अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग – १

निरूपण –

मी प्रबोधिनीत पद्य म्हणायला लागलो, त्या काळात पद्य कोणी लिहिले आहे हे विचारायची आणि सांगायची पद्धत नव्हती. पद्य गायचे असते. ते स्फूर्तीगीत तरी असते किंवा समरगीत तरी असते किंवा संचलनगीत तरी असते, आणि म्हणताना वैयक्तिक गीत असते किंवा समूहगीत असते, एवढेच पद्यांचे प्रकार माहीत असत. ‘विकसता विकसता विकसावे’ हे पद्य दहा-बारा वर्षे म्हणत होतो आणि सांगतही होतो. कैलासवासी आप्पांचे एके दिवशी पहाटे निधन झाले. संध्याकाळी त्यांच्या देहावर अग्निसंस्कार झाले. दुसऱ्या दिवशी अस्थीविसर्जनासाठी आठ-दहा जण आळंदीला गेलो होतो. अस्थीविसर्जन झाल्यावर तिथेच सर्वजण गोलाकारात बसलो होतो. कोणीतरी म्हणाले, आप्पांनी लिहिलेले पद्य म्हणूया आणि सगळ्यांनी ‘विकसता विकसता विकसावे’ हे पद्य म्हणायला सुरवात केली. प्रबोधिनीत आल्यावर चौदा वर्षांनी मला कळले की हे पद्य आप्पांनी लिहिलेले होते.

विकसता विकसता विकसावे
घडविता घडविता घडवावे
मिळविता मिळविता मिळवावे
विजय प्राप्त असे तळपावे ||१||

प्रबोधिनीचे काम काय? त्याचेच वर्णन पहिल्या कडव्यापासून सुरू होते. प्रत्येक क्रियापद तीन-तीन वेळा आले आहे. प्रत्येक क्रिया सतत अखंडपणे चालू ठेवायची आहे हे सुचविण्यासाठी तसे केले आहे. आधी स्वतःचा विकास आयुष्यभर करत राहायचे. ‘माझे शिकणे संपले किंवा माझा आणखी विकास होणे शक्य नाही’ असे कधीही म्हणायचे नाही. स्वतःचा विकास करता करता काय करायचे? तर, घडवायचे. म्हणजे सतत उत्तम नवनिर्मिती करत राहायची आणि इतरांना घडवायचे. म्हणजे इतरांच्या विकासात त्यांना मदत करायची. त्यांनाही ‘माझे शिक्षण संपले किंवा माझा आणखी विकास शक्य नाही’ असे कधी म्हणू द्यायचे नाही. स्वतःच्या विकासाला, नवनिर्मिती करायला आणि इतरांच्या विकासात मदत करायला अनेक प्रकारची साधन सामग्री लागते. संपत्ती लागते, तंत्रज्ञान लागते आणि विविध कला, शास्त्रे आणि विद्या यांचे ज्ञानही लागते. या तीनही गोष्टी सतत नवीन नवीन आणि अधिकाधिक मिळवत राहायच्या. असा सातत्याने आयुष्यभर चालणारा स्वतःचा विकास करणे,  इतरांना घडायला मदत करणे आणि साधन सामग्री मिळवत राहून कामे घडवणे, हे जो करतो, त्याचा चेहरा तळपतो म्हणजे त्यावर तेज दिसते. त्याच्या वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास दिसतो. आणि कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची आकांक्षा त्याच्या डोळ्यांमध्ये दिसते. असे आपले व्यक्तिमत्त्व होण्यासाठी काय काय करायचे हे पुढच्या कडव्यांमध्ये सांगितले आहे.

मन विशाल समृद्ध करावे
मन प्रफुल्ल सदाचि हसावे
मन विवेकबळे उमलावे
मन त्वरे जनपदी रमवावे ||२||

व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंच्या वर्णनाला इथे मानसिक विकसनापासून सुरुवात केली आहे. कारण पहिल्या कडव्यातील कृतीचे सातत्य, विजयाकांक्षा आणि तेज हे मुख्यतः मनाचे गुण आहेत. ‘मिळविता मिळविता मिळवावे’ हे कशासाठी? तर मन विशाल आणि समृद्ध व्हावे ह्यासाठी. ‘हे विश्वचि माझे घर’ किंवा ‘वसुधैव कुटुंबकम्’ असे वाटणे म्हणजे मन भावनेने विशाल करणे. पण विश्वामध्ये जे जे आहे ते ते जाणून घेतले पाहिजे, असे कुतूहल किंवा जिज्ञासाही मनात सतत जागी असली पाहिजे. कोणत्या विश्वाला आपले घर म्हणायचे आहे, ते विश्व जाणून घेण्यासाठी, मन विशाल करावे लागते. दर्शन आणि आह्वान (Exposure and challenge) ही प्रबोधिनीच्या शिक्षणाची सूत्रे आहेत असे आप्पा म्हणायचे. नवनवीन अनुभवांना सामोरे जाणे, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मुद्दाम ठरवून घेणे, म्हणजे मनाला विश्वातील विविधतेचे दर्शन घडवणे (exposure देणे). पूर्वी, “केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार”, अशा भाषेत हेच सांगायचे. ह्यामुळे मन समृद्ध होते. समृद्धी म्हणजे अनुभवांच्या श्रीमंतीची भरभराट. भरभराट होणे म्हणजे, सतत भर पडत राहणे. असे होण्याला समृद्धी असे म्हणतात. मन विशाल व समृद्ध करण्याच्या नादात काहीवेळा चेहऱ्यावर ‘करीनच करीन’ अशी त्वेषाची आणि एकाग्रतेची भावना दिसायला लागते. असा चेहरा पाहून इतरांना आपल्यापासून अंतर ठेवावेसे वाटते. त्यामुळे या त्वेष आणि एकाग्रतेबरोबर मन प्रफुल्ल असावे, असे म्हटले आहे. म्हणजे जे मिळालेले आहे त्याचा आनंद मानणारे असावे. आणि तो आनंद चेहऱ्यावरच्या स्मित हास्याने सदैव दिसत राहावा असे मुद्दाम सांगितले आहे. ‘आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे’ असे म्हटले जाते. आहे तितक्याचा आनंद हा चेहऱ्यावरच्या हास्यातून कळला पाहिजे. तर आणखी विशाल आणि समृद्ध होण्याची इच्छा मनाच्या आतमध्येच राहिलेली चालेल. आहे त्याचे समाधान, आणि मिळवायचे आहे त्याबाबतचे असमाधान, याचा समतोल राखता येणे, ह्यालाच विवेक करणे असे म्हणतात. समाधानचे हास्य आणि असमाधानाचा त्वेष यांच्या समतोलाला, ‘मन विवेकबळे उमलावे’ असे म्हटले आहे. काय करावे व काय करू नये, काय धरावे व काय सोडून द्यावे, कशाच्या मागे पळावे आणि कशाकडे दुर्लक्ष करावे, ह्याची निवड करता येणे म्हणजेच विवेकाचे बळ आपल्याला मिळणे. या बळामुळे समाधान आणि असमाधान असे दोन्ही मनात मावू शकले की मग मन प्रफुल्ल झाले, विशाल आणि समृद्ध झाले, असे होते. असे विशाल, समृद्ध, प्रफुल्ल आणि विवेकाने उमललेले म्हणजे विकसित झालेले मन, ‘त्वरे’ म्हणजे अतिशय वेगाने लोकांचे हित करण्यात गुंतवावे, असे चौथ्या ओळीत सांगितले आहे. पंढरपूरला पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायावर डोके ठेवले म्हणजे यात्रा सफल झाली असे मानतात. आपला पांडुरंग म्हणजे आपले राष्ट्र, आपला समाज, या समाजातील सर्व लोक. त्यांच्या पायावर डोके ठेवणे, म्हणजे आपले सर्व विजय व मनाची सर्व श्रीमंती त्यांच्या हितासाठी उपयोगी आणणे. यालाच ‘मन जनपदी रमवावे’ असे म्हटले आहे. जनपदी म्हणजे लोकांच्या हितासाठी. रमवावे म्हणजे त्याचेच चिंतन करण्यात, त्याचाच विचार करण्यात, त्यासाठीच काम करण्यात आनंद मानणे.

तपविता तपविता तपवावे
तपपुनीत शरीर करावे
तपवुनी प्रतिभे उजळावे
तपगुणे मन मना मिळवावे ||३||

            कोणाचीही कुशाग्र बुद्धी, विशाल मन आणि बळकट शरीर ह्याचा उपयोग कुठपर्यंत होतो? तर शरीरात प्राण असेपर्यंत. प्राण आहेत तो पर्यंत शरीर, मन, बुद्धीच्या सर्व गुणांचे सामर्थ्य आहे आणि त्यांना अर्थ आहे. असलेली प्राणशक्ती चांगल्या रितीने वापरण्यासाठी, तिचा विकास करण्यासाठी, तप हे साधन आपल्याकडे सांगितले आहे. आपल्याकडे जी काही क्षमता आहे त्यापेक्षा थोडे अधिकचे उद्दिष्ट ठेवून, त्यासाठी धडपडणे म्हणजे तप करणे. या धडपडीचा त्रास वाटून न घेता ती आनंदाने सहन करणे म्हणजे तप. तपाशिवाय प्रगती नाही. आणि ‘तपविता तपविता तपवावे’ म्हणजे आयुष्यभर सतत कुठले तरी उद्दिष्ट गाठण्यासाठीचा प्रयत्न करत राहणे. प्राण तर आपल्याला दिसत नाहीत, ते आपल्याला फक्त जाणवतात. तपाने सबल व सक्रिय झालेल्या प्राणाचा परिणाम आपल्या शरीर, मन व बुद्धीवर झालेला दिसतो. तपाने काय होते? तर शरीर पुनीत होते, म्हणजे शुद्ध होते. शुद्ध शरीर म्हणजे निरोगी, आरोग्यसंपन्न, सामर्थ्यसंपन्न, चपळ, लवचिक, सहनशक्ती असलेले, असे शरीर होय. तपाने आणखी काय  होते? तर बुद्धीमध्ये प्रतिभाशक्ती वाढू लागते. सतत नवनवीन कल्पना, कामाच्या नवीन शक्यता, कर्तृत्वाची नवीन क्षितिजे, आपल्याला दिसायला लागली, म्हणजे बुद्धी प्रतिभेने उजळून निघाली. सूर्योदय झाल्यावर सर्व दिशांना प्रकाश पडतो, म्हणजे सर्व दिशा उजळतात. तसेच बुद्धीमध्ये प्रतिभा उजळली की आपल्या सगळ्या प्रयत्नांना, कामांना नाविन्याचा प्रकाश मिळतो. तपाने आणखी काय झाले पाहिजे? पुराणातल्या अनेक गोष्टींमध्ये तपस्वी ऋषी एवढ्या तेवढ्या कारणांनी रागावून जाऊन लोकांना शाप देतात असे वाचायला मिळते. तप हाताबाहेर गेल्याचे किंवा त्यावर नियंत्रण न राहिल्याचे हे परिणाम आहेत. तप नियंत्रणात राहिले, म्हणजे आपले मन इतरांमधील त्रुटी न पाहता त्यांच्यातले गुण पाहू लागते, आणि त्या गुणांसाठी त्यांच्याशी मैत्री करावी असे वाटू लागते. तप नियंत्रणात राहिले म्हणजे आपली संवेदनशीलता वाढून इतरांच्या अडचणी त्यांनी न सांगताच लक्षात येऊ लागतात. त्या दूर करण्याला आपण सहज प्रवृत्त होतो. इतरांच्या यशाचा आनंद वाटायला  लागतो. आणि इतरांच्या उपयोगी पडताना स्वतःला होणाऱ्या कष्टांकडे आपण दुर्लक्ष करू लागतो. ‘तपगुणे मन मना मिळवावे’ म्हणजे तपाच परिणाम म्हणून योग्य रितीने इतरांशी मैत्री, इतरांबद्दल करुणा, इतरांच्या यशात आनंद आणि  स्वत:च्या कष्ट, त्रास व दु:खाकडे दुर्लक्ष, या भावनांनी आपण इतरांशी मनाने एकरूप होऊन जावे. आधीच्या कडव्यात ‘मन त्वरे जनपदी रमवावे’ असे ह्याच अर्थाने म्हटले आहे. पद्याच्या उरलेल्या कडव्यांचे निरुपण पुढील रविवारी पाहू.

– गिरीश श्री. बापट


पद्य –

विकसता विकसता विकसावे ।। ध्रु. ।। 
घडविता घडविता घडवावे
मिळविता मिळविता मिळवावे
विजयप्राप्त असे तळपावे ।। १ ।।

मन विशाल समृद्ध करावे
मन प्रफुल्लसदाचि हसावे
मन विवेकबळे उमलावे
मन त्वरे जनपदी रमवावे ।। २ ।।

तपविता तपविता तपवावे
तपपुनीत शरीर करावे
तपवुनी प्रतिभे उजळावे
तपगुणे मन मना मिळवावे ।। ३ ।।