माधव देशपांडे
पार्श्वभूमी :
आर्वी येथील माजी सरपंच श्री. रामभाऊ नवघणे यांच्याकडील लग्न समारंभाच्या निमित्ताने पारावर काही मंडळी गप्पा मारत होती. तेवढ्यात श्रीहरी वाडकर, सुदाम चोर, विठ्ठल भोईट असे सणसवाडीमधील ३-४ जण परिचित भेटले. ‘प्रबोधिनीने आमच्या वाडीत थोडं लक्ष घालावं, आम्ही ग्रामस्थ व तरुण मंडळ सदैव तयार आहोत. आमच्याकडे पाण्याचा मोठा प्रश्न आहे. ऐन उरसालासुद्धा (जत्रेला) पाण्याचा टँकर मागवावा लागतो.’ असा त्यांचा एकूणात सूर होता. एवढ्यात लग्न मंडपातून शुभ मंगल सावधान … ची घोषणा झाली व आमची चर्चा तेथेच थांबली.
१९८७-८८ या काळात प्रबोधिनीचा दिल्लीच्या कपार्टशी संबंध होता. विहिरी खोल करणे, त्यासाठी सुरुंग ब्लास्टिंगचा खर्च कपार्ट देणार व ग्रामस्थांनी श्रमदानाने गाळ काढावा असा प्रस्ताव रंगत होता. आम्ही ग्रामविकसन विभागाच्या कार्यालयात यावर चर्चा करत होतो. शिवगंगा खोऱ्यातील कल्याण, कोंढणपूर, आर्वी, रांझे, कुसगाव, कासुर्डी (खेबा), वरवे, शिवरे, विंझर, माळेगाव या गावांचा विचार सुरू होता. मला एकदम आर्वीच्या लग्नात भेटलेल्या सणसवाडीच्या लोकांची आठवण झाली. आम्ही सणसवाडीत गेलो.
सणसवाडी :
पुणे-सातारा मार्गावर पुण्यापासून सुमारे २२ कि.मी. अंतरावर खेड-शिवापूर आहे. तेथून सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आर्वी-सणसवाडीचा फाटा फुटतो. या फाट्यापासून डोंगराच्या दिशेनं ३ कि.मी. गेल्यावर लागते ती आर्वी ग्रुप ग्रामपंचायतमधील सणसवाडी. साधारण ५०० लोकसंख्या असलेल्या या वाडीत शेती हा मुख्य व्यवसाय, तीही जिरायती. शिक्षणाची परिस्थिती यथातथाच होती. ९८ पैकी ७५ कुटुंबांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आणि दरमहा उत्पन्न रु. १००० पेक्षा कमी होते.
कामाचा श्रीगणेशा :
अशा या सणसवाडीत जाऊन तेथील जुनी जाणती मंडळी व तरुण मंडळी यांच्याबरोबर चर्चा केली. तेथील धनगरी ओढ्यात एक जुना हातपंप मोडलेला होता. वाडीतील ज्येष्ठ आप्पा चोर, बुवा इंगुळकर, सणस मामा यांनी सांगितलं, ‘साहेब, या पंपाच्या जागी ब्लास्टिंग उडवा. इथं पाणी नक्की लागंल. आम्ही सारं गाव श्रमदानाने गाळ-माती काढू. फक्त तुम्ही बार उडवायचं काम करा.’ ठरलं ! एक चांगला दिवस बघून माजी सरपंच रामभाऊ नवघणे व शामराव सणस यांच्या हस्ते पूजा करून नारळ वाढवला आणि बघता बघता बाया, बापडी, तरुण, पुरुष मंडळी कामाला लागली. जुना पंप काढून तेथे मोठा डवरा पडला. तळाशी थोडं पाणी लागल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसला. दुसऱ्या दिवशी माळावरची मंडळी खाली आली. तिसऱ्या दिवशी आमटी दऱ्यातील मंडळी खाली आली. सारा गाव पाण्यासाठी निकराची लढाई झुंजत होता. १५ दिवसांत विहीर चांगली आकाराला आली. लोकांच्या चेहऱ्यावर समाधान होते. विहिरीची पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत होती. पण आजूबाजूची माती त्यात ढासळत असल्यामुळे पंप मोटरीच्या साहाय्याने वरच्या पाडीमधील दगडी विहिरीत साठपा केला. त्यामुळे त्या वर्षीचा उरूस जोरदार झाला .
पाझर तलावाचे बांधकाम :
उरुसाच्या हिशोबाला मारुतीच्या देवळात बैखट (बैठक) झाली. त्यामध्ये धनगरी ओढ्यातील विहिरीच्या कठड्याचे बांधकाम करण्याचे ठरले. त्यानुसार पंचायत समितीचे त्यावेळचे सभापती श्री. शिवाजीराव कोंडे यांनी या कामासाठी पंचायत समितीतर्फे निधी दिला. अशाप्रकारे पंचायत समितीचा निधी व गावकीचा फंड यातून विहिरीचं बांधकाम दोन टप्प्यांत पूर्ण केलं. ओढा व पाऊस यामुळे विहीर ९०% भरली. परत एकदा मारुतीच्या देवळात बैठक झाली. विहिरीचा जमा-खर्च मांडला गेला. आता गावात नळ योजना व्हावी, यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडून अनुदान मिळवावे, असे ठरले.
पण तेवढ्यात सुदाम चोरने प्रश्न केला. एकदा का नळ-पाणी झालं आणि विहीर आटली तर काय करायचं? त्याचं हे म्हणणं बरोबर आहे असे आप्पा म्हणाले. ‘साहेब, तुम्हीच सांगा काय करायचे ते,’ असं विठ्ठल म्हणाला. मग आम्ही सांगितले, ‘विहिरीला जर पाणी टिकायचे असेल तर विहिरीच्या वरच्या अंगाला धनगरी ओढ्यात एक सिमेंटचा बंधारा घालावा लागेल.’
याच अवधीत कपार्टला एक पाझर तलावाचा प्रस्ताव पाठविण्याची तयारी करत होतो. सणसवाडी, ओढा येथे चांगल्या साईट होत्या. आम्ही ग्रामस्थांबरोबर एक शिवारफेरी केली. यावेळेस आमटीदरा येथे एक चांगला पाझर तलाव होऊ शकेल, असे लक्षात आले. धनगरी ओढा येथूनच वाहात होता. त्यामुळे जर येथे बंधारा झाला तर साऱ्या गावालाच उपयोग होईल. परंतु आमटीदऱ्यात काही सणसमंडळींची खाजगी रानं होती.त्यांच्याशी बोलायला हवं होतं. यासाठी पुन्हा एक गाव बैठक झाली. दिनकरराव सणस, शामराव सणस, बाबू तात्या व सणस भावकी हे खूप आढेवेढे घेत जागा द्यायला तयार झाले. अशा प्रकारे ग्रामस्थांच्या सहयोगाने आमटीदरा येथे कपार्टच्या योजनेतून एक पाझर तलाव बांधण्यात आला. यासाठी वाडीतील प्रत्येक घराने आपलं योगदान दिलं होतं. प्रबोधिनीचे युवक कार्यकर्ते श्री. चारूदत्त पालेकर यांनी यासाठी खूपच मेहनत घेतली. या कामाचा परिणाम म्हणजे लगोलगच सणसांच्या व जाधवांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. ओढ्यातील जुनी विहीर भरून वाहायला लागली. आम्ही केलेल्या धनगरी ओढ्यातील विहिरीला चांगले पाणी लागले. त्यानंतर परत एक ग्रामसभा झाली. वाडीतील माळवाडी, जाधववस्ती, आमटीदरा येथील सारीच मंडळी आली. झालेल्या कामाचा व सुटलेला पाण्याचा प्रश्न यावर लोक खूप खूष झाले.
नरवीर तानाजी ग्रामविकास प्रतिष्ठान :
या कामामुळे ग्रामस्थांच्या प्रबोधिनीकडून अपेक्षा वाढत गेल्या. त्यामुळे गावातील तरुण मंडळींनी एकत्र येऊन एखादं प्रतिष्ठान तयार करावं व त्या माध्यमातून गावाच्या विकासाची कामं करावी, असं त्यांना सुचवलं. यातून ‘नरवीर तानाजी ग्रामविकास प्रतिष्ठान’ या संस्थेचा जन्म झाला.
आठवड्यातून एकदा या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची बैठक होऊ लागली. प्रामुख्याने प्रबोधिनीच्या पद्धतीने बैठकीच्या सुरुवातीस नमस्ते व शेवटी उपासना व्हायची. बैठकीतले निर्णय व त्या निर्णयांची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारली असल्यामुळे वाडीच्या विकासाचा एक छोटा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार योजलेल्या प्रत्येक कामाला ३०% गाव वर्गणी व ७०% अनुदान मिळवायचे, असे ठरले. यामध्ये काही शासकीय योजना आल्यास किंवा खासदार / आमदार फंडातूनही कामे झाल्यास ती कामेही प्रकर्षाने करावी असे ठरले. गावाच्या मासिक फंडाच्या वेळी झालेल्या कामाचा आढावा घेऊन आर्थिक हिशोब मांडला जायचा व नवीन कामाची योजना व्हायची .
महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका :
सणसवाडीतील ग्रामस्थांचा सहभाग, त्यांची श्रमदान करण्याची प्रवृत्ती, बैठकीत एकत्र येऊन सांगोपांग चर्चा हे सारं पाहता वाडी विकासाचा एक समग्र प्रस्ताव प्रबोधिनीने अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनकडे पाठवला. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्या असलेल्या व त्यावेळेस अमेरिकेत स्थायिक झालेल्या सौ. विद्याताई हर्डीकर-सप्रे यांनी प्रबोधिनीच्या शिवगंगा खो-यातील ग्रामविकासाच्या कार्याचा परिचय फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना करून दिला. त्यानंतर फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी वाडीस भेट दिली व प्रस्तावाला मान्यता दिली. मासिक बैठकीच्या वेळी बाळू जाधव यांनी, ‘अहो, चर्चा झाल्या खरं, पण कामाचं काय?’, असं म्हंटलं. त्याचीच री श्री. शांताराम यांनी ओढली. अन् मग काय सांगता राव! वाडी झपाट्याने जागी झाली आणि धनगरी ओढ्याच्या कामाला सुरुवात झाली. केटी (कोल्हापूर टाईप दगडी) बंधाऱ्याचे काम सुरू असताना माळवाडीच्या ओढ्यातला रस्ता हा एक नवा प्रश्न उद्भवला. माळवाडीच्या लोकांनी ‘आधी रस्ता करा, मग आम्हाला पाणी द्या’, तर श्री. हनुवती इंगुळकर यांनी ‘आधी पाणी मग रस्ता, तरंच मी गाडी पुढं जाऊ देईन’, असा ठेका धरला. जुन्या जाणत्या मंडळींनी हनुवतीला समजावलं आणि रस्त्याचं काम चालू केलं. वाडीत एकाच वेळी रस्ता अन् माळवाडीची पाणी योजना अशी कामे सुरू होती.
मंदिर उभारणी :
आर्वी व सणसवाडीचे भैरवनाथ हे ग्रामदैवत आणि भैरवनाथाचे मंदिर तर आर्वी येथे होते. त्यामुळे मासिक बैठकीत सणसवाडीच्या ग्रामस्थांनी ठरवले की सणसवाडीतसुद्धा भैरवनाथाचे मंदिर उभे करायचे. मंदिराच्या बांधकामासाठी ग्रामस्थांनी पैसे मागितले. परंतु प्रकल्पाचे पैसे फक्त विकासाच्या कामासाठीच वापरायचे, इतर कोणत्याही कामासाठी वापरायचे नाहीत, हे प्रबोधिनीचे धोरण होते. प्रबोधिनी ग्रामस्थांना मंदिर कामासाठी पैसे देऊ शकणार नाही, असे मी स्पष्ट सांगितले. परंतु ग्रामस्थांनी मंदिर बांधायचेच असे ठरवले असल्यामुळे त्यांनी प्रबोधिनीला तात्पुरते पैसे मागितले व गावकीच्या फंडातून परत देण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांचा आत्तापर्यंतचा सहभाग पाहून प्रबोधिनीने ग्रामस्थांना पैसे उसने देण्याचे मान्य केले. खरंतर ही एक जोखीम होती. परंतु ही जोखीम पत्करून प्रबोधिनीने गावाला ७० हजार रुपये दिले. प्रबोधिनीने गावात केलेल्या कामाचा दाखला म्हणजे ग्रामस्थांनी प्रबोधिनीकडून घेतलेला पै न् पै नंतर परत केला .
तालीम :
वाडीत तरुण मंडळींनी आपल्या भागात चांगली तालीम नाही, तालीम व्हायला पाहिजे, असा आग्रह धरला. तालमीसाठी वाडीतील एक जागा ठरली. वाडीतील जुनी जाणती माणसं जवळच्या गावातील तालीम पाहून आले. त्याप्रमाणे एक चांगली तालीम तयार केली. या तालमीचे उद्घाटन त्याच परिसरातील खासदार श्री. विदुरा नवले यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाला आमदार श्री. अशोक मोहोळ व जि.प. महिला बाल कल्याण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिज्ञा ग्रहण :
वाडीच्या बैठकीत चर्चा सुरू असतानाच हनुवतीने प्रबोधिनीमध्ये प्रतिज्ञा का घेतात हे आम्हाला समजावून सांगा, असे म्हटले. यावर यंत्रालयातील वाडीचे कार्यकर्ते श्रीहरी वाडकर यांनी त्यांना जमेल अशा भाषेत खुलासा केला. ‘लोकांनी एकत्र येऊन सार्वजनिक काम समाजाच्या हितासाठी कोणतीही अपेक्षा न धरता करायचे’, असे कुशाबाने सांगितले. विठ्ठल म्हणाला, ‘आपण प्रतिज्ञा घेऊया.’ ठरलं ! बैठकीत निर्णय झाला. अन् ११ मंडळींनी प्रबोधिनीच्या वास्तूत संचालक मा. गिरीशरावांच्या हस्ते प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञा ग्रहणानंतर वाडीमध्ये दर गुरुवारी सायं. ७ वाजता मंडळी जमू लागली. यामध्ये गावातील सुधारणांविषयी चर्चा होऊ लागली.
बायोगॅस व शौचालय :
याप्रमाणे वाडीत २ घ.मी.ची ४० गोमसंयंत्रे (बायोगॅस प्लँट) झाली व त्यापैकी ३० संयंत्रांना स्वच्छतागृह जोडले गेले.
प्रमुख व्यक्तींच्या भेटी :
शिवगंगा खोऱ्यातील या छोट्या वाडीच्या ग्राम विकसन कामाचा फारच बोलबाला झाला. महाराष्ट्र फाऊंडेशनच्या श्रीमती विजयाताई कानिटकर, प्रा. सौ.विद्याताई हर्डीकर-सप्रे, WOTR संस्थेचे संस्थापक श्री. फादर बाकर, ज्येष्ठ सामाजिक व गांधीवादी कार्यकर्त्या श्रीमती सावित्रीबाई मदन, सचिव-गांधी स्मारक निधी, महिलाश्रम प्रमुख श्रीमती सुषमा देशपांडे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव श्री. रवींद्र देशपांडे यांनी वाडीला भेटी दिल्या.
वाडीतील ग्रामस्थांचा वाढता प्रतिसाद व सहकार्य, एकत्रित चर्चा करण्याची त्यांची पद्धत व प्रतिष्ठान यांमुळे वाडीत अनेक कामे आकारास आली. यामध्ये २ सिमेंट बंधारे, २ विहिरी, १ पाझर तलाव, ४० गोमसंयंत्रे, ३० शौचालये, गटार योजना, शाळा, वर्ग, तालीम, तलावाच्या व शाळेच्या मागे वृक्षारोपण, ICAR चे डॉ. ए. व्ही. जोशी यांचे शेतीचे प्रयोग यांसारखी कामे होऊ शकली. ग्रामस्थांनी घेतलेली प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा हे यातील वेगळेपण! वाडीमध्ये महिला मंडळाने केलेले काम व त्यांची फंड योजना यामधून घराघरात गृहोपयोगी पाण्याची भांडी, पिंप, कॉट, फर्निचर यांसारख्या वस्तूचा वापर, मकर संक्रांत व हळदी-कुकू कार्यक्रमातून दिसून आला. खासदार श्री. विठ्ठल तुपे यांच्या मदतीने वाडी ते पूणे अशी बस सुरू झाली एखाद्या गावाने जर ठरवले तर काय होऊ शकते, याचं सणसवाडी हे उत्तम उदारण आहे. आर्वीची वाडी सणसवाडी ही आता ‘तानाजी नगर’ या नावाने ओळखली जाऊ लागली. प्रबोधिनीने सलग १५-२० वर्षे लक्ष घालून या वाडीच्या विकासास हातभार लावला.
*******************************************************************************************************************