स्वामी विवेकानंद यांचा देशधर्माचा विचार

लेख क्र. ३०

०४/०७/२०२५

मा. श्री. यशवंतराव लेले यांनी देश, धर्म, वेद-पुराण इ. विषयांवरील स्वामी विवेकानंदांचे विचार या लेखात मांडलेले आहेत. हा लेख ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या कार्यवृत्त २०११ मध्ये प्रकाशित झाला. ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाधिपतींमधील विवेकानंद व त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांचे विचार व कार्य भारतीय स्त्री-पुरुषांनी आत्मसात करायला हवेत असा यशवंतरावांचा आग्रह आहे.

राष्ट्र – स्वामी विवेकानंदांनी एक राष्ट्र म्हणून हिंदुस्थानचा सखोल विचार केलेला आहे. ‘हिंदु राष्ट्र म्हणजे ज्यांच्या अंत:करणात समान अध्यात्मविचारांचे ध्वनी उठतात अशांचे राष्ट्र’, ‘या हिंदू राष्ट्राचा प्राण कशात असेल तर तो अध्यात्मात!’ असे त्यांचे स्पष्ट प्रतिपादन आहे. पण हे अध्यात्म म्हणजे तरी काय? अगदी व्यावहारिक उदाहरण देऊन ते सांगतात, ‘मला आधी खायला हवे, इतरांपेक्षा मला अधिक धन मिळायला हवे. मीच आधी मुक्तीचा अधिकारी व्हायला हवे,’ असे विचार करण्यापेक्षा ‘न लगे मुक्ती धनसंपदा’ असे जो म्हणतो, त्याचप्रमाणे स्वार्थाचा काही विचार न करता ‘दुसर्‍याला साहाय्य मिळवून देण्यासाठी मी नरकात जाण्यासही तयार आहे’ असे म्हणण्याइतका नि:स्वार्थीपणा आपल्या ठिकाणी यायला हवा. कारण माझ्यात अन् दुसर्‍या माणसात काय फरक आहे? तो आणि मी एकसारखेच आहोत, नव्हे तर एकच आहोत! तो स्वर्गात गेला आणि मला नरकात धाडले तर मी स्वर्गसुखाचा तेथे आनंद घेईन! आमच्यात भेद नाही. आमच्यात अद्वैत आहे. तो वेगळा-मी वेगळा असा दोनपणाचा भावच नाही. म्हणजेच आमच्यात द्वैत नाही. याला संस्कृतात म्हणतात अद्वैत! स्वामीजी भारतीयांना सांगतात ‘अद्वैती व्हा’.

पूर्वपश्चिम भेद – युरोपातील राष्ट्रांशी तुलना करता आपला देश अजून राष्ट्र म्हणावयास पात्र नसल्याचे त्यांना वाटे. ते म्हणाले, ‘इंग्रजांना हिंदुस्थान जिंकणे इतके सोपे का गेले?’ ‘कारण ते राष्ट्र आहेत’. आम्ही राष्ट्र नाही. आमच्यातील एखादा थोर पुरुष जेव्हा मरतो तेव्हा दुसऱ्याची वाट पाहात आम्हास शतकानुशतके थांबावे लागते. त्यांच्याकडे एक मेला, दुसरा तयार असतो. असे का? त्यांच्याकडे माणसे निवडण्याचे क्षेत्र अत्यंत व्यापक आहे. आमचे अत्यंत लहान आहे. कित्येक कोटींच्या देशात (२० कोटींच्या भारतात) थोर पुरुष निवडण्याचे क्षेत्र लहान आणि ३ कोटीच्या देशात अशा निवडीचे क्षेत्र मोठे, हे कसे? कारण एवढेच, त्या देशातून शिकलेल्या स्त्री-पुरुषांची संख्या अत्यंत मोठी आहे. ध्येयासाठी संघटित झालेला समाज म्हणजे राष्ट्र. ध्येयसाधनेसाठी संघटना करायची तर वेगवेगळ्या समाजातील समान भूमिका शोधावी लागते, मग त्या आधारे राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृती करता येते.

          यानंतर आमचा समान इतिहास स्वामीजी सांगतात, ‘हे सारे करायला निघताना ध्यानात ठेवा आपल्या या पवित्र भूमीवर अत्याचारी आक्रमकांच्या लाटांमागून लाटा आल्या. आयुष्य कोणत्या क्षणी संपेल याची शाश्वतीच कोणा हिंदूला राहिली नव्हती. जगाच्या इतिहासात या भूमीइतके दु:ख आणि या भूमीला दास्यात जखडण्यासाठी केली गेली तेवढी धडपड दुसर्‍या कोणत्याही देशाच्या अनुभवास आलेली नाही. पण तरीही एक समाज म्हणून आज आपण जवळजवळ जसेच्या तसे खडे आहोत. इतकेच नव्हे तर प्रसंग आल्यास, पुन्हा तशा संकटांना परतवून लावण्यास सिद्ध आहोत. इतकेच काय, हिंदुस्थानाबाहेर जाऊनही आम्ही पराक्रम करू शकतो आणि खरोखरी बाहेर जाणे, वाढणे हेच जिवंतपणाचे निदर्शक आहे.

            स्वामीजींनी पश्चिमेत जाऊन तेथील समाजजीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले होते. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल सारखी युरोपीय राष्टे दर्यावर्दी म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्यांनी नौकानयनात प्रगती केली असे हे सारे देश, नावेवर ‘नित्य नवा दिवस संकटाचा’ अशा परिस्थितीशी सामोरे जात असतात व अशा वादळांचे वेळी नावेवरील प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या कामात दक्ष राहून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो ते त्या नावेच्या सुरक्षेसाठी ! बाप मुलाच्या नावे हाका मारत नाही की मुलगा मदतीसाठी बापाला हाकारत बसत नाही. सारेजण एक दिलाने कर्तव्यदक्ष राहून नाव वाचवतात. तिच्यात पाणी भरू लागले असेल ते सर्व शक्ती एकवटून बाहेर काढून टाकत असतात. पण या सांघिक प्रयत्नात यश नाहीच आले तर सारेच्यासारे त्या जहाजासकट नाहीसे होण्यासही मागेपुढे पाहात नाहीत. नौकेवरील हे सहकार्य, ही कुटुंबभावना, हे संघटन, इंग्रजी जीवनात घरोघरी मुरले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे संघटन हा सहज गुणधर्म दिसून येतो. विदेशातून स्वदेशी परतल्यावर स्वामींनी कोलंबोपासून अल्मोरापर्यंत जी व्याख्याने दिली त्यात संघटनेचा महिमा वारंवार सांगितलेला दिसतो. तो सांगताना ‘To sail or sink together’ हा वाक्यप्रयोग त्यांना सुचत राहिला असावा. हिंदुस्थानातील चित्र अगदी वेगळे होते. स्वामी म्हणत, ‘आम्हा हिंदूंचा सर्वात मोठा दोष असा की आपल्या हातातील सत्तेमध्ये दुसऱ्याला भागीदार करण्याची आमची तयारी नसते.’ राष्ट्र समर्थ व समृद्ध करायला समाजातील संघटनवृत्ती कशी कारणीभूत होते हे स्वामी विवेकानंदांनी मुख्यतः अमेरिकेमध्ये पाहिले. भारतात अशी संघटनवृत्ती जोपासण्यासाठी भारतीयांमध्ये कोणते गुण आले पाहिजेत याविषयी आपले चिंतन त्यांनी भाषणांमधून, पत्रांमधून मांडले आहे.

            गुणग्रहण करून एकमेकांना साहाय्यक होणारी संघटना आवश्यक आहे. म्हणून अशी एक संस्था स्थापन करावी जिथे नित्यनेमाने एकत्र यावे लागेल. माझ्या मित्रांनो मग तेज तुमच्या पाठोपाठ येईल. संघटन आमचा स्वभाव बनायला हवा. त्यासाठी मत्सररहितता हे मुख्य सूत्र आहे. सर्वांना प्रेमाने जिंका. वाढणे आणि गतिशील असणे हीच जिवंतपणाची खूण आहे. स्वामीजींनी म्हटले आहे, ‘हे ध्यानात ठेवा की, कार्य करणारे तुम्ही नसून कार्य करविता तो परमेश्वर आहे !’ द्वितीय सरसंघचालक प. पू. श्रीगुरूजी हे स्वामीजींच्या गुरुबंधूंचे, स्वामी अखंडानंदांचे, शिष्य होते. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचे संघटना कार्य मूर्त रूपात आज लक्षावधी सेवाकार्यांमधून उभे राहिलेले आपण पाहतो. ते रा. स्व. संघाच्या द्वाराच घडत आहे. (अशा संघटनेत बहुमताचे जोरावर निर्णय घ्यावेत असे स्वामींना वाटत नव्हते. त्याचे कारण पाश्चात्य देशातील समाजाप्रमाणे येथील समाज प्रगल्भ नव्हता, हे दिसते.) आज्ञांकितता हा महत्त्वाचा गुणधर्म संघटनेत आवश्यक असतो हे स्पष्ट करताना स्वामी म्हणतात, ‘नदीत उडी टाकून सुसरीला पकडा अशी वरिष्ठांनी आज्ञा केली तर ती तुम्ही प्रथम पाळली पाहिजे, आज्ञा चूक की बरोबर याचा विचार नंतर’. बंगालमध्ये स्वामी पाहात होते, ब्राह्मो समाजातील वरिष्ठांमध्ये मतभेद होऊन हा समाज दुभंगण्याचे प्रसंग अनेकदा घडले होते. स्वामी म्हणत ‘संघाबद्दल तुम्हाला अत्यंत निष्ठा हवी. इथे अवज्ञेस स्थान नाही. अवज्ञा करणाऱ्यास दूर केले पाहिजे. संघटनेत विश्वासघातकी कोणी असता कामा नये. आकाशासारखे विशाल व आज्ञांकित असे संघ सदस्य हवेत.’

            स्वामी विवेकानंदांचे, म्हणजेच एका ‘पराक्रमी’ संन्याशाचे, विश्वविजय करून ते परतल्यावर जे देवदुर्लभ स्वागत भारतीयांनी केले ते हिंदू जातीच्या परंपरेला साजेसेच असल्याचे स्वामीजींनी स्वत: म्हटले आहे. पुढे ते सांगतात, ‘हिंदू जातीचे चैतन्य, हिचा जीवनाधार, हिचा आत्मा, म्हणजे केवळ धर्मच आहे. आपणास धर्म हे एवढेच साधन उपलब्ध आहे की, ज्याच्या साहाय्याने आपण पुढे जाऊ शकू. इंग्रजाला धर्मही राजकारणाद्वारे कळतो, अमेरिकनास समाजसुधारणांमधून धर्म कळतो पण हिंदूंना राजकारणही कळू शकले ते केवळ धर्माच्याच वाटे. धर्म हाच येथील ओंकार ध्वनी आहे.’ अशा या हिंदू धर्माची वैशिष्ट्ये स्वामीजींनी सुस्पष्ट केली आहेत. हा धर्म कोणा एका व्यक्तीवर आधारलेला नाही. श्रीकृष्णासही वेद वंद्य आहेत. तसेच, स्वामींचा सारा भर होता उपनिषदांवर. त्यातही ‘शक्तीची उपासना’ हिंदूंसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अहिंसा हा बुद्धाचा मार्ग पण स्वामींचे मते उपनिषदांचा मार्ग अधिक चांगला आहे.

            ‘शोपेन हौवरने’ भविष्य वर्तवले आहे की पूर्वी ‘डार्क एजेस्’ नंतर जशी ग्रीक व लॅटिन संस्कृती सर्व युरोपभर पसरली. त्याप्रमाणे हिंदू संस्कृतीचे महत्त्व युरोपभर वाढीस लागेल. हरे कृष्ण पंथाचा प्रसार, योगासनांच्या द्वारा चालू असणारा पतंजली प्रणीत योगदर्शनाचा प्रचार, स्वित्झर्लंडमधील ट्रान्सन्डेन्टल मेडिटेशनचे महेश योगींचे कार्य, रजनीशांचा भक्तगण इत्यादींनी हिंदू संस्कृती व धर्म जगभर पोहोचलेला आहे. रामकृष्ण आश्रमाचे कार्यही देशोदेशी चालूच आहे. शिवाय आज हिंदू देश जिवंत आहे तोही हिंदू धर्मामुळेच. काही शेकडो वर्षांच्या परकीय संस्काराचा त्याग करणे सोपे की सहस्रावधी वर्षांमध्ये घडत गेलेला आपला स्वभाव टाकणे सोपे ? असा प्रश्न स्वामींनी उपस्थित केला आहे. पण ते हिंदूंना सुचवतात, “कित्येक दिवस गतिशून्य झालेली धर्मभावना आता गतिसंपन्न केली पाहिजे, प्रत्येकाच्या आचारविचारात, आयुष्यात धर्म येईल असे करायला हवे.” आणि पुढे त्यांनी हा झोपी गेलेला देश जागृत होत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे. भविष्यकालीन हिंदुस्थानात या टोकापासून त्या टोकापर्यंत एकाच एका धर्माला मान्यता मिळण्याची आवश्यकता त्यांनी सांगून ठेवली आहे.

              स्वामी म्हणतात सुखेच्छापूर्वक परमेश्वरावर प्रेम करणे, भक्ती करणे काही वाईट नाही. कारण सुंदर, भव्य वस्तूवर प्रेम करणे हे सहजच आहे. पण निरपेक्षपणे तसे भक्तिप्रेम करणं चांगले. एकेश्वरवादी धर्मांनीही सर्वव्यापी ईश्वराला चर्चमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. क्रॉसला हार घालणेही त्यांना आवडते. आकाशाकडे नजर लावून प्रार्थना करणेही त्यांना आवडते. कॅथॉलिकांमध्ये तर कितीतरी मूर्ती असतात ! त्यामुळे त्यांनी हिंदूंना अनेकेश्वरवादी म्हणून हसण्याची गरज नाही. शेवटी मूर्ती, मंदिरे, शास्त्रग्रंथ ही सारी साधने आहेत पण ती बाल्यावस्थेतील मात्र नाही. नाहीतरी धर्मही देवत्वाकडे जाण्याचे एक साधनच नाही का? खरे हे आहे की सत्कर्मयोगाद्वारे देवत्वप्राप्ती होत असते.

            ईश्वराप्रमाणे पूर्ण होण्याचा प्रयत्न चालू ठेवणे हाच धर्म ! अनुभवावाचून पूर्णता येत नसते. धर्माचा आपला अर्थ आहे ‘प्रत्यक्ष अनुभूती’. जशी स्वतः स्वामींनी भगवान रामकृष्णांच्या कृपेने देवत्वाची अनुभूती घेतली होती. पांडित्यपूर्ण वक्तृत्व म्हणजे काही अध्यात्माची अनुभूती नव्हे. म्हणून अध्यात्माची वृत्ती असल्याशिवाय भारताचे पुनरुज्जीवन शक्य नसल्याचे स्वामींचे मत होते. “बालपणापासून तेजस्वी बनण्याचे, बलसंपन्नतेचे वळण लावून घ्या, सर्व जिंकू त्यासाठी जे जे सोसावे लागेल ते ते सोसू पण विजयीच होऊ.” असा विचार करा.

वेद – स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची औपचारिक माहिती देतांना वेद, स्मृती, पुराणे यासंबंधीही विवेचन केले आहे. स्वामींनी वेदाचे दोन कांड सांगून कर्मकांड आणि ज्ञानकांड असे त्याचे दोन भाग वर्णिले आहेत. त्यातील वेदांचा अखेरचा भाग उपनिषद् नावाने ओळखला असून त्यात ज्ञानाचे भांडार आहे. स्मृती अनेक आहेत. त्यामध्ये आचारांचे नियम सांगितले असून त्यात स्थलकालानुसार बदल होत जातात. त्यामुळेच अनेक स्मृती निर्माण झाल्या आहेत. मनुस्मृती हे नाव आपण ऐकलेले असते पण याज्ञवल्क्य स्मृती, देवल स्मृती अशा अनेक स्मृती आहेत.

पुराणे – ही सर्वसामान्य लोकांसाठी सोप्या संस्कृतमध्ये नाना गोष्टी सांगणारी ग्रंथरचना आहे. ती काही विद्वानांसाठी नव्हेत. गोष्टींच्या रूपाने रंजन करत समाज शिक्षण करण्याची ती साधने आहेत. या जगात असंख्य जीवात्मे आहेत. त्यात प्रचंड विविधता आढळते, पण स्वामीजी सांगतात ‘विविधता हाच या विश्वाचा आत्मा आहे. विविधता असणे म्हणजे परस्पर विरुद्धत्व असले पाहिजे असे बिलकूल नाही.’

              अद्वैताच्या हिंदू तत्त्वज्ञानामुळेच मानवतेमधील परस्पर बंधूतेचे नाते सहजच स्पष्ट होते. केवळ माणसा-माणसातील हे बंधुत्व नव्हे तर साऱ्या प्राणिमात्राशी, साऱ्या जीवनसृष्टीशी हे बंधुत्व सिद्ध होते हे विशेष! या भूतलावरच सत्कर्म करण्याची संधी उपलब्ध आहे. मग स्वर्गाची आम्हाला गरजच काय ? तेव्हा या जगात राहून आपण सर्वत्र सर्वश्रेष्ठ असे जे धर्मदान ते करूया. म्हणजे धर्म समजून घेऊया, समजावून सांगूया. अगदी प्राणदानही यापुढे गौण ठरते. म्हणून तुमचे या देशावर प्रेम असेल तर आपल्या शास्त्रातील दुर्बोध तत्त्वे लोकांना शिकवावीत. सर्व देशांमधील साऱ्या लोकांपर्यंत ती पोचवावी !