एक अनेक बिआपक पूरक, जत देखऊ तत सोई ।
माइआ चित्र विचित्र बिमोहित, बिरला बूझै कोई ॥ १ ॥
सभु गोबिंदु है सभु गोबिंदु है, गोबिंदु बिनु नही कोई ।
सूतु एकु मणि सत सहंस जैसे, ओति पोति प्रभु सोई ॥ धृ ॥
जल तरंग अरु फेन बुदबुदा, जलते भिन्न न कोई ।
इह परपंचु पारब्रह्म की लीला, बिचरत आन न होई ॥ २ ॥
मिथिआ भरमु अरु सुपनु मनोरथ, सति पदारथु जानिआ ।
सुक्रित मनसा गुरु उपदेसी, जागत ही मनु मानिआ ॥ ३ ॥
कहत नामदेव हरि की रचना, देखऊ रिदै बीचारी ।
घट घट अंतरि सरब निरंतर, केवल एक मुरारी ॥ ४ ॥
१९८३ ते १९८५ ही तीन वर्षे प्रबोधिनीमध्ये पंजाब पर्व होते. पंजाबमध्ये तीन सद्भावना दौरे, पंजाबी लोकांचा महाराष्ट्रातील मैत्री दौरा, दोन पूर्ण वेळ युवती कार्यकर्त्यांचा पंजाबमध्ये निवास, प्रबोधिनीच्या उपासना मंदिरात गुरु ग्रंथसाहिबचा अखंड पाठ, असे अनेक उपक्रम त्या काळात झाले. दौऱ्यांमध्ये आणि सभा बैठकींंमध्ये पंजाबी लोकांसमोर आणि त्यांच्यासह म्हणण्यासाठी पाच-सहा हिंदी आणि पंजाबी पद्ये, शबद आणि अभंग तयार केले होते. त्या काळात म्हटलेल्या अभंगांपैकी आजचा हा अभंग सगळ्यात कमी वेळा म्हटल्याचे आठवते. परंतु त्याचा अर्थ माझ्या मनाला सर्वात जास्त भिडला. नामदेवांचे जे ६१ अभंग गुरु ग्रंथसाहिब मध्ये घेतलेले आहेत, त्यापैकी एक आजचा अभंग आहे.
एक अनेक बिआपक पूरक – तो एकच परमेश्वर अनेकही झाला आहे. तो सर्वांना व्यापून राहतो. आणि सर्वांना आतून पूर्णही करतो.
जत देखऊ तत सोई – जिथे पाहावे तेथे सोई, म्हणजे तोच, आहे.
माइआ चित्र विचित्र बिमोहित – या चित्रविचित्र मायेने मोहित झालेला
बिरला बूझै कोई – कोणी विरळा, म्हणजे एखादाच मनुष्य, त्याला बूझै, म्हणजे ओळखतो.
सभु गोबिंदु है सभु गोबिंदु है – सर्व काही गोविंदच आहे.
गोबिंदु बिनु नही कोई – गोविंदाशिवाय अन्य कोणीही नाही.
सूतु एकु मणि सत सहंस जैसे – जसे एका सुतामध्ये सत सहंस, म्हणजे शेकडो, हजारो, मणी ओवलेले असतात.
ओति पोति प्रभु सोई – तसे तो प्रभू सर्वांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. ओत म्हणजे कापडातील उभे धागे. प्रोत म्हणजे आडवे धागे. उभ्या आडव्या धाग्यांमुळेच कापडाला कापड म्हणून रूप येते. तसे त्या प्रभूमुळेच सर्वांचे अस्तित्व आहे.
जल तरंग अरु फेन बुदबुदा – पाण्यावरची लाट, पाण्याचा फेस आणि पाण्यावर दिसणारे बुडबुडे
जलते भिन्न न कोई – हे पाण्याचेच बनलेले आहेत, पाण्यापेक्षा वेगळे नाहीत.
इह परपंचु पारब्रह्म की लीला – तसा हा प्रपंच किंवा सारी सृष्टी परब्रह्मापासूनच बनलेली आहे. लाट, फेस आणि बुडबुडा हे जसे पाण्याचे खेळ आहेत, तसा प्रपंच ही परब्रह्माची लीला म्हणजे खेळ आहे.
बिचरत आन न होई – प्रपंचात परब्रह्माशिवाय बिचरत, म्हणजे चालणारा किंवा जगणारा, आणखी दुसरा कोणी असत नाही.
मिथिआ भरमु अरु सुपनु मनोरथ – अल्पजीवी भ्रम, झोपेतील स्वप्ने आणि मनोरथ, म्हणजे जागेपणाची स्वप्ने
सति पदारथु जानिआ – या सर्वांना सामान्य माणूस खरे पदार्थ मानतो.
सुक्रित मनसा गुरु उपदेसी – सुक्रित, म्हणजे शुद्ध, मनाने गुरूचा उपदेश ग्रहण केल्यावर
जागत ही मनु मानिआ – तोच मनुष्य जागत, म्हणजे जागृत झालेल्या, मनाने ‘सभु गोबिंदु है’ हे मानायला लागतो.
कहत नामदेव हरि की रचना – नामदेव म्हणतात की या हरीच्या रचनेचा
देखऊ रिदै बीचारी – आपल्या हृदयातच विचार करून पाहा.
घट घट अंतरि सरब निरंतर – मग प्रत्येक घटाच्या आतमध्ये, म्हणजे प्रत्येक वस्तू, प्राणी आणि व्यक्तीच्या आतमध्ये, निरंतर, म्हणजे अखंडपणे
केवल एक मुरारी – केवळ एकच मुरारी, गोविंद, हरी, परब्रह्म किंवा प्रभू भरून राहिलेला आहे याचे ज्ञान प्राप्त होईल.
वैज्ञानिक पद्धतीने म्हणजे वस्तुनिष्ठ रितीने जगाकडे पाहताना वैज्ञानिक स्वतःला जगापासून अलग करून जगाकडे पाहतात. तसे पाहताना वैज्ञानिकांनाही विश्वातील विविध किंवा अनेक रचनांच्या मागे एकच शक्ती आहे हे कळते. ती व्यापक आहे आणि सगळ्यांच्या आतमध्येही आहे हे देखील कळते. जिथे पाहावे तिथे तीच शक्ती आहे हे ही कळते. विश्वातील सर्व चित्रविचित्र रचना एका शक्तीतून उत्पन्न होऊन नष्ट झाल्यावर त्या शक्तीत विलीन होणार आहेत, म्हणजेच माया आहेत हे देखील कळते. विज्ञानाचा एवढा सखोल अभ्यास करून हे सर्व समजून घेणारे विरळाच, म्हणजे सात अब्ज मानवी लोकसंख्येपैकी कदाचित सात लाख लोकच, असतील. नामदेवांच्या काळात त्यांच्याकडे जी शब्दसंपत्ती होती ती वापरून त्यांनी पहिल्या कडव्यात विज्ञानाला मान्य होईल असेच विश्वाचे वर्णन केले आहे.
धृपदाकडे मात्र, विश्वापासून स्वतःला अलग ठेवण्याच्या वैज्ञानिकाच्या पद्धतीने पाहता येत नाही. विज्ञानाला सापडलेली विश्वातील सर्वांच्या मुळाशी असलेली एकमेव शक्ती जड आहे, म्हणजे तिला काही संवेदना किंवा चेतना नाही, असे वैज्ञानिक मानतात. आणि गोविंद तर चिदानंदरूपी म्हणजे चेतना व संवेदनायुक्त आहे. मग सर्व काही गोविंद आहे, म्हणजेच चिदानंदरूपी आहे, हे वस्तुनिष्ठ पद्धतीने कसे समजेल? वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहणे म्हणजे स्वतःला वेगळे ठेवून पाहणे. माझ्यामध्ये जी काही शक्ती आहे तीच विश्वामध्ये आहे. कारण मी आणि सर्व विश्व एकाच प्रकारच्या अणुरेणूंनी बनलेलो आहोत. सर्व अणुरेणू एकाच शक्तीची रूपे आहेत. माझ्यामध्ये जी चेतना आणि संवेदना शरीरातील अणुरेणूंच्या विशिष्ट रचनेमुळे व्यक्त होते, ती चेतना आणि संवेदना, विश्वातील अणुरेणूंची रचना माझ्या शरीरातील अणुरेणूंच्या रचनेपेक्षा वेगळी असल्यामुळे, व्यक्त झालेली मला दिसत नाही. मला दिसत नाही, म्हणून ती चेतना आणि संवेदना विश्वातील अणुरेणूत नाहीच, असे म्हणायचे काही कारण नाही.
संतांची पद्धत तर स्वतःचे ‘मी’ पण वेगळे न ठेवता स्वतःला गोविंदाशी एकरूप करून टाकण्याची आहे. जी शक्ती विश्वात ओतप्रोत म्हणजे उभी-आडवी भरलेली आहे हे विज्ञान मान्य करते, ती शक्ती चेतना आणि संवेदनायुक्त आहे, म्हणजेच गोविंदरूप आहे हे समजण्यासाठी वैज्ञानिकाच्या सूक्ष्म बुद्धीबरोबर शुद्ध बुद्धी देखील लागते. मगच गोविंदाशिवाय अन्य कोणी नाही हे कळते. सूक्ष्म बुद्धी म्हणजे कारण आणि परिणामांची साखळी शोधून काढणारी, अखंड काय आणि आणि घटकांनी बनलेले काय हे शोधून काढणारी बुद्धी. शुद्ध बुद्धी म्हणजे आग्रह, अभिनिवेश, अहंकार विरहित बुद्धी.
पाण्याची लाट, पाण्याचा फेस आणि पाण्यावरचे बुडबुडे पाण्यातूनच निर्माण होतात आणि पाण्यातच नष्ट होतात हे वैज्ञानिकाच्या सूक्ष्म बुद्धीला कळते. बुद्धी सूक्ष्म करण्याचे प्रशिक्षण म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचे प्रशिक्षण. तसे हा प्रपंच परब्रह्मशक्तीतून निर्माण होतो आणि त्यातच विलीन होतो हे शुद्ध बुद्धीच्या संतांना कळते. परब्रह्मशक्तीशिवाय प्रपंचामध्ये विचरण, म्हणजेच संचार, हालचाल किंवा चळवळ, करणारे आणखी कोणी नाही. पण हे कळण्यासाठी बुद्धी शुद्ध करण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.
जागेपणीचे भ्रम (मृगजळ इत्यादी…) आणि जागेपणीची स्वप्ने खरी नाहीत हे सूक्ष्म बुद्धीने कळते. झोपेतली स्वप्ने खरी नाहीत हे सूक्ष्म बुद्धीने कळते. खरी नाहीत म्हणजे त्यांना सुरुवात आणि शेवट आहे. अशा गोष्टींंना भारतीय परंपरेत मिथ्या हा शब्द वापरला आहे. मिथ्या म्हणजे सापेक्ष सत्य. एखाद्याला काही काळ ते खरे वाटेल. पण सर्वांना, सर्वकाळ, खरे वाटेल असे नाही. सर्वांना सर्वकाळ खरे वाटेल तोच सत् पदार्थ. तो शोधून काढायला सूक्ष्म बुद्धी लागते आणि पुरते. तो सत्पदार्थ, चेतना आणि संवेदनायुक्त देखील आहे, हे कळायला मात्र शुद्ध बुद्धी लागते. बुद्धी शुद्ध करण्यासाठी मन शुद्ध करून गुरूचा उपदेश ग्रहण करावा लागतो. नामदेवांना विसोबा खेचरांच्या रूपात मानवी गुरू मिळाला. ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांच्या रूपाने आणि विवेकानंदांना रामकृष्णांच्या रूपाने मानवी गुरू मिळाला. रामदासांनी हनुमान आणि श्रीराम यांनाच गुरू मानले. तुकारामांना स्वप्नात गुरूपदेश मिळाला. अरविंदांना त्यांच्या आतमध्येच गुरू सापडला. गुरू कुठल्या ही रूपात येऊ शकेल. त्याचा उपदेश ग्रहण करण्यासाठी मन शुद्ध झाले पाहिजे. अशा शुद्ध मनातच ज्ञान जागृत होते. मन शुद्ध होणे म्हणजे इच्छा, भीती, क्रोध, मोह, मत्सर, लोभ या विकारांपासून मन मुक्त होणे.
नामदेव म्हणतात हरीने केलेली रचना आपल्या हृदयात म्हणजे शुद्ध मनाच्या गाभाऱ्यात विचार केल्यावर समजते. शुद्ध मनाच्या गाभाऱ्यात शिरताना आपले ‘मी’ पण ही सोडून द्यायला लागते. म्हणजे बुद्धी शुद्ध होते. प्रत्येक घटात आतमध्ये जी शक्ती आहे, तीच शक्ती चेतना आणि संवेदना युक्त आहे किंवा चिदानंदरूपी मुरारी आहे हे शुद्ध झालेल्या बुद्धीला कळते.
गिरीश श्री. बापट