STREE SHAKTI PRABODHAN

स्त्री शक्ती प्रबोधन (ग्रामीण)
आरोग्य फेरी
८ मार्च २०२०, महिला दिनस्त्री शक्ती प्रबोधन (ग्रामीण) कामाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या त्यानिमित्ताने, जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून किशोरी, युवती व महिला यांची आरोग्य फेरी वेल्हे या तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केली होती. रविवार  दि. ८ मार्च २०२० रोजी विंझर गावापासून वेल्हे गावापर्यंत असे १० कि. मी. अंतर पार करणे अशी योजना होती. या आवाहनाला प्रतिसाद देउन किशोरी १२०, युवती ८६, ग्रामीण महिला ६२० अशा ६६ गावामधून आल्या होत्या. त्याशिवाय प्रबोधिनीच्या निगडी क्रिडाकुलाच्या मुली व ताया मिळून १९ जणी सहभागी होत्या. पुण्यातून प्रबोधिनीच्याच वेगवेगळ्या विभागातील सदस्य व काही संस्था प्रतिनिधी अशा ४५ जणी सुद्धा आरोग्य फेरी मध्ये सहभागी झाल्या होत्या.. अशा सर्व मिळून ८९० जणींचा सहभाग होता. सगळ्यात लहान अवघी ६ वर्षाची बाल-किशोरी होती तर ७२वर्षाची ग्रामीण महिला  नि ७४ वयाच्या पुण्यातील सर्वात मोठ्या युवतींचा सहभाग या दौडमध्ये होता हे विशेष!  
ठीक ८ वाजता सगळ्यांनी विंझर कॉलेजच्या ग्राउंडवर जमायचे होते. पहिला गट ७ वाजता पोचला तोवर चहावाल्याने 200 कप चहा गॅस  ठेवला सुद्धा होता. मग वेल्ह्याचे नाव नोंदणी करणारे गट आले आणि म्हणता म्हणता गावोगावच्या २५-३० गाड्यातून भराभर महिला-मुली उतरल्या. गटागटात नाव नोंदणी झाली. पाण्याची गाडी आली पळायच्या वाटेतल्या हॉटेलमध्ये त्यांनी पाणी उतरवले सोबत एक स्वयंसेविकाही होती. प्लॅस्टीकचा वापर टाळून आवश्यक तिथे कागदी ग्लास होते. एकीकडे सगळ्यांचा चहा झाला. चहा सोबत प्रत्येकीला बिस्कीट पुडा दिला होता. ग्रामीण बायकाच त्या भल्या पहाटे उठून घरच्यांच्या पोटाची सोय करून आल्या पण स्वतः उपाशीच आल्या असणार हे माहिती होतेच… तसेच होते. मग अश्विनी ताई यांनी शिट्टी वाजवली आणि सगळ्यांना रांगेत उभे केले. आधी किशोरींचा गट त्या नंतर युवतीचा गट हे गट पूर्ण १० किमी पळणारे होते मग महिला. त्यात पुण्याच्या नि गावाकडच्या होत्या, गणवेशात असणाऱ्या आरोग्य आशा कार्यकर्त्यांची वेगळी रांग होती तर हिरकणी प्रकल्पाच्या सगळ्या गणवेशाच्या जाकीटात हजर होत्या. नवदिशा, नव चेतना बैठकीतल्या प्रतिनिधी आपापल्या गावातल्या गटासह मैदानात उतरल्या होत्या.
डॉ. वैशालीताई बिनीवाले गेली १४ वर्ष गरोदर महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी वेल्हे तालुक्यात येत आहेत त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एडके सरांनी शुभेच्छा दिल्या, करंजावणे प्राथमिक केंद्राचे डॉ नांदेडकर स्वतः उपस्थित होतेच, शेवटी पोलीस अधीक्षक देवकर सरांनी सर्व सहभागींना महिला दिनाच्या शुभेच्छा व प्रोत्साहन दिले. सगळया जणी आरोग्य दौडसाठीच आल्यामुळे कुठेही खुर्च्यांची सोय केली नव्हती आणि कोणाचीही त्या बद्दल तक्रार नव्हती. उत्साह ओसंडून वहात होता! पळायला लहान मुलींइतक्याच मोठ्ठ्याही उत्सुक होत्या. यासाठी कोणीही सराव केला नव्हता. सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सोहळा बघायला वेल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या जाधवबाई स्वतः आल्या होत्या. डॉ. वैशालीताई यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि एक एक गट पळायलाच लागला. जिला दमल्या सारखं झाले ती थोडा दम खाउन थोडे चालून पुन्हा पळायला लागायची अशाही खूप होत्या. ही काही बक्षिस पटकवण्यासाठी जीवाच रान करून पळायची स्पर्धा नव्हती तर गटानं एकत्र येउन स्वतःच्या आनंदासाठीची केलेली योजना होती. सत्तरी ओलांडणाऱ्या सगळ्या जणींनी ५ किमी अंतर चालणे केले तर ४५० पेक्षा जास्त जणींनी १०कि. मी अंतर चालत किंवा पळत हसत हसत ओलांडले. अशा भारावलेल्या, चैतन्यमय वातावरणात ग्रामीण महिला आयुष्यात प्रथमच पळत होत्या. या आरोग्य दौडचा एक भाग असा होता कि ‘डॉक्टरांच्या सोबत चालणे’ पुण्यातून पाच निमंत्रित होते. सर्व महिला डॉक्टर गटासोबत १० किमी. चालले हे विशेष! एवढंच काय पण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरही ५ किमी चालले. या वेळी पोलीसांचे सहकार्य उल्लेखनीय होते. महिला पोलीसही टप्प्याटप्यात गटासोबत चालत होत्या. एकूणच पोलीस व शासकीय आरोग्य खाते अगदी स्वतः डॉक्टरांपासून आशा सेविकांपर्यंत सगळे सोबत चालत होते. या उत्स्फूर्त सहभागामुळे संयोजकांना अतिशय सुरक्षित वाटत होतं. नऊवारी पेहेरावातल्या ५०पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या आणि या सर्व जणींनी १० किमी अंतर पूर्ण केले. गावाकडच्या अनेक जणी सवयीने अनवाणी पळत होत्या.
सहभागीन्पैकी मावळातले सगळ्यात लांबचे गाव म्हणजे लिंगाण्या जवळचे सिंगापूर (वेल्ह्यापासून ३२ कि.मी.) तर सिंहगड पिछाडीचे कल्याण (वेल्ह्यापासून ४८ कि.मी) या भागातल्या ६६ गावातून गट सहभागी झाले होते. वेल्ह्याच्या सहनिवासातल्या आपल्या मुलींच्या पालिकांना मुद्दाम निमंत्रण दिले होते त्या आल्या होत्या आणि विशेष म्हणजे १७ आई आपापल्या मुलीसोबत  सहभागी होउन दौडमध्ये पळाल्या सुध्दा!
चालत पळत सगळे गट अखेर वेल्ह्याच्या एस टी स्टँडवर पोचले आणि मग तिथून सगळा एकत्र गट घोषणा देत शिवगोरक्ष कार्यालयात गेला आणि विसावला! तोवर सगळ्या गाड्याही पोचल्या. ड्रायव्हर सांगत होते, ‘दमलेल्यांना सांगत होतो गाडीत बसा तर बाया ऐकतच नव्हत्या! ती बघ माझ्या पुढे आहे थांब तिला गाठते म्हणून पळत होत्या.’…. नउवारीवाल्या सुद्धा मागे नव्हत्या!
१०.३० पर्यंत शेवटचा गट सुद्धा पोचला! हुश्श!मग कार्यालयात सभा झाली. ग्रामीण स्त्री शक्तीच्या कामाचा धावता आढावा घेतला. डॉक्टरांचे सत्कार केले, या दौडच्या संयोजकांपैकी एक रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड होते त्यांचे १० प्रतिनिधी वेल्ह्यात सहभागी व्हायला आले होते. त्या प्रतिनिधींचा सत्कार केला. पाहुण्यांची मनोगते, मार्गदर्शन झाले आणि शेवटी चालणाऱ्या/ पाळणाऱ्या वेगवेगळ्या गटांमधल्या पहिल्या ३ जणींचे कौतुक म्हणून स्मृतीचिन्ह देउन सत्कार केला. त्यात किशोरी, युवती गट होते, महिला ५ किमी, १० किमी असेही गट होते आणि विशेष म्हणून पुण्याच्या गटाचे वेगळे नंबर काढले होते आणि नउवारी गटामध्येही वेगळे नंबर काढले होते. बहुतेक स्थानिक बक्षिसे नेहेमी गरज म्हणून चालावे लागते अशा गेलगणे व रायादंडवाडी इथल्या धनगर गटानेच पटकावली. फारशा कुठल्या कार्यक्रमात एरवीही सहभागी हो नसणाऱ्या या महिलांना तर बक्षिसासाठी सुद्धा पुढे यायचा संकोच होत होता. अशांच्या सहभाग या दौड मध्ये होता, दिवस कारणी लागला! शेवटी प्रार्थना होउन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम संपताच सर्व गटाचे प्रमुख वाढपी बनले आणि तासाभरात भुकेलेल्या ९०० जणींची जेवणे पार पडली. भूक इतकी लागली होती की पंगतीत शेवटी वाढेपर्यंत पहिलीचे जेवण करून होत होते. जेवताना सगळ्या मिळून मिसळून बसल्या होत्या. मी एक-दोन किलोमीटर चालायचे ठरवले होते पण दहा किलोमीटर कधी झाले कळलेच नाही. अशा गप्पांना रंग चढला होता. ज्या आल्या नाहीत त्या केवढ्या आनंदाला मुकल्या अशीही चर्चा होत होती.
गावागावात रहाणाऱ्या ८० गाव प्रतिनीधीच्या गटाने फक्त पंधरा दिवस काम करून केवळ महिला सहभागी असणारी अशी पहिली आरोग्य फेरी अशा प्रकारे यशस्वीरीत्या पूर्ण केली.
यासाठी अनेकांनी मदत केली पुण्याहून जाण्या-येण्यासाठी गिरिकंद ट्रॅव्हल्स व जुनावणे ट्रॅव्हल्स यांनी बस उपलब्ध करून दिल्या तर वेल्ह्याचे कार्यालय भूरूक कुटुंबीयांनी अल्प मोबदल्यात उपलब्ध करून दिले. रोटरी क्लबच्या टेलिमेडिसिन प्रकल्पाअंतर्गत भरीव अर्थसहाय्य दिले तर औंध व पौडरोड संवादिनी गटाने स्मुतीचिन्हासाठी अर्थसहाय्य दिले. कातकरी गटासाठी त्यांच्यासाठी चालू प्रकल्पातून आर्थिक न्माडत झाली तर आरोग्य सखी प्रकल्पाचे अर्थबळ काही दुर्गम गावासाठी उपलब्ध झाले. याशिवाय काही वैयक्तिक देणगीदारांनी या साठी देणगी दिली. सर्व डॉक्टरांनी सहभागी होण्याचे सहज मान्य केले आणि गावागावातल्या प्रतिनिधीनी आपापल्या गावातून प्रयत्नपूर्वक सहभागी गट उभा केला …. अशा सगळ्यांच्या नेमक्या प्रयत्नामुळे आणि सहभागाने हा कार्यक्रम अविस्मरणीय तर झालाच पण सगळ्याच गटाला नवीन उर्जा देणारा ठरला.

  1. सहभागी गटातल्यांच्या काही प्रतिक्रिया!
  • सर्व प्रबोधिका आणि ताईंचे अप्रतिम नियोजन. आजचा कार्यक्रम खूपच छान झाला. माझा पहिला वहिला कार्यक्रम होता, कायम स्मरणात राहिल.
  • Lucky to witness such an august gathering!
  • अतिशय सुनियोजित , संस्मरणीय कार्यक्रम झाला.
  • खूप मजा आली. फार मस्त कार्यक्रम झाला. अतिशय संस्मरणीय.
  • नियोजनबद्ध कार्यक्रम, सर्व व्यवस्था पण उत्तम!
  • खूपच छान नियोजन होते… नक्कीच स्मरणात राहणारा आहे
  • महिला दिनानिमित्त शिवभूमीत माता जिजाऊंच्या छायेत पुण्यशील तोरण्याच्या पायथ्याशी शिवपुत्रींचा आनंद मेळावा साजरा झाला. \”कोणती पुण्ये अशी येती फळाला\’ वाटते आयुष्याचे चंदन झाले.
  • कार्यक्रम उत्तम झाला, सर्व व्यवस्था , सहभागींचा उत्साह उर्जादायक आहे. किशोरींची संख्या आणि सहभाग भविष्यासाठी विशेष आश्वासक आहे
  • इतका अनोखा आणि ऊर्जा देणारा महिला दिन झाला की तो आज तिथे येणाऱ्या प्रत्येक महिलेला स्वतःची अशी ओळख देऊन गेला , फारच छान
  • कार्यक्रमाचे नियोजन १ नं होते. सगळ्यांचा  उत्साह वाखाणण्याजोगा होता. It was completely charged atmosphere. Hats off to you आज मी खूप अनमोल खजिना घेऊन घरी आले!