२७. ज्योती असे मी विमल निरागस ईवरचरणी समर्पिता

२७. ज्योती असे मी विमल निरागस ईवरचरणी समर्पिता

ज्ञान प्रबोधिनीमध्ये प्रचलित असलेल्या उपासनेमध्ये गायत्री मंत्राशिवाय आणखी आठ संस्कृत मंत्र आहेत. त्या सर्व मंत्रांमध्ये ‌‘विरजा‌’ हा शब्द आहे. म्हणून त्यांना विरजा मंत्र म्हणतात. त्याशिवाय प्रत्येक मंत्रामध्ये ‌‘शुद्ध होवो‌’ या अर्थाचे ‌‘शुध्यन्ताम्‌‍‌’ हे क्रियापदही आहे. त्यामुळे प्रबोधिनीमध्ये या मंत्रांना शुद्धिमंत्र असेही म्हणतो. संन्यासी जेव्हा संन्यास घेतात, तेव्हा जो होम केला जातो, त्याला ‌‘विरजा होम‌’ असे म्हणतात. त्यावेळी एक-एक विरजा मंत्र म्हणून त्या होमात आहुती दिली जाते. प्रबोधिनीमध्ये मात्र ब्रह्मचारी, गृहस्थ, गृहिणी, संन्यासी या सर्वांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व अंगांच्या शुद्धीसाठी हे मंत्र म्हणावेत अशी योजना केली आहे.

या शुद्धिमंत्रांमध्ये आपले शरीर, कर्मेंद्रियांची चालकशक्ती, ज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी हे सर्व शुद्ध व्हावेत असे संकल्प सुरुवातीला करायचे असतात. शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी हीच आपल्याला जाणवणारी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुख्य अंगे आहेत. ती शुद्ध होवोत असा संकल्प रोज मनःपूर्वक केला व त्यासाठी तसे प्रयत्न केले, तर व्यक्तिमत्त्वाची ही सर्व अंगे माझी आहेत असे मानणारा ‌‘मी‌’ सुद्धा शुद्ध होत जातो.

मागच्या आठवड्यातील लोकात ज्ञेय तेच ज्ञान, आणि ते सर्वांच्या हृदयातच असते असे सांगितलेले आहे. ‌‘मी‌’ शुद्ध झाल्यावर आपणच ते ज्ञेय व ज्ञान आहोत, ज्योतीरूप आहोत, हे समजते. म्हणूनच या प्रत्येक शुद्धिमंत्रामध्ये ‌‘ज्योतिरहं‌’- मी ज्योतिरूप आहे, हे शब्दही आले आहेत. परंपरेने हनुमानाच्या तोंडी एक श्लोक सांगितला जातो. त्यात हनुमान श्रीरामांना म्हणतो, मला जेव्हा मी शरीर आहे असे वाटते, तेव्हा मी तुमचा दास आहे. मला जेव्हा मी जीव आहे असे वाटते, तेव्हा मी तुमचा अंश असतो, आणि जेव्हा मी ज्योती आहे हे मला आठवते, तेव्हा मी आणि तुम्ही एकच असतो. शरीराने, जीवरूपाने किंवा ज्योतिरूपाने या पैकी कोणत्याही प्रकाराने सर्व काळ रामाचे म्हणजे ईश्वराचे स्मरण होण्यालाच सर्व भावांनी ईश्वराला शरण जाणे असे पारंपरिक भाषेत म्हणतात. यासंबंधी गीतेत पुढील श्लोक आलेला आहे.

गीता 18.62 :          तमेव शरणं गच्छ, सर्वभावेन भारत |

                           तत्प्रसादात्‌‍ परां शान्तिं, स्थानं प्राप्स्यसि शावतम्‌‍ ॥   

गीताई 18.62 :        त्याते चि सर्व-भावे तू जाई शरण पावसी

                            त्याच्या कृपा-बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत

‌ ‘ज्ञान प्रबोधिनी, एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड : 2‌’ मध्ये ‌‘आजच्या युगातील अद्वैत तत्त्वज्ञान‌’ या शीर्षकाचा कै. आप्पांचा लेख आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदाचे उपशीर्षक म्हणून या श्लोकाची ‌‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत‌’ ही पहिली ओळ आलेली आहे (पान 75). दास आपल्या स्वामीला कायम शरण गेलेला असतो. म्हणजे सर्व बाबतीत तो आपले स्वामी जे सांगतील तेच करतो. त्याची स्वतःची काही इच्छा नसते. हनुमान श्रीरामाला या अर्थाने शरण गेलेला होता. आधुनिक शिक्षित मनाला शरण जाणे ही कल्पनाच बोचते. म्हणून कै. आप्पांनी यासाठी विज्ञानातील अनुनादन (resonance) हा शब्द वापरला आहे. तंबोऱ्याची एक तार छेडली, की त्याच स्वरात लावलेल्या दुसऱ्या तंबोऱ्याची तार अनुनाद करायला म्हणजे आपोआप पाठोपाठ झंकारायला लागते. इथे दुसऱ्या तंबोऱ्याच्या तारेला झंकारायचे की नाही हे ठरवायचे स्वातंत्र्य नसते. पारंपरिक भाषेत ती पहिल्या तंबोऱ्याच्या तारेला शरण गेलेली असते. हनुमान शरीरानिशी रामाचा दास होता. कारण जीवरूपाने त्याचा जीव रामाच्या इच्छेप्रमाणे अनुनादित होत होता. हनुमान सर्व भावाने रामाला शरण गेला होता. म्हणून ते अनुनादनही रामाच्या इच्छेचे केवळ हनुमानच्या शरीरातील प्रकटीकरण होते.

प्रबोधिनीची स्थापना 1962 साली झाली. 1979 साली लिहिलेल्या या लेखात कै. आप्पांनी म्हटले आहे, तोवरच्या ‌‘सतरा वर्षातील प्रबोधिनीचे यश प्रबोधिनीत चालणाऱ्या नित्य उपासनेमध्ये आहे. स्वतःला परिपूर्ण शरण करून आपल्या अंतःकरणाची स्पंदने परब्रह्मशक्तीच्या स्पंदनांशी जोडायची ही भारतीय अध्यात्माची देणगी आहे. प्रबोधिनीत दैनंदिन उपासनेच्या रूपाने तिचे जतन व वर्धन होत असते. ते तसे सातत्याने घडले पाहिजे‌’ सर्वभावाने शरणता साधली, की या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीतील परम शांती किंवा अढळ स्थिती, ज्योतींची ज्योती असलेल्या त्या परमेश्वराचा प्रसाद म्हणून आपल्याला मिळते. आपण मनुष्यत्वाकडून विकसित मनुष्यत्वाकडे जाणे म्हणजेच देवमानव होणे हाच तो प्रसाद. म्हणूनच प्रबोधिनीच्या संकल्पगीतात ‌‘देवत्वाप्रत खचित पोचतिल पथिकसंघ येथले‌’ असे म्हटले आहे. पथिकसंघ म्हणजे आपण सर्व.