दिपावलीतील लक्ष्मीपूजन

पुढील लिंक वर संपूर्ण पोथीची PDF उघडता येईल लक्ष्मीपूजन पोथी

लक्ष्मीपूजनाचे महत्त्व

आश्विन वद्य अमावास्येला सायंकाळी लक्ष्मीदेवतेचं पूजन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. खरं तर रोजच सायंकाळी घराची दारं लक्ष्मीच्या स्वागताला उघडी ठेवून, देवापुढे दिवा लावून, आपण शुभंकरोति म्हणतो,  त्यात “घरातली इडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो,  घरच्या धन्याला उदंड आयुष्य देवो ” अशी प्रार्थना आपण करतोच. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या प्रार्थनेचं विशेष महत्त्व आहे. बलिप्रतिपदेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवतानुसार नवीन वर्ष सुरू होतं. अनेक व्यापार-व्यावसायिकांचं आर्थिक वर्षही दिवाळीच्या पाडव्यापासून  सुरू होतं. त्यामुळे हिशेबाच्या नवीन वह्यांची आदल्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजा करतात. त्यावेळी जुन्या वह्याही काही लोक पूजेत ठेवतात. तिजोरी-तराजू-लेखण्यांची देखील पूजा करण्याची काही ठिकाणी पद्धत असते. यामागील भाव आणि विचार समजून घ्यावा.

हो उदंड येथे नीतिमंत श्रीमंती । या घराघरातुन वसो क्षेम-सुख-शांती ।

सचोटीने, नीतीने,कष्ट करून पुष्कळ संपत्ती मिळवावी, घरात समृद्धी, समाधान, शांती असावी, ‘ईशावास्यम् इदं सर्वम् ’ असं म्हणत आपल्याला मिळालेलं धन देवाला अर्पण करून त्याचा प्रसाद म्हणून ते स्वीकारावं असं आपल्या पूर्वजांचं सांगणं आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आणि भगवान विष्णूंची पत्नी. भगवान विष्णू हे जगाचे पिता, म्हणून लक्ष्मीला त्रिभुवनाची माता समजतात. विष्णू म्हणजे विशाल, सर्व काही व्यापणारा असा विचार करणार्‍या व्यक्तीला धन-समृद्धी मिळते असे मानले जाते.  चांगल्या मार्गाने धन मिळविणं ही आईची पूजा आहे असं मानतात आणि दुसर्‍याला   फसवून, कपटाने, भ्रष्टाचाराने मिळविलेलं धन म्हणजे आईचा अनादर होय असे आपण मानतो. वहीपूजन करण्यामागचा भाव असा असतो की पराक्रम-पुरुषार्थाने आम्ही वर्षभरात उदंड संपत्ती मिळवावी. देवापुढे नि:शंक मनाने ठेवता येतील एवढे आमचे आर्थिक व्यवहार निर्मळ, प्रामाणिक असावेत.

प्रत्येकच उद्योग, व्यापार, व्यवसाय ही ईश्वराची पूजा होवू शकते. त्यामुळे व्यवसायाची साधनं ही एक प्रकारे  पूजेचीच साधनं असतात, मग ती लेखणी असो, तराजू असो, नांगर असो की यंत्र असो. या सर्वांची पूजा आपण दसर्‍या-पाडव्याला करतो. घरातील पवित्र ग्रंथ, विद्यार्थ्यांची पुस्तकेही पूजेत ठेवतो. ज्या साधनांच्या आधारे जीवनात आपण यश मिळवितो त्या साधनांबाबत अशा रीतीने कृतज्ञतेचा भाव आपण व्यक्त करीत असतो.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्यं मनात रुजतात; म्हणून या पूजेची विशेषता आहे.

वाच. स्वर्णलता भिशीकर

पूजेची तयारी

लक्ष्मीपूजनाच्या आधी स्वच्छतागृहासहित घर लख्ख करावं. दारात सुंदर रांगोळी काढावी, पणत्या लावाव्यात, दारावर मंगलतोरणं बांधावीत.

चौरंगावर शाल किंवा स्वच्छ वस्त्र घालून त्यावर एका चांदीच्या किंवा निष्कलंक लोहाच्या (स्टीलच्या) वाटीत लक्ष्मीची मूर्ती किंवा टाक अथवा नाणी ठेवावीत. दुसर्‍या वाटीत कुबेरपूजेसाठी चलनी रूपये, नाणी ठेवावीत. आपल्या कामाची साधनं (वह्या, लेखणी, तराजू किंवा अन्य काही) मांडावीत. एका कलशात  पाणी भरून त्यात किंचित हळद-कुंकू, कापूर, अक्षता, एक फूल, एक सुपारी, एखादे नाणे घालून ठेवावे. वर विड्याची किंवा आंब्याची पाच पानं लावून त्यावर नारळ ठेवावा. कलशावर कुंकवाचं स्वस्तिक काढावं. चौरंग किंवा पाटावर अक्षता ठेवून त्यावर कलश ठेवावा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे अक्षतांवर सुपारीचा गणपती मांडावा. शंख, घंटा, समई ठेवावी. दिलेल्या यादीनुसार साहित्याची तयारी असावी. खारका, बदाम या पूजेतील अत्यावश्यक गोष्टी नव्हेत. ज्यांना त्या ठेवाव्याशा वाटतील त्यांनी त्या ठेवाव्यात. नंतर प्रसाद म्हणून त्यांचं वाटप करावं. पूजेच्या वेळी घरातील सर्वांनी मंगल तिलक लावून, स्वच्छ कपडे घालून पूजेला ओळीत, शिस्तीने बसावं. घरातील कर्त्या पुरुषाने अथवा स्त्रीने वा दोघांनी यजमान म्हणून पूजेस बसावं.

अधिक माहिती साठी लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ पाहावा .