वर्षांत उपासना – प्रौढ सदस्यांसाठी

प्रस्तावना

वर्षारम्भ आणि वर्षान्तदिनांच्या उपासना हे ज्ञान प्रबोधिनीने पुनरुज्जीवित केलेले शैक्षणिक संस्कार आहेत. श्रावणी या संस्काराचे पुनरुज्जीवित रूप म्हणजे वर्षारम्भ. श्रावणीच्या रूपातील वर्षारम्भ तुरळक स्वरूपात अजूनही कुठे-कुठे चालू असतो. उत्सर्जन किंवा वर्षान्त हा संस्कार मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी बंद पडला होता. आधुनिक काळातील शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाशी आणि सांगतेशी अनुक्रमे वर्षारम्भ आणि वर्षान्ताची सांगड ज्ञान प्रबोधिनीने घातली आहे.

पूर्वीच्या काळी वेदाध्ययन सुरू करताना श्रावणी संस्कार होत असे, तर वेदाध्ययन तात्पुरते थांबवून, इतर विद्या शिकणे आणि वापरणे याला सुरुवात करायची म्हणून, उत्सर्जन संस्कार होत असे. आधुनिक काळात नवीन शैक्षणिक वर्षात नवीन विषय शिकण्याचे, नवीन कौशल्य शिकण्याचे आणि नवीन अभ्यासक्रम शिकण्याचे संकल्प वर्षारम्भदिनी करावे अशी पद्धत ज्ञान प्रबोधिनीमध्ये सुरू केली आहे. इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा विद्याव्रत संस्कार होतो. वर्षारम्भदिनाची उपासना विद्याव्रताचे स्मरण करण्यासाठी आहे. विद्याव्रत संस्कार होईपर्यंत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी तो केवळ संकल्पदिन आहे. औपचारिक शिक्षण पूर्ण झालेल्यांसाठी वर्षारम्भदिन हा नवीन कार्यसंकल्प करण्यासाठी आहे आणि नव्या कामांसाठी आवश्यक ते नवे ज्ञान व कौशल्ये शिकण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.

वर्षान्तदिन हा वर्षारम्भी केलेल्या संकल्पांचा आढावा घेण्यासाठी आहे. शिकलेले ज्ञान व कौशल्ये व्यवहाराच्या कसोटीवर नेहमीच तपासून घ्यावे लागतात. वर्षान्त ते पुढचा वर्षारम्भ या मधल्या काळामध्ये विविध कामांमध्ये आपले ज्ञान व कौशल्य वापरण्याच्या योजना करायच्या असतात. तसेच कोणत्याही अभ्यासक्रमात बसवता येत नाही असे अनुभवशिक्षण वर्षान्त ते पुढील वर्षारम्भ या दरम्यानच्या काळात घ्यायचे असते. ज्ञानार्जन आणि ज्ञानाचे उपयोजन अशा दोन्ही पद्धतींनी शिकतच व्यक्तिमत्त्व विकसन होत असते. वर्षारम्भदिनाच्या उपासनेपेक्षा वर्षान्तदिनाच्या उपासनेत वेगळे श्लोक किंवा मंत्र असले तरी गद्यातील प्रार्थना दोन्ही दिवशी एकच ठेवलेली आहे. ‘समाजविकासासाठी व्यक्तिविकास’ या सूत्राकडे ही गद्यातील प्रार्थना लक्ष वेधते.

सुमारे पन्नास वर्षे एकाच संहितेचा वापर केल्यानंतर कालानुरूप बदल करून वर्षान्तदिनाच्या उपासनेची नवी संहिता या पोथीमध्ये प्रकाशित केली आहे. वयोगटानुसार गद्य व पद्य भागाची वेगवेगळी मांडणी हे या नव्या संहितेचे वैशिष्ट्य आहे.

गिरीश श्री. बापट
संचालक

******************************************************************************************************

वर्षान्तदिन उपासना

(प्रौढ सदस्यांसाठी)

सूत्रचालक : हरिः ॐ
उपासक : हरिः ॐ
सूत्रचालक : ॐ
उपासक : ॐ
सूत्रचालक : ॐ
उपासक : ॐ
सूत्रचालक : आज आपल्या विभागाचा वर्षान्तदिन समारंभ आहे. विविध रूपातील देवीचे स्मरण व वंदन करून आजच्या या उपासनेला आपण सुरुवात करूया.

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
शक्तिरूपेण संस्थिता । लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.२०,५.३२.५.५६)

चितिरूपेण या कृत्स्नम् एतद् व्याप्य स्थिता जगत् ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.७८)

सूत्रचालक : जी देवी सर्व जीवांमध्ये बुद्धी, शक्ती व लक्ष्मीरूपाने राहते तसेच जी दिव्य चेतना सर्व विश्वाला व्यापून राहिलेली आहे, तिला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. या सर्व विश्वात या दिव्य चेतनेशिवाय अन्य काहीच नाही. या चेतनेलाच निरनिराळे लोक निरनिराळ्या नावांनी संबोधतात. ऋग्वेदात म्हटले आहे,

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :

एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति
अग्निं यमं मातरिश्वानम् आहुः । (म. १, सू. १६४, ऋचा ४६)

सूत्रचालक : सत्य एक आहे. त्यालाच जाणते लोक अग्नी, यम, मातरिश्वन् इत्यादि नावांनी हाक मारतात. अशा या सत्याचे, चैतन्याचे आपण सर्व अंश आहोत. आपणाकडून काय अपेक्षा आहे? ईशावास्योपनिषदात सांगितले आहे,

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :

कुर्वन् एव इह कर्माणि, जिजीविषेत् शतं समाः ।
एवं त्वयि न अन्यथा इतः अस्ति न कर्म लिप्यते नरे ।। (ईशावास्य २)

सूत्रचालक : इहलोकी कर्मे करीत करीतच शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरावी. तुला, देहवंताला हाच मार्ग आहे. याहून वेगळा मार्ग नाही. मनुष्याला काही कर्म चिकटत नाही, फलवासना चिकटते. शंभर वर्षे कर्म करीत जगायचे, तर ते कसे? ज्याला स्वतःचे हित साधायचे असेल, त्याने आपले काम नेहमी कष्टपूर्वक आणि मनोभावे करीत राहावे. काही कामे नित्य म्हणजे दररोज करण्याची असतात. उदाहरणार्थ कार्यालयात, शाळेत, प्रयोगशाळेत, कारखान्यात किंवा शेतात काम करणे. काही कामे नैमित्तिक असतात. उदाहरणार्थ संघटनेतील उपक्रमांच्या, सार्वजनिक उत्सवांच्या किंवा कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने करावी लागणारी प्रासंगिक कामे. ही सर्वच प्रकारची कामे मनोभावे केली तर ती माणसाला परमेश्वराकडे घेऊन जातात. मन लावून केलेल्या कामामुळे मन शुद्ध आणि पवित्र बनते आणि अशा पवित्र मनाच्या मंदिरात परमेश्वर वास करतो. यासंबंधी एकनाथ महाराज म्हणतात, ‘लोकहो, आपले काम करीत राहणे म्हणजे परमेश्वराचीच भक्ती करणे आहे’.

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :

जया करणे आत्महित। स्वधर्म आचरावा सतत ।
कर्मे नित्य नैमित्तिक । ब्रह्मप्राप्ती लागी देख।
तीचि नित्य आचरावी। चित्तशुद्धी तेणे व्हावी।
एका जनार्दनी कर्म। ईशभक्तीचे हे वर्म ।। (एकनाथी गाथा भाग ३, २८३२)

सूत्रचालक : अशा रितीने काम करताना आणखी काय करायला हवे ? स्वतःमध्ये असलेले आत्मतत्त्व जसे जाणायचे, प्रकट करायचे, तसेच समष्टीमधील आत्मतत्त्व जाणायचे, प्रकट करायचे. यासाठी शतपथ ब्राह्मणातील प्रार्थना आपण म्हणूया.

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :

श्रीः वै राष्ट्रम्।
श्रीः वै राष्ट्रस्य भारः।
श्रीः वै राष्ट्रस्य मध्यम्।
क्षेमो वै राष्ट्रस्य शीतम् ।। (शतपथ १३.२३९ : २, ३, ४, ५)

सूत्रचालक : श्री म्हणजे विद्या, संपत्ती आणि नीती यांनी युक्त तेच राष्ट्र होय. विद्या-संपत्ती-नीती हाच राष्ट्राचा संभार अथवा व्याप होय. विद्या-संपत्ती-नीती हाच राष्ट्राचा गाभा होय. या सर्वांचे रक्षण करणे हेच राष्ट्राचे शीतल अथवा सुख होय. असे हे आपले राष्ट्र उभे करणे, म्हणजेच स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करणे. आपणही समाजाचाच एक भाग आहोत. स्वतःचा उद्धार करावा. आपणहून अधोगतीला जाऊ नये. प्रगतीच्या वाटेवर नेणारे मन आपले बंधू आहे आणि अधोगतीला नेणारे आपले मनच असते, ते आपले शत्रू आहे. गीतेत सांगितले आहे,

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :

उद्धरेदात्मनात्मानं, नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुः; आत्मैव रिपुरात्मनः ।।
उद्धरावा स्वर्ये आत्मा खचू देऊ नये कधी
आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ।। (गीता-गीताई अध्याय ६.५)

बन्धुरात्माऽऽत्मनस्तस्य, येनात्मैवात्मना जितः।
अनात्मनस्तु शत्रुत्वे, वर्ततात्मैव शत्रुवत् ।।
जिंकूनी घेतला आत्मा बंधु तो होय आपुला
सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये ।। (गीता-गीताई अध्याय ६.६)

सूत्रचालक : आपल्या मनाला स्वैर सोडले आणि इंद्रियसुखाच्या पाठीमागे त्याला धावू दिले, तर आपले मनच आपले शत्रू बनते. आपण इंद्रियसुखाच्या मागे लागलो, तर अग्नीला तुपाची आहुती दिल्यावर तो जसा भडकतो, त्याप्रमाणे आपण अधिकाधिक क्षणिक सुखाच्या मागे लागत जातो. महाभारतकारांनी म्हटले आहे,

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :

न जातु कामः कामानाम् उपभोगेन शाम्यति।
हविषा कृष्णवत्मैव भूय एव अभिवर्धते ।। (महाभारत संभवपर्व अध्याय ७५.५०)

सूत्रचालक : इंद्रियविषयांच्या उपभोगाने कामाभिलाषेची तृप्ती होत नाही, तर अग्रीला आहुती दिल्यावर तो प्रज्वलित व्हावा त्याप्रमाणे ही कामलालसा वाढतच जाते. पूर्ण विकसित जीवन कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या, ईश्वराच्या चरणी अर्पित करणे यातच मानवी जीवनातील सुख सामावलेले आहे. पूर्ण विकसित, शुद्ध अशा जीवनपुष्पाने राष्ट्रअर्चना, देवअर्चना करणे हेच साध्य. इच्छिलेल्या सर्व गोष्टी मिळाल्याने आनंद होत नाही, तर त्यातील आत्मतत्त्वाशी आपल्या आत्मतत्त्वाची गाठ पडल्याने आनंदाचा अनुभव येतो. म्हणून आत्म्यासंबंधी ऐकले पाहिजे, ऐकलेल्याचे मनन केले पाहिजे, मननाने समजले पाहिजे, त्याच्या अनुभवण्याचा ध्यास घेतला पाहिजे आणि प्रत्यक्ष त्याचे दर्शन घेतले पाहिजे. तोच सर्वश्रेष्ठ आनंद आहे. आपले दैनंदिन जीवन जगताना हे सर्व कसे करावे हे संत एकनाथांनी सांगितले आहे —

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥धु॥
भावभक्ति भीमा उदक ते ब्राहे।
बरवा शोभताहे पांडुरंग ।।
दया, क्षमा, शांति हेचि वाळवंट ।
मिळालासे भार वैष्णवांचा ।।
ज्ञान, ध्यान, पूजा, विवेक, आनंद ।
हाचि वेणुनाद शोभतसे ।।
दश इंद्रियांचा एक मेळा केला।
ऐसा गोपाळकाला होत असे ।।
देही देखिली पंडरी जनी बनी।
एका जनार्दनी वारी करी ।। (एकनाथकृत अभंग ५४५)

सूत्रचालक : ज्ञान प्रबोधिनीचे सारे काम स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी चालते. स्वामी विवेकानंदांनी आत्म्याचा शोध स्वतःमध्ये आणि जगामध्ये दोन्ही प्रकारे घ्यायला हवा असे सांगितले आहे. जो विठ्ठल देहामध्ये आहे, तोच जनामध्ये म्हणजे सर्व लोकांमध्ये आहे आणि वनामध्ये म्हणजे सर्व सृष्टीमध्ये आहे. जनामधील विठ्ठलाचा म्हणजेच आत्म्याचा शोध घेण्यासाठी प्रबोधिनीचे काम करतो आहोत अशी आपली भावना हवी. ते काम करण्याची शक्ती आपल्याला मिळो. सामुदायिक, एकत्र असे वेदांचे स्मरण उपनिषदोंचे स्मरण, भगवद्‌गीतेचे स्मरण केल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनातील सामूहिक आकांक्षा पुढील प्रार्थनेत परमेश्वराला सांगूयात.

गद्य प्रार्थना

राष्ट्रार्थ भव्य कृति काही पराक्रमाची।
ईर्ष्या निजांतरि धरूनि करावयाची।।
खरोखर राष्ट्रहितार्थ
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी
अशी तीव्र तळमळ मनात धरून
आम्ही एकत्र जमत आहोत.
गत वर्षभर आम्ही सर्वांनी
एकत्र काम केले.
या वर्षाचा
औपचारिक शेवट करताना
आमच्या मनातील आकांक्षा
आम्ही व्यक्त करीत आहोत.
हे परमात्मन्, तू याचा साक्षी हो।
वर्षारंभी केलेले संकल्प
पूर्ण करण्याचा
आम्ही प्रयत्न केला आहे.
त्यामध्ये मिळालेल्या यशाचा आनंद
आमच्या मनात आहे.
त्यामध्ये राहून गेलेल्या उणिवा
समजून घेऊन
पुढील वर्षीच्या संकल्पपूर्तीसाठी
आम्ही अधिक चांगले प्रयत्न करू.
प्रतिवर्षीचे संकल्प पूर्ण करण्याचा
सर्व तन्हेने प्रयत्न करीत
शंभर वर्षे आनंदाने, सामर्थ्याने
अनुभवण्याचा प्रयत्न करू.
भौतिक संपत्तीला
सदगुणाच्या तरत्तीची जोड असत्याशिवाय
ती दैवी संपत्ती होत नाही.
सद्‌गुणविरहित संपत्ती
ही आसुरी संपत्ती होय.
आम्ही दैवी संपत्ती येथे आणू इच्छितो.
जीवनदायी शिक्षण देणे
हा प्रबोधिनीच्या कार्याचा गाभा आहे.
शिक्षण हे केवळ
शाळेत घेता येते असे नाही,
ते जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात
काम करीत असताना घेता येते.
तसे जीवनदायी शिक्षण आम्ही घेऊ.
आणि खऱ्या अर्थान कार्यकर्ते होऊ.
देशापुढे असलेल्या
महत्त्वाच्या प्रश्नांची
सोडवणूक करण्यासाठी
रचनात्मक विधायक कार्याची
स्फूर्ती जागृत करणे
हा प्रबोधिनीने विविध क्षेत्रात चालविलेला
उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
यासाठी शिक्षण, ग्रामविकसन
प्राचीन व आधुनिक शास्त्रांमधील संशोधन
आणि औद्योगिक विकसन
या राष्ट्रजीवनाच्या मुख्य अंगांच्या
विविध पैलूंचा प्रत्यक्ष कार्ययुक्त अभ्यास
प्रबोधिनीमध्ये केला जातो.
अशा विविध क्षेत्रांद्वारे
राष्ट्ररचनेसाठी लागणारे
कर्तृत्वसंपन्न युवक-युवतींचे
बळ निर्माण करणे
हा आमच्या खटपटीचा प्रधान हेतू आहे.
हा हेतू, हे परमात्मन्, साध्य होवो.
या ध्येयकल्पनेला आमचे सर्व कार्यच
आम्ही अर्पण केलेले आहे.
समर्थ श्री रामदास, स्वामी दयानंद,
स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद
या राष्ट्रपुरुषांचे आत्मिक सामर्थ्य
आमच्या कार्यास उपयोगी होवो,
हे परमात्मन्, तुझ्या आशीर्वादाने
आम्हास अविरत, अथक
परिश्रम करण्याची शक्ती मिळो.
आणि आमचे संकल्प
यशाप्रत जावोत.

सूत्रचालक : यानंतर त्रिवार ॐकार, ध्यान व गायत्री मंत्राने आपण उपासनेची सांगता करूया. उपासनेनंतर गतवर्षीच्या कार्यसंकल्पाचा आढावा आपण सगळे मिळून घेऊया.

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :

ॐ ॐ ॐ

(२ मिनिटे चिंतन)

ॐ ॐ ॐ

ॐ भू: l हे पृथ्वी

ॐ भुवः । हे अंतरिक्ष

ॐ स्वः । हे सूर्य

ॐ महः । हे कोटिसूर्य

ॐ जनः । हे आकाशगंगा

ॐ तपः । अनंत आकाशगंगा

ॐ सत्यम् । हे परब्रह्म

ॐ तत्सवितुर्वरेण्यम
भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ।।

या परब्रह्माच्या, देवाच्या
श्रेष्ठ तेजाचे ध्यान करितो
अमुच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो. (ऋ. ३.६२.१०)

सूत्रचालक व पाठोपाठ उपासक

ॐ तत मत ।
ॐ तत मत।
ॐ तत् सत।
नमस्ते १ २ ३

***************************************