४ हाव आणि राग हेच आपले खरे शत्रू
स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःजवळ शक्ती हवी. त्याच बरोबर पुढे जाण्यासाठी पायाखाली भक्कम आधार हवा. स्वतःची प्रगती करणे हेच उद्दिष्ट असेल, त्यासाठी युक्ताहारविहाराचे नियम नियमित व्यवस्थित पाळायचे असतील, तर उद्दिष्टावरून लक्ष ढळून चालणार नाही. आपले लक्ष उद्दिष्टावर स्थिर ठेवायला ज्या गोष्टी मदत करतात त्या म्हणजे आधीच्या श्लोकातील युक्ताहारविहार. त्या जणू आपल्या बंधू आहेत.
पायाखालची जमीन जर खचत गेली तर त्याबरोबर आपण ही खाली खेचले जाऊ. मग वर जाण्याची गोष्ट बाजूलाच राहील. ज्या गोष्टींच्या मुळे आपले लक्ष ढळते, आपण खाली खेचले जातो, त्या आपल्या शत्रू आहेत. त्यासंबंधी गीतेत श्लोक आहे –
गीता 3.37 : काम एष क्रोध एषः, रजोगुणसमुद्भवः |
महाशनो महापाप्मा, विद्ध्येनम् इह वैरिणम् ॥
गीताई 3.37 : काम हा आणि हा क्रोध, घडिला जो रजोगुणें
मोठा खादाड पापिष्ठ, तो वैरी जाण तू इथे
काहीतरी मिळावे किंवा मिळवावे अशी इच्छा मनात येते. ती इच्छा म्हणजेच काम. एकदा मिळाले तर पुन्हा पुन्हा आणि जास्तीत जास्त मिळावे अशी हाव मनात निर्माण होते. ती हाव म्हणजे कामाचे वाढलेले रूप. अनेक वेळा प्रयत्न करून ही इच्छा पूर्ण होत नाही. तेव्हा राग येतो. काही वेळा इच्छेप्रमाणे घडेल असे वाटत असताना अचानक काहीतरी अडथळा मध्ये येतो आणि इच्छा अपूर्ण राहते. अशा वेळीही राग येतो. एखाद्या गोष्टीची हाव सुटणे किंवा इच्छा पूर्ण होत नाही म्हणून राग येणे या भावनांनी मन व्यापून जाते. या दोन्हीमुळे आपले उद्दिष्ट काय आहे याचे भान सुटते. उद्दिष्टाचा विसर पडतो. त्यामुळे प्रगती खुंटते. इच्छा पूर्ण करण्याच्या मागेच आपण भरकटत जातो. किंवा काही वेळा झालेली प्रगतीही पुसली जाते आणि राग येतो. म्हणून इच्छा आणि राग, यांना वैरी म्हणजेच शत्रू म्हटले आहे. आधीच्या श्लोकात ‘आत्मा चि रिपु आपुला’ म्हटले होते. हाव किंवा राग यांनी मन भरून गेले की आत्मा, म्हणजे आपण स्वतः आपलेच वैरी बनतो.
काम-क्रोध हे मोठ्या श्लोकांचे शत्रू असतातच. पण विद्यार्थ्यांना सुद्धा युक्ताहारविहाराचे नियम पाळताना हाव आणि राग यांच्यापासून सावध राहून आपले रक्षण करावे लागते. म्हणूनच विद्याव्रत संस्काराच्या पोथीमध्ये इंद्रियसंयमन हे दुसरे व्रत समजावून सांगायच्या आधी हा श्लोक सांगितला आहे. (विद्याव्रत संस्कार, आवृत्ती तिसरी, 2002, पान 21) विद्यार्थ्यांना आवडीचे खाद्यपदार्थ, आवडीचे संगीत, आवडीचे चित्रपट, आवडीचे खेळ, आवडीचे कपडे हे सर्व अधिकाधिक मिळावे असे वाटते. पहाटेची साखरझोप संपूच नये असे वाटते. हे संपूच नये किंवा अधिकाधिक मिळावे वाटणे म्हणजेच काम. प्रौढांनाही याचीच इच्छा असते. शिवाय त्यामध्ये काही जणांच्या इच्छांमध्ये व्यसनांचीही भर पडते. इच्छा पूर्ण झाली नाही, त्यात अडथळे आले की राग येतो. दारुड्याला कोणी दारू पिण्यापासून रोखले की त्याला भयंकर राग येतो. त्याचा तोल सुटतो, तो घरच्या लोकांना मारहाणही करतो.
ज्यामुळे चळवळ, धडपड, सतत कृती करावीशी वाटते त्या गुणाला रजोगुण म्हणतात. अधिकाधिक मिळवण्याची इच्छा देखील रजोगुणाचाच भाग. इच्छा पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसता न येणे हा देखील रजोगुणच. म्हणून काम व क्रोध म्हणजेच इच्छा व राग रजोगुणाचेच बनले आहेत असे म्हटले आहे. आग पेटल्यावर ती जसे ज्याला स्पर्श होईल ते जाळून टाकते, तसे ज्याची इच्छा मनात होईल ते मिळवण्याचा प्रयत्न आपल्या मनातील ‘काम’ हा शत्रू करतो. इच्छा कधी संपत नाहीत म्हणून काम खादाड आहे असे म्हटले आहे. इच्छा पूर्ण झाली नाही तर माणूस रागाच्या भरात अविचारी कृती करून बसतो. म्हणून रजोगुणाबरोबर येणाऱ्या काम-क्रोध यांना महापापी असे म्हटले आहे. कर्मवीर होण्यासाठी रजोगुण मदत करतो. पण आपण ध्येयापासून भरकटू नये म्हणून रजोगुणासह येणाऱ्या काम व क्रोध या शत्रूंना नियंत्रित करावे लागते.