श्री. यशवंतराव लेले
इतिहास हे राष्ट्रनिर्मितीचे फार मोठे साधन आहे, याचा आपल्या राज्यकर्त्यांना विसर पडलेला असला आणि आपल्या राष्ट्रीय इतिहासाचा विकृत जातीय विपर्यास खपवून घेण्यापर्यंत आपल्याकडील अनेक विचारवंतांचीही मजल गेलेली असली तरी पाकिस्तानात मात्र त्यांच्याच दृष्टीने इतिहास शिकवला जातो. त्यात काय काय सांगितले जाते, याचा एका पाठ्यपुस्तकाच्या निमित्ताने घेतलेला आढावा.
बरेच दिवस जिज्ञासा होती की पाकिस्तानात, म्हणजेच त्या सिंधुसरितेच्या परिसरातील शाळांमधून कसला इतिहास शिकवण्यात येत असेल ? त्या सिंधुदेशात, सिंध प्रांतात दाहीरचे नाव नि त्या देवल ऋषींचे नाव इतिहासात सांगत असतील का ? ती व्यास नदी, ती असक्नवी, ती रावी, ती शतद्रू अन् ती सिंधुसरिता ! या परमपावन पंच नद्यांच्या आसपास तरी कुणी सांगत असेल का की जगातील तो प्राचीनतम ग्रंथ ऋग्वेद-ऋषींना स्फुरला ?
ग्रंथालयात शोधाशोध करता Pakistan Studies हे पुस्तक हाती लागले. ११ वी – १२ वी साठी हे अनिवार्य पुस्तक म्हणून नेमलेले असून पाकिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये ते शिकवावे लागते. पहिलेच प्रकरण आहे, The Basis of Pakistan पाकिस्तानचा पाया म्हणजे इस्लामचे पृथगात्म तत्त्वज्ञान असे प्रथम प्रकरणात सांगण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखकमंडळात पाचातील तीन डॉक्टर मंडळी आहेत.
पाकिस्तानची खरी स्थापना
दुसऱ्या प्रकरणात पाकिस्तानची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करताना लेखकांनी कायदे-आझम जीनांचे वचन उद्धृत केले आहे. जीना म्हणतात ‘या उपखंडावर (म्हणजे भारतात) ज्या दिवशी पहिल्या मुसलमानाचा पाय पडला व पहिल्या हिंदूने इस्लामचा स्वीकार केला त्याच दिवशी पाकिस्तानची स्थापना झाली.’
दक्षिण आशियात मुस्लीम समाजाची निर्मिती महंमद बिन कासीमने राजा दाहीरचा पराभव करून सिंध प्रांत जिकल्यानंतर झाली. व्यापारार्थ आलेल्या अरबांच्या जीवनाचा स्थानिक लोकांवर असा काही प्रभाव पडला की त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांनी इस्लामचा स्वीकार करून मुस्लीम समाजात मोठी भर टाकली. ११ व्या शतकात दक्षिण पंजाबात सतत मुसलमान येत राहिले. लाहोरच्या हिंदू राजाने म्हणजे जयपालने सातत्याने जे विश्वासघाताचे वर्तन चालू ठेवले त्यामुळे महम्मद गझनीला राग आला व त्याने लागोपाठ स्वाऱ्या करून त्याचे राज्य खालसा करून आपल्या राज्यास जोडले.
मुसलमानी समाजाचा दक्षिण आशियाच्या उत्तर व मध्य-भागात जो प्रसार झाला तो मुख्यतः महंमद घोरीच्या पराक्रमामुळे. त्याने तरेण (Tarain) युद्धभूमीवर राजा पृथ्वीराजाचा पराभव केला व थोड्याच अवधीत दिल्ली व अजमीर मुसलमानी अंमलाखाली आले. महंमद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने गुजरात व ग्वाल्हेरचे राज्य मुसलमानी अंमलाखाली आणले, तर बख्त्यार खिलजी बिहार-बंगाल मुस्लीम अधिसत्तेखाली आणण्यात यशस्वी झाला. १२०६ मध्ये कुतुबुद्दीन ऐबक हा गादीवर आला- तो दक्षिण अशियाच्या मोठ्या थोरल्या भागावरील मुस्लीम राजा म्हणून ! त्याने दिल्लीस ‘दार उल खिलाफा’ बनवले. त्याने उभारलेल्या प्रचंड मशिदीचा उर्वरित एकमेव मिनार म्हणजे आजही पहावयास मिळणारा कुतुबमिनार होय ! अशा प्रकारे दीर्घकालीन मुस्लिम अधिराज्याचा द. अशियावरील पाया घातला गेला अन् १८५७पर्यंत हे अधिराज्य चालले. मोगली सिंहासनावरून बहादूरशहा जफरला पदच्युत करण्यात आल्यानंतर हे अधिराज्य संपले.
सूफी संतांचे कार्य
आध्यात्मिक भूमिकेतून राज्य करणाऱ्या इल्तमश व नासिर उद्दीन मोहंमदसारख्या प्रगल्भ राजांनी जसा इस्लामचा प्रसार केला तसाच प्रामाणिक, सच्चे असे जे सूफी संत त्यांनीही तो केला. त्यांची दारे हिंदू नि मुसलमान सर्वांनाच खुली असत ! एखाद्या मुसलमानाने आपले वर्तन सुधारण्यामुळे त्यांना जसा आनंद होई तसाच हिंदूने इस्लामचा स्वीकार केल्याने होत असे. पण सर्वांचीच आध्यात्मिक उन्नती करणे हे त्यांचे ध्येय होते. मुसलमानी सत्ताधीशांनी येथील मुस्लिम समाजास भक्कम राजकीय आधार दिला तर सूफींनी त्यांना नैतिक व आध्यात्मिक बळ दिले.
अजमीरचे ख्वाजा मुइउद्दीन, बाबा फरीदगंज शकर, स्वाजा निजामुद्दीन अवलिया, शेख बहाउद्दीन झकेरिया, हजरत मखदुम-इ-जहानिआन इ. जहान गंश्त आणि शेख रूखउद्दीन या सूफी संतांचे काम इस्लाम प्रसाराच्या दृष्टीने स्मरणीय आहे.
आठशे वर्षांच्या मुसलमानी सत्तेने या उपखंडाचे केवढे कल्याण केले ते सांगताना लेखक म्हणतात ‘ शांतता, न्याय, भौतिक विकास, एक नवीन संस्कृती आणि जीवनपद्धती या गोष्टी उपखंडास मुस्लीम कालखंडाची देणगी म्हणता येईल.’
‘हिंदू बंडखोरीचे ओंगळ भूत ‘
दक्षिण आशियाई मुस्लिम राजसत्तेचा कणा तैमूरलंगाच्या स्वारीमुळे मोडून पडला व फिरोजशहा तुघलकापासून ते अकबर बादशहा होईपर्यंतच्या सुमारे दीडशे वर्षात सिकंदर लोदीच्या राज्याची २८ वर्षे वगळता स्थिर असे केन्द्रीय शासनच अस्तित्वात नव्हते. अखेरीस तर राजस्थानात व विजयानगरात हिंदू बंडखोरीचे ओंगळ भूत उभे राहिले. पुढे तर रजपुतांनी (Seditious methods) राजद्रोहाचा विडा उचलून त्याबरोबर धार्मिक क्षेत्रातही अशी काही उलथापालथ आरंभिली की एकीकडे भक्ती संप्रदायाच्या मिशाने त्यांनी इस्लामच्या आध्यात्मिक पायासच सुरूंग लावला तर दुसरीकडे त्यांनी मुस्लीम समाजास उघड उघड धर्मत्यागाचीच ओढ उत्पन्न करण्यास प्रारंभ केला. ‘
त्यात भर पडली ती अकबराच्या अतिउदार धार्मिक धोरणाची ! द. अशियातील इस्लामचे त्यामुळे अस्तित्वच धोक्यात आले होते. अकबराने हिंदू वेषभूषा केलेली पाहून एतद्देशीयांना काय आनंद झाला असेल याची कल्पना करून पहावी. पण ख्वाजा बाकी-बिल्ला आणि मुजाद्दिद अल्फीथानी यांनी मुस्लीम धर्माच्या जागरणाचे काम आघाडीवर राहून सुरू केले. त्यांचे काम अवघड होते. अकबराच्या दिने इलाही या गोधडी धर्माचे खूळ निपटून काढणे हे एक आवश्यक काम बनले होते तर दुसरीकडे भक्त कबीर, बाबा नानक व त्यांचे सहकारी यांनी इस्लाम व पाखंडी विचार एक करून राम व रहीम ही एकाच शक्तीची दोन नावे असल्याचा भ्रम पैदा करण्याचा जो खटाटोप चालवला होता त्याच्याशी मुकाबला आवश्यक झाला होता ! ‘पायाभूत तत्त्वावरील श्रद्धा एकदा गोंधळली की माणसाची क्रमाने पाखंडाकडे मार्गक्रमणा सुरू झाली हे गृहीत धरावे.’
‘मुस्लिम पुनरुज्जीवनाचे काम करणाऱ्यांत तत्कालीन दिल्लीच्या शेख अब्दुल हक्क यांचाही उल्लेख केला पाहिजे. मुसलमानांनी हादिथ (Hadith) चा अभ्यास करण्यास त्यांना गोडी वाटावी असे प्रयत्न त्यांनी केले. ‘
शाहजहान व औरंगजेब यांचे विशेष कार्य
‘समाजात इस्लाम धर्माची श्रद्धा वाढीस लागावी यासाठी शहाजहानचे प्रयत्न विशेष कारणीभूत ठरले आहेत. दैनिक नमाजावर त्याचा कटाक्ष असे. धमनि सांगितलेले उपवास तो करीत असे. उलेमा व प्रतिष्ठित मुसलमानांचा गौरव तो नेहमी करीत असे आणि शरियतच्या कायद्याप्रमाणे तो आपले निर्णय करीत असे. हे सारे जरी खरे तरी मुस्लिम साम्राज्याची उभारणी शरियतच्या आधारावर करणे, साऱ्या देशभर उलेमांकडे न्यायदान सोपवणे, आणि बादशाही आसन हे साऱ्या नास्तिकतेतून किंवा अनेक देवतावादातून पूर्णतः मुक्त करण्याचे महत्कार्य मात्र औरंगजेब अलमगीर याच्या हातूनच व्हायचे होते हे खरे! ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले ‘फतवा-इ-अलमगिरी’मध्ये औरंगजेबाने शरियतच्या आधारे आपल्या राज्याचे कायदे मांडून दाखवले आहेत. त्याच्या काळात मोगली साम्राज्याच्या सीमा खूपच विस्तारल्या हे जरी खरे तरी त्या क्षेत्रात सत्ता दृढमूल होण्याआधीच दक्षिणेत मराठ्यांनी बंडाळी केली व औरंगजेबाच्या वारसांना त्यावर नियंत्रण ठेवणे जमले नाही.’
याच वेळी जर अहंमदशहा अब्दालीची स्वारी होऊन त्यारे पानपतावर मराठ्यांचा पराभव केला नसता तर मुसलमानी सत्ता हिंदूंच्या हाती पडण्याचे दुःस्वप्न खरे ठरले असते !’
तिकडे वायव्य सरहद्द प्रांतात सय्यद अहमद आणि शहा इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली जिहादचा पुकारा करून मुस्लिम जनतेने शिखांचा उठाव दडपून टाकण्याचे प्रयत्नात हौतात्म्य पत्करले. बंगालमध्ये सिराज उद्दौला आणि दक्षिणेत हैदरअली आणि टिपू सुलतान यांचे इस्लामस्थापनेचे सारे प्रयास विश्वासघातक्यांनी व्यर्थ ठरवले ! आणि सुमारे ८०० वर्षाच्या कालखंडानंतर द. आशियात मुसलमान सत्ताभ्रष्ट झाले.
द. आशियात विजेते म्हणून आलेले नि शतकानुशतके येथे राज्यकर्ते म्हणून राहिलेले, भरभराटीस आलेले मुसलमान दूरदृष्टीच्या अभावी अन् इंग्रजांच्या कुचक्रात सापडून अधोगतीला पोचले !’
पाकिस्तानची चळवळ – तेहरिक-ए-पाकिस्तान !
‘मुसलमानांची राजकीय सत्ता संपुष्टात येताच परकीय सत्ताधीशांनी त्यांची संस्कृती नाहीशी करण्याची योजना आखली व मुसलमानी अंमलाखाली शेकडो वर्षे सुरक्षित राहिलेल्या स्थानिक देशबाधवांनी आपली या उपखंडावर राज्य करण्याची जुनी पुराणी अभिलाषा पुनश्च व्यक्त केली.’ ही हाव एवढी तीव्र बनत गेली की तिच्यामुळे मुसलमानांची ससेहोलपटच सुरू झाली. मुसलमान समाजाने हिंदू तरी व्हावे किंवा हे उपखंड सोडून चालते तरी व्हावे अशी परिस्थिती उत्पन्न झाली! अशा प्रकारे ब्रिटिशांनी मुसलमानांचे स्वतंत्र अस्तित्व उध्वस्त करण्याचा चंग बांधला आणि हिंदूंनी त्यांचा धर्म नाहीसा करण्याचा खटाटोप सुरू केला ! मुसलमानांनी आपल्या बचावासाठी धडपड सुरू केली. त्यांचा धर्म श्रेष्ठ असल्यामुळे व निर्धार मोठा असल्यामुळे मुसलमान म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यात ते यशस्वी झाले इतकेच नव्हे तर अखेरीस स्वतःसाठी स्वतंत्र राष्ट्र हस्तगत करण्यातही त्यांना यश आले. या सामुदायिक स्वातंत्र्यचळवळीस ‘पाकिस्तानचा लढा’ किंवा ‘तारिक-ए- पाकिस्तान’ असे म्हणतात.
यापुढे सर सय्यद अहमद खान यांचे पाकिस्तानच्या निर्मितीतील योगदान या विषयावर माहिती देण्यात आली आहे.
सर सय्यद अहंमद खान
इंग्रज या देशावर प्रदीर्घ काळ राज्य करतील व त्यांना येथून हुसकावून देणे शक्य होणार नाही’ असा विश्वास असल्याने सर सय्यद अहमद खान यांचे म्हणणे असे होते की या देशात मुसलमानांना टिकून रहावयाचे असल्यास इंग्रजांशी आपले संबंध सुधारण्यावाचून त्यांना अन्य पर्यायच नाही! त्यासाठी राजकारणापासून अलिप्त राहून पाश्चात्य शिक्षणाचा अंगिकार करणे हे मुसलमानांच्या हिताचे असल्याचे सय्यद अहंमदांचे म्हणणे होते, म्हणूनच त्यांनी स्वतः अनेक शाळा व मदरसा स्थापन केल्या. १८५९ मध्ये मुरादाबाद येथे पहिली मुस्लीम शाळा त्यांनी काढली. अलीगडमधील एम्. ए. ओ. हायस्कूल १८७५ मध्ये सुरू करण्यात येऊन १८७७ मध्ये त्याचे महाविद्यालयात रुपांतर झाले. पुढे अलिगड विद्यापीठ यातून उभे राहिले! अलिगडमधून देण्यात आलेली हाक साऱ्या उपखंडातील मुसलमानांपर्यंत पोचली.
१८८६ मध्ये मोहमेडन एज्यूकॅशनल कॉन्फरंसची संस्थापना सर साहेबांनीच केली. ही जरी राजकारणातीत परिषद होती तरी राजकीय विचारविनिमयास तेथे वाव मिळे व त्यातूनच एका अधिवेशनात अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. सर सय्यद हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर पुरस्कर्ते होते आणि ते त्या दोन्ही जमातींची तुलना सुंदरीच्या अद्वितीय नेत्रकमलांशी करीत असत ! पण पुढे हिंदूंनी उर्दू भाषेस, पर्शियन लिपीस हिंदी व देवनागरीसाठी विरोध केल्यामुळे सर साहेबांचे मन बदलले असे पुस्तकात म्हटले आहे.
भाषेच्या प्रश्नावरून संबंधात बिघाड
लेखक पुढे सांगतात, ‘भाषेच्या प्रश्नावरून उभय जमातींमधील संबंध बिघडत गेले आणि मुसलमानांना आपल्या वितवित्ताच्या आणि धर्म-संस्कृतीच्या रक्षणार्थ स्वतंत्र राष्ट्राची मागणी करण्यावाचून मार्गच उरला नाही. १८८५ मध्ये लॉर्ड ह्यूमने कॉंग्रेसची संस्थापना केल्यानंतर हिंदू मोठ्या उत्साहाने त्यात सामील झाले तरी सर सय्यदांच्या मार्गदर्शनानुसार मुसलमान त्यापासून व एकूणच राजकारणापासून कटाक्षाने अलिप्त राहिले. इ. १९०० मध्ये उत्तर प्रदेशच्या गव्हर्नरने न्यायालयातून हिंदीला स्थान दिले. हिंदी न जाणणाऱ्यास सरकारी नोकरीस अपात्र ठरवले गेले.
गोहत्येचा विषय हिंदूच्या जिव्हारी लागणारा असल्याने त्या निमित्ताने दंगे सुरु झाले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगाली साहित्यात असे काही येऊ लागले की ज्यामागे मुसलमानांच्या विषयी द्वेषमावना उत्पन व्हावी. यात बंकिमचंद्र चतर्जींची ‘आनंद मठ’ ही कादंबरी मुद्दाम उल्लेखिली पाहिजे. या कादंबरीतील एक गाणेच आपले पक्षीय गाणे बनवले! हे गाणे व एकूणच ही कादंबरी मुसलमानविरोधी विष पसरवण्यास कारण ठरली. झुंजार आर्य समाजाने याच काळात उघड उघड आक्रमक भूमिका घेऊन अशी मागणी सुरू केली की मुसलमानांनी एक हिंदू तरी व्हावं किवा हिंदुस्थान सोडून जावं !
१९०५ मध्ये पूर्व बंगाल मुस्लिम बहुसंख्या असलेला प्रांत बनल्याने मुसलमानांचा लाभ होतो आहे हे पाहून हिंदूमधील सर्व गटांनी त्यास कडवा विरोध केला! हे पाहून तर सय्यद अहंमद खान ३५ मुस्लिम पुढाऱ्यांना घेऊन लॉर्ड मिंटोस भेटले व मुसलमानांच्या स्वतंत्र मतदारसंघांची मागणी त्यांनी केली.
मुस्लिम लीगची डाक्क्यात स्थापना
१९०६ मध्ये मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्सच्या डाक्का येथील वार्षिक अधिवेशनात नवाब विकूल मुल्क हे अध्यक्ष होते. नवाब सलीम उल्लाखानांनी मांडलेल्या एका ठरावाच्या अनुषंगाने ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. सर आगाखान लीगचे प्रथम अध्यक्ष म्हणून निवडले गेले. तसेच अलिगड येथे केंद्र कार्यालय ठेवण्याचे ठरले. लगेच १९०८ मध्ये लीगची एक शाखा लंडनमध्येही स्थापण्यात आली.
१९०९ मध्ये मोर्लेमिंटो सुधारणांमध्ये मुसलमानांसाठी विभक्तमतदारसंघ मान्य करण्यात आले, पण अतिरेकी हिंदूना मुसलमानांशी कोणत्याच मुद्यावर जमवून घ्यायचे नव्हते. त्यांना हिंदू राज्याविना काहीच नको होते. १९११ मध्ये बंगालची फाळणी इंग्रजांनी रद्द केली व मुसलमानांना नाराज केले. यात भर म्हणजे १९१३ मधील कानपूर मशिदीच्या प्रकरणामुळे उपखंडातील मुसलमानांत राग धुमसू लागला ! १९१५ मध्ये लखनौमध्ये महंमदअल्ली जीनांच्या खटपटीमुळे काँग्रेस व लीग यांची अधिवेशने एकाच वेळी भरवण्यात आली व मुसलमानांच्या विभक्त मतदारसंघांना हिंदूंनी मान्यता दिली. मध्यवर्ती कायदेमंडळात १/३ प्रतिनिधित्व मुसलमानांना देण्याचे ठरले. शिवाय हिंदूंचे व मुसलमानांचे ज्या प्रांतांंतून बहुमत आहे तेथे तेथे त्यांना प्रमाणाहून कमी जागा द्यायचेही ठरले.
हिंदू-मुसलमानांनी सामोपचाराने केलेला एकमेव करार म्हणजे लखनौ करार ! याचे सारे श्रेय जाते महंमद अली जीनांकडे. या करारानंतर उभय राष्ट्रांनी स्वातंत्र्यासाठी एकत्रपणे संघर्ष केला! जालियनवाला बाग हत्याकांड व तेहरिक – ए – खिलाफत यामुळे ती आणखीनच जवळ आली. २३ नोव्हेंबर १९१९ ला दिल्लीत प्रचंड अशी खिलाफत परिषद होऊन म. गांधीच्या प्रेरणेने हिंदूंनी खिलाफत चळवळीस आपला पाठिंबा व्यक्त केला. त्यासाठी गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले. मौलाना आझादांनी फतवा काढून मुसलमानांना देशत्यागाचे आवाहन केले. परिणामी हजारो तरुणांनी शिक्षण सोडले, कित्येकांनी सरकारी नोकऱ्यांची त्यागपत्रे दिली, तर अनेकजण अफगाणिस्तानात गेले.
जातीय दंगली हिंदूंकडून सुरू!
हिंदूंनी शाब्दिक सहानुभूती दाखवली तरी त्यांच्या जातीय हितसंबंधांना धक्का लागतो आहेसे वाटताच त्यांनी अलिप्ततेचा स्वीकार केला ! १९२१ मधील कराची येथील खिलाफत परिषदेने सरकारी नोकरी ही ‘हराम’ ठरवली !
१९२२ च्या कायदेभंग आंदोलनाचे वेळी गांधींनी खिलाफत बंद केली. यानंतर जातीय दंग्यांची सुरुवात झाली. हे दंगे हिंदू अतिरेक्यांकडून योजनाबद्धपणे घडवले जात होते. यावर कळस म्हणजे आमच्या धर्मसंस्थापक पवित्र महंमदाचे चरित्रावर निर्लज्जपणे वाटेल तसे शिंतोडे उडवण्यास हिंदू लेखकांनी प्रारंभ केला !
काझी अब्दुर रशीदने श्रद्धानंदांवर गोळी झाडून त्यांना ठार केले. शुद्धी चळवळीच्या ह्या संस्थापकास खलास करून रशीद फासावर चढला ! लाहोर येथील नतद्रष्ट हिंदू प्रकाशक राजपाल याला गाझी इल्म दिन शहीद याने ठार केले. त्याने शहादत (हौतात्म्य) प्राप्त करून घेतले! कराचीत एंका पठाणाने, अयूब त्याचे नाव, नथूरामला ठार मारून वीरमरण पत्करले ! ‘ १९२० ते २५ च्या दरम्यानचे दंग्यांचे काही उल्लेख करून लेखक म्हणतात, ‘मुस्लिमविरोधी अशा शुद्धी आणि संघटन या दोन चळवळी या काळात गतिमान होत गेल्या तरी काँग्रेसने त्यांच्याकडे कानाडोळाच केला!
नेहरू रिपोर्ट अमान्य
१९२७ मध्ये दिल्ली येथे मुंबई इलाख्यापासून सिंध विभक्त करण्यासंबंधी व मुस्लिम प्रतिनिधित्वासंबंधीच्या मागण्या मांडण्यात जाल्या. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा अखेरचा प्रयत्न हिंदू वृत्तपत्रांनी विरोध करून हाणून पाडला’ असे लेखक म्हणतात. नेहरू रिपोर्टातही या सर्व मागण्या फेटाळल्या गेल्याने जीनांनी रिपोर्टाची संभावना ‘हिंदूंच्या चिरकाल गुलामीत नि प्रभुत्वाखाली मुसलमानांना ठेवण्याची तरतूद’ या शब्दात केली आहे! नेहमी काँग्रेसला निरपेक्षपणे साथ देणाऱ्या जमियत उलेमाकडूनही नेहरू रिपोर्ट फेटाळला गेला. या रिपोर्टाने मुसलमानांना संघटित होण्याची बुद्धी झाली हा एक फायदाच म्हणावा लागेल असे लेखक म्हणतात. नेहरू रिपोर्टास उत्तर म्हणून जीनांनी १४ मागण्या पुढे केल्या. त्या कॉंग्रेसने व हिंदूंनी फेटाळल्या. यावर लेखकांचा अभिप्राय हा की सतत ‘हिंदू राज्य स्थापनेचाच त्यांचा प्रयत्न होता.’
१९३० मधील अलाहाबादच्या लीग अधिवेशनात अल्लाम्मा इक्बालनी आपल्या भाषणात स्पष्टपणे म्हटले आहे की ‘ या उपखंडातील कोणता घटक त्याच्या सामाजिक एकीमुळे व सामुदायिक प्रेरणेमुळे राष्ट्र म्हणावयास पात्र असेल तर तो मुस्लिम समाजच होय ! आणि म्हणून त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र स्थापले पाहिजे.’
गोलमेज परिषदा, १९३५ चा कायदा व तदनुसार १९३७ मधील निवडणुका यांचा वृत्तांत सांगून लेखक म्हणतात की ‘काँग्रेसच्या मंत्र्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर मुस्लीम संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले प्रथम त्यांनी उर्दू मोडीत काढून हिंदी हा शालेय अभ्यासात सक्तीचा विषय बनवून टाकला. ‘वंदे मातरम् ‘हे हिंदू गीत राष्ट्रगीत ठरवण्यात आले व शाळकरी मुलांना गांधी प्रतिमेपुढे डोके टेकण्यास भाग पाडण्यात येऊ लागले. वर्धा शिक्षण योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. या योजनेचा हेतूही मुस्लीम सांस्कृतिक परंपरा नष्ट करून मुसलमान मुलांच्या मनात हिंदू संस्कृतीचे श्रेष्ठत्व बिंबवणे हाच होता’.
यानंतर द्वितीय महायुद्धात हिंदुस्तानचे सहकार्य हवे असल्यास ब्रिटिशांनी हिंदुस्तानला पूर्ण स्वतंत्र बनवण्याचे स्पष्टपणे कबूल केले पाहिजे अशी काँग्रेसने मागणी केली. पण सरकारने ती नाकारताच कॉंग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. (२२-१०-१९३९) मुसलमानांनी मात्र जीनांच्या आदेशानुसार २२ ऑक्टोवर हा हिंदू राज्यातून मुक्ती झाल्याचा आनंद दिन म्हणून साजरा केला!
पाकिस्तानची मागणी
सिंधमधील लीगच्या शाखेने प्रथम १९३८ मध्ये हिंदुस्थानच्या फाळणीची मागणी केली. तर अखिल भारतीय मुस्लीम लीगच्या लाहौर अधिवेशनात स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी करण्याचे १९३९ मध्ये पक्के करण्यात आले. मौलवी फजलुल हक यांनी २२ मार्च १९४० मध्ये पाकिस्तानचा ठराव मांडला. ‘करारदाद-इ-पाकिस्तान’ असे त्याला म्हणतात. महंमदअली जीनांच्या तेजस्वी नेतृत्वाखाली लीगने ठराव केल्यापासून सात वर्षात आपले उद्दिष्ट साध्य करून दाखवले ! एवढे महत्त्वपूर्ण ध्येय एवढ्या अल्पावधीत साध्य करून घेणे दुसऱ्या कोणत्याच राष्ट्रास जमलेले नाही.’
यानंतर क्रिप्स मिशन (१९४२) सिमला येथील लॉर्ड वेव्हेलशी झालेल्या वाटाघाटी (१९४५) यांचा वृतांत सांगून १९४५ डिसेंबरमधील निवडणुकात लीगने कसा नेत्रदीपक विजय संपादन केला, ते लेखकांनी वर्णिले आहे. पुढे मंत्रिमंडळापासून लीग दूर राहिली व तिने प्रत्यक्ष प्रतिकाराचा (Direct Action) प्रारंभ पाकिस्तानच्या प्रस्थापनेसाठी कसा सुरू केला हे सांगून लेखक म्हणतात, ‘या डायरेक्ट अॅक्शनमुळे लियाकत अली खान यांना अर्थमंत्रीपद तर द्यावे लागलेच पण पटेलांसारख्या संकुचित वृत्तीच्या माणसालाही पाकिस्तानला मान्यता द्यावी लागली !’
जीनांचे बिनतोड युक्तिवाद, मुसलमानांचा त्याग व त्यांचा निर्भय लढा या सर्वांचा परिणाम होऊन इंग्रजांना ३ जून १९४७ ला फाळणीस मान्यता द्यावी लागली! जुलैमध्ये ब्रिटिश पार्लमेंटने इंडियन इंडिपेन्डन्स अॅक्ट संमत केला.
पाकिस्तानी घटना व इस्लामीकरण
पाकिस्तानची निर्मिती हो विसाव्या शतकातील महत्त्वपूर्ण राजकीय घटना म्हणावी लागते. कारण त्याची उभारणी तात्त्विक पायावर झालेली आहे. (Ideological Basis)
घटनेच्या उद्दिष्टांमध्ये ‘लोकशाही, स्वातंत्र्य, समता, सहिष्णुता व सामाजिक न्याय या इस्लामला अभिप्रेत गोष्टी पूर्णतः पाळल्या जातील’ असे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे ! ‘अल्पसंख्याकांचे न्याय्य अधिकार सुरक्षित ठेवण्यात येतील व त्यांना त्यांच्या धर्माचे आचरण करण्याची मुभा राहील’ असेही म्हटले आहे.
१९५६ मध्ये पहिली पाकिस्तानी घटना तयार झाली व ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ असे देशाचे अधिकृत नामकरणही झाले !’
पण लवकरच लोकांचा भ्रमनिरास झाला. कारण सार्वजनिक जीवनात इस्लामी कायदा आला नाही किंवा मुसलमानी समाजाची प्रस्थापनाही झाली नाही !
१९७७ मध्ये मात्र दारू पिणे व रेस खेळणे यावर बंदी घालून शुक्रवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. जुलै १९७७ मध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळल्यामुळे सेनादलास मुलकी सत्ता हाती घ्यावी लागली.
१९७९ फेब्रुवारीत ईद मिलादच्या शुभ मुहूर्ती मुसलमानी हदूद (Hadood) कायद्यानुसार फौजदारी गुन्ह्यांना कठोर (हात तोडण्यासारख्या) शिक्षा देण्यास प्रारंभ झाला. पुढे मग आर्थिक कायदे व शैक्षणिक क्षेत्रातील कायदे इस्लामशी जुळते मिळते करण्यात आले. इस्लामी विश्वविद्यालय स्थापण्यात आले. त्यात शरीयत अध्यासन ठेवले गेले. शरीयत न्यायालयेही निघाली.
बँकांना व्याजाऐवजी त्यांच्या लाभहानीनुसार व्यवहार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सर्व शाळांमधून कुराण शिकवले जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत ‘इस्लामियत’ हा एक सक्तीचा विषय बनला आहे.
राष्ट्रीय एकात्मता : पाक शैली
सातवे प्रकरण आहे’ राष्ट्रीय एकात्मते’ वर ! या प्रकरणामध्ये पाक समाज घडणीचे तीन कालखंड दिले आहेत. पहिला इस्लामपूर्व काळ! आये, ग्रीक, इराणी, अरब, तुर्क आणि मोगल हे क्रमाक्रमाने या उपखंडात येत गेले व आपापसात मिसळत राहिले. तत्पूर्वी मोहेंजोदाडो व हराप्पा संस्कृतीचे लोक येथे होते. ते द्राविडियन वंशाचे होते असे मानण्यात येते. इस्लामोत्तर कालखंड हा द्वितीय कालखंड होय. इस्लाम धर्माच्या उदयानंतर लगेच पुढच्याच शतकात ह्या उपखंडात त्याचा प्रवेश झाला.
महंमद बिन कासीमने पहिले मुस्लीम सरकार सिंधमध्ये स्थापन केले. तत्पूर्वी एक ब्राह्मणी सत्ता तेथे चालू होती व जाति संस्था दृढमूल झालेली होती. महंमद बिन कासीमने सिंधी लोकांना इतक्या उत्तम रीतीने वागवले, इतक्या दयावुद्धीने वागवले की इस्लामचा स्वीकार केल्याशिवाय त्यांना राहवेनाच ! पण या उपखंडातील श्रेष्ठ प्रभुसत्ता इस्लामच्या नावाने स्थापण्याचा बहुमान व दिल्लीत राजधानी करण्याचा मान कुतुबुद्दीन ऐबक याचेकडे जातो. ‘मस्जिद-इ-कव्वात-उल इस्लाम’ त्याने स्थापन केली. याच कालखंडात या उपखंडामध्ये समर्पित मुसलमान व मान्यवर सूफी यांनी इस्लामचा दूरवर प्रचार केला.
प्रशासकीय व महसुली कामाचे केन्द्रीकरण करून या उपखंडास राजकीय एकविधता आणून देण्याचे कार्य मुसलमानांनी केले. ८०० वर्षांची इस्लामी सत्ता म्हणजे उपखंडातील वैशिष्टयपूर्ण सामाजिक प्रगतीचा कालखंड, भरभराटीचा कालखंड !
लोकांची आर्थिक सुबत्ता, सामाजिक प्रगती, शेतीतील प्रगती, व्यापार-उद्योगांची भरभराट म्हणजे मुस्लीम राज्यकर्त्यांनी दाखवलेल्या राजकीय मुत्सुद्देगिरीचा, त्यांनी दाखवलेल्या सामाजिक न्यायाचा, व गोरगरिबांच्या कल्याणाच्या त्यांनी दाखवलेल्या आस्थेचा परिपाक होय !
पण जेव्हा सामाजिक व बौद्धिक व्हासास प्रारंभ झाला तेव्हा मुसलमान स्थितीप्रिय बनले, आळशी झाले अन् मग त्यांची अर्थस्थिती व राजकीय सत्ताही दुर्बल बनली. साहजिकच यावेळी इंग्रजांनी सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली !
वर्तमान कालखंड – या उपखंडातील मुसलमानांनी स्वातंत्र्यासाठीची शेवटची लढाई १८५७ मध्ये दिली !
पाकिस्तानची सांस्कृतिक पूर्वपीठिका
उपखंडातील इस्लामच्या आगमनापासून सुरू होणाऱ्या ऐतिहासिक कालखंडाचा पाक राष्ट्रास मोठा अभिमान वाटतो । सिंधला ‘बाबुल इस्लाम म्हणण्यात येते. देवल बंदरात ज्याने मशीद उभारली त्या महंमद बिन कासीमने इस्लामी संस्कृतीचा पाया घातला. या देशात बाहेरून आलेल्या मुसलमानांनी येथील पददलित जनतेला समतेचे व वादातीत प्रतिष्ठचे आश्वासन दिले तेव्हा तिने प्रचंड संख्येने मुस्लिम होण्यास प्रारंभ केला!
सर्वसाधारण मनास सहज पटणाऱ्या वैशिष्टयांमुळे इस्लाम संस्कृतीचा व्यापार-उदीमाच्या क्षेत्रात नव्हे तर दैनंदिन जनजीवनातही प्रसार होऊ लागला. प्रचारकी वृत्ती, भक्ती अन् धर्मशिक्षण यांच्यामुळे बहुजन समाज इस्लामकडे आकृष्ट होत गेला.
पाक भाषा
उर्दू, बलुची, पुश्ती, सिंधी व पंजाबी या महत्त्वाच्या पाकिस्तानी भाषा होत. या साऱ्यांंचा गट भारतीय भाषा गट हा एकच आहे. उपखंडातील मुसलमानांच्या आगमनानंतर मुळातील बोली भाषेच्या दर्जाच्या या भाषांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. या सर्व भाषा प्राय: एकाच लिपीत म्हणजे कुराणाच्या लिपीत लिहिल्या जातात हे महत्त्वाचे आहे.
पाक साहित्य
मीर दर्द, रेहमान बाबा, शहा लतीफ या श्रेष्ठ कवींचा संदेश एकविध आहे. काव्यांचा उपयोग मुख्यत: धर्मप्रचारासाठीच करण्यात येई. मुसादस-ई-हातीचे सामाजिक व ऐतिहासिक महत्त्वाचे लेखन मुसलमानांना त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरक ठरले असल्याने आता ते साऱ्या पाकिस्तानी भाषांमध्ये अनुवादिले गेले आहे.
साऱ्या जगातील मुसलमानांना संघटित होण्याचे आवाहन करणारे अल्लाम्मा इक्बालचे काव्य उपखंडातील मुसलमानांना वैचारिक मार्गदर्शन करीत आले आहे.
धर्म हा राष्ट्रास एक मजबूत पाया उपलब्ध करून देत असतो. अन्यथा राष्ट्रे वर्ण, जाती, भाषा किंवा प्रादेशिक वादामुळे फुटताना दिसतात.
राष्ट्रीय अस्मितेच्या प्रमुख चिन्हांमध्ये राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय पोषाख आणि राष्ट्रभाषा यांचा उल्लेख करायला हवा. सलवार व खमीझ आज सर्व प्रांतांमध्ये वापरत असून शाळा महाशाळांमधून गणवेष म्हणूनही तो पत्करण्यात आला आहे. शासकीय व बिनशासकीय समारंभांमध्येही आता हा वेष वापरात येतो आहे. शेरवाणी आणि टोपीमुळे या पोषाखात एक ऐटबाजपणा येतो हे खरे.’
परराष्ट्रसंबंध
‘हे एक कटु सत्य आहे की भारताने अजूनही पाकिस्तानचे अस्तित्व मनापासून स्वीकारलेले नाही. त्याच्या आक्रमक पवित्र्याचा परिचय असल्यामुळेच पाकिस्तानला संरक्षण आणि प्रादेशिक एकात्मता या दोन गोष्टी परराष्ट्र धोरण ठरवताना पायाभूत म्हणून घ्याव्या लागतात. पूर्व पाकिस्तानातील हिंदूंना जाणूनबुजून चिथावणी देण्यात आली व त्याचा परिणाम म्हणजे पूर्व-पश्चिम विभागात विद्वेष उत्पन होऊन कटुता वाढून देशाचे तुकडे पडले. भारताने स्वातंत्र्यानंतर तीनदा पाकिस्तानवर युद्ध लादले आहे ! स्वातंत्र्यानंतर लगेचच भारतीय सेनेने जुनागड व हैद्राबादवर हल्ले केले व जुलूमजबरदस्तीने हे प्रदेश भारतात कोंबले. काश्मीरचा मोठा हिस्साही भारताने आपल्या कब्जात घेतला आहे. वास्तविकरीत्या काश्मीर हा मुस्लिम बहुसंख्या असणारा प्रांत आहे. काश्मीरी जनतेच्या मदतीसाठी पाकिस्तानने सेना पाठवताच भारताने हा प्रश्न राष्ट्रसंघाकडे नेला.
काश्मीर हा घटनात्मक दृष्ट्या भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारतीय लोकसभेने एकतर्फीच १९६५ मध्ये जाहीरही करून टाकले ! सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानवर आक्रमण करून भारताने कहरच केला. तेव्हा राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने त्याची दखल घेतली व युद्धबंदी व ताश्कंद करार होऊ शकला.
१९७१ च्या प्रारंभी पूर्व पाकमधील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती गंभीरपणे ढासळत गेली अन् याचा गैरफायदा घेऊन भारताने बंडखोरांना प्रशिक्षण दिले, व अर्थसहाय्य केले. शस्त्रास्त्रे पुरवली व प्रत्यक्ष घुसखोरही धाडले. नोव्हेंबर १९७१ मधे तर भारताने हल्लाच केला तेव्हा पाकिस्तानी सैन्याने त्याचा निकराचा प्रतिकार केला. पण डिसेंबरमध्ये त्यांना शस्त्रे खाली ठेवावी लागली. सिमला कराराने या प्रकरणाची अखेर झाली.
१९७४ मध्ये भारताने आपल्या पहिल्या अणुबाँबचा स्फोट करून आपले इरादे एकापरीने उघड केले!’ असा उल्लेख भारतीय अणुचाचणीसंबंधी पुस्तकात केला आहे.
लियाकत अलींपासून अलिप्ततावादी असणारे पाकिस्तान १९५४ मधे सोऍटोचे सदस्य कसे बनले, १९५५ मधे बगदाद करारात कसे सामील झाले, आणि इराक-इराण-तुर्कस्थान यांच्या ‘विकासार्थ प्रादेशिक सहकारा’ त (R. C. D.) कसे दाखल झाले ते सांगून १९७१ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला पाठिंबाही दिला नाही व शस्त्रसहाय्यही कसे दिले नाही ते खेदपूर्वक नमूद केले आहे. १९७९ मधील रशियाच्या अफगणिस्तानावरील घुसखोरीनंतर अमेरिकेने पाकिस्तानच्या गरजांची व अडीअडचणींची दखल घेण्यास प्रारंभ केला आहे.
चीनचे भारताविरूद्ध १९६५ मधील लढाईत झालेले सहाय्य लेखकांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेखले आहे रशिया भारताचा सहाय्यक असला तरी पाकला त्याने तेलसंशोधनास व पोलाद कारखान्याची कराची येथील उभारणी या उपक्रमात रशियाचे कसे सहाय्य होत असते त्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे.
भारताच्या चिथावणीने अफगाणिस्तान पख्तुनिस्तानचा प्रश्न उकरून काढत राहिल्याने पाकचे अफगणिस्तानशी सातत्याने तणावपूर्ण संबंध राहिले आहेत.
या पुस्तकात शेवटी पाकिस्तानचा नकाशा दिला असून संपूर्ण काश्मीर व जुनागड हे भाग त्यात दाखवले आहेत हैद्राबाद मात्र दाखवायचा राहिलेला दिसतो !