्ञाकडे अध्यात्माद्वारे विश्वविजय करण्याची प्रेरणा काय असली पाहिजे.
हिंदुत्व आणि धर्मसंस्थापना याविषयी, संस्कार विधींविषयी, उपासनेविषयी, प्रतिज्ञेविषयी संघटनेविषयी विचार असला पाहिजे. मानवी हक्क, पर्यावरण रक्षण आणि संवर्धन, धर्मनिरपेक्षता, आंतरराष्ट्रीय सामंजस्य, स्त्रियांना आरक्षण, अण्वस्त्र आणि रासायनिक अस्त्र वापर इत्यादी बाबत विचारपूर्वक निश्चित भूमिका असली पाहिजे. सगळ्या कार्यकर्त्यांना अनेक विधेयकांपासून ते समोरच्या विषयाच्या उपयुक्तता मूल्याचा विचार करायला लागेल.
मार्गदर्शक तत्त्वे
देशव्यापी काम करताना काही मार्गदर्शक तत्त्व लागेल ते म्हणजे व्यावहारिक वेदांत – Practicable वेदांत म्हणजेच व्यवहारात आणण्यासारखे वेदांत तत्त्वज्ञान. यामध्य काय काय येतं? – भारतीय अध्यात्म – अद्वैत विचार, समता, संघटन (बंधुता आणि सामाजिक न्याय), विज्ञानातील उत्तमता (धर्मशास्त्राला सुद्धा शास्त्रीय कसोट्या लावल्या पाहिजेत. आणि जो शास्त्रीय कसोट्यांवर टिकेल, तोच खरा धर्म) या गोष्टी असणारा समाज निर्माण करणे.
हिंदू राष्ट्राचं ध्येय – धर्मसंस्थापना – समाजसंस्थापना
धर्मसंस्थापना म्हणजेच समाजसंस्थापना – समाज प्रगतीच्या मार्गावर राहील, ढळणार नाही, आणि त्या त्या टप्प्याला तो संतुलित अवस्थेत राहील असं काम करायला लागेल. समाजाची प्रगती किंवा उत्क्रांती होत गेली पाहिजे. यासाठी संघटनाशिवाय सेवा करायला लागेल. सगळ्या संस्कार विधींमध्ये विज्ञानाभिमुखता असली पाहिजे. समाजाचा मूलभूत पिंड जर का बदलायचा असेल तर तो अध्यात्म जागरणाने होईल, आणि असं अध्यात्म जागरण करण्याची शक्ती येण्यासाठी उपासना केली पाहिजे त्यातून सांस्कृतिक बदल होतील.
उपासनेतून समाज संस्थापना – सांस्कृतिक बदल
सामूहिक उपासना – समाज संघटनासाठी सामूहिक उपासना, समूह शक्ती जागरणासाठी सामूहिक उपासना. आपला ‘राष्ट्रयोग’ असल्यामुळे त्या सामूहिक उपासनेमध्ये मातृभूमी पूजन याची भर. एकाच वेळी कोटी कोटी लोकांची उपासना चाललेली आहे इतकं उपासनामय वातावरण राष्ट्रामध्ये होऊ शकलं, तर त्या अध्यात्म प्रेरणेतून जग जिंकणं हे उद्दिष्ट सहज आपल्या डोळ्यासमोर येऊ शकेल. मानव्य कल्याण हेच आपलं राष्ट्रीय ध्येय आहे,
प्रवृत्तीपर अध्यात्म विचार – वर्तन आदर्श
उपासना हा सहजभाव होणे व उर्वरित वेळात काम करणे म्हणजे प्रवृत्तीपर अध्यात्म. दिवसाच्या चोवीस तासांपैकी एक तास वेळ उपासनेसाठी आणि बाकी सगळा २३ तासाचा वेळ हा प्रत्यक्ष कामामध्येच आपल्याला वापरायला पाहिजे. अशी काम आणि उपासना यांची सांगड घातलेले – वर्तन आदर्श. त्यांच्यामुळे समाजातलं व्यक्तिगत आणि सामूहिक कर्तृत्व आणि व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्य वाढतं. अशा वर्तन आदर्शांच्या सहवासात राहण्याची संधी संघटनातून मिळते. त्यातून प्रेरणा वाढते. त्यामुळे राष्ट्र घडवायचा असेल, समाज संघटित करायचा असेल, तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने प्रवृत्तीपर अध्यात्म विचाराचे सिंचन झालं पाहिजे.
राष्ट्रकार्य दिशा
राष्ट्रयोगातील मुख्य काम म्हणजे राष्ट्रीय एकात्मता याच्यासाठी काम करायला लागेल. सर्वांना आंतरिक एकात्मतेची आठवण करून देणे. विरोधी सुरांशी प्रेम आणि आत्मीयतेने जोडणे. ‘एकं सत विप्रा बहुदा वदंती’ असं फक्त परमेश्वराच्या बाबतीत नाही तर राष्ट्राच्या बाबतील सुद्धा खरं आहे. संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता पन्नास-साठ टक्के भारतीयांसाठी मार्गदर्शक असा ग्रंथ होऊ शकेल. ग्रामगीतेमध्ये पाच पाच अध्यायांचे आठ गट केलेले आहेत
- आश्रम धर्म म्हणजे व्यक्तिगत जीवन
- सेवा आणि संघटन याची आवश्यकता
- गावाचे पुनर्निर्माण आणि गावाचे नवनिर्माण
- गावामध्येव्यक्तिगत, कौटुंबिक आणि गावावरती होणारे संस्कार – गावातली सामूहिक प्रार्थना
- प्रयत्नवादाचे महत्त्व
- ग्रामकुटुंब म्हणून कसे राहावे
- एकाच वेळी व्यवहारातली उन्नती कशी करावी आणि आत्मप्रचिती कशी घ्यावी
- दृष्टी परिवर्तन
ग्राम गीतेमध्ये या सर्व मुद्द्यांबद्दल मार्गदर्शन आहे. या सर्व मुद्द्यांचा समग्र विचार म्हणजे आध्यात्मिक राष्ट्रयोग.
आध्यात्मिक राष्ट्रयोग – समग्र राष्ट्रयोग
राष्ट्र हे आपलं सगळ्यांचं सामुदायिक इष्ट. आपल्या इष्टावरती एकाग्र होणं या अर्थाने योग हा शब्द आहे. मग त्यामध्ये राष्ट्रसेवायोग, राष्ट्रअर्चनायोग, राष्ट्रभक्तीयोग, राष्ट्रचिंतनयोग हे सगळं करायला लागेल. राष्ट्रयोग हा सगळ्यांना सामुदायिक इष्टासाठी जाण्याचा मार्ग आहे. आपल्याला तो संप्रदाय करायचा नाहीये. व्यक्तीश: कुठल्याही कुठल्याही इष्टाची पूजा करा, तरी राष्ट्रयोगाचं आचरण करू शकता. आध्यात्मिक राष्ट्रयोग म्हणजे समग्र राष्ट्रयोग असा शब्द वापरायला हरकत नाही. राष्ट्र हे सामुदायिक इष्ट आहे आणि योग म्हणजे या राष्ट्रासंबंधी चिंतन, भक्ती हे सगळं करायचा मार्ग.
आध्यात्मिक राष्ट्रयोगाचे यमनियम
- कृतिशीलता – प्रत्येक व्यक्तीने बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि आत्मिक सर्व प्रकारे कार्यक्षम होणे.
- आपण जे काही काम करायचं ठरवू, त्यात परमोच्च यश मिळवू अशी विजीगिषु वृत्ती – वीरवृत्ती.
- आपण पदार्पण केलेल्या क्षेत्रात मौलिक आणि मूलगामी कार्य करणे.
- देशवासियांना जागृत करणे, तसेच कर्तृत्व, पराक्रम, ज्ञान, पौरुष यात पारंगत करणे.
- संघटना – राष्ट्र म्हणजे संघटित समाज – जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही संघटना घडवू
- वर्तन आदर्श शोधणे आणि त्यांच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करणे
- आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकारणी लागणे
अशा पद्धतीने राष्ट्रयुगाचा एक नमुना आपण ज्ञानप्रबोधिनीमध्ये उभा करत आहोत. असे अनेक नमुने देशभर तयार होणं, हे सुद्धा राष्ट्रयोगाचेच आचरण आहे. यासाठी अनेक संघटना लागतील. तर अशा संघटनांनी सुद्धा परस्पर पूरक बनणं हा समग्र राष्ट्रयोग आहे.