६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा
दोन छान बोधप्रद गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टीत एका राजाचे डोळे खूप दुखायला लागतात. त्यांची आग-आग होत असते. वैद्य येतो, डोळे तपासून निदान करतो. खूप रखरखीत, उन्हाचे वातावरण बरेच दिवस आहे. त्यामुळे डोळे कोरडे पडले आहेत. उपाय म्हणजे राजाने भरपूर हिरवाई पाहावी असे वैद्य सांगतो. राजाने लगेच सर्व भिंती, वस्तू, कपडे, हिरव्या रंगाचे करायला सांगितले. त्याच्या शहाण्या मंत्र्याने सगळे जग हिरवे करण्याऐवजी हिरव्या काचांचा चष्मा वापरायला सांगितला. मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे केलेला उपचार लागू पडला. राजाचे डोळे दुखायचे थांबले.
दुसऱ्या गोष्टीत राजाला धुळीची ॲलज निघाली. राजाने सर्व रस्ते चामड्याने मढवायला सांगितले. इथे ही एक शहाणा मंत्री होता. रस्ते चामड्याने मढवायच्या ऐवजी त्याने राजाच्या पायाभोवती चामड्याचे आवरण तयार केले. आणि बुटांचा असा शोध लागला. धुळीपासून पायांचे रक्षण कसे करायचे हा राजाचा प्रश्न सुटला. सगळ्या जगाला रंगवायला, किंवा चामड्याने मढवायला, जाण्यापेक्षा डोळे (ज्ञानेंद्रिय) किंवा पाय (कर्मेंद्रिय) यांनी कोणता रंग पाहायचा, किंवा सुरक्षित राहून कसे चालायचे, याची व्यवस्था करणे जास्त शहाणपणाचे असते.
आपल्या इंद्रियांचे विषय तर चहू दिशांनी जगभर पसरले आहेत. त्या सर्वांवर नियंत्रण आणणे अशक्य आहे. पण त्यांचे अस्तित्व ज्यांमुळे जाणवते ती इंद्रिये आपल्या ताब्यातली आहेत. आपण जे ठरवू तेच त्यांनी ऐकायचे किंवा पाहायचे. आणि आपण जिकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरवू, ते त्यांनी ऐकायचे नाही किंवा पाहायचे नाही. असे करता आले तर आपण आपली इंद्रिये जिंकली. म्हणूनच गीतेमध्ये म्हटले आहे की इच्छा ज्यामुळे निर्माण होते ती इंद्रियेच सर्वात आधी नियंत्रणात आणा. असे इंद्रियसंयमन हा विद्याव्रतामधला दुसरा नियम आहे. (विद्याव्रत उपासना, चतुर्थ आवृत्ती, २०१७ , पान १८)
गीता ३.४१ : तस्मात् त्वम् इन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ |
पाप्मानं प्रजहि ह्येनं, ज्ञानविज्ञाननाशनम् ॥
गीताई ३.४१ : म्हणूनि पहिला थारा इंद्रिये ती चि जिंकुनी
टाळी पाप्यास जो नाशी ज्ञानविज्ञान सर्व ही
इंद्रियांच्या साहाय्याने जे जे कळते त्याने किंवा त्याच्या आठवणीने, आणि ते मिळावे यासाठी चाललेल्या विचाराने, ‘काम’ अधिकाधिक बलवान होतो. आपल्या डोळ्यांचे लक्ष छान छान दृश्ये बघण्याकडे, कानांचे लक्ष चित्तवेधक संगीत ऐकण्याकडे, जिभेचे लक्ष गोडधोड किंवा चटकदार खाण्याकडे लागले असेल, तर आपले मन अभ्यासावर, ज्ञानार्जनावर किंवा कोणत्याच कामावर एकाग्र होणे कठीण आहे. आधी मन अभ्यासाकडे वळणारच नाही. वळले तरी इंद्रियांना आकर्षक गोष्टी आढळल्या तर अभ्यासातून किंवा कामातून लक्ष विचलित होईल.
आधी इंद्रियांना पाहण्याची, ऐकण्याची किंवा चव घेण्याची ओढ लागते. मग मन ही इंद्रियांच्या पाठोपाठ खेचले जाते. शेवटी असे ओढले किंवा खेचले जाण्यात काही चूक नाही, अशा सबबी किंवा कारणे बुद्धी पुरवते. इंद्रियांना आकर्षक वाटणारे विषय, इंद्रिये, मन आणि बुद्धी ही साखळी जणू काही ज्ञानार्जनाच्या उद्दिष्टाकडे जाण्यातला अडथळा बनते. बुद्धी, मन किंवा इंद्रिये आपल्याला दिसत नाहीत. दिसतात ते इंद्रियांना आकर्षक वाटणारे विषय. म्हणून इंद्रिये आणि त्यांना आकर्षक वाटणारे विषय यांच्यातला दुवा तोडणे किंवा कमजोर करणे हे त्यामानाने सोपे जाते.
आपल्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे पुण्य करणे. उद्दिष्टापासून दूर किंवा उद्दिष्टापेक्षा वेगळ्या दिशेने घेऊन जाणाऱ्या गोष्टी करणे म्हणजे पाप करणे. आधीच्या श्लोकांमध्ये उल्लेख झालेला ‘काम’, पाप करण्यास प्रवृत्त करतो. इंद्रिये नियंत्रणात आली की या श्लोकातील पाप्मानम् एनं (या पाप्यास), म्हणजे पापकारक कामाला, दूर ठेवता येते.
गीता ज्या उद्दिष्टाबद्दल बोलते, ते उद्दिष्ट आत्म्याची ओळख करून घेण्याचे आहे. आत्म्याची शाब्दिक माहिती मिळणे म्हणजे ज्ञान. आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे म्हणजे विज्ञान. ज्ञान म्हणजे वाचलेली किंवा ऐकलेली माहिती, नियम व सिद्धान्त. विज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाने पडताळा घेतलेले नियम व सिद्धान्त. ‘काम’ पापकारक आहे, कारण तो आत्म्याचे सैद्धान्तिक आणि अनुभवाचे ज्ञान मिळवण्याच्या मार्गापासून आपल्याला दूर घेऊन जातो. म्हणूनच त्याला ज्ञान-विज्ञानाचा नाश करणारा असे म्हटले आहे. आत्मदर्शन करणे हे प्रत्येक व्यक्तीचे अंतिम उद्दिष्ट आहे. आयुष्यातील टप्प्यांप्रमाणे त्या आधीची बरीच उद्दिष्टे गाठायची असतात. विद्यार्थिदशेत उत्तम अभ्यास करणे हे उद्दिष्ट असते. विद्यार्थिदशेनंतर प्रौढपणात ज्ञानार्जनाप्रमाणेच ‘उत्तम व्यवहारा’ने ‘धन जोडून’ ते ‘उदास विचारे’ समाजहितासाठी ‘खर्च करायचे’ असते. ‘काम’ त्याच्याही आड येतो. त्याला टाळण्यासाठी सर्वप्रथम इंद्रियांवर नियंत्रण मिळवले पाहिजे.