परिशिष्ट १ – ज्ञान प्रबोधिनीचा संस्थानिर्मित लेख

नाव

१. या संस्थेचे नाव ‘ज्ञान प्रबोधिनी’ असे राहील. तिला अशा नावाने दावा लावता येईल व तिच्यावर अशा नावाने दावा लावता येईल.

कार्यालय

२. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे राहील. हे कार्यालय सदाशिव पेठ घरांक ५१० (नवा) पुणे शहर येथे राहील.

उद्देश व कार्य

३. या ज्ञान प्रबोधिनीचे खालील उद्देश राहतील:-

३.१ ज्ञान प्रबोधिनी म्हणजे केवळ पाठ्य-पुस्तकांचे शिक्षण देणारी सामान्य प्रतीची शिक्षणसंस्था नव्हे. म्हणून प्रबोधिनीतील विद्यार्थी शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक अशा सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न होईल अशा प्रकारचे शिक्षण देणे.

३.२ भारताच्या आर्थिक, औद्योगिक, शेतकी, शैक्षणिक, वैज्ञानिक, शासकीय, तांत्रिक, सैनिकी इत्यादी प्रांगणात श्रेष्ठ चारित्र्याचे आणि कणखर राष्ट्रीय वृत्तीचे नेते पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाहीत. अशा नेत्यांची आवश्यकता ही केवळ प्रचलित कालापुरतीच नसून ती नित्याची निकड आहे. म्हणून सर्वंकष नेतृत्वाची धुरा आपापल्या क्षेत्रात स्वीकारतील आणि राष्ट्राच्या हाकेला ‘ओ’ देतील असे कार्यकर्ते निर्माण करणे.

३.३ हे अभिप्रेत नेतृत्व उपलब्ध होण्याचे उगमस्थान म्हणजे या राष्ट्रातील कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या होत. अशी ही उगवती पिढी राष्ट्राची अमोल संपत्ती आहे. या पिढीच्या निसर्गप्राप्त कुशाग्र बुद्धिमत्तेला आवश्यक त्या अन्य गुणांची व साधनाची जोड मिळू शकल्यास वर अभिप्रेत असलेले सर्वंकष नेतृत्व अधिक द्रुतगतीने विकसित होऊ शकेल. म्हणून तसे गुण संपादन करण्याची आणि व्यक्तिविकसन साधण्याची संधी आणि सोय नवोदित पिढीला उपलब्ध करून देणे.

३.४ व्यक्तिविकसनाच्या कल्पना अधिक स्पष्ट करणे उपयुक्त आहे. व्यक्तिविकसन करणे म्हणजे प्रखर बुद्धिमत्तेच्या या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये विशेष गुणसंपदा निर्माण करणे. या गुणसंपदेमध्ये सदाचार, सत्प्रवृत्ती, अभ्यासशीलता, उद्योगप्रियता, राष्ट्रीय प्रेरणा, उज्ज्वल भारतीय संस्कृतीचा व परंपरेचा अभिमान, स्वावलंबन, उत्फूर्तिसंपन्नता (इनिशिएटिव्ह), अंतःप्रेरणा (इण्ट्युशन), संघटन-चातुर्य इत्यादी चारित्र्य-गुणांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. हे गुण विकसित होऊन स्वतःवरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव त्यांच्या मनात सदैव स्फुरेल असे करणे.

३.५ प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अशी गुणसंपदा निर्माण होण्यासाठी, म्हणजेच व्यक्तिविकसनासाठी सुयोग्य अशी शिक्षणपद्धती शोधणे आणि व्यवहारात आणणे. हे साधण्यासाठी…

३.५.१ -जगातील प्रगत देशांच्या शैक्षणिक कल्पना व प्रणाली यांचा अद्ययावत तौलनिक अभ्यास करणे.

३.५.२

या अभ्यासातून भारताच्या दृष्टीने योग्य ती शैक्षणिक तत्त्वे स्वीकारणे आणि

३.५.३ प्रयोगशील राहून आपल्या प्रतिभेतून आपली प्रणाली निर्माण करणे, व ती निर्दोष करणे.

३.६ प्रबोधिनीतील विद्याव्रताचे नाते हे अल्पकालीन असणार नाही. शक्य झाल्यास हे नाते आयुष्यभराचे ठरावे अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ शालेय शिक्षणाच्या कालावधीतच नव्हे, तर त्यांच्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणकालात आणि तदनंतरदेखील प्रबोधिनी हा त्यांच्या राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा ठरावा आणि त्यातून राष्ट्रघडणीची वाटचाल करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न व्हावी अशी अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक अशा कल्पना आणि तंत्रे उदित करणे.

३.७ नेतृत्व-विकसन, शिक्षणप्रणालीची निर्मिती, इत्यादी वर ग्रथित केलेल्या उद्देशांच्या मुळाशी स्वदेशात विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन होऊन देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे असा हेतू आहे. तो साध्य होईल अशा त-हेचे कार्य घडविणे.

उपक्रम

४. वरील उद्देश साध्य करण्यासाठी संस्थेकडून अंगीकारल्या जाणाऱ्या कार्यात खालील उपक्रमांचा अंतर्भाव होईल. ते सर्व वा त्यांतील काही उपक्रम संस्थेच्या प्राधिकाऱ्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून संस्थेच्या त्या त्या वेळी प्रचलित असलेल्या नियमांस अनुसरून पार पाडले जातील.

४.१ कुशाग्र बुद्धी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या उच्च प्रतीच्या शिक्षणाची व त्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाची सोय करणे.

४.२ भारतीय पातळीवरून अथवा राज्य पातळीवरून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धात्मक परीक्षांस (उदाहरणार्थ एन.डी.ए., डफरिन ट्रेनिंगशिप, आय.ए.एस. या व यांसारख्या अन्य परीक्षा) बसू इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांच्या खास शिक्षणाची सोय करणे.

४.३ ४.३.१ व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी, शेती-बागायती अथवा अन्य प्रकारच्या स्वतंत्र क्षेत्रात विशेष कर्तृत्व संपादन करण्याची ईर्ष्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे.

४.३.२ ग्रामीण व शहरी जनतेच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीकरिता प्रबोधिनीच्या वतीने प्रत्यक्ष ग्रामविकसनाचे प्रकल्प अथवा योजना अंगीकारणे व त्या चालविणे.

४.३.३ आरोग्य आणि वैद्यकविषयक प्रकल्प अथवा योजना अंगीकारणे व त्या चालविणे.

४.३.४ स्थापत्य, समाज-संचारण (मास कम्युनिकेशन), सर्व आधुनिक शास्त्रे (उदा. संगणक शास्त्र, संदेशवहन शास्त्र, सायबरनेटिक्स इत्यादी) यांमधील प्रकल्प अथवा योजना स्वीकारणे व त्या चालविणे.

४.३.५ -वाङ्मय प्रकाशन, युवक-युवती कार्य, क्रीडाकेंद्रांचे संचालन, अनौपचारिक शिक्षण, राष्ट्रीय अथवा सामाजिक ऐक्याचे उपक्रम, सामाजिक समतेचे उपक्रम, इत्यादीविषयक योजना करणे व त्या चालविणे.

४.४ विविध शैक्षणिक विषयांचा शास्त्रीय (सायण्टिफिक), तात्त्विक (थिअरॉटिकल) आणि तांत्रिक (टेक्निकल) दृष्ट्या विशेष अभ्यास अथवा संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची खास शिक्षणाची सोय व आवश्यक त्या मार्गदर्शनाची सोय करणे आणि त्या विद्यार्थ्यांना त्या कामी आवश्यक त्या अन्य सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणे.

४.५ प्रबोधिनीचे संकल्पित उद्देश साधण्यासाठी

४.५.१ – विविध वयोमयदिच्या विद्यार्थ्यांना अनुरूप अशा शिक्षणसंस्था आणि संशोधनसंस्था स्थापन करणे आणि त्या चालविणे.

४.५.२ – भारतातील आणि भारताबाहेरील शिक्षणसंस्थांशी, संशोधन-संस्थांशी, कारखान्यांशी, शेतकी संस्थांशी, धार्मिक व सामाजिक संस्थांशी, बँकांशी, विमा कंपन्यांशी, नाविक (शिपिंग) कंपन्यांशी अथवा अन्य उपयुक्त संस्थांशी आणि व्यक्तींशी संबंध निर्माण करणे आणि त्यांचे सहकार्य संपादन करणे.

४.५.३ – सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांकडून ज्ञान प्रबोधिनीच्या उद्देशांशी सुसंगत अशा स्वरूपाच्या कार्यासाठी उपलब्ध करून दिली जाणारी संधी आणि सोय यांचा उपयोग करून घेणे आणि ज्ञान प्रबोधिनी त्या संस्थांना त्या कामी शक्यतोवर पूरक बनविणे.

४.६ विद्यार्थिदशा ओलांडलेल्या व्यक्तींच्या गुणविकासासाठी व्याख्यानमाला, शिक्षणवर्ग, चर्चासत्रे इत्यादी चालविणे, नियतकालिके, पुस्तके, पत्रके काढणे इ. उपक्रम करणे. त्यासाठी आवश्यक त्या अन्य संस्था स्थापन करणे व त्या चालविणे.

४.७ संस्थेच्याद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करणे, त्यासाठी माहिती केंद्रे स्थापन करणे आणि त्यांना योग्य तो व्यवसाय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.

४.८ संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी व विकासासाठी संस्थेच्या उद्देशांशी सुसंगत अशा अर्थोत्पादनाच्या स्वायत्त संस्था व उद्योगधंदे काढणे आणि ते चालविणे.

४.९ ज्ञान प्रबोधिनीच्या कायनि लवकरात लवकर मुक्त विद्यापीठाचे (ओपन युनिव्हर्सिटीचे) स्वरूप धारण करावे असा हेतू आहे. म्हणून जगातील अनेक विद्यापीठांमधून जे जे विषय शिकविले जातात ते शिकविणे, जी नवनवीन शास्त्रे उदयाला येत असतात त्यांचे शिक्षण देणे, त्यासाठी त्यांचे अभ्यासक्रम ठरविणे, त्या विषयातील छोट्या अभ्यासक्रमापासून पदविका, पदवी, पदव्युत्तर अथवा संशोधन पदव्या देणे, त्या विषयांच्या अभ्यासाची जमेल तसतशी सोय करणे, त्यांच्या व्यावहारिक अनुभवासाठी (प्रॅक्टिकल एक्स्पीरिअन्स) सर्व प्रकारचे प्रयोग करणे, त्यासाठी साधनसामग्री जमविणे, प्रयोगशाळा अथवा प्रयोगक्षेत्र उभारणे, प्रकल्प अथवा योजना अंगीकारणे अशा त-हेचे उपक्रम करणे.

४.१० याखेरीज संस्थेचे संकल्पित उद्देश साधण्यासाठी इष्ट वा आवश्यक ते सर्व उपक्रम करणे.