अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह

मैत्री वधुवरांची !

मैत्रीची परीक्षा संकटाच्या प्रसंगाने होते हे खरेच आहे. हौसेमौजेच्या प्रसंगी जमा होणारे सारेच खरे मित्र असतात असे नाही. आपण आपत्तीत सापडलो की त्या मंडळींपैकी जे कोणी धावून येतील आणि आपत्ती दूर करण्यासाठी साहाय्य करतील त्या मोजक्या व्यक्तींना खरे मित्र म्हणून समजण्यास प्रत्यवाय नाही. लग्नानंतर एकत्र येणाऱ्या युवक-युवतींना आपण परस्परांचे खरे मित्र व्हावयाचे आहे, याचे भान नसते. तसे भान निर्माण होण्यासाठी कोणी प्रयत्न करतात असेही नाही. वधुवरांना ही गोष्ट लग्नाआधी सांगण्याची काही व्यवस्थाही नसते, प्रत्यक्ष लग्नविधीत यासाठी योग्य स्थान आहे खरे, पण आपला लग्नविधी संस्कृतात असल्याने त्याचा बोध होणे कठीण जाते. विधी सुरू असताना मंत्रांचा उच्चार गुरुजी करणार तोही इतक्या घाईने की संस्कृत पदवी घेतलेल्यांनाही त्यातले शब्द कळणे कठीण होते. ज्यांना शब्द कळत असतील त्यांनी मधेच अर्थ विचारण्याची सोय नाही. अर्थ समजावून सांगणारे गुरुजीही अत्यंत दुर्मिळ.

अशा परिस्थितीत खरोखरी सुखी संसाराची स्वप्ने साकार करण्यासाठी लग्नापूर्वी शक्यतो ‘विवाहवेद (लेखिका डॉ. ऋतुजा विनोद) यासारख्या पुस्तकाचे वाचन करावे, सकृतदर्शनी पसंत पडलेल्या भावी जीवनसाथीस नीट समजावून घेण्यासाठी परस्पर बोलावे, शंकांचे शक्यतो आधीच निरसन करून घ्यावे. आपल्यातील गुणदोषांचे आपल्याला भान असावे म्हणजे आपल्याला आवडलेली व्यक्तीही अशीच गुणदोषांनी युक्त असणार हे गृहीत धरून वागता येईल व परिणामी फारसा अपेक्षाभंगही होणार नाही. शिक्षित उच्चवर्णीयांमध्येही रूप, वेतन, विदेशी वास्तव्य असल्या बाह्य गोष्टी पाहून झटपट निर्णय होताना दिसतात आणि अनेकदा शोकांतिकांना सामोरे जाणे भाग पडते.

सन्मित्र लक्षण

भर्तृहरीने सन्मित्र लक्षणे सांगितली आहेत. ती आपल्याला आवडतील अशीच आहेत. पण आपण असे सन्मित्र आहोत का, हे आपले आपण आधी पहावे व मग दुसऱ्याकडून तशा प्रकारची अपेक्षा ठेवावी. भर्तृहरीने म्हटले आहे-

पापात् निवारयति योजयते हिताय | गुह्यं निगूहति गुणान् प्रकटीकरोति|| आपद्वतं न जहाति ददाति काले| सन्मित्रलक्षणम् इदं प्रवदन्ति सन्तः ॥

येथे उत्तम मित्राची खरे पाहता लक्षणे सांगितली आहेत पापापासून म्हणजेच वाईट कार्यापासून परावृत्त करतो तो खरा मित्र केवळ नकारात्मक लक्षण हे उपयोगाचे नाही. कुकर्मापासून परावृत्त करून स्वहितकारक अशा सत्कर्मात जो गुंतवतो तो मित्र ! आपल्यापाशी जगापासून लपवून ठेवाव्यात अशा काही गोष्टी, उणीवा, रहस्ये असतात. त्यांची वाच्यता चारचौघांत चुकूनही करणार नाही तो खराखुरा मित्र. आपले सद्गुण, आपले विजय, आपली सत्कर्मे अशा गोष्टी आपण आपल्या तोंडाने सांगायच्या नसतात. पण आपल्या या सर्व गोष्टी चारचौघांमध्ये प्रेमाने सांगायला ज्याला आवडते तो आपला स्नेही हे नक्की! आपण अडचणीत सापडलो असता आपली साथ सोडणारा मित्र कसला? आपली अडचण ही ज्याला स्वत:वरचे संकट वाटते तो मित्र ! अशा संकटप्रसंगी कोरडी सहानुभूती दाखवून न थांबता प्रत्यक्षात हवी असेल ती मदत मिळवून देतो तो सच्चा स्नेही म्हणावा, अशी सहा लक्षणे सांगून अखेर “सज्जनांनी ही उत्तम मित्राची खूण सांगितली आहे” असे भर्तृहरी म्हणतो. म्हणजे सन्मित्रात सहाही गुण हवेतच हा त्याचा आग्रह आहे.

साप्तपदीन स्नेह

विवाहविधीतील सप्तपदीमध्ये सातवे पाऊल टाकताना वराने वधूला उद्देशून म्हणावयाचे असते ‘सखा सप्तपदी भव’ सख्यासाठी, मैत्रीसाठी, आपल्या दोघांच्या निरंतर स्नेहासाठी सातवे पाऊल टाका. गुरुजींनी सप्तपदीच्या वेळी शक्यतो हा परस्पर मैत्रीचा अपेक्षित अर्थ स्पष्ट करून सांगावा. त्याचा काहीना काही उपयोग अवश्य होईल. सप्तपदीतील पहिले ‘पाऊल अन्नलाभासाठी आहे. त्याचवेळी एकपत्नीव्रत आणि एकपतिव्रत पाळण्याचे वचन उपस्थितांच्या साक्षीने पतिपत्नीने घ्यावे. सामर्थ्यसंपादनासाठी दुसरे पाऊल टाकावयाचे असते. ते टाकताच ‘आमची संपत्ती ही आम्हा उभयतांची आहे. दोघांचाही तिच्यावर सारखाच अधिकार आहे” असे वधुवरांनी प्रकटपणे म्हणावे, मग धनसंवर्धनासाठी तिसरे पाऊल टाकले जावे. सुखसमृद्धीसाठी चौथे पाऊल टाकताना परस्परांची प्रतिष्ठा राखण्याचा निश्चय दोघांनी सांगावा. पाचवे पाऊल हे संततीसाठीचे आहे. ते टाकताना वधुवर निर्व्यसनी राहण्याचा निर्धार प्रकट करतील, तर संततीसही व्यसनमुक्त राहण्याचे वातावरण प्राप्त होऊ शकेल.

सहाही ऋतूंचा सारखाच आनंद उपभोगण्याची मानसिकता सहावे पाऊल टाकत असताना व्यक्त व्हावी आणि बरोबरीने परस्परांच्या गुणदोषांचाही आनंदाने स्वीकार व्हावा. दुर्गुण दूर अवश्य करावेत पण ते आपले आहेत हे समजून हळूवारपणाने ते काम केले जावे हे बरे !

सप्तपदी झाल्याशिवाय रूढी, शास्त्र, कायदा, याप्रमाणे हिंदू विवाह सिद्ध होऊ शकत नाही हे ध्यानी ठेवून त्याच्यासाठी थोडा अधिक वेळ देऊन मैत्रीचा खुलासा सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे गुरुजींनी अगत्यमेव करावा.

लाजाहोमाचे औचित्य

विवाहात लाजाहोमाचा विधी केला जातो लाजा म्हणजे लाह्या विशेषतः भाताच्या लाह्या! ज्या होमात भांताच्या लाह्यांची आहुती त्रिवार देण्यात येते त्यास लाजाहोम म्हणतात. तुपाच्या आहुत्या किंवा समिधांच्या आहुत्या देण्याची व्यवस्था असूनही लग्नविधीत भाताच्या लाह्या आहुतींसाठी का सांगितल्या गेल्या ?

भात हे असे धान्य आहे की ज्याची लावणी करावी लागते. त्या भाताच्या लाह्या या अग्निपरीक्षेतून तयार होत असतात, माहेरचे बीजगुण घेऊन आलेल्या वधूची सासरी एक प्रकारे लावणीच होत असते. नवीन माती, नवी परिस्थिती अन् अनोखं पर्यावरण अनुकूल करून घेणं ही अग्निपरीक्षा वधूलाच द्यावी लागते ! त्यामुळे तिला उदंड आर्द्रतेची, , हृदयाच्या ओलाव्याची अपेक्षा असते याची जाणीव सासरच्या परिजनांनी व मुख्यत: यजमानांनी ठेवायला हवी. नाहीतर मग तर मग रोप जीव धरत नाही, हवं तसं वाढत नाही, कोमेजू लागतं. हे आपण पाहतोच! लक्ष्मीपूजन करून जिला घरात घेतली तिला, त्या प्रत्यक्ष लक्ष्मीला सुकवून सुख कसं वाढेल?

संस्कार व्हावा

मंत्रांमधील अक्षरही न कळता तीन तीन दिवस लग्न चालले किंवा तीन तीन तास विविध विधी केले तर यथासांग भरपूर काही केल्यासारखे वाटते. हजारो लोक जेवतात, लक्षावधींचा खर्च होतो, कर्जाचा डोंगर वधू पक्षाच्या माथी येतो आणि अखेर संसार यशस्वी होईल की नाही हे काही सांगवत नाही. त्यासाठी लग्नाकडे केवळ गंमत म्हणून, देण्याघेण्याचा, हौसमौजेचा, खाण्यापिण्याचा समारंभ म्हणून पाहणे थांबवून एक दीर्घकालीत सुख दांपत्यासाठी, दोन्ही कुटुंबांसाठी आणि पर्यायाने समाजासाठी ज्यामुळे लाभेल असा सु-संस्कार म्हणूनच त्याकडे पहावे.