निरूपण –
साध्या सोप्या चालीतले आजचे पद्य अनेक संघटनांमध्ये म्हटले जाते. आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्याचे त्यात एक साधक आणि तपस्वी म्हणून वर्णन केले आहे. मी १९८६ साली कोलकाता येथे काही दिवस मुक्कामी असताना योगसाधना करणाऱ्या तेथील एका महाराष्ट्रातील कार्यकर्त्याने या पद्यासंबंधी माझ्याशी बोलताना ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचे उदाहरण दिले होते. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात योगमार्गाचे वर्णन करताना ‘जिये मार्गीचा कापडी | महेशु आझुनी॥’ असे दोन चरण एका ओवीच्या शेवटी आले आहेत (ज्ञानेश्वरी ६.१५३). कापडी म्हणजे यात्रेकरू किंवा प्रवासी. महेशु म्हणजे श्री शंकर. या योगमार्गावर श्रीशंकरही अजून चालतच आहेत, मुक्कामावर पोचलेले नाहीत. म्हणजे हा निरंतर चालत राहण्यचा मार्ग आहे, असा या चरणांचा अर्थ आहे. ध्येयाकडे जाण्याचा मार्ग पण कधी संपणार नाही असे वाटेल, इतक्या लांब प्रवासाचा आहे असे या पद्यात म्हटले आहे.
दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है ॥धृ.॥
व्यक्ती आणि समाज दोन्ही पूर्ण विकसित करणे हेच देशासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे दिव्य ध्येय आहे. दिव्य म्हणजे प्रकाशमान आणि अवघड असे ध्येय. यदाकदाचित ते एका पिढीसाठी गाठता आले, तरी पुढच्या पिढीत तीच स्थिती राहील याची शाश्वती नाही. अतिप्रयत्नाने डोंगराच्या शिखरावर ढकलत नेलेला दगड, ढकलणाऱ्याने हात बाजूला करताच खाली घरंगळायला लागतो. तसे कार्यकर्ता थोडा जरी काम करायचा थांबला तरी त्याच्या संपर्कातील व्यक्ती व समाजात अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्याचे जीवन तपस्व्यासारखे आहे. तो न डगमगता आयुष्यभर ध्येयाच्या दिशेने चालत राहतो म्हणजे काम करत राहतो. म्हणून त्याच्या पिढीतील व्यक्ती व समाज विकासाच्या एका टप्प्यावर निदान टिकून राहतात व काही प्रमाणात आणखी विकसित होऊ शकतात.
सज-धज कर आयें आकर्षण,
पग-पग पर झूमते प्रलोभन,
होकर सबसे विमुख बटोही,
पथ पर सँभल-सँभल बढता है ॥१॥
बटोही म्हणजे वाटसरू. ध्येयमार्गावर वाटचाल करणारा कार्यकर्ता. वाट सोडून जाण्याचा मोह होईल, असे कमी कष्टाचे पर्याय, लवकर साध्य होणारी उद्दिष्टे, समाजात मान्यता, प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठा मिळेल असे कार्यक्रम, त्या कार्यकर्त्याला पावलोपावली समोर दिसत असतात. पण या आकर्षणांकडे तो विमुख होतो, म्हणजे पाठ फिरवतो आणि आपल्या मार्गावर सावधपणे पुढे जात राहतो. वाटेतल्या सगळ्या आकर्षणांपेक्षा आणि प्रलोभनांपेक्षा माणसाचा देवमाणूस करणे आणि समाजाला देवमानवांचा समाज बनवणे हे ध्येयच त्याला जास्त लक्ष वेधून घेणारे वाटत असते.
अमर तत्त्व की अमिट साधना,
प्राणों में उत्सर्ग कामना,
जीवन का शाश्वत व्रत लेकर,
साधक हँस कण-कण गलता है ॥२॥
व्यक्ती व समाजाने देवत्वाप्रत पोचण्याचे तत्त्व हे कायमसाठी मानवी उत्क्रांतीची दिशा दाखवणारे असे अमर तत्त्व आहे. त्यासाठीचे प्रयत्न कधीही निष्फळ होणार नाहीत किंवा मिटणार नाहीत, अशी अमिट साधना आहे. शरीरात प्राण असेपर्यंत ही साधना करण्याची इच्छा खऱ्या साधकामध्ये असते. प्राणांचा उत्सर्ग होईपर्यंत म्हणजे प्राण शरीर सोडून जाईपर्यंत, चेहऱ्यावरचे हसू हरवू न देता, प्रसन्नपणे, कणाकणाने आपले शरीर झिजवत, साधक शाश्वत म्हणजे आजीवन पाळायचे व्रत पाळत असतो. जणू त्याचे प्राण एकेका श्वासाबरोबर शरीरातून गळून पडत असतात. पण तो प्रसन्नतेने आपले व्रतपालन शेवटच्या श्वासापर्यंत, शरीरातील शक्तीच्या शेवटच्या कणापर्यंत करत असतो.
सफल-विफल और आस निराशा,
इसकी ओर कहाँ जिज्ञासा,
बीहडता में राह बनाता,
राही मचल-मचल चलता है ॥३॥
राही म्हणजे ध्येयपथावरचा प्रवासी कार्यकर्ता. या प्रवासात यश मिळते आहे की अपयश, परिस्थिती आशादायक आहे की निराशाजनक, याची तो जिज्ञासा म्हणजे चौकशी करत नाही. म्हणजेच यशापयशाचा, आशा किंवा निराशाजनक परिस्थितीचा, तो स्वतःवर परिणाम होऊ देत नाही. बीहड म्हणजे एकमेकींशी कशाही वेड्यावाकड्या जोडलेल्या, वाट चुकायला लावणाऱ्या घळींचा प्रदेश. बीहडता म्हणजे अनेक समस्या व संकटांनी भरलेला मार्ग. त्यातून तो मचल-मचल म्हणजे, हट्टाने, किंवा निग्रहाने, मार्ग काढत पुढे जात असतो. कोणत्याही अडचणींपुढे तो हात टेकत नाही.
पतझड के झंझावातों में,
जग के घातों – प्रतिघातों में,
सुरभि लुटाता, सुमन सिहरता,
निर्जनता में भी खिलता है ॥४॥
पानगळीच्या काळातले जोराचे वारे, झाडांचे खराटे करतात. झाडे जणू त्यापुढे अगतिक होतात. असे गती रोखणारे वारे आले, अनेक जणांनी मार्गात अडथळे आणले, त्यांच्याशी दोन हात करण्यात वेळ आणि शक्ती गेली, तरी साधक जगावर आणि परिस्थितीवर रागावत नाही. उलट ‘सिहरता सुमन’, म्हणजे पूर्ण उमलून सुकायला लागलेले फूल, शेवटपर्यंत जसे सुगंध लुटत असते, वाटत असते, तसे साधक जगाचे कल्याणच इच्छित आणि करत असतो. असे सुगंध लुटणारे फूल, राना-वनात, माळरानावर कुठेही फुलत असते. तसे हा साधक, राही, बटोही, तपस्वी कार्यकर्ता निर्जनतेत म्हणजे कोणी बघत नसताना, दखल घेत नसतानाही, ‘खिलता है’, फुलत असतो, उत्साहाने आणि प्रसन्नतेने काम करतच असतो.
पद्य –
दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है ॥धृ.॥
सज-धज कर आयें आकर्षण,
पग-पग पर झूमते प्रलोभन,
होकर सबसे विमुख बटोही,
पथ पर सँभल-सँभल बढता है ॥१॥
अमर तत्त्व की अमिट साधना,
प्राणों में उत्सर्ग कामना,
जीवन का शाश्वत व्रत लेकर,
साधक हँस कण-कण गलता है ॥२॥
सफल-विफल और आस निराशा,
इसकी ओर कहाँ जिज्ञासा,
बीहडता में राह बनाता,
राही मचल-मचल चलता है ॥३॥
पतझड के झंझावातों में,
जग के घातों - प्रतिघातों में,
सुरभि लुटाता, सुमन सिहरता,
निर्जनता में भी खिलता है ॥४॥
शेवटचे कडवे फार सुंदर आहे. परिस्थिती ज्ञानाच्या एका तासाला आप्पांनी हे गाऊन घेतले होते, असे आठवते.
तथापि दिव्य ध्येय हे आपले आपल्यालाच हुडकावे लागते..
खूप छान रसग्रहण. काही शब्दांचे अर्थ माहिती नव्हते तेही समजले.कवितेचा गूढ अर्थ छान समजावलात
चिखलगाव ता मुळशी जि पुणे
खूप छान समजला अर्थ मध्ये कधीतरी काम नकोसे वाटले अडथळे आले की नक्कीच आठवण करून देईल हॆ पद्य. तसेच खूप काम आहे अजून करायला थोडया कामाने हुरळून नको जायला नको थांबायला 🙏🏻🙏🏻
हे पद्य म्हणताना ऐकताना एक वेगळीच ऊर्जा मिळते! अतिशय सुंदर आणि सुलभ भाषेत अर्थ समजावून सांगितला आहे ! डोळ्यासमोर अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उभे राहिले , स्वामी विवेकानंदांना समोर ठेवून हे पद्य लिहिले आहे असं वाटत रहातं ! सतत प्रेरणा देणारे हे पद्य मला मनापासून आवडतं ! खूप खूप धन्यवाद !