मागे वळून बघताना ८ – युवती विकास उपक्रम भाग २  

गेल्या भागात आपण, युवती विकास प्रकल्पातील औपचारिक शिक्षण घेत नाहीत, अशा मुलींसाठी चालवलेल्या जास्वंद वर्गाबद्दल पाहिले. या भागात नियमित शिकणाऱ्या युवतीं विषयी थोडेसे.. 

युवती विकास उपक्रम सुरू करायचं ठरवलं कारण ‘बाई’ झाल्यावर म्हणजे थोडे मोठे झाल्यावर, संसाराला लागल्यावर शिकण्याला मर्यादा येतात म्हणून त्यांना महाविद्यालयातच गाठू! या उद्देशाने महाविद्यालयातच तासिका घ्यायचे असे ठरवले. पहिल्या तासांना चर्चा घेतली, त्यात प्रश्न होता, ‘महाविद्यालयात शिकायला का आलो?’ असे सांगायचे. या प्रश्नाला इतकी अनपेक्षित उत्तरे यायची की ….मैत्रीण येते म्हणून, गावाजवळ कॉलेज आहे म्हणून, पुण्यातली बहीण शिकते म्हणून, शाळेतल्या शिक्षकांनी प्रेरणा दिली म्हणून, नोकरी करता येईल म्हणून, शेतावर जायला नको म्हणून, काहीतरी करायचे म्हणून ….. थोडक्यात काय तर शब्द वेगवेगळे असले तरी ‘मला ‘हे’ शिकायचे म्हणून मी महाविद्यालयात येते!’ असे कोणाचेच उत्तर नसायचे. अनेकींच्या घरी कॉलेजमध्ये गेलेले पालक नसल्यामुळेही अशी काहीही उत्तरे येत असली तरी आपण ‘मुलगी’ म्हणून काहीतरी भारी करतोय असे गृहीतक असायचे. 

त्यामुळे थोडेसे बरे मार्क पडले तरी हुशार मुलगी! म्हणून मुलींना पुढे शिकावे असे वाटायचे ही महत्वाची बाजू होती. पण काय शिकायचे, का शिकायचे, कुठे शिकता येते याचे फारसे पर्याय माहिती नसल्याने प्रश्न यायचा! या माहितीमुळे युवती विकास प्रकल्प करताना ‘पुढील शिक्षणा विषयी माहिती’ मिळावी म्हणून १० वीची परीक्षा दिलेल्यांसाठी शिबिरे घ्यायला सुरुवात केली. या शिबिरात कॉमर्स, आर्ट्स म्हणजे काय? त्यात कुठले विषय विषय असतात, सायन्सला गेले तर पुढे कुठल्या वेगळ्या संधी मिळतात याचीही माहिती दिली. मुलींनी शास्त्र शाखेत जाणे, शिकून तसा विचार करायला शिकणे ही महत्वाचे होते असे वाटून असे काही वर्ष केले. आपल्या आजूबाजूचे शिकलेले असल्यामुळे सहज जाताएता कानावर पडल्यामुळे आपल्याला ही माहितीच असते, त्यासाठी माहिती मिळवावी लागत नाही पण गावात असे घडत नाही.. काय माहिती नाही हे सुद्धा माहिती नाही या टप्प्यापासून कामाला सुरुवात करावी लागते, म्हणून अशी शिबिरे घ्यायला सुरुवात केली. एकदा तर या शिबिरात भाग घेणाऱ्या मुली म्हणाल्या, ‘आम्ही सायन्सला जायला तयार आहोत पण आमच्या गावात कॉलेज नाही आणि सायन्स शिकवले जाते, त्या लांब गावच्या कॉलेजला पालक पाठवणार नाहीत.’ मग आपल्या युवती विकास उपक्रमाच्या कामाचा भाग म्हणून स्थानिक पुढाऱ्यांना भेटून हे गाऱ्हाणे कानावर घालायला सांगितले आणि अश्चर्य म्हणजे पुढाऱ्यांनी मुलींचे ऐकून वेल्हयात सायन्स कॉलेज सुरू केले! आता तिथेही काही प्रवेश होतात. 

काही कोर्स पुण्यातच शिकावे लागतील म्हणून संपर्कात आलेल्या युवतींच्या शिक्षणाचा भाग म्हणून सलग काही वर्ष कर्वे शिक्षण संस्थेत निवासी शिबिर घेतले. जिला शिकायचे आहे तिने सुद्धा मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेताना बघायला हवे. म्हणून आपल्याला चालेल अशी, माफक फी असणारी, चालेल असे वातावरण असणारी, फक्त मुलींसाठी शिक्षण देणारी संस्था कर्वे शिक्षण संस्था असल्यामुळे शिबिर तिथे घेतले. शिबिर वेळापत्रकात तिथे प्रवेश कसा मिळवायचा हे पण दाखवले. अगदी तिथे प्रवेश घेणाऱ्या मुली ‘कमवा आणि शिका’ योजनेत कसे काम करतात, निवासी मुलींना रोज जेवण कसे मिळते असेही दाखवले.. परिणामतः काही जणी प्रवेश घ्यायला तयार झाल्या पण वयात आलेल्या मुलीला शिकायला बाहेर पाठवण्यासाठी तिच्या आईची परवानगी महत्वाची होती, मग एकदा तर युवतींच्या पालिकांची सहल कर्वे संस्थेत काढली. तिथले सुरक्षित हॉस्टेल दाखवले. एरवी असे पालिकांना कोण दाखवणार? अशा ठिकाणी पोहोचणे सुद्धा अवघड.. आतून प्रवेश घेण्यापूर्वी बघायला मिळणे तर पालिकांना अशक्यच होते. संस्थेच्या मध्यस्थीने शक्य झाले. असे सगळे केल्यावर जेव्हा युवती पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतील असा विश्वास आला तेव्हा तिथल्या व्यवस्थापनाशी बोलणी केली आणि सलग ४-५ वर्ष ठरवून वर्षाला ५-६ युवती प्रवेश घेतील असे पाहिले! मुलींच्या शिक्षणाचे शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या, महिला शिक्षण संस्था असणाऱ्या पुणे जिल्ह्यातली ही वस्थूस्थिती मांडत आहे. 

तर! अशा प्रयत्नाने युवती शिकत्या झाल्या. मग ज्यांनी पुण्यात शिक्षणासाठी प्रवेश घेतले त्यांच्यासाठी स्कॉलरशिप उभी करणे असे कामही ओघानेच सुरू झाले. आजही चालू आहे. अशा स्कॉलरशिप मिळालेल्या युवतींची आयुष्यच बदलतात याची देणगीदारही खात्री पटली आहे त्यामुळे अशा शिक्षणाला देणगीही मिळते. जिला प्रबोधिनीतून स्कॉलरशिप दिली, तिला सांगितले की, ‘पैशांची मदत करू, पण तू काय शिकते आहेस हे सुट्टीला गावाकडे जाशील तेव्हा गावागावात जाऊन इतर युवतींना सांगायचे!’ आणि तिनेही हे काम आनंदाने केले! जी फॅशन डिझायनिंग शिकत होती तिने बुटिकच्या कामाचा अनुभव सांगतला तर जी नर्सिंग शिकत होती तिने गणवेश घालून हॉस्पिटलमध्ये जाताना किती भारी वाटते ते सांगितले. आपण एरवी काय शिकवले जाते ते सांगितले असते पण मुलींनी त्या शिक्षणात त्यांना भारी काय वाटते याचे अनुभवकथन केले. या निमित्ताने आपवादाणे घडत असले तरी शहरात शिकायला गेलेल्या सगळ्याच मुली काही मित्र मिळवून पळून जात नाहीत हेही पालिकांना कळले. आपण विचार न करता असे काही केले तर गावातल्या पुढच्या मुलींच्या शिक्षणाचा रस्ता बंद होतो हेही युवतींना पुन्हा पुन्हा संपर्क असल्यामुळे सांगितले. अशा अनुभव कथनामुळे आता ‘शिकण्याचे मार्केटिंग’ वेगळे करावे लागले नाही. शिकणारी शिकून नोकरीला लागते तेव्हा असे काही सांगते की, ‘आमच्या घरात एवढे पैसे मिळवणारी मीच पहिली!’ तेव्हा जो परिणाम होतो तो शब्दातीत असतो. आत्मसन्मान बोलण्यातून दिसावा लागतो मग अनुकरण करणारी तयार होतात. 

हे काम जरी एक दोन परिच्छेदात इथे लिहिले असले तरी यातला एक एक प्रसंग घडायला.. नव्हे समजून घडवायला काही वर्ष लागली आहेत. शिकणाऱ्या युवतीच्या आईला, कुटुंबाला युवतीच्या शिक्षणाचा अभिमान वाटायला हवा तरच असे सारे घडते. काय शिकायचे यासाठी शिक्षणाच्या सोयीची नुसती माहिती देऊन पुरत नाही सोबत प्रेरणाही द्यावी लागते, हे काम करताना लक्षात आले. असे प्रेरणा जागरणाचे काम झाले तरच स्वयंस्फूर्तीने काही घडू शकते.. हे घडवताना घडवणाऱ्या व्यक्तीच्या कामाचे सातत्य आणि गुंतवणूक किती आहे त्यावर परिणाम किती लवकर होणार हे अवलंबून असते.. सुदैवाने आपल्या कामात गेल्या ३० वर्षात काम सोडून गेलेल्या अपवादानेच आहेत, टिकून राहिलेल्या स्वघोषित कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे त्यांच्या कामावरच्या निष्ठेने सारे घडत आहे ही आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. 

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६