२५. जे अटळ आहे त्याचा स्वीकार

२५. जे अटळ आहे त्याचा स्वीकार

बहुतेकांनी लहानपणी खेळातील शोभादर्शक वापरला असेल किंवा बनवलाही असेल. त्यात साधारणपणे वेगवेगळ्या आकाराचे रंगीत खडे किंवा काचेच्या बांगड्यांचे तुकडे घातलेले असतात. शोभादर्शक फिरवत राहिले की आतल्या खड्यांच्या किंवा तुकड्यांच्या वेगवेगळ्या आकर्षक रचना दिसत जातात. तुकड्यांची संख्या मर्यादित असली, तरी रचना असंख्य आणि सतत बदलत असतात. एकदा पाहिलेली रचना पुन्हा दिसेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. नवनवीन आकृत्या तयार होतात व नाहीशा होतात. पण एका शोभादर्शकातल्या काचांच्या तुकड्यांची संख्या स्थिर असते. रचना किंवा आकृत्या बदलत्या असतात, पण त्या ज्यांच्यापासून होतात, त्या तुकड्यांची संख्या स्थिर असते.

जे शोभादर्शकाच्या बाबतीत आहे, तेच सगळ्या विश्वाच्या बाबतीत आहे. ज्या अणूंपासून विश्व बनलेले आहे, त्यांची संख्या अगणित असली, तरी ती बदलती आहे, असे कोणाला म्हणावेसे वाटत नाही. पृथ्वीवरील असंख्य जीवांपासून अनंत आकाशगंगांपर्यंत जे काही बनलेले आहे ते या अणूंपासून बनलेले आहे. एका लहान विषाणूपासून अनंत आकाशगंगांपर्यंत या सर्व रचना कधीतरी बनत असतात आणि कधीतरी नष्ट होत असतात. विषाणूचे आयुष्य काही मिनिटांचेच असते. आकाशगंगेचे कोट्यवधी किंवा काही अब्ज वर्षांचेही असू शकते. परंतु त्या अणूंपासून तयार होतात हे निश्चित व ते आकार नष्ट होतात हेही निश्चित. त्यांची निर्मिती किंवा जन्म आणि तसेच नाश किंवा मृत्यू अटळ आहे. प्रश्न फक्त निर्मिती आणि विनाश यांच्यामध्ये किती काळ जाणार याचा आहे. त्यांच्या जन्मापूर्वी  आणि मृत्यूनंतरही अणू असतात. अणूंचे अस्तित्व ही कायमचे आहे असे नाही. विश्वाचे आयुष्य काही अब्ज वर्षांचे असले, तरी त्यातले सर्व अणू पहिल्या तीन मिनिटांतच निर्माण झाले असे काही शास्त्रज्ञ म्हणतात. ते असे निर्माण झाले असले, तर ते ही कधीतरी नष्ट होणारच. मग ते ज्या ऊर्जेपासून बनले, त्या ऊर्जेचे अस्तित्व अटळ आहे आणि अणूंची निर्मिती झाली तसे ते नष्ट होणार हेही अटळ आहे. जे अटळ आहे ते सर्व स्वीकारले पाहिजे, असे गीतेमध्ये म्हटले आहे.

गीता २.२७ :          जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च|

                           तस्मादपरिहार्येऽर्थे, न त्वं शोचितुमर्हसि ॥

गीताई २.२७ :         जन्मतां निश्चयें मृत्यु मरतां निश्चये

                           म्हणूनि न टळे त्याचा व्यर्थ शोक करू नको

विषाणूंपासून आकाशगंगांपर्यंत सर्वांची निर्मिती आणि नाश अटळ आहे. विज्ञानाचा थोडा अभ्यास झाला असेल, तर या वास्तवाकडे तटस्थपणे पाहता येते. विषाणू मेला किंवा आकाशगंगेचा स्फोट झाला, तर त्यांच्या रचनेतले सौंदर्य ज्यांना दिसते त्यांना थोडी हळहळ वाटेल. परंतु ते नष्ट झाल्याचे दुःख मनात ठेवून कुणी शोक करत राहणार नाही. स्वतःच्या जन्माचा आनंद आपल्याला व्यक्त करता येत नाही. पण घरातल्या नव्या बाळाच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करावासा वाटतो. कोणाच्या अकाली किंवा अपघाती मृत्यूचे दुःख होते. पूर्ण कृतार्थ जीवन जगलेल्या शतायुषी माणसाच्या मृत्यूचेही दुःख होते. स्वतःच्या संभाव्य मृत्यूची भीतीही बहुतेकांच्या मनात असतेच. जन्माचा आनंद आणि मृत्यूचे दुःख किंवा भीती त्या त्या व्यक्तीशी असलेल्या भावनिक गुंतवणुकीमुळे म्हणजे नात्यामुळे असते.

प्राण्यांना जे काही मन असते, त्यामुळे प्राण्यांमध्येही आईला पिल्लाच्या मृत्यूचे किंवा एका झुंडीतील प्राण्यांना झुंडीतल्या एखाद्या प्राण्याच्या मृत्यूचे दुःख होत असावे असे त्यांच्या वर्तनावरून काही वेळा वाटते. पण ते फारच थोड्या काळापुरते असते. मृत्यूची घटना विसरून प्राणी काही वेळातच पूर्ववत व्यवहार करू लागतात. माणसांमध्ये मात्र जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत असू शकते. याचे कारण शरीर आणि मनाचे नाते ही बऱ्यापैकी घट्ट असते. आणि मन म्हणजेच मी अशी आपली बहुतेकांची ठाम समजूत असते.

मी मनापेक्षा वेगळा आहे. हात, पाय, डोळे, कान या इंद्रियांसारखे मनही एक इंद्रिय आहे. आणि ती इंद्रिये वापरणारा मी वेगळा आहे, हे समजण्याची आवश्यकता असते. जसे स्वतःच्या बाबतीत आहे, तसेच इतर माणसांच्या बाबतीत असते. त्यांचे शरीर आणि मन यांच्यापेक्षा त्यांचा ‌‘मी‌’ वेगळा असतो. शरीराचा जन्म आणि मृत्यू अटळ आहे. हे समजणे थोड्याफार प्रयत्नांनी जमते. ‌‘मी‌’ चे अस्तित्व कायम आहे, अटळ आहे हे कळायला मात्र बराच प्रयत्न करावा लागतो. या प्रयत्नांनाच आध्यात्मिक साधना म्हणतात. शरीराचा जन्म-मृत्यू अटळ म्हणजे अपरिहार्य आहे. त्यामुळे जो जो जन्माला आला आहे, त्याच्या मृत्यूचा शोक करणे योग्य नाही, असे या श्लोकात सांगितले आहे. हा श्लोक सुद्धा अंत्येष्टीच्या पोथीमध्ये समाविष्ट केलेला आहे (ज्ञान प्रबोधिनी संस्कारमाला : अन्त्येष्टी दाहकर्म संस्कार पोथी, पाचवी आवृत्ती, शके 1939, पान 12), परंतु तो केवळ स्मशानातच म्हणावा असे नाही. आपल्या आजूबाजूला सर्व काळ सर्व ठिकाणी जन्म-मृत्यूचा खेळ सुरू असतो. आपले आणि इतर सर्वांचे शरीर ही त्या खेळाचा भाग आहे हे कळले आणि लक्षात राहिले पाहिजे.