१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण
महापुरुषपूजेच्या वेळी कै. आप्पांनी गायलेला गीतेतला पुढचा श्लोक भक्तांची लक्षणेच सांगणारा होता (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड२, पान ३१०) –
गीता १२.१४ : संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः |
मय्यर्पितमनोबुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः ॥
गीताई १२.१४ : सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढनिश्चयी
अप मज मनोबुद्धी भक्त तो आवडे मज
सुख मिळवण्याच्या बाबतीत आणि दुःख टाळण्याच्या बाबतीत भक्त सारखाच तटस्थ असतो असे वर्णन आधीच्या श्लोकाच्या शेवटी आले. तटस्थता हे सुद्धा बऱ्याच वेळा अभावात्मक लक्षण वाटते. म्हणून पुढे लगेच या श्लोकाच्या सुरुवातीला सांगितले आहे की तटस्थ म्हणजे इतरांना जे प्रसंग सुखाचे वाटतात ते स्वतःवर आल्यावर त्या प्रसंगात भक्त संतुष्ट असतोच. पण इतरांना जे प्रसंग दुःखाचे वाटतात ते स्वतःवर आल्यावर त्या प्रसंगातही तो तेवढाच संतुष्ट असतो. म्हणजे सर्व परिस्थितीत प्रसन्न आणि आनंदी असतो.
सुखदुःखाच्या प्रसंगी भक्त संतुष्ट कसा राहू शकतो? कारण तो योगी ही असतो. त्याची इंद्रिये संवेदना ग्रहण करत असतात किंवा कृती करत असतात. आणि मन मात्र रामरंगी रंगलेले असते. त्याने काम-क्रोध जिंकण्यासाठी मनाने आपल्या इंद्रियांचे नियंत्रण केले असते. इंद्रिये आपल्या सहज प्रवृत्तीने सुखकारक गोष्टींकडे खेचली जातात व दुःखकारक गोष्टींपासून दूर पळू पाहतात. पण योग्याचे मन संयमी असते. म्हणजे ते इंद्रियांना सहज प्रवृत्तीने वागू देत नाही. इंद्रिये आपल्या सहज प्रवृत्तीप्रमाणे वागू शकत नाहीत, तर मग कशी वागतात? बुद्धीने केलेल्या निश्चयाप्रमाणे वागतात.
एका पद्यामध्ये पुढील ओळी आहेत –
कर्णपथावर येतिल वार्ता, सुगम याहुनी सहस्र वाटा
निर्धारे पुढती नच ढळता, चालणे दुजा चालविणे
आपण चाललो आहोत त्यापेक्षा सोपे असे इतर अनेक मार्ग आहेत, असे कोणी कोणी म्हटलेले कानावर येईल. ते ऐकल्यावर ती वाट कोठे जाते याचा विचारही न करता इंद्रियांना लगेच त्या सोप्या वाटेने जावेसे वाटते. पण संयमी मन इंद्रियांना तिकडे जाऊ देत नाही. कारण बुद्धीने कोणत्या मार्गाने व का जायचे ते ठरवले आहे. निर्धाराने म्हणजेच दृढ निश्चयाने वाट न सोडता चालत राहायचे आहे. इतरांनाही तो मार्ग दाखवायचा आहे. हे मनाने स्वीकारलेले असते व इंद्रिये मनाच्या नियंत्रणात असतात.
संयमी मन आणि दृढनिश्चयी बुद्धी बरोबर कशावरून? तर ती दोन्ही आपल्या ध्येयाला, ईश्वराला, वाहिलेली आहेत म्हणून. बुद्धी कायम ईश्वराच्या स्वरूपाचे चिंतन करत असते. मन कायम ईश्वराच्या अनुभवाचा ध्यास घेऊन असते. तेव्हाच ईश्वराकडे जाण्याचा मार्ग मन-बुद्धीला स्पष्ट दिसायला लागतो. मग मन आणि बुद्धी इंद्रियांना दुसऱ्या मार्गाने जाऊ देत नाहीत. ईश्वराकडे जाण्याच्या मार्गाचे टप्पे जो भक्त असे एक-एक करून ओलांडतो आहे, तो भक्त ईश्वरालाही आवडतो.
प्रबोधिनीतील दैनंदिन उपासनेत जे विरजा मंत्र किंवा शुद्धिमंत्र आहेत, त्यात मन व बुद्धी शुद्ध व्हावी अशी प्रार्थना ‘मे शुद्ध्यन्ताम्’ या शब्दांनी शेवट होणाऱ्या मंत्रांमध्ये आहे. मी मन व बुद्धी शुद्ध करीन असे ‘विरजा विपाप्मा भूयासं’ या शब्दांमधले संकल्प आहेत. त्या पुढे ‘ज्योतिरहं’ म्हणत, स्वतः मधील ईश्वराला, ‘स्वाहा’ म्हणत, मी ते समर्पित करतो/ते, अशी घोषणा ही आहे. नित्य उपासनेत अर्थ समजून घेत हे मंत्र म्हटल्याने हळूहळू समर्पण भाव जागृत होऊन स्थिर होऊ लागतो. मन आणि बुद्धी ईश्वराच्या शोधात गुंतवणे, त्यासाठीच काम करणे म्हणजे ईश्वराला सर्वस्व समर्पण करणे.
महापुरुषपूजेमध्ये या श्लोकाच्या निरूपणानंतर जी गद्य प्रार्थना झाली, त्यात म्हटले होते, की परमेश्वराचेच अंश असलेल्या राष्ट्रसंतांनी प्रकट केलेले चिंतन, म्हणजे परमेश्वराचेच विचार. त्यानुसार परमेश्वराला अर्पण केलेली बुद्धी, म्हणजे मातृभूमीला कुठल्याही संकटातून वाचवू शकणारी बुद्धी. आणि परमेश्वराला अर्पण केलेले मन, म्हणजे संघटनेला सदैव अभंग ठेवणारे मन. परमेश्वराला म्हणजे राष्ट्रदेवाला मन-बुद्धी अर्पण केलेले असे भक्त म्हणतात –
‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’.
असे भक्तच परमेश्वराला प्रिय असतात.