योगशास्त्राचा इतिहास व विकास

लेख क्र. २६

३०/६/२०२५

मानवाच्या दीर्घायुषी व निरोगी जीवनासाठी ‘योग’ महत्त्वाचा आहे. नुकताच २१ जूनला आंतरराष्ट्र्रीय योग दिवस जगभर साजरा झाला. परंतु हा योग फक्त एकच दिवस नाही तर आयुष्यभर आत्मसात करणे गरजेचे आहे. म्हणूनच योगशास्त्राची माहिती असणेही आवश्यक आहे. त्या संदर्भातला हा लेख आहे डॉ. भाग्यश्री हर्षे ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या त्यांनी लिहिला आहे. १९८७ साली रामायणावर आधारित संशोधन करून त्यांनी ‘वाचस्पती’ पदवी प्राप्त केली व नंतर काही काळ त्यांनी संत्रिकेसाठी काम केले. प्रा. अर्जुनवाडकर व डॉ. स. ह. देशपांडे यांच्या बरोबर अगदी वेगळ्या अशा विषयांवर काम केलेल्या भाग्यश्रीताईंचा हा लेख आपल्याला योगशास्त्राची परिपूर्ण माहिती देतो. ज्याकाळात संत्रिकेचे काम काहीसे मंदावले होते तेव्हा केलेले हे महत्वाचे संशोधन आहे.

योगाचे महत्त्व आणि स्थान

‘योग’ ही भारताने अखिल विश्वाला दिलेली देणगी आहे. भारतीय तत्त्वाज्ञानात आणि जीवनातही योगाला अनन्यसाधारण स्थान आहे. कारण भारतातील बहुतांशी सर्व तत्त्वज्ञानांचे ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे पूर्णत्व प्राप्त करून घेऊन आत्म्याची मुक्ती साधणे. ही मोक्षप्राप्ती साधण्यासाठी ‘योग’ हे सर्वोत्कृष्ट साधन आहे.

‘योग’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, परंतु जीवनातील अंतिम सत्य प्राप्त करून घेण्याची जी शास्त्रशुद्ध प्रणाली तिलाच ‘योगशास्त्र’ म्हटले जाते. केवळ पारमार्थिक आणि तात्त्विक हेतूनेच नाही तर भौतिक प्रगती व लौकिक अभ्युदय यासाठीही योग आवश्यक आहे. त्यामुळेच सर्वांगीण समृद्ध जीवनासाठी भारतीयांनी योगशास्त्राला जीवनात महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते. अनेक तत्त्वज्ञांनी याच शास्त्राच्या अध्ययनाने प्रत्यक्ष अनुभूतीच्या आधारे असे अनेक यौगिक सिद्धांत मांडले जे जीवनातील उच्चतम क्षेत्रापासून साधारणतम क्षेत्रापर्यंत सर्वत्र उपयुक्त आहेत.

योगशब्दाचे विविध अर्थ –

वेदान्त्यांनी जीवात्मा व परमात्मा यांच्यातील संयोगाला योग म्हटले आहे. ‘देवतानुसंधानं योगः।’ असे रामानुजांनी सांगितले; तर वैद्यकात ‘भेषजं योगः|’ अशी व्याख्या आहे. व्यवहारशास्त्रज्ञांनी ‘छलम्’ म्हणजे युक्तीलाच योग असे नाव दिले. ज्योतिषज्ञांनी योगाचा संबंध रविचन्द्रादी ग्रहांशी जोडला, तर मौहूर्तिकांनी तिथिवार नक्षत्रांशी जोडला. अशा प्रकारे विभिन्न अर्थांनी योगशब्दाचा प्रयोग झालेला दिसतो. परंतु योगशास्त्राला अभिप्रेत असणारा योग शब्द युञ्ज्-समाधौ या धातूपासून निष्पन्न होतो. त्याचा व्युत्पत्ति-लभ्य अर्थ ‘समाधी’ असा आहे. या समाधिरूप योगाची व्याख्या पतंजलींनी ‘योगश्चित्तवृत्तिनिरोधः।’ अशी केली आहे. ‘चित्तवृत्तींचा उपशम करणे म्हणजे योग’ याच मताचे प्रतिपादन योगमताने केले.

योगशास्त्रसंकल्पना –

योग ही एक साधना आहे. यात चित्ताच्या एकाग्रतेवर सर्वाधिक भर दिलेला आहे. किंबहुना योगाचा विशाल दुर्ग या चित्तवृत्तींवरच अधिष्ठित आहे. या चित्तवृत्ती शुद्ध करून त्यांचा शुद्ध आत्मतत्त्वात लय घडविण्यासाठी जो मार्ग आचरला जातो त्याचे यथोचित वर्णन करणारे, त्याची शास्त्रशुद्ध आणि सूत्रबद्ध मांडणी करणारे शास्त्र म्हणजेच हे योगशास्त्र. केवळ ज्ञानानेच मुक्ती मिळते असे मानणाऱ्यांनाही चित्तातील अशुद्धी दूर होऊन त्यात शुद्ध ज्ञानाचा अविष्कार कसा होईल याचा विचार करावा लागतो. भक्तीने मुक्तीची वाट चोखाळणाऱ्यांनाही शुद्ध अंतःकरणाशिवाय ईश्वरप्राप्तीचा आनंद अनुभवास येत नाही. त्यामुळे योगाचे महत्त्व सर्वांनी एकमुखाने मान्य केलेले आहे.

योगशास्त्राची प्राचीनता –

वैदिक वाङ्मय हे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीनतम व समृद्ध वाङ्मय आहे. वेदांमध्ये ‘योग’ हा शब्द मुख्यतः युज् म्हणजे जोडणे या अर्थाने आलेला दिसतो. उदा. पहिल्या मंडलातील ३४ वे सूक्त. काही ठिकाणी योगाभ्यास सूचक उल्लेखही आढळतात. जसे हृदा पश्यन्ति मनसा विपश्चितः । (ऋ. १०.१७७.१)

उपनिषदांत एक दर्शन म्हणून आणि क्रियात्मक साधन म्हणून दोन्ही अर्थांनी योग शब्द प्रयुक्त आहे. कठोपनिषदात ‘तां योगमिति मन्यन्ते स्थिरामिन्द्रियधारणाम् ।’ (२.६.११) अशी योगाची व्याख्या केलेली आहे. योगसूत्रातील जीवात्मा व विश्वात्मा ही कल्पना मुंडकोपनिषदात आलेली आहे (मु.३.१.१); सर्व उपनिषदांतील योगविषयक विचार पाहता श्वेताश्वतर उपनिषदातील विचार अधिक परिणत दिसतात. यात क्रियात्मक योगाचे वर्णन असून (श्वे. २.८.९) योगसाधनेचे फळही सांगितले आहे.

वेदान्त्यांनी योगाला ज्ञानप्राप्तीचे अन्तर्गत साधन मानले आहे (ब्र.सू. ४.१.७-११). भगवद्गीता हे तर परिपूर्ण असे योगशास्त्रच आहे. जीवाला परमात्म्याची प्राप्ती घडविणे हेच गीतेचे अंतिम लक्ष्य आहे. दुसऱ्या अध्यायात योगाची प्रारंभिक साधना सुरू होते ती उत्तरोत्तर विकसित होत जाते. सहाव्या अध्यायापर्यंत या क्रियात्मक योगाचे विवेचन आहे. योगसिद्ध पुरुषाचे वर्णनही गीतेत आहे. बौद्ध व जैन या दर्शनांतही योगाचे विस्तृत वर्णन मिळते. धर्मचक्रप्रवर्तनसूत्रात सांगितलेला आर्यअट्ठंगिक मार्ग अष्टांगयोगाप्रमाणेच आहे. बौद्धांचे स्वतंत्र योगशास्त्र आहे. त्यांनी राजयोग व हठयोग या उभयविध योगाची साधना केली. योगसाधनेला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. बौद्धांनी षडंगयोग मानला. हरिभद्रसूरिकृत ‘योगबिंदू’ तसेच यशोविजयकृत ‘अध्यात्मसार’ या जैन ग्रंथांनी पातंजलयोगाचाच पुरस्कार केला आहे. जैनांनी सम्यक् चारित्र्यासाठी यम, नियम व ध्यान यांना सर्वाधिक महत्त्व दिले (कल्पसूत्र ४४-४५).

तंत्रमार्गात नाथपंथियांचा हठयोग प्रसिद्ध आहे. महाभारत, भागवत, विष्णुपुराण, याज्ञवल्क्यस्मृती यासारख्या पौराणिक ग्रंथांतूनही योगविषयक संदर्भ मिळतात. अहिर्बुध्न्य संहितेत हैरण्यगर्भ योगाचे विवरण आढळते. या सर्व ग्रंथांवरील योगसूत्रांचा प्रभाव पाहता योगशास्त्राची प्राचीनता व व्यापकता स्पष्ट होते.

योगशास्त्राचा प्रवर्तक व कर्ता

आज बहुधा सर्वत्र योगाचे आद्यप्रवर्तक म्हणून योगसूत्रकार पतंजलींचेच नाव घेतले जाते किंवा योगसूत्रे हीच प्रमाणग्रंथ मानून त्यांच्यापासूनच योगाभ्यासाला प्रारंभ केला जातो. परंतु पतंजलीच्या पूर्वी हिरण्यगर्भाचा योग प्रचलित होता असाही एक मतप्रवाह आज अस्तित्वात आहे. शंकरादी अनेक विद्वानांनी स्वरचित ग्रंथांमध्ये हैरण्यगर्भयोगाच्या वचनांचे स्मरण केले आहे. महाभारतातील ‘हिरण्यगर्भो योगस्य वक्ता नान्यः पुरातनः ।’ या प्रसिद्ध वचनाने या मतास पुष्टी मिळते. काही विद्वानांच्या मते कपिल मुनी हेच हिरण्यगर्भ होत. महाभारतातील शान्तिपर्वातील ‘यमाहुः कपिलं सांख्याः परमर्षिः प्रजापतिम्। हिरण्यगर्भा भगवानेषच्छम्दसि सुष्टुतः।।‘ या उक्तीमुळे विद्वानांच्या म्हणण्याला पुष्टी मिळते.

विद्वानांच्या मते सृष्टीच्या प्रारंभी हिरण्यगर्भ ब्रह्म्याने स्वाध्यायशील ऋषींना योगविद्येचा उपदेश दिला होता. किंबहुना त्यांच्याच प्रेरणेने स्वाध्यायी ऋषींना नैसर्गिक संस्कार प्रतिभेने योगविद्या प्राप्त झाली. म्हणूनच योगशास्त्रात आलेले ‘स्वाध्यायादिष्टदेवतासंप्रयोगः।’ (यो.सू.२.४४) हे सूत्र सार्थ आहे. हिरण्यगर्भाकडून लौकिक ज्ञान अप्राप्य असल्याने ऋषींनी योगज ज्ञानच प्राप्त केले.

सारांश, योगविद्येचे प्रथम प्रवर्तक हिरण्यगर्भ आहेत हे मान्य केले तरी त्याकाळात योगविद्या ही सूत्रबद्ध नव्हती हे निश्चित, गुरु-शिष्य परंपरेद्वाराच तिचे ग्रहण-धारण आणि पठण-पाठण होत होते. मानवसमाजात योगविद्येचे सोपपत्तिक प्रवर्तन कपिल मुनींनी केले असावे. प्रथम जी विद्या ऋषिपरंपरेने प्रसृत झाली त्याच विद्येच्या आधारे काही योगीजनांनी हैरण्यगर्भ योगविद्येवर ग्रंथ लिहिले. पुढे ज्यावेळी अनेक संवादादींतून योगविद्या अत्यंत विस्तृत व जटिल झाली; त्या वेळी त्या विद्येच्या रक्षणाच्या उद्देशाने भगवान पतंजलींनी ती सूत्रबद्ध केली आणि त्यांची योगसूत्रे प्रमाण मानली जाऊ लागली.

योगसूत्रकार पतंजली व त्यांचा काळ

विद्वानांच्या मते योगसूत्रकार पतंजलींचा काळ इ. स. पू. २०० च्या आसपासचा आहे. श्री. उमेशचंद्र मिश्र, सतीशचंद्र चट्टोपाध्याय, धीरेंद्रमोहन दत्त या विद्वानांनी ‘पतंजली हेच योगाचे आद्य प्रवर्तक असून ‘पातंजल योगसूत्रे’ हाच योगाचा आद्य ग्रंथ आहे’ असे मत मांडलेले आहे. पतंजलींनी योगसूत्रांची रचना केली म्हणून त्यांना आद्य प्रवर्तक म्हणता येणार नाही. कारण पातंजल योगसूत्रांचा आधार हैरण्यगर्भयोग आहे. परंतु हैरण्यगर्भयोग आज उपलब्ध नाही त्यामुळे ते योगशास्त्र सूत्रबद्धच होते याविषयी काही प्रमाण मिळत नाही. ते श्लोकबद्ध असावे. म्हणून माधवादी विद्वानांच्या मते योगविषयक उपलब्ध ग्रंथांमध्ये पतंजलींची ‘योगसूत्रे’ हीच प्राचीन व प्रमाण मानावीत.

योगशास्त्राचा विकास –

प्राचीन काळापासून या योगविद्येमध्ये वृद्धीच होत गेलेली दिसते. मंत्रयोग, हठयोग, लययोग व राजयोग या चार प्रकारांनी योग विकसित झाला. मंत्रयोगामध्ये साधकाच्या अंतरातली शक्ती मंत्रामुळे जागृत होऊन साधकाला महाभाव समाधीचा अनुभव येतो. हठयोगामध्ये देहशुद्धीला महत्त्व आहे. षट्‌कर्मांच्याद्वारे ही शुद्धी केली जाते व कुंडलिनीच्या जागृतीने साधक महाबोध समाधीत जातो. लययोगात शिवाच्या ठिकाणी शक्तीचा लय होतो आणि महालयसमाधी अवस्था प्राप्त होते; तर राजयोगात चित्तशुद्धीच्या साहाय्याने जिवा-शिवाचे अद्वैत साधले जाते व निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त होते. या चारही योगात राजयोग हा सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. यावरच पतंजलीची सूत्रे असून ती प्रमाणभूत मानलेली आहेत. या योगांबरोबरच कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग असा त्रिविध योग ही प्रसिद्ध आहे.

योगसूत्रांचा विकास योगांगातून झाला. सहा अंगांपासून पंधरा अंगापर्यंत योगांगे दिसतात. बौद्धांनी षडंग योग मानला. अमृतनादोपनिषदात षडंग योगाचे वर्णन आहे. तेत्रोबिंदुउपनिषदात योगाची १५ अंगे वर्णिली आहेत. परंतु पतंजलीने सांगितलेला यमनियमआसनादी एकाहून एक वरचढ अशा आठ अंगांचा समावेश असलेला अष्टांगयोग हा अधिक विकसित झाला व उपयोगात आणला गेला.

योगाभ्यासात योगसिद्धीही महत्त्वाच्या मानल्या जातात. भागवतात अठरा सिध्दींचे वर्णन आलेले आहे. पतंजलीने अणिमा, महिमा, लघिमा आदी अष्टमहासिद्धी महत्त्वाच्या मानल्या. अशा सिद्धी मिळविणे हेच योगमार्गाचे एक उद्दिष्ट बनले आहे. अशाप्रकारे प्राचीन काळापासून अव्याहत प्रवाहित असलेला हा योगशास्त्राचा प्रवाह दिवसेंदिवस विशालरूप धारण करतो आहे आणि अत्यंत अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. स्वानुभवाने तत्त्व-साक्षात्कार घडवून मानवाला अंतिम ध्येयापर्यंत पोचविणारा योगमार्ग भक्ती व ज्ञानाचा साहाय्यक म्हणून उपयुक्त ठरला. त्यातूनच ‘योगमनोविज्ञान’ अशी विज्ञानाची एक स्वतंत्र शाखा विकसित झाली आणि भारतीय मानसतज्ज्ञांनी योगमनोविज्ञानाच्या माध्यमातून विज्ञानाला एका उच्च आध्यात्मिक स्तरावर नेऊन ठेवले आहे.