श्री संत तुकाराम महाराज गाथेतील विविध विषय

लेख क्र. ३१

०५/०७/२०२५

संत तुकाराम महाराज (जन्म-इ.स.१५९८, मृत्यू-इ.स.१६४९) त्यांच्या मधाळ व भक्तिरसाने भरलेल्या अभंगांमुळे सर्वांनाच परिचित आहेत. हे अभंग ‘संत तुकाराम गाथा’ यात संग्रहित आहेत. ह्या अभंगांचा सामाजिक दृष्ट्या अभ्यास केल्यावर डॉ. मनीषा शेटे यांना अध्यात्माशिवाय अनेक सामाजिक घटना, विविध विषय यांचीही माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी हा माहितीपर व अभ्यासपूर्ण लेख लिहिला. याच मालिकेत प्राचीन कवी मुकुंदराज यांचा ‘विवेकसिंधू’, महानुभाव पंथी चक्रधरस्वामी यांचे ‘लीळाचरित्र’ यांचाही अभ्यास झाला. उद्या असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा लेख पाठवत आहे.

अध्यात्माव्यतिरिक्त श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगात आढळणाऱ्या अनेकविध विषयांचा अभ्यास व्हावा या हेतूने गाथेचे वाचन करण्यात आले. तेव्हा त्यांत सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, भौगोलिक, कृषी, औषधी वनस्पती, मानसशास्त्र, भाषा इ. विषयी संदर्भ सापडले. तुकारामांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याची तळमळ व स्पष्टवक्तेपणा यांतून १६ व्या शतकातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचे चित्र आपल्या समोर उभे रहाते.

तुकारामांनी लिहिलेले वह्यांचे कागद देवाने उदकी तारिले असे खुद्द त्यांनीच म्हटले. त्या वह्यांचे पुढे काय झाले ते सांगणे कठीण आहे, मात्र ‘कोरड्या वह्या निघाल्या उदकी। त्या तरी लुटूनी नेल्या भावीकी। प्रख्यात लोकी व्हावया॥’ असे भक्तलीलामृत अ. ३५, ओवी १६७ मध्ये महीपतीने नोंदवले आहे. अभ्यासकांनी प्रयत्नपूर्वक अभंगांचे एकत्रीकरण केले. तुकारामांच्या टाळकर्‍यांत दोन लेखक होते, एक कडूसचा ब्राह्मण मवाळ व दुसरा चाकणचा संताजी जगनाडे. महीपतीने या दोघांचा उल्लेख केला आहे. इ. स. १८४४ मध्ये ‘अभंग पत्रिकेचे तुकोबाचे’ प्रसिद्ध झाले. नंतरही थोडे थोडे अभंग प्रसिद्ध होत गेले. पहिली समग्र गाथा ३३२९ अभंगांसह १८६२ साली प्रकाशित झाली. याचे एकूण पाच भाग होते.

तत्कालीन इंग्रजी मिशनर्‍यांचे व सुसंंकृत इंग्रजी अधिकार्‍यांचे लक्ष तुकारामांकडे गेले. लोकांना तुकाराम निर्मित सेतूवरूनी ख्रिस्तचरणी नेता येईल असा पुढे रे. नारायण वामन टिळकांप्रमाणे त्याकाळीही मिशनर्‍यांचा समज झाला होता. मरे मिचेल या महाराष्ट्रात मुरलेल्या मिशनर्‍याने महीपतीच्या तुकारामचरित्राचा इंग्रजी गोषवारा १८४९ साली मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नल मध्ये छापला. या मिशनर्‍याचा तुकारामाचा व्यासंग इतका गाढ होता की त्याला स्वतःला मराठीत अभंग रचता येऊ लागले. गाथेची पारायणे व अभ्यास करणारे अनेक जण आहेत, काही अभंगांचा इंग्रजीतून अनुवादही झाला आहे. भक्तिमार्गातील प्रवासात सर्वांना सामावून घेत असताना तुकोबांनी केलेले डोळस निरीक्षण त्यांच्या अभंगात उतरले आहे.

आजच्या काळात ज्याला विज्ञान म्हणतात असे विज्ञान त्याकाळी परिचयाचे नसले तरीही त्याच्या जवळ जाणारा आशय अनेक अभंगांतून व्यक्त झाला आहे. अणुविज्ञान- अणु हे सर्व विश्व व्यापुन राहिला आहे. जसा सूर्यप्रकाश सर्वत्र भरलेला असतो, अग्नि लाकडांत असतो पण लाकूड पेटविल्याशिवाय तो जागृत होत नाही. तसेच हे अणू-रेणु अतिशय सूक्ष्म आहेत ते डोळ्यांनी दिसत नाहीत (अ.क्र.७८६, १७१८, २०६६, ३८९६). सूर्य व त्याची किरणे वेगळी दिसतात तरी ती एकच असतात हे सांगणारी एक पंक्ती आहे. शिसे, तांबे , कासे, पितळ, परिस, लोखंड, चुंबक, सोने, माणिक-मोती, चिंतामणि नावाचा इच्छापूर्ती करणारा खडा, पृथ्वीच्या पोटात सापडणारे धातू इ.चे उल्लेख केलेले दिसतात. मोहरा नावाचा द‌गड दोर्‍याला लावला असता दोरा जळत नाही अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण उल्लेख मिळतो (अ.क्र.१९३, ६८७, ७१४, ७२८, १११६, २४६५, २५५८). अग्नीमधे धातु टाकल्यानंतरच तो शुद्ध होतो, सोने तापविल्यानंतरच दागिना तयार होतो (अ.क्र.१४४०,१४५३).

पोटदुखी, ताप, वमन, कोड, जंत, नारू, नवज्वर, पडसे-खोकला, सन्निपात, कामिन, मूळव्याध, खरुज, क्षयरोग, डोळ्यातील वडस ई. रोगांचा उल्लेख सापडतो. अंगात ताप असता मिष्टान्नसुद्धा बेचव लागतात हे त्यांनी एका अभंगाच्या पंक्तीत सांगितले आहे (ज्वरिलियापुढे वाढिली मिष्टान्ने। काय चवी तेणे घ्यावी त्याची॥ – अ.क्र.१४८.३) तसेच, रोगांवरच्या कडूनिंबाचा पाला, जिरे, सुरण, राई यांचा एकत्रित पाक, बिबा, चंदन या औषधांचाही उल्लेख संंत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केला आहे (अ.क्र.८३, २३९२, २४९०, २५२५, २६०६, २७१९, ३०८८, ३२६३). सहस्र, ऐंशी सहस्र, १४ चौकडयांचे राज्य, ४ वर्ष, १ युग, ४ युगांची एक चौकडी (१६ वर्षे) अशा १४ चौकड्या, सत्तर टक्के बाकी उरणे, लंके मधील घरे सप्तलाख हे सर्व आकड्यांचे संदर्भ आपल्याला गाथेत दिसतात. एका ठिकाणी १० मधील शून्य काढुन टाकल्यास १ च शिल्लक राहतो पण ० महत्वाचे आहे हे दाखविणारा दाखला दिलेला आहे (पापपुण्य कैसे भांजिले अंक। दशकाचा एक उरविला॥ जाणोनिया काय होतोसी नेणता। शून्या ठाव रिता नाही नाही॥-अ.क्र.१४१३).

उद्धव, अक्रूर व्यास, अंबऋषी, रुक्मांगद, प्रल्हाद, जनक, विदुर, पांडव, द्रौपदी, अजामेळ, विश्वामित्र, वसिष्ठ, नारद, वाल्हा, उपमन्यू, परिक्षित राजा या पौराणिक व्यक्तींचा उल्लेख सापडतो. इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार करताना समकालीन संत व त्यांच्या आधी होऊन गेलेले संत यांचीही नावे समजतात. नामदेव, नरसी मेहता, धनाजी जाट, मीराबाई, दामाजीपंत, कबीर, गोरा कुंभार, पुंडलिक, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, चांगदेव नागो, जनमित्र, रोहिदास, परसा भागवत, सूरदास, सांवतामाळी, चोखामेळा, एकनाथ, जनार्दन, पाठक कन्हैय्या, महानु‌भाव मुनि, वैश्य तुळाधार, मोमीन, लतीफ मुसलमान, खोदु पिंजारी, बंका, जनाबाई, सजन कसाई, भानुदास, चिंतामणी देव, रामदास (मुक्ताबाईंचे नावं नाही हे विशेष.). तत्कालीन विविध समाजगटांचे दर्शनही त्यांच्या या उल्लेखांमधून होते.

गोदावरी, गंगा, सिंधू, मनकर्णिका, चंद्रभागा, भीमा या नद्या व वाराणसी, द्वारका, गया, गोपाळपूर, प्रयाग, नीरा नरसिंगपूर, पंढरपूर ही तीर्थस्थळांची नावे अभंगांमध्ये येतात. पृथ्वी समुद्रवलयांकित आहे असाही उल्लेख येतो. त्यांचे काही अभंग मराठीप्रमाणे हिंदीमध्ये सुद्धा आहेत (अ.क्र.३४३५). गौळणी, विरहिण्या, अभंग, ओवी या रचनांमध्ये ललित, रूपके इ. भाषेला अलंकृत करणाऱ्या अलंकरणांचा सहज सुंदर उपयोग केला आहे. क्वचित काही ठिकाणी दमयमकाचा उपयोग करून रचना केली आहे. सरळ सोप्या बोलीभाषेत त्यांनी सर्व रचना केल्या आहेत. कानडींचा उल्लेख एका अभंगात आला आहे (कानडीने केला मर्‍हाटा भ्रतार – अ‍.क्र.८४७)

शेतीविषयक माहिती देणारे तीन अभंग (अ.क्र.३८२५ – ३८२७) गाथेत आहेत. त्यात नांगरणी, कुळवणी ,तिफणी, पेरणी ही शेतीसाठी आवश्यक कामे कधी व कशी करावी ते सांगितले आहे. तसेच उभ्या पिकाचे काळजीपूर्वक गोफणगुंड्याच्या सहाय्याने जतन केले पाहिजे. रात्रीच्या वेळी शेतावर आग पेटवून राहावे व शेताचे रक्षण करावे असेही सांगितले आहे. शेतीमधील अनिश्चिचितता त्यांना चांगलीच परिचयाची होती. त्यामुळे त्यांनी कलियुगात ओढवणाऋर्‍या बिकट अवस्थेतून नामस्मरणच तारू शकेल हा विश्वास व्यक्त केला होता (अ. क्र.२२०३ ते २२०७). कलियुगामुळे पाउस पडणार नाही व शेतांची दुर्दशा होईल असं भविष्यही वर्तविलेले दिसते. तसेच, दुष्काळ , सुकाळ , पुर (उपमा देण्यासाठी हा शब्द वापरला असावा) इ. पावसाशी संबंधित असलेल्या परिस्थितींचे वर्णन केले आहे (अ.क्र.१८८५).

रोजच्या जगण्यातील विषय उपमा देण्यासाठी सहज वापरलेले आहेत. उदा. सांगडी म्हणजे दोन होड्या किंवा नावा एकत्र बांधून केलेले जलयान. जर फुटकी सांगडी पाण्यात घातली तर ती निश्चितच बुडणार असे वर्णन आहे. शिडाच्या नावेचा उल्लेखही दोन-तीनदा (अ.क्र.१७५४, १८८७) येतो. तेव्हा होन हे नाणे प्रचारात होते. तसेच, मुलांसाठी मातीचे होन बनत होते असा उल्लेख येतो. त्याचप्रमाणे नाणी बनविणाऱ्या टांकसाळीचा उल्लेखही (खरे टांकसाळी नाणे।- अ.क्र.२९२०) अभंगात आहे.
हुमरी ,कोल्हाट्यांचा खेळ, विटीदांडू, चेंडू-फळी, वाघोडी, लगोरी, हमामा, सेलडोरा, दोरा, निसरभोवंडी, बालघोंड(बालगुंडा), चेंडू चौगुणा, फुगडी, टिपरी, मृदुंगपाट्या, हाल इ. खेळांचे वर्णन केले आहे (अ.क्र.२५११,२७१७, ३३३६, ३४७०-३४८५). तोरड्या, वाकी, तोडे ताईत, साखळी, गळ्यातील दुल्लडी, बाजूबंद, हातसर वेणीचे नग अश्या दागिन्यांचे उल्लेख येतात. नट, नट्यांचा उल्लेख, डंका व तंबोरा इ. वाद्ये नावे येतात.
रजक, धोबी, तेलीण, गारोडी,वाणी इ. (अ.क्र.१९६१, २३७१, २८११ इ ) व्यावसायिकांचा तसेच ऋण, गहाण, व्याज, रोखापत्र, धनको, ऋणको, खतावणी, जकात इ. (अ.क्र.२९९७, ४०९१ इ.) धनाच्या व्यवहारासंबंधी शब्द अभंगांत येतात. तसेच न्यायालयातील पंचांकरवी न्यायदान करण्याच्या पद्धतीचा उल्लेखही आहे. दिवटया, छत्री, घोडे, वर्षासने, वतन, वतनदारी, भूमिदान यातून तत्कालीन सामाजिक व राजकीय रचनेचा परिचय होतो. परकीय आक्रमणांचा उल्लेख, म्लेच्छांचा प्रजेला होणार्‍या त्रासाचे वर्णन, सैनिकाने राजाच्या आज्ञा पाळाव्या, प्राणाचे मोल देवून राष्ट्र सांभाळावे, राजाने अन्याय करणाऱ्याला दंड करावा असे उपदेश त्यांनी केले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे धनुष्यबाण, ढाल, तरवार, (फिरंगी) विळा, गोळ्या बंदुकी आदी शस्त्रास्त्रांची नावे अभंगांमध्ये येतात.

समाजमनाचा अभ्यास त्यांच्या अभंगात ठायी ठायी दिसून येतो. माणसा-माणसांतील प्रवृत्तींवर ते मार्मिक भाष्य करतातच व कुटंबजीवनातील पती, पत्नी, सासू, मुले या सर्वांचे स्वभावविशेष ते दाखवितात. दैनंदिन कामातून, कटकटींमधून शांतता मिळविण्यासाठी ‘भक्ती’ हा एक मार्ग आहे, त्यामुळे विठ्ठलाची उपासना करावी असे ते सांगतात. ते स्वतः विठ्ठलभक्त असल्यामुळे त्यांनी वि‌ठ्ठलाचे रसाळ वर्णन अनेक ठिकाणी केले आहे. गाथेच्या पहिल्या आठ अभंगामध्ये विठ्ठलाला नमन केले आहे. मकरकुंडले, कौस्तुभमणी, कपाळावर कस्तुरी टिळा, चतुर्भुज, शंख-चक्र-गदा ही आयुधे धारण करणारा असे विठ्ठलाचे वर्णन केले आहे. वि‌ठ्ठ‌लाव्यतिरिक्त शिव, शक्ती, सूर्य, गणपती इ. देवता व दशावतारांचे वर्णन असून दशावतारांमधील बुद्ध व कली यांचेही नाव आले आहे. मूर्तीपूजेचे प्रस्थ त्या काळात असल्याने तांबे, पितळ, कांसे, अष्टधातूंच्या मूर्ती घडविल्या जात असे वर्णनावरून दिसते (अ.क्र.२५५८). याच्या जोडीने लोकदेवता मायराणी, मेसाबाई, म्हैसासुर मुंजा, जाखाई, जोरवाई, चंडी, बहिरव(भैरव), खंडेराव, वेताळ यांची नावे पण आली आहेत. सामाजिक उतरंडीचे स्पष्ट चित्रण तुकारामांच्या गाथेमध्ये दिसते. समाजाला त्यांनी फक्त भक्तिमार्ग दाखविला नाही तर अनिष्ट रुढी परंपरा यावर त्यांनी कडक टीका केली आहे. विठ्ठलाशिवाय अन्य कोणाचे भजन-पूजन का करावे! तुकाराम हे संतकवी तर होतेच पण ते एक समाजकवी होते हे वरील विषयांवरून लक्षात येते.

आषाढी निकट । आणी कार्तिकीचा हाट ॥ ध्रु. ॥ पुरे दोन्ही च बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ १ ॥ तें चि द्यावें तें चि घ्यावें। कैवल्याच्या रासी भावें ॥ २ ॥ कांहीं कोणा नेणे । विठो वांचूनि तुका म्हणे ॥ ३॥ – तुकारामगाथा. ३८१७