हेची थोर भक्ती – अभंग १

हेचि थोर भक्ति

हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची।।
ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।धृ।।
वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।।
तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवापायी ।।

जून १९६९ मध्ये ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सुरू झाली आणि मी ही प्रशालेत दाखल झालो. पुढच्याच महिन्यात आषाढी एकादशीची तयारी सुरू झाली. आमच्या इयत्ता आठवीच्या वर्गाला ‘हेचि थोर भक्ती’ हा अभंग म्हणायचा होता. माझ्या आयुष्यात मी म्हटलेला हा पहिलाच अभंग. हा अभंग लक्षात राहण्याचे हे पहिले कारण. आणि दुसरे कारण म्हणजे या अभंगाचा लोकांमध्ये रूढ असलेला चुकीचा अर्थ. आमच्या अभंगाचे परीक्षण करताना मा. आण्णांनी त्याचा खरा अर्थ थोडक्यात सांगितला होता.

भक्ती करणे म्हणजे आपल्या जवळचे जे सर्वात उत्तम असेल ते देवाला अर्पण करणे. संकल्पावी म्हणजे अर्पण करावी. सर्वसामान्य लोकांचे संसारावरील प्रेम, म्हणजे संसाराची माया, त्यांचा जीव की प्राण असते. ते संसारावरील प्रेम देवाला अर्पण करणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे असे पहिल्या दोन चरणांमध्ये सांगितले आहे.

हा अभंग माझ्या लक्षात राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे इथे देवाला अनंत म्हटले आहे. मला अनंत हा शब्द तोपर्यंत माहीत नव्हता. परंतु त्याचा अर्थ चौथी-पाचवीत असतानाच कळला होता. माझ्या प्रबोधिनीपूर्वीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रोज जी प्रार्थना म्हणायचो त्याची सुरुवात Eternal God, Creator of All अशी होती. आम्हाला एक अँग्लोइंडियन क्रीडा शिक्षक होते. त्यांच्या भोवती खेळाचा तास संपल्यावरही विद्यार्थ्यांचा घोळका असायचा. एका विद्यार्थ्याने त्यांना Eternal चा अर्थ विचारला. त्यांनी त्यावर त्यांच्या चर्च मधल्या फादरने सांगितलेली गोष्ट सांगितली.

एक मैल उंचीचा एक काळाकाभिन्न कातळाचा डोंगर आहे. दर शंभर वर्षांनी त्याच्या वरून एक पक्षी उडत जातो. त्याच्या पंखांचा वारा कातळाच्या वरच्या भागाला स्पर्श करून जातो. त्या वाऱ्यामुळे त्या कातळाची थोडी झीज होते. असे दर १०० वर्षांनी जवळून पक्षी गेल्यावर, कातळाची झीज होत राहते. अशी झीज होता होता सर्व कातळ संपून जायला जेवढा वेळ लागेल तो वेळ म्हणजे Eternal असा अर्थ त्यांनी सांगितला. ही गोष्ट आणि हा अर्थ मनात पक्का बसला होता. हा अभंग म्हणताना Eternal म्हणजेच अनंत हे लक्षात आले. काळाच्या बाबतीत अनंत, विस्ताराच्या बाबतीत अनंत, गुणांच्या बाबतीत अनंत आहे, तो देव. त्याच्या शक्तीपुढे एका माणसाची शक्ती नगण्य आहे. त्यामुळे त्या अनंत अशा देवाने जसे तुम्हाला ठेवले आहे, त्यात समाधानाने राहावे असे या अभंगाच्या दुसऱ्या दोन चरणांमध्ये सांगितले आहे.

इथेच या अर्थाचा घोटाळा होतो. देवाने ठेवले आहे तसे राहावे, म्हणजे काही हातपाय न हलवता स्वस्थ बसून राहावे, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असे म्हणत खाटेवर लोळत राहावे, असा अर्थ लोक घेतात. पण त्याचा खरा अर्थ अगदी उलट आहे. एखादे काम उत्तम रितीने पूर्ण होण्यासाठी, जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे, ते करा, आणि मग त्या प्रयत्नांचे फळ म्हणून जे मिळेल, ते परमेश्वराने दिले आहे असे समजून समाधानाने स्वीकारा, असा ‘ठेविले अनंते…’ या चरणांचा अर्थ आहे. पुढील दोन चरणांचा अर्थ पाहिल्यावर हा अर्थ असाच आहे आणि बहुसंख्य लोक जसा मानतात तसा निष्क्रियता सांगणारा नाही असे लक्षात येते.

एखादे काम सुरू करताना मनासारखी साधने जवळ नाहीत, काळ, वेळ सोयीची नाही, म्हणून चिडचिड करणे म्हणजे उद्वेग वाहणे. काम करणे चालू असताना ते अपेक्षित गतीने आणि पद्धतीने पुढे सरकत नाही म्हणून वैतागणे, आदळआपट करणे म्हणजे उद्वेग वाहणे. काम संपल्यावर अपेक्षित ते, तेवढे आणि अपेक्षित तेव्हा, त्याचे फळ मिळाले नाही म्हणून कुरकुरत बसणे म्हणजे उद्वेग वाहणे. काम सुरू करताना, काम चालू असताना, काम संपल्यावर आणि काही जणांच्या बाबतीत तर काम न करता, उद्वेग वाहणे म्हणजे असमाधानाला किंवा दुःखाला निमंत्रण असते.

परंतु, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्या त्या वेळी फक्त त्यावेळच्या कामाचे परिणाम दिसतात असे नाही. तर आपण आधी केलेल्या अनेक कामांचे अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम आताच्या कामाच्या परिणामांमध्ये मिसळलेले असतात. प्रत्येक कामाचे काही तात्कालिक परिणाम असतात व काही दीर्घकालीन परिणाम असतात. काम झाले आहे आणि दीर्घकालीन परिणाम अजून दिसायचे आहेत, अशा अजून दिसायच्या असणाऱ्या परिणामांना संचित असा पारिभाषिक किंवा शास्त्रीय भाषेतील शब्द आहे. लहानपणी कुपोषण झाले आहे आणि दहा वर्षांनी तुम्ही पोषक आहार घेतला तर त्या पोषक आहाराचे परिणाम लगेच दिसत नाहीत. आधीच्या कुपोषणाचे परिणामच दिसत राहतात. अशा जुन्या कुपोषणाचे परिणाम अनुभवण्याला संचिताचे फळ अनुभवणे असे म्हणतात. आज उत्तम काम केले व अपेक्षित परिणाम मिळाला नाही याचा अर्थ आधीच्या चुका किंवा उणिवा, किंवा वेगळ्या दिशेने केलेले प्रयत्न यांचे परिणाम आजच्या कामाच्या परिणामांबरोबर मिसळले गेले आहेत. त्यामुळे अपेक्षित फळ मिळत नाही. यालाच ‘भोगणे ते फळ संचिताचे’ असे म्हणतात. तुम्ही देव मानत असलात तर ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ आणि देव मानत नसलात तर ‘भोगणे ते फळ संचिताचे’. तुम्ही काहीही मानत असलात तरी ‘वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ’ हे लक्षात घेऊन ‘चित्ती असू द्यावे समाधान’ असे राहायला शिकले पाहिजे. या अभंगाच्या मधल्या चार चरणांचा अर्थ असा एकत्र पाहिला पाहिजे.

तुकाराम महाराज देव मानणारे होते. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ असा मूर्तीतला देव पाहण्याइतके ते भावसमृद्ध होते. आणि ‘मागे पुढे विठ्ठल भरला, रिता ठाव नाही उरला’ याचे भान असण्याइतके ते ज्ञानसमृद्धही होते. त्यांच्या दृष्टीने तर केवळ या जन्मातल्या नाही, तर आधीच्या जन्मांमधल्या कामांचे, अजून दिसून यायचे परिणाम म्हणजे संचित होते. त्यामुळे चित्तामध्ये सतत समाधान राखायचे असेल, आणि उद्वेग व त्यामुळे होणारे दुःख याचा स्पर्शही मनाला होऊ द्यायचा नसेल, तर कुठल्या कामाचे परिणाम कधी, कसे दिसतील याची जबाबदारी किंवा भार देवावर सोपवावा. संसारावरील फक्त प्रेमच नाही तर सगळा संसारच देवाला अर्पण करावा, आणि आपण मोकळेपणाने आपला स्वधर्म आचरत राहावे, असे शेवटच्या दोन चरणांमध्ये तुकाराम महाराज म्हणतात. अपेक्षित परिणाम व्हावेत यासाठी आपल्या बाजूने अचूक आणि परिपूर्ण प्रयत्न करणे आणि परिणामांची काळजी देवाला करू देणे हीच थोर भक्ती आहे. असा मला या अभंगाचा आपण स्वीकारण्यासारखा तथ्यांश वाटतो.

गिरीश श्री. बापट