पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन

निरूपण –

लौकिक जीवनात वाढदिवस, लग्न-समारंभ, सत्कार-समारंभ अशा प्रसंगी उत्तमातली उत्तम, सर्वात शोभिवंत, सगळ्यांपेक्षा वेगळी अशी भेटवस्तू उत्सवमूर्ती व्यक्तीला देण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. यासाठी केलेल्या कष्टांना, खर्चाला कोणी समर्पण किंवा त्याग म्हणत नाही. उत्सवमूर्तीला मोठा पुष्पगुच्छ, आकर्षक शुभेच्छापत्र किंवा सुंदर कलाकृती भेट देण्यासाठी जेवढे धडपडू, तेवढे स्वतःचे बलसंपन्न शरीर, सुदृढ मन आणि तरल बुद्धी समाजाकरता, राष्ट्राकरता किंवा देवाकरता देण्यासाठी धडपडणारे लोक कमी दिसतात. असे करताना भेट देत आहोत, असे न वाटता त्याग करत आहोत असे अनेकांना  वाटते. जणू काही भेटी देणे हे आनंददायक आणि त्याग होणे क्लेशकारक अशी समजूत अनेकांची झालेली असते.

खरे तर सर्व बाजूंनी संपन्न आयुष्यही संपणार असतेच. सर्व फुले पूर्ण उमलल्यावर सुकून जातातच. सर्व फळे झाडावर पूर्ण पिकली की नंतर सडून जातातच. उमललेले फूल आणि पिकलेले फळ कोणाला दिले, तर आनंद होतो.  देण्यातून, समर्पणातून  दिलेल्या वस्तूचा त्याग होतो पण देण्याचा आनंद मिळतो. आपले सारे जीवन पूर्ण विकसित करून देण्याचा आनंद आपण घ्यावा व त्या जीवनातील सर्व प्रकारच्या कमाईचा त्याग झालेला लोकांना दिसला तर दिसू  द्यावा, यासंबंधीचे हे पद्य आहे. ज्यांना देतो त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये प्रेम असेल, तर ‘त्याग केल्याचे’ दुःख होत नाही. तर आपल्याला योग्य विनियोग करता आल्याचे समाधान मिळते. ‘त्याग केल्याचे’ इतरांना वाटते. जे उत्तमोत्तम आहे, ते देण्याला समर्पण म्हणतात. इतरांना समर्पणाची कृती कळत नाही. काय दिले हेच ते पाहतात आणि त्यावरचा आपला हक्क सोडण्याला ते त्याग म्हणतात. इतरांना त्यागमय वाटणारे जीवन आम्हाला मात्र समर्पणमय वाटते त्याबद्दलचे हे प्रबोधन गीत आहे.

आज तन, मन और जीवन, धन सभी कुछ हो समर्पण
राष्ट्र-हित की साधना में हम करें सर्वस्व अर्पण ॥ धृ. ॥

आपले तन म्हणजे शरीर आणि मन घेऊन आपण जन्माला येतो. त्या शरीरात प्राण असतो, तो पर्यंत आपले जीवन असते. यापैकी काहीच आपण मिळवलेले नाही. ते ज्या ईश्वराने तयार केले, ते त्याचे आहे, माझे नाही, याची जाणीव ठेवणे म्हणजे समर्पण करणे. या शरीर-मनाच्या साहाय्याने जमा झालेले धनही मग ईश्वराचेच आहे, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. त्या ईश्वराचे एक प्रतीक म्हणजे आपले राष्ट्र. दिसणाऱ्या व मनात येणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आपल्या वाटतात, त्या सर्व रोज राष्ट्रासाठी वापरण्याची सवय लागणे म्हणजे राष्ट्र‌हिताची साधना. मीच जर ईश्वराचा, राष्ट्रदेवाचा आहे, तर माझे सर्वच त्याचे आहे. सर्वस्व अर्पण म्हणजेच समर्पण. एक-एक गोष्ट अर्पण करत जायची. सर्व अर्पण करता आले की  समर्पण झाले.

त्याग कर हम शेष जीवन की सुसंचित कामनायें।
ध्येय के अनुरूप जीवन हम सभी अपना बनायें।
पूर्ण विकसित शुद्ध जीवन-पुष्प से हो राष्ट्र अर्चन ॥ १ ॥

सुसंचित कामनायें म्हणजे मी काय करीन आणि काय मिळवीन अशा सर्व अपूर्ण इच्छांचा साठा. त्याला सध्या ‘बकेट लिस्ट’ म्हणतात. राष्ट्रहिताची साधना करणे हे आमचे ध्येय. त्यासाठी आवश्यक तेवढ्या गोष्टी ‘बकेट लिस्ट’ मधून काढून घ्यायच्या आणि आपले व्यक्तिमत्त्व राष्ट्रहिताची कामे करायला योग्य बनवायचे. असे ध्येयसाधनेसाठी योग्य बनवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे पूर्ण विकसित जीवन-पुष्प. ते राष्ट्रहितासाठी वापरणे म्हणजेच राष्ट्र अर्चना करणे. राष्ट्र अर्चनेसाठी सर्व व्यक्तिमत्त्व अर्पण करण्याचा आनंद इतका असतो, की बकेट लिस्ट मध्ये मागे राहिलेल्या, म्हणजे शेष राहिलेल्या गोष्टींची आठवणही राहत नाही. त्याला इतर लोक त्याग केला असे म्हणतात. आपल्याला त्याग करावा लागत नाही, तो सहज घडतो.

यज्ञ-हित हो पूर्ण आहु‌ति, व्यक्तिगत संसार स्वाहा ।
देश के कल्याण में हो, अतुल धन भंडार स्वाहा ।
कर सकें विचलित न किंचित मोह के ये कठीण बंधन ॥२॥

राष्ट्र‌अर्चना करणे हाच यज्ञ. यज्ञ-हित म्हणजे यज्ञासाठी. यज्ञात आहुती अर्पण करताना स्वाहा म्हणतात. या यज्ञात आहुती द्यायची ती व्यक्तिगत संसाराची. म्हणजे राष्ट्रासाठी व्यक्तिगत संसारातील कामे, ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’  या पद्धतीने, बाजूला ठेवायची. स्वतःची सगळी संपत्ती भामाशाहने राणा प्रतापला सैन्याची पुन्हा उभारणी करण्यासाठी दिली. म्हणजे आपले धन भांडार देशाच्या कल्याणासाठी अर्पण केले. अलीकडचे उदाहरण लडाख-सियाचिनमध्ये सैनिकांना प्राणवायू पुरवणारी यंत्रे पोचवण्यासाठी आयुष्यभराची कमाई देणाऱ्या कुटुंबाचे आहे. व्यक्तिगत संसार आणि स्वतःची संपत्ती सर्वात महत्त्वाची वाटणे म्हणजे मोहाचे बंधन. आपल्याला या बंधनामुळे राष्ट्रअर्चनेसाठी पुढे होण्यात चालढकल कराविशी वाटली, म्हणजे आपले लक्ष यज्ञातून विचलित झाले किंवा ढळले. तसे होऊ नये हा आमचा संकल्प आहे.

हो रहा आह्वान तो फिर कौन असमंजस हमें है|
उच्चतम आदर्श जीवन प्राप्त युग-युग से हमें है|
हम ग्रहण कर ले पुनर् वह त्यागमय परिपूर्ण जीवन ॥३॥

विकसित जीवन म्हणजे सर्व क्षमता व कौशल्ये मिळवलेले जीवन.  ते राष्ट्राला समर्पित करता आले म्हणजे जीवन परिपूर्ण झाले. समर्पण करताना व्यक्तिगत संसार आणि धनसंपदा यांच्या मोहात अडकलो नाही, की लोक त्याला त्यागमय म्हणतात. अशा राष्ट्रसमर्पित जीवनाचा आदर्श युगा-युगांपासून, म्हणजे पुरातन काळापासून आपल्यासमोर आहे. तो आदर्शच पुन्हा पुन्हा आपल्यासमोर ठेवूया. हा आदर्श स्वीकारण्याचे आह्वान, सध्याची परिस्थिती आपल्या समोर ठेवत आहे. ते स्वीकारण्यात ‘कौन असमंजस’ म्हणजे करावे की करू नये असा गोंधळ आमच्या मनात कसा असू शकेल ? अर्थात हे आह्वान आम्ही स्वीकारणारच.


पद्य –

आज तन, मन और जीवन, धन सभी कुछ हो समर्पण
राष्ट्र-हित की साधना में हम करें सर्वस्व अर्पण ॥ धृ. ॥

त्याग कर हम शेष जीवन की सुसंचित कामनायें।
ध्येय के अनुरूप जीवन हम सभी अपना बनायें।
पूर्ण विकसित शुद्ध जीवन-पुष्प से हो राष्ट्र अर्चन ॥ १ ॥

यज्ञ-हित हो पूर्ण आहु‌ति, व्यक्तिगत संसार स्वाहा ।
देश के कल्याण में हो, अतुल धन भंडार स्वाहा ।
कर सकें विचलित न किंचित मोह के ये कठीण बंधन ॥२॥

हो रहा आह्वान तो फिर कौन असमंजस हमें है|
उच्चतम आदर्श जीवन प्राप्त युग-युग से हमें है|
हम ग्रहण कर ले पुनर् वह त्यागमय परिपूर्ण जीवन ॥३॥

2 thoughts on “पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन”

  1. खूपच छान, समर्पण त्याग, राष्ट्र हितासाठी जीवन असा मोठा आशय सोप्या भाषेत समजवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *