उंबरातील कीटका – अभंग क्रमांक – १०

उंबरातील कीटका । हेचि ब्रह्मांड ऐसे लेखा ॥ धृ ॥
ऐसी उंबरे किती झाडी । ऐशी झाडे किती नवखंडींं ॥ १ ॥
हेचि ब्रह्मांड आम्हासी । ऐसी अगणित अंडे केसींं ॥ २ ॥
विराटाचे अंगी तैसें । मोजू जाता अगणित केश ॥ ३ ॥
ऐशा विराटाच्या कोटी । साठविल्या ज्याच्या पोटी ॥ ४ ॥
तो हा नंदाचा बालमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद ॥ ५ ॥
ऐसी अगम्य ईश्वरी लीला । ब्रह्मानंदी गम्य तुक्याला ॥ ६ ॥

१९७८ साली आषाढी एकादशीला आप्पांनी ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ या अभंगावर प्रवचन केले होते. या अभंगाचा अर्थविस्तार करताना जे आणखी चार-पाच अभंग सांगितले होते त्यातला ‘उंबरातील कीटका’ हा शेवटचा अभंग होता. त्यावेळी त्या अभंगाचा अर्थ फारसा कळला नव्हता. त्याच्या पुढच्या वर्षी आमचे गीतारहस्य अभ्यास शिबिर झाले. त्या शिबिरानंतर गीतारहस्यामध्ये मांडलेले ‘अद्वैत तत्त्वज्ञान’ आणि ‘आधुनिक विज्ञान’ या विषयावर आप्पांनी मला इंग्रजीतून एक लेख लिहायला सांगितला होता. तो लेख मी लिहून दिला आणि त्यानंतर त्याबद्दल विसरून गेलो. चार-पाच महिन्यांनी खेड शिवापूर जवळ रांझ्याला एक दिवसभराची बैठक झाली. बैठक झाल्यावर बाकीचे सगळे गटामध्ये संचलन करत शिवापूरपर्यंत गेले. आप्पांनी त्यांची गाडी पुढे पाठवून दिली. आणि मला त्यांच्याबरोबर थांबायला सांगितले. आम्ही दोघेच रांझे ते शिवापूर चालत गेलो. साधारण ३५-४० मिनिटांचे अंतर आहे. चालायला सुरुवात केल्यावर त्यांनी माझ्या इंग्रजी लेखाचा विषय काढला. त्यात काय काय भर घालायला पाहिजे असे सांगायला सुरुवात केली. त्यात ‘उंबरातील किटका’ या अभंगाचीही भर घालायला सांगितली. मग त्या अभंगाची फोड करून त्यांनी मला सांगितली.

उंबरातील कीटका हेचि ब्रह्मांड ऐसे लेखा उंबरातील किड्याचे जन्मापासून मृत्युपर्यंत सर्व जीवनचक्र एका उंबरातच पूर्ण होते. त्याच्या दृष्टीने ते उंबर म्हणजेच जणू सारे ब्रह्मांड असते, ‘ऐसे लेखा’, म्हणजे असे तुम्ही समजा.

ऐसी उंबरे किती झाडी ऐशी झाडे किती नवखंडीं त्या बिचाऱ्या किड्याला हे माहीत नसते की त्याला ब्रह्मांड वाटणाऱ्या उंबरासारखी शेकडो उंबरे एका झाडावर असतात. आणि अशी हजारो झाडे नवखंड पृथ्वीवर आहेत.

हेचि ब्रह्मांड आम्हासी । ऐसी अगणित अंडे केसींं – आपणही उंबरातल्या किड्यासारखेच आहोत. आपली पृथ्वी आणि आपल्याला दिसणारे सूर्य, चंद्र, ग्रह, यांची सूर्यमाला म्हणजेच सारे ब्रह्मांड असे आपल्याला वाटते. अशी अगणित, म्हणजे गणना न करता येण्याइतकी किंवा मोजता न येण्याइतकी अंडे म्हणजे ब्रह्मांडे (विराटाच्या) एका केसावर आहेत.

विराटाचे अंगी तैसें मोजू जाता अगणित केश एका केसावर जितकी ब्रह्मांडे आहेत तसे विराट पुरुषाच्या अंगावरचे केस मोजू गेल्यावर ते ही अगणित वाटतील. (दृश्य विश्वाला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये विराट म्हणतात. ते विराट म्हणजे विराट पुरुष अशी कल्पना केली आहे.)

ऐशा विराटाच्या कोटी साठविल्या ज्याच्या पोटीअसे कोट्यवधी विराट पुरुष ज्याच्या पोटामध्ये साठवले आहेत –

तो हा नंदाचा बालमुकुंद तान्हा म्हणवी परमानंद तो परमानंद, किंवा परब्रह्म, गोकुळामध्ये नंदाच्या घरी बालमुकुंद म्हणजेच बाळकृष्णाचे तान्हे रूप घेऊनही खेळत असतो.

ऐसी अगम्य ईश्वरी लीला ब्रह्मानंदी गम्य तुक्यालामोठ्यात मोठे परब्रह्म तान्ह्या बाळकृष्णाचेही रूप घेते ही ईश्वराची लीला, म्हणजे खेळ, अगम्य, म्हणजे बुद्धीला न समजणारा आहे. पण तो तुक्याला, म्हणजे मला तुकारामाला, ब्रह्मानंदात, म्हणजे समाधी अवस्थेत, गम्य झाला, म्हणजे अनुभवता आला.

असा हा अभंगाचा अर्थ थोडक्यात सांगून आप्पांनी मला सांगितले की आपली सूर्यमाला, हेच आपले ब्रह्मांड. अशी अनेक ब्रह्मांडे विराटाच्या अंगावरच्या एका केसावर आहेत. विराटाच्या अंगावरचा एक केस म्हणजे जणू एक आकशगंगा. विराटाच्या अंगावरचे अगणित केस हे जणू अनंत आकाशगंगा. आपल्या ज्ञात विश्वासारखे म्हणजे विराटासारखे कोट्यवधी विराट ज्याने आपल्या पोटात सामावून घेतले आहेत तो परमानंद म्हणजेच परब्रह्म. असे सगळे विवरण करून मग हा अभंग लेखामध्ये का घालायचा हे मला आप्पांनी सांगितलं.

मी तो लेख सांगितलेले काम म्हणूनच लिहिलेला असल्यामुळे आप्पांनी सांगितल्यावर अभंग आणि त्यावरील भाष्य यांची ही भर त्या लेखात त्यांनी सांगितल्याप्रमाणे घातली. पण त्या वेळेला मला तो अर्थ फारसा समजलेला नव्हता. नंतर माझ्या वाचनात दोन चरित्रे आली. तुकारामांनंतर साधारण अडीचशे वर्षांनंतर बंगालमध्ये होऊन गेलेले रामकृष्ण परमहंसांचे शिष्य आणि स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अद्‍भुतानंद यांचे चरित्र हे त्यातील पहिले. त्यांना लाटू महाराजही म्हणत. ते जवळजवळ निरक्षरच होते. रामकृष्णांच्या सहवासात राहून आणि त्यांच्या मार्गदर्शनाने लाटू महाराजांनी ध्यानसाधना केली होती व समाधीचा अनुभवही घेतला होता. एकदा ते त्यांचे आणखी एक गुरुबंधू स्वामी तुरीयानंद यांचे उपनिषदांवरील प्रवचन ऐकत होते. त्यात उपनिषदांमध्ये आलेले विश्वरचनेचे वर्णन आले होते. प्रवचन झाल्यावर लाटू महाराज स्वामी तुरीयानंदांना म्हणाले की, अरे! मला समाधी अवस्थेत जे दिसले, बरोबर त्याचेच वर्णन तू तुझ्या प्रवचनात करत होतास. उपनिषदांचा अभ्यास न केलेल्या लाटू महाराजांना त्या प्रवचनामुळे आपल्याला अनुभवातून मिळालेले ज्ञानच धर्मग्रंथांमधून सांगितलेले आहे हे लक्षात आले. गंमत म्हणजे ॐ भूः ते ॐ सत्यम् याचा अर्थ लावताना आप्पांनी पृथ्वी ते अनंत आकाशगंगा आणि परब्रह्म अशी शिडी मांडली आहे; अशीच श्रेणी एका उपनिषदातही मांडली आहे आणि ती मांडताना चक्क ही दृश्य जगातली किंवा भौतिक जगातली शिडी वापरूनही चिंतन करता येईल असे म्हटले आहे.

दुसरे चरित्र बेळगाव, धारवाड, हुबळी या भागात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्यांचा संचार होता त्या कलावती आईंचे. त्यांचेही आधुनिक पद्धतीचे शिक्षण झालेले नव्हते. एकदा एका प्राध्यापकाने त्यांना आधुनिक विज्ञानाने शोधून काढलेली विश्वाची रचना कशी आहे ते समजावून सांगितले. त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले व नंतर त्याला म्हणाल्या, तू अगदी बरोबर वर्णन केलेस. मला ध्यानामध्ये ही अशीच रचना परमेश्वराने दाखवली आहे.

तुकाराम महाराज, लाटू महाराज आणि कलावती आई हे तीन वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या तीन वेगवेगळ्या भागात तीन वेगवेगळ्या परंपरांमध्ये होऊन गेलेले साक्षात्कारी संत आहेत. तिघांचेही लौकिक अर्थाने आधुनिक उच्च शिक्षण झाले नव्हते. त्यांनी एकमेकांचे वाचलेले असायची शक्यताही फारच कमी आहे. पण ते तिघेही म्हणतात की मला समाधी अवस्थेत किंवा ध्यानाच्या अवस्थेत विश्वाची रचना कळली.  ती आजच्या विज्ञानाने शोधून काढलेल्या रचनांच्या चढत्या भांजणीशी जुळणारी आहे असे आपल्याला लक्षात येते. तुकारामांना समाधी अवस्थेत दिसलेली दृश्य विश्वासारखी (विराट) असंख्य विश्वे (विराटाच्या कोटी) ही शेवटची पायरी तर दृश्य विश्वाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला अजून एक चर्चा करण्यासाठीची कल्पनाच आहे.

तुकाराम महाराजांच्या काळात आकाशात प्रत्यक्ष दिसणारी एकच आकाशगंगा माहीत होती. अनंत आकाशगंगा आहेत हा शोध १९२२ सालानंतर लागला. त्यामुळे तुकाराम महाराजांना या अभंगातील विश्वाच्या विस्ताराची चढती भांजणी मांडताना दृश्य जगातील सूर्यमाला ते अनंत आकाशगंगा ही रचना निरीक्षणातून किंवा अभ्यासातून समजली नव्हती हे नक्की. त्यांना जो अनुभव समाधी अवस्थेत आला, तो त्यांनी तेव्हाच्या माहीत असलेल्या विराट आणि बालमुकुंद अशा देवतांशी संबंधित भाषेत मांडायचा प्रयत्न केला. तो ही अर्थ सगळ्यांना समजणार नाही म्हणून सुरुवातीलाच उंबरातील कीटकाचा सर्वांना परिचित दृष्टांत दिला.

माहिती असणे, कल्पना करता येणे आणि प्रत्यक्ष अनुभव येणे या मन-बुद्धीच्या विकासाच्या पुढच्या पुढच्या पायऱ्या आहेत. दिसणाऱ्या आणि माहीत असलेल्या विश्वातील अधिकाधिक मोठ्या रचनांची माहिती आज पाहून, वाचून किंवा ऐकून मिळते. उपासना करताना गायत्री मंत्राच्या पूर्वी ॐ भूः, ॐ भुवः, ॐ स्वः, ॐ महः, ॐ जनः, ॐ तपः, ॐ सत्यम् अशी सात नावे आपण उच्चारतो. तेव्हा अनुक्रमे पृथ्वी, अंतरिक्ष, सूर्य, कोटी सूर्य, आकाशगंगा, अनंत आकाशगंगा आणि परब्रह्म असे त्या एकेका नावाचे अर्थही आपण उच्चारतो. आपण या क्रमशः मोठ्या होत जाणाऱ्या रचनांचा भाग आहोत. त्यांच्यापासून शक्ती मिळवत आहोत. असा विचार करत करत त्या नावांचा उच्चार आपण करत गेलो तर आपण मनाने विश्वाच्या विस्ताराची कल्पना करायला लागू आणि पुढे मागे त्या विस्ताराचा प्रत्यक्ष अनुभवही येऊ शकेल. अशी अपेक्षा आप्पांनी या सात नावांच्या अर्थावर भाष्य करताना व्यक्त केली. आज आपण बुद्धीला माहीत झालेली परंतु अनुभव नसलेली नावे उच्चारतो ती आपल्याला भौतिकशास्त्रातून कळलेली आहेत.

आपल्याला निरीक्षण करता येत नसले व अनुभवही नसला तर अभ्यासाची एक पद्धत अशी आहे की किमान तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून निरीक्षण करा किंवा तीन वेगवेगळ्या लोकांचे अनुभव ताडून पाहा. ते जुळले तर आपल्याला अनुभव येईपर्यंत त्यांचे निरीक्षण किंवा अनुभव स्वीकारा. लेख लिहून झाल्यानंतर काही वर्षांनी माझ्या वाचनात ही चरित्रे आली आणि आधी न समजलेले आप्पांचे विवेचन मला थोडेफार समजले. प्रबोधिनीची नित्य उपासना करणाऱ्या सर्वांनी या अभंगाचेही नित्य चिंतन, मनन केले, तर त्यांची उपासना अधिक प्रचोदक होईल. असे मला माझ्या अनुभवावरून वाटते.

गिरीश श्री. बापट