प्रस्तावना
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, योगी अरविंद अशा थोर नेत्यांनी गीतेच्या अर्थाचे विवरण आपापल्या विचारानुसार केले. त्यामध्ये स्वातंत्र्याच्या प्रयत्नांसाठी समाजाला जागृत करणे हा सर्वांचा एकच हेतू होता. गीतेचा संदेश सांगून स्वातंत्र्य चळवळीला प्रवृत्त करणे हा जागृतीचा एक प्रकार होता. स्वातंत्र्य मिळवून देशातल्या व्यक्तीने कोणत्या ध्येयासाठी जगावे या विचाराला प्रवृत्त करणे हा गीतेचा संदेश सांगून जागृती करण्याचा दुसरा प्रकार होता.
ज्ञान प्रबोधिनीच्या प्रबोधकांनी यथाशक्ती, यथाकाल सर्वच नेत्यांनी केलेले गीतार्थाचे विवरण अभ्यासावे अशी अपेक्षा आहे. पण स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्रघडणीसाठी प्रवृत्त होता यावे म्हणून प्राधान्याने लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचावे. ते जमेपर्यंत निदान विनोबांची गीता प्रवचने वाचावीत, असे आपण सुचवतो. तसेच संपूर्ण गीता समश्लोकी गीताईसह एकदा तरी वाचलेली असावी, गीतेचे काही अध्याय पाठ असावेत, अशीही प्रबोधकांकडून अपेक्षा असते.
या अपेक्षा बऱ्याच वेळा एकट्याला पूर्ण करताना प्रेरणा कमी पडते. त्यामुळे युवक व युवतींसाठी कधी गीतेच्या अभ्यासाची, तर कधी गीतारहस्याच्या अभ्यासाची शिबिरे, आपण प्रबोधिनीत योजतो. या शिबिरांमध्ये गीतेतील श्लोकांचे सामुदायिक पठणही होते.
पठणाच्या सोयीसाठी अनेकांनी गीतेचे सार म्हणून काही थोड्या श्लोकांचे संकलन केले आहे. अशाच एका गीतारहस्य अभ्यास शिबिराच्या वेळी कल्पना सुचली की प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांना व विद्यार्थ्यांना गीतेचा अभ्यास का करायचा हे थोडक्यात कळेल असे निवडक श्लोकांचे संकलन आपणही करावे. मला कळलेले गीतेचे सूत्र म्हणजे ‘विज्ञानाधिष्ठित राष्ट्रकेन्द्रित कर्मयोग’. गीतेतले विज्ञान भौतिक विज्ञान नसून आध्यात्मिक विज्ञान आहे. गीतेत राष्ट्र शब्द नसला तरी ‘मी कर्म केले नाही तर हे श्लोक नष्ट होतील’ असा तीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे.
हे सूत्र मनात ठेवून श्लोक मी निवडायच्या ऐवजी विविध संस्कार पोथ्या, विशेष उपासनांच्या पोथ्या, ज्ञान प्रबोधिनी खंड 2 मधील लेख, कै. आप्पांच्या भाषणांचे ‘राष्ट्रदेवो भव’ हे पुस्तक आणि त्यांनी लिहिलेले ‘श्री माताजी-श्री अरविंद काय म्हणाले?’ हे पुस्तक, यातून कै. आप्पांनी उद्धृत केलेले श्लोकच मी एकत्र केले. असे एकूण 27 श्लोक मिळाले. त्यांचा क्रम लावायचा प्रयत्न मी केला. गीतेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग यांचे महत्त्व सांगणारे श्लोक आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या प्रार्थनेतही ‘ज्ञान-कर्म-युत भक्ति-व्रत’ आचरू असा संकल्प आहे. या 27 श्लोकांचे कर्माला पुढावा देणारे, भक्तीचा पुरस्कार करणारे आणि ज्ञानाचे महत्त्व सांगणारे असे वर्गीकरण करण्याचाही प्रयत्न केला आहे. निवड आधी झाली होतीच. फक्त वर्गीकरण करून व राष्ट्रकेन्द्रित कर्मयोग सूत्राला अनुसरून क्रम मी ठरवला.
एवढे काम 2010 मध्येच गीतारहस्य अभ्यास शिबिराच्या आधी झाले. त्या शिबिरात आणि नंतरही दोन शिबिरांमध्ये हे श्लोक सगळ्यांनी म्हटले. पण श्लोक म्हणण्याबरोबर त्यांच्या अर्थावरही विचार झाल्याशिवाय त्यातले सूत्र मनात रुजणार नाही असे वाटले. म्हणून ही निरूपणे लिहिण्याचा विचार सुचला.
गीतेतल्या श्लोकांचा केवळ अर्थ उलगडून सांगणे, असे या निरूपणांचे स्वरूप नसेल. प्रबोधिनीचा ध्येयविचार त्यांतून कसा उलगडतो व समाजाभिमुखतेसह त्या ध्येयविचाराचा आध्यात्मिक पाया कसा स्पष्ट होतो, हे दाखवण्यासाठी ही निरूपणे लिहिली आहेत. व्यक्तिगत शांती, समाधान, जिज्ञासापूत किंवा मोक्षासाठी मार्गदर्शन असा या निरूपणांचा हेतू नाही. ‘समाजार्थ निःस्वार्थ सेवा कराया’ साठी प्रेरणा जागरण हा हेतू निरूपणे लिहिताना ठेवला आहे.
गिरीश श्री. बापट
(संचालक ज्ञान प्रबोधीनी)
(सौर आषाढ 13, शके 1943, दि. 4 जुलै 2021)