मागे वळून बघताना २ – एकल महिला

गेल्या लेखात आपण एकल महिलांची अभिव्यक्ती असा विषय पाहिला. एकदा विषय लक्षात आल्यावर मग स्वस्थ बसू देईना. एकल बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली… काही विधवा असतात, काही परित्यक्ता, तर काहींचे काही कारणाने लग्नच झालेले नसते…मग अपंगत्व असेल किंवा मतिमंदत्व! जेवढा भाग अविकसित, शिक्षण कमी तेवढं महिलांना जास्त फसवलं जातं याचे अनेक किस्से या बचत गटाच्या बैठकीमधून समजले. असं वाटायला लागलं की आता फक्त एकल महिलांच्या कल्याणासाठी काहीतरी भरीव करूया. नक्की सुरुवात कुठून करायची हे लक्षात येईना म्हणून प्रश्न निट समजून घेण्याच्या दृष्टीने एकल महिलांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली. जरी त्या एकल असल्या हे सगळ्यांना माहिती असलं, तरीही मनात त्यांना कुठेतरी संकोच होता की ‘मी एकल आहे हे कुठे जाहीर करू नये’ स्वाभाविक होतं कारण सामाजिक सुरक्षा ही त्याच्याशी निगडित होती. मेळाव्यात १५०-२०० जणींशी बोलल्यावर, त्यांनी माहिती दिली म्हणून शासकीय योजनांचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की शासन या एकल महिलांचं जगणं सुसह्य होण्यासाठी खूप सोयी/ सवलती देतं.मग मात्र असं ठरवलं की सर्व एकल महिलांचा डेटा गोळा करायचा. गेल्या आठ वर्षात जवळजवळ साडेचारशे महिलांची वैयक्तीक माहिती गोळा झाली. ही माहिती गोळा करताना गटाच्या लक्षात येत होतं की कुठल्या वयाला महिला एकल झाली त्यावरही उत्तर वेगवेगळी होती. जर एकल महिलेला फक्त मुली असतील तर अनेकदा ते माहेरी येते पण जर मुलगा असेल, म्हणजेच वंशाचा दिवा असेल, ज्याचं उद्या शेताच्या सातबाऱ्यावर त्याचं नाव लागू शकेल असा असेल तर अनेकदा ती सासरी राहते. एकल महिलांचा मुख्य प्रश्न म्हणजे अस्तित्वाचा आहे. शासकीय सवलती मिळंत असल्या तरीही महिला त्या सवलती घेत नव्हत्या कारण अस्तित्वाचे पुरावे नाहीत, बँकेत खाते नाही….. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शासकीय कार्यालयातल्या पुरुष अधिकाऱ्याशी संवाद करण्याची धास्ती! मेळाव्यामध्ये शासकीय योजनांच्या सर्व सवलतींची माहिती द्यायला सुरुवात केली. योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी अर्ज करण्याचं धाडस कोणाचंही होत नव्हतं, मग प्रबोधिनीच्या ताईलाच हे काम सांगितलं…. सांगितले म्हणण्यापेक्षा तिनेच करायचं ठरवलं. एकेकीचे कागदपत्र तहसील कचेरीत द्यायला सुरुवात केली. मग पुढच्या प्रश्नांना सुरुवात झाली म्हणजे काय झालं तर एकल महिलेला शासन मदत करतं जर तिचं रेशन कार्ड स्वतंत्र असेल तर! पण जर एकल महिला सासरी रहात असेल आणि कुटुंबप्रमुख म्हणून रेशन कार्डवर सासऱ्याचं नाव असेलं तर ती कुठल्या तोंडाने सासर्‍याला सांगणार असते की मला माझं मुलांच्या सकट रेशन कार्ड वेगळे करून द्या? …… फक्त नियम करून आणि योजना करून पुरंत नाही हे आपल्याला समजलं. मग अशा सासरच्या मंडळींना आपल्या कार्यकर्त्यांनी घरी जाऊन पटवलं की ‘दादा तुमच्या घरात फूट पाडायची किंवा तुम्ही सांभाळत नाही म्हणून एकल महिलेचे वेगळे रेशन कार्ड नकोय पण हे वेगळे रेशन कार्ड केलं तर सरकार तिला काही मदत करेल तुमच्यावरचा भार थोडा कमी होईल’…. 2024 मध्ये एकल महिलेला शासन पेंशन म्हणून महिन्याला १३००/-₹ आणि दोन मुलांना प्रत्येकी १३००/-₹ (१८ वर्षापर्यंत) देते. असे ३९००/-₹ दरमहा मिळाले तर गावातल्या किमान गरजा भागतातच… मग कोणाचं मिंधेपण येत नाही… अगदी सासऱ्याचं नाही तर भावाचं सुध्दा!‘ती’च्या आत्मसन्मानासाठी असं पेंशन मिळवून देण्याचे काम हळूहळू एकेकी सोबत केले. अनेक विनापत्य वृद्ध दांपत्यही अशा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी होण्यासाठी आली… त्यांना ही आपण मदत केली. आज सांगायला अतिशय आनंद होतो की शासनाच्या या योजनांमधून आपण केलेल्या कामांमधून गेल्या काही वर्षात साधारण ७२ लाख रुपयाची आर्थिक मदत जिच्या तिच्या खात्यात पोहोचवली आहे. शासनाकडे अर्ज केल्यानंतर आपला अर्ज केराच्या टोपलीत जाऊ नये म्हणून त्याला इनवर्ड नंबर घातला जातो आहे ना याची खातर जमा करायची असते, इथपासून आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. हे सर्व काम तालुक्यामधल्या तहसील कचेरी मधून केले. कचेरीतील सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय मनापासून मदत केली. एकदा मेळाव्यात २०-२५ एकल महिलांची कागदपत्र जमा झाली तर पुढच्या कामासाठी आपली ताई अधिकारी ऑफिसमध्ये आहेत ना? हे बघायला गेली तर साहेब स्वतः म्हणाले, ‘एवढ्या सगळ्या जणींनी माझ्याकडे येण्यापेक्षा इनवर्ड रजिस्टर आणि शिक्का घेऊनच मी तुमच्या कार्यालयात येतो’ आणि त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यालयात बसून आलेल्या सगळ्या एकल महिलांचे काम पूर्ण केले. एरवी शासनाकडे दिरंगाई होण्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकतो पण एकल महिला विषयात एकही अशी तक्रार करायला आम्हाला जागा नाही, हे सांगायला आनंद होत आहे. तर अशा रितीने आपण गेली ९वर्ष एकल महिलांसाठी काम सुरू केले. कधी खेळत्या भांडवलातून भांडवल देऊन उद्योग सुरु करायला मदत केली तर कधी एकल मातेच्या मुलीला शिक्षणासाठी स्कॉलरशीप दिली. कधी त्यांचीच फक्त अनुभव समृद्ध करणारी सहल सुध्दा काढली. या कामातून एकल महिलेलाही ‘व्यक्ती’ म्हणून सन्मानाने जगता येते अशी अनेक उदाहरणेग्रामीण समाजात तयार झाली. त्यामुळे आता गावातील मेळाव्यातही उजळ माथ्याने यांचा वावर सुरु झाला. कोणी वाटी नसणारी काळी पोत गळ्यात घालायला लागली तर कोणाच्या कपाळावर पुन्हा टिकली दिसायला लागली. सहज घडत गेलं…… आता अशा अनेक एकल महिला, इतर एकल महिलांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे अशा स्त्री शक्ती प्रबोधननाच्या कामाला लागल्या आहेत….

1 thought on “मागे वळून बघताना २ – एकल महिला”

  1. नऊ वर्षांचा प्रवास वाचायला काही मिनिटे लागली. पण काळी पोत घालणे किंवा टिकली लावायाला लागले हा आत्मसन्मान जागा करणारा आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण करणा-या आपणां सर्वांचे कौतुक. हॅटस् ऑफ टू यू ऑल

Comments are closed.