वसंत स्वरस्मृती

वसंत स्वरस्मृती मध्ये ज्ञान प्रबोधिनीचे समर्पित कार्यकर्ते आणि द्वितीय संचालक कै. डॉ. वसंत सीताराम तथा आण्णा ताम्हणकर यांच्या आवाजातील गीते समाविष्ट केली आहेत. यामध्ये देशभक्तीपर गीते आणि शंकराचार्यांचे आत्मषटकम् हे स्तोत्रही आहे. आण्णांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रचारक म्हणून औरंगाबाद येथे काही वर्ष काम केले. तसेच संघाचे घोषप्रमुख म्हणूनही ते दीर्घकाळ काम करत होते. त्यानंतर त्यांनी ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. डॉ. आप्पासाहेब पेंडसे यांच्या प्रेरणेने, ज्ञान प्रबोधिनीच्या माधमातून देशकार्यासाठी जीवन वाहिले आणि आयुष्यभर संन्यस्तवृत्तीने राहून, ज्ञान प्रबोधिनीच्या विविध केंद्रांच्याद्वारे प्रबोधिनीचा कार्यविस्तार घडवून आणला.

आण्णांचा आवाज अतिशय भावपूर्ण व हृदयस्पर्शी होता. गीतातील आशयानुसार वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होण्याची कला आण्णांना सहजसाध्य होती. आण्णा भाषण कमी करत कारण, अनेक भाषणांपेक्षा एखादे पद्य अधिक पटीने परिणामकारक होते, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या सुमधुर आवाजातील ही गीते कोणत्याही संघटनेतील कार्यकर्त्यांना आणि पुढच्या पिढीमधील युवक-युवतींना नक्कीच प्रेरणादायी ठरतील असा विश्वास वाटतो.
यातील काही गीतांमध्ये गायत्री सेवक, संगीता रानडे इत्यादींचाही स्वरसाथ आहे. सध्या अमेरिकास्थित असलेले प्रबोधिनीचे कार्यकर्ते श्री. आश्विन बडवे यांनी स्वतःच्या व्यक्तिगत संग्रहासाठी १९६७मध्ये ही गीते आण्णांना ध्वनिमुद्रित करून मागितली होती. त्यांच्यासाठी त्यावेळी तयार केलेल्या ध्वनिफितींवरून हा अनमोल ठेवा, त्यांनी ती. आण्णांना श्रद्धांजली म्हणून नव्या स्वरुपात उपलब्ध करून दिला, याचाही मनापासून आनंद आहे.