सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती?

लेख क्र. २८

०२/०७/२०२५

कालच्या लेखात आपण वेदकालीन ‘राष्ट्र’ संकल्पना बघितली. राष्ट्र आले की संस्कृतीसुद्धा आलीच. जसे ‘भारत’ राष्ट्र प्राचीन काळापासून एकसंध व एकात्म होते तशीच भारतीय संस्कृती प्राचीन, सर्वसमावेशक होती. या प्राचीन संस्कृतीला मुख्यत्वे सिंधू संस्कृती म्हटले जाते. पण, मा. श्री. यशवंतराव लेले यांनी नक्की या संस्कृतीला काय म्हणायचे या प्रश्नावर अभ्यास करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. असा हा अभ्यासपूर्ण लेख ‘यज्ञ’ या दिवाळी अंकात २००८ रोजी छापून आला व आता येथे पुन्हा प्रकाशित करीत आहोत.

आम्ही कोण? – एकराष्ट्रीयतेच्या आड येणारे अनेक अपसिद्धान्त भारतीय इतिहासामध्ये अनेक वर्षे पद्धतशीरपणे घुसडण्यात घेऊन समाजातील अनेक पिढयांना त्यांनी आपापसात झुंजत ठेवले आहे. आर्य हे मध्य आशियातून या देशात आले हा त्यातला एक सिद्धान्त. वास्तविक ‘आर्य’ शब्द सभ्य, प्रतिहित अशा अर्थाने संस्कृत भाषेत आलेला आहे पण तो इंग्रज शासकांनी वंश या अर्थाने वापरला व आम्ही तो त्यांच्याकडून जसाच्या तसा स्वीकारला. मग आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृती उद्ध्वस्त केल्याचा दुसरा सिद्धान्त व्हिलरने मांडला. हाही अनेक भारतीय पिढ्यांनी शिकून घेतला. या पार्श्वभूमीवर के. डी. सेठना यांचे ‘हडप्पन संस्कृति ही वैदिक संस्कृती होती’ हे वाक्य महत्वाचे वाटते.

सिंधूनेच सामावून घेतले – सिंधू संस्कृतीत मिळालेल्या मानवी सांगाड्यांच्या अभ्यासातून दिसून आले की त्यांच्यावर कोणत्याही शस्त्राघाताची काहीही खुण नाही, मग सिंधू नदीच्या महापुराने  त्या माणसांचा मृत्यू झाला असल्याचा नवा तर्क लढवला गेला. पाठ्यपुस्तकातून हळूच आर्यांनी सिंधू संस्कृती नष्ट केल्याचे विधान गाळण्यात आले तरी आर्य हे परकीय आक्रमक हे घोकणे चालूच राहिले.

सिंधूसंस्कृतीचा सर्वाधिक विस्तार ! – देश स्वतंत्र झाल्यानंतर मोहेंजोदडो व हडप्पा इत्यादी सिंधू संस्कृतीची स्थाने पाकिस्तानात गेली. सिंधू नदी ही प्रायः पाकमधेच वाहात राहिली. पण गतकाळात पंजाबमध्ये रुपड येथे (जि. अंबाला) मोहेंजोदडो पेक्षाही मोठे नगर शोधले गेले. उत्तर प्रदेशातील अलमगीरपूर येथे उत्खनन झाले, राजस्थानात कालीबंगा सारखी कितीतरी उत्खनने झाली, सौराष्ट्रात लोथल, रोजडी, सरापूर, सोमनाथ अशी तथाकथित सिंधू संस्कृतीची स्थाने उजेडात आली. थोडक्यात सांगायचे तर हिमाचल प्रदेश, हरियाना, राजस्थान, गुजराथ या राज्यांमधून एकूण ४०० च्या आसपास उत्खनने झाली व ती सारी सिंधू संस्कृतीची नगरे असल्याचे ठरले. अगदी महाराष्टातील दायमाबादपासून गंगेच्या खोऱ्यापर्यंत तर पश्चिमेस पाकिस्तानापलीकडील प्रदेशातही उत्खनने झाली आहेत.

सरस्वतीचा शोध – १९८५ मध्ये डॉ. वि. श्री. वाकणकर यांनी सरस्वती नदीच्या लूप्त-गुप्त झालेल्या पात्राचे संशोधन व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले. डिसेंबर ८५ मध्ये एका पथकाने सुमारे ४० दिवसात ४ हजार किलोमीटरची शोधयात्रा काढून असे निरीक्षण नोंदवले की नासा संस्थेने राजस्थानातून वाहणाऱ्या भूगर्भातील नदीपात्राचा जो आराखडा चित्रित केला आहे तो महाभारतकालीन बलरामाने केलेल्या तीर्थयात्रेच्या मार्गाशी मिळता जुळता आहे. हा मार्ग महाभारतात म्हटल्याप्रमाणे तत्कालीन सरस्वती नदीच्या पात्राचा आहे हे तिच्या काठच्या तीर्थस्थानांच्या नावांवरून सिद्ध होते आहे. त्याकाळी म्हणजे ३ हजार वर्षांपूर्वी  महाभारतीय युद्धात सहभागी न होता बलरामाने तीर्थयात्रा करणे पसंत केले. नकाशाप्रमाणे या सरस्वतीच्या लुप्त पात्राच्या अनुषंगाने कुपनलिका खोदल्या गेल्या. आसपास उपलब्ध पाणी खारट असले तरी भूगर्भातील नदीपात्रातून मात्र कूपनलिकांना गोड पाणी उपलब्ध झाल्याने भारतीयांना सहस्रावधी वर्षे केवळ त्यांच्या स्मृतीपथावर अवशिष्ट राहिलेली व ‘गंगा सिंधु सरस्वती चः यमुना गोदावरीः नर्मदा। कुर्वन्तु वै मंगलम्।’ अशा प्रकारे मंगल कामनेच्या निमित्ताने आमच्या वाणीवर वर्षानुवर्षे विराजमान झालेली ती मातृतमा अन् देवितमा म्हणून गौरवान्वित झालेली महानदी आम्हाला सापडली. लुप्त सरस्वती, लुप्त वैदिक नदी पुनश्च आम्हाला सापडली आहे. आता तिला प्रवाहित करण्याचे प्रयासही चालू आहेत. गुजराथ सरकारने तर नर्मदेचे जल सरस्वतीच्या त्या पावन पुरातन मार्गापर्यंत पोचवून या कार्याचा शुभारंभही केलेला आहे.

सिंधू संस्कृती ही येथील भूमीपुत्रांची तर ‘सरस्वती संस्कृती’ ही आक्रमक, परकीय आर्याची आहे की काय हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात रेंगाळत असणे शक्य आहे. त्या दृष्टीने थोडे निरीक्षण करणे हे उपयुक्त ठरेल, काहींना तर ‘ही सरस्वतीच कशावरून?’ असा प्रश्न पडला आहे! अशा घटनांनी शंकित होणारी, चिंतित होणारी काही माणसे असतात. त्या बुद्धिवादी मंडळींना सत्याचा स्वीकार करण्यास पुरेसा वेळ द्यावा लागतो.

सिंधू संस्कृती आहे तरी काय? – सिंधू संस्कृतीत अनेक मातीची भांडी, असंख्य शिक्के, चांगली घरे, सरळ रस्ते, जलनिस्सारणासाठी चांगली बांधलेली गटारे, सामूहिक स्नानगृहे, विहिरी इतकेच नव्हे तर प्रेतदहन होत असे त्या स्थळाचा पुरावा मिळाला आहे.

सिंधू संस्कृतीची लिपी आहे पण तिचे कोडे सुटेपर्यंत न थांबता अनेकांनी अन्य मार्गाने अभ्यास चालूच ठेवलेला आहे यावरून काय ज्ञान होते ते पाहूया.

नित्य स्नान हे या देशातील लोकांचे, उष्ण हवामानामुळे, स्वच्छतेचे महत्वाचे साधन तर आहेच पण या संस्कृतीची शुचिर्भूततेची, पावित्र्याची कल्पनाही त्यात अंतर्भूत असते. त्यामुळे स्नानगृहे ही विशेषता आपल्याला दिसते. सामूहिक स्नानगृहांची येथील कल्पना मात्र हिंदुस्थानात अन्य कोठे न आढळणारी प्रादेशिक विशेषता म्हणावी लागेल, कदाचित पुष्कर सारखी ही तीर्थक्षेत्रे असावीत. सुस्नात होऊन सुंदर वस्त्रे परिधान करून हे लोक पशुपतीची उपासना करत असत असे दिसते. पशुपतीची मूर्ती तर उत्खननात मिळाली आहेच पण त्याला आवडणाऱ्या त्रिदलाची पाने अनेक‌ मृद्-भाड्यांवर रंगवलेली आढळतात. ही बिल्वपत्रे व नाना पशूंच्यामध्ये योगोक्त आसनात (मूळबंध) वसलेला तो शिवशंकर! हे सारे पाहून यांचा कोणी पुरोहित असणार असे मनात येते.

त्या पुरोहिताचा पुतळाही उपलब्ध झाला आहे. पुतळ्याचे अर्धोन्मीलित नेत्र हे योगात सांगितल्याप्रमाणेच आहेत. उत्तरीय डाव्या खांद्यावर घेऊन उजव्या काखेत मागे अडकवलेले आहे. जानवे असेच परिधान केले जाते व ते उत्तरीयाचे प्रतीकच असते, हे उत्तरीय म्हणजे चांगली रंगीबेरंगी फुलांची चित्रे असणारी शाल वाटते. त्या फुलांचा रंग तांबडा आहे हे पुतळ्याच्या नीट निरीक्षणानंतर खाचा खोबणीमधून स्पष्ट दिसून येते. पाकिस्तानात कराचीच्या संग्रहालयात १० सेंटीमीटर उंचीचा हा पुतळा आहे. पुतळ्याच्या उत्तरीयाचे स्वरूप आपस्तंब श्रौतसूत्रानुसार (२२-१६-३) असल्याचे अस्को परपोला (हेलसिंकी विश्वविद्यालयात आग्नेय आशियन संस्कृतीचे प्राध्यापक) याने म्हंटले आहे. की वस्त्रावरील उठावानुसार ही फुले वस्त्रावर नंतर भरली असावीत असा अंदाज आहे. पिंपळ वृक्षाचे अस्तित्व सिंधू संस्कृतीमधील मृद्‌भांडयावर आहे. शिक्क्यांवर आहे. अलंकारांमध्ये स्वर्णालंकार, चांदीच्या बांगडया तसेच नील वैदूर्य ही रत्ने आहेत. नर्तिकेच्या मूर्तीकडे पाहिल्यास तिच्या एका हातात अनेक बांगडया आहेत. या प्रकारे डाव्या हातात अशा अनेक बांगड्या घालण्यायाची प्रथा आजही भारतात व पाकिस्तानातील थरच्या भागात पाहावयास मिळते हे विशेष. गळ्यातील अलंकारही आज पाहायला मिळतात तसेच आहेत. अनेक प्रकारची खेळणी मूर्ती अशा अनेक गोष्टी आढळल्या असून त्या विविध संग्रहालयातून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

या साऱ्या प्रतीकांना परकीय म्हणणार? – एका पट्टिकेवर एक महायोगी चौरंगा सारख्या आसनावर बसलेला असून त्याच्या दोन्ही बाजूस दोन नाग उभे दिसतात. एक भक्त काही भेट घेऊन खाली बसलेला दिसतो. नमस्कार मुद्राही मोहेंजोदडो हडप्पात दिसते. एक लांबट पट्टी अशी आहे की तिच्यावर सहा स्वस्तिके दिसतात. महाराष्टातील दायमाबाद येथे ब्रॉंझ धातूचा रथ व त्याला जोडलेले दोन बैल व मागे उभा सारथी असे खेळणे सापडले आहे. मोहेंजोदडोत मातीची म्हैस, गेंडा, हत्ती अन् उंदीर इ. खेळणी आढळली आहेत.

राजस्थानमध्ये कालीबंगन येथील उत्खननात व अन्यत्रही अनेक स्थानी यज्ञकुंडे सापडली असून तिकडे सौराष्ट्रात लोथळ मधेही यज्ञकुंडे आढळतात. त्याचप्रमाणे घरांच्या विशेषांमध्येही यज्ञकुंडे सापडली आहेत. पाकिस्तानी पुरातत्वशास्त्री डॉ. अहमंद दाणी यांनी काली बंगन पैथील यज्ञशाळा पाहून ही सारी सरस्वती संस्कृती, वैदिक संस्कृती मानली व यात सिंधू संस्कृतीचे वेगळेपण कुठे दिसते? असा प्रश्र उपस्थित केला.

आपला निष्कर्ष काय? – सुंदर बांधलेले सामूहिक स्नानगृह (वीटकामाचे हे स्नानगृह आहे), पशुपतीची उपासना, त्यासाठी बिल्वपत्रे, आपस्तंब श्रौतसूत्रांनुसार उत्तरीय धारण केलेला पुरोहित, महायोगी, मूलबंध, ध्यानमुद्रा इ. योग शास्त्रातील गोष्टी, पिंपल, वड वगैरे क्षीर वृक्ष वा ज्यांच्या समिधा यज्ञात वापरतात असे यज्ञीयवृक्ष, स्वस्तिके, ओंकार इ. संस्कृतीची प्रतीके, अनेक आकाराची व प्रकारांची यज्ञकुंडे या सर्वांचा एकत्र विचार केला असता ही कुणाची संस्कृती वाटते?

डेव्हिड फ्राउले अथवा वामदेव म्हणतात,”Harappan Culture resembles that of Yajurveda and later Vedic Era.” यानंतर नवरत्न राजाराम यांनी म्हटले आहे की ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडळाशी हडप्पा लेखन मिळते जुळते आहे. डॉ. अ.द. पुसाळकर तर स्पष्टच सांगतात की हडप्पा संस्कृती ही ऋग्वेद संस्कृतीची उत्तरकालीन अवस्था आहे.

प्राच्यविद्यापंडित व दूरदर्शनवरील ‘सुरभी’ या लोकप्रिय मालिकेचे प्रणेते श्री. सुभाष काक यांना वाटते सिंधू संस्कृतीमधील अगम्य लिपीस आता सरस्वती लिपी म्हणावे. सरस्वती नदीकाठची उत्खनने ४०० च्या आसपास आणि सिंधू परिसरातील उत्खनने म्हणजे पाकिस्तानातील उत्खननांची संख्या १०० अशी आता अवस्था असल्याने लिपी प्रमाणे संस्कृतीचेही नामांतर करावे व सरस्वती संस्कृती म्हणावे हे योग्य दिसते.

आणखी काही निरीक्षणे – हडप्पा येथे धान्यकोठारे सापडली आहेत त्यांची बांधणी कौतुकास्पद आहे. कृषिप्रधान अशा समाजात चांगली नांगरलेली शेती सापडली आहे यात काय आश्चर्य! गहू, तांदूळ, सातू, खजूर, फळे व भाज्यांचे उत्पादन घेणारा येथील शेतकरी होता. लोथल येथील गोदीचा शोध हा तर मोठा महत्त्वाचा शोध असून जहाजांना आवश्यक तेवढे पाणी बंदरात भरतीचे वेळी भरून घेणारी व हवी तेव्हा पाण्याची पातळी कमी जास्त करू शकणारी एक झडप हे सारे पाहून जल अभियांत्रिकीचा एक विलक्षण नमुनाच आपल्या समोर उभा राहतो. या बंदरातून विदेशाशी हस्तिदंत, कापूस, बी-बियाणे इ. गोष्टींचा व्यापार होत असे. एका मृण्मय मुद्रेत आपल्याला तत्कालीन जहाजाचे चित्रच पहावयास मिळते. ५० टन वजन पेलू शकणारी ३० जहाजे एकावेळी उभी राहू शकतील एवढा या गोदीचा विस्तार होता.

उलगडा – हजारो वर्षांपूर्वी भूकंपासारख्या भूगर्भांतर्गत उद्रेकामुळे एकेकाळी पूर्ववाहिनी असणारी व गंगायमुनांच्या मिठीत एकरूप होऊन गेलेली सरस्वती पश्चिमवाहिनी झाली. हिमालयातील प्रचंड हिमनगांंमधून येणाऱ्या पाण्याबरोबर उपनद्यांच्या पुरवठ्याने दुथडी भरून १०-१५ कि.मी. पात्र निर्माण झाले. ऋग्वेदीय कवींनी सर्वाधिक मोठी नदी असे हिचे कौतुक केलेले आहे. या नदीकाठी प्राचीन ऋषींच्या साहित्याची निर्मिती झाली. हिच्या तीरी मोठमोठे यज्ञ झाले. भागवतासारखी महापुराणे सरस्वतीकाठी होणाऱ्या वाक्-यज्ञातून शब्दबद्ध झाली. हिच्या अमृतसदृश पाण्यावर पोसलेली वाणी मग मूर्तिमती सरस्वती झाली. वीणा पुस्तक धारिणी अशी देवी सरस्वती आकाराला आली.

पुढे नैसर्गिक उलथापालथी चालूच असल्याने सरस्वतीत जलपुरवठा करणाऱ्या हिमनगांमधे, उपनद्यांमधे असे काही बदल होत गेले की सरस्वतीचा प्रवाह कमी होऊ लागला. म्हणूनच महाभारतात बलरामाला ही नदी क्षीण होताना दिसली आहे. विनशन तीर्थावर तो गेला होता. नदीचा हळूहळू विनाश होऊ लागल्याची खुण हे विनशन तीर्थ!  प्रचंड प्रवाहाऐवजी थोड्याथोड्या अंतरावर मोठमोठ्या डोहांनी युक्त अशी ही नदी बनू लागली. सर म्हणजे सरोवर वा डोह. या अनेक सरोवरांची म्हणून या नदीचे सरस्वती हे नाव सार्थ ठरू लागले असे दिसते. कालांतराने पूर्ण कोरडी होऊन सरस्वती अंतर्धान पावली, गुप्त झाली पण भारतीय तिला विसरले मात्र नाहीत, म्हणून तिला उपग्रहांच्याद्वारे शोधून ओळखून तिला पुनश्च प्रवाहित करण्याची महत्वाकांक्षा उत्पन्न झालेली आहे. या सर्व पुराव्यांचा विचार करता सिंधू की सरस्वती का हिंदू संस्कृती हा प्रश्न उपस्थित होऊ नये असे वाटते.