लेख क्र. ३८

१२/०७/२०२५
मा. श्री. यशवंतराव लेले यांनी संस्कृती, संस्कार, धर्म या विषयांवर भरपूर अभ्यास केला आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी केलेले विश्लेषण देत आहोत. धर्म म्हणजे हिंदू, शीख, ख्रिश्चन असे नसून आपले चांगले आचरण, तसेच समाजाची प्रगती होईल असे काम करणे होय. धर्माची ही व्याख्या यशवंतरावांनी सोप्या शब्दात पण परखडपणे सांगितली आहे.
समाजप्रदूषण !
आपल्या दैनंदिन जीवनात सदाचारास उतरती कळा आलेली दिसते आहे. विधिमंडळाच्या सदस्याने भ्रष्टाचार करावा, गंभीर गुन्हे करावेत आणि त्यास शिक्षा झाली तरी त्याने उजळ माथ्याने लोकनेता म्हणून मिरवावे, लोकांनीही अशा गुन्हेगारास आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे हे दृष्य आपण पाहतो आहोत. कार्यपालिकेतील अधिकाऱ्याने पैसे खाऊन गुन्हेगारास सोडून द्यावे आणि त्याला न्यायपालिकेची भीती नसावी, उलट पैशाच्या जोरावर न्यायाधीशासही खिशात टाकण्याचा विश्वास त्यास वाटावा हे दृष्य आज आपणास दिसते आहे !
सदाचाराने हे अवमूल्यन का झाले असावे? आपल्या तथाकथित निधर्मी जीवनपद्धतीशी तर त्याचा संबंध नाही ना?
सदाचार, नीतिमत्ता, सदसद्विवेकबुद्धी या सर्व गोष्टींना एवढी अवकळा का आली असावी?
धर्मलक्षण
धर्मलक्षण सांगताना स्मृतिकार म्हणतो,
वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः। एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम् ॥
अर्थ :- वेद, स्मृती, सदाचार आणि आपल्याला प्रिय गोष्ट ह्या गोष्टी चार गोष्टी म्हणजे धर्माचे प्रत्यक्ष लक्षण.
ह्या धर्माच्या लक्षणात वेद म्हणजे ज्ञानास अग्रस्थान दिलेले दिसते. आपल्यावर कोणी अन्याय केला असता, आपणास केवढे दुःख होते! मग आपण असा अन्याय दुसऱ्यावर कधी करू नये हे ज्ञान अनुभवातून आपण मिळवणे अपेक्षित आहे. दुसऱ्याला आपण साहाय्य केल्याने त्याला जी प्रसन्नता येते तिचे स्मरण, तिची स्मृती, जेव्हा आपल्याला असते तेव्हा आपण असला परोपकार करण्यास पुनश्च प्रवृत्त होऊ शकतो.
एखाद्या सज्जनाचं वागणं, कोणा संताचं जीवन, त्यांचं सदाचरण हे प्रत्यक्ष धर्माचं लक्षण असल्याचं स्मृतिकार म्हणतो आहे. पण जीवनातून म्हणजे समाजजीवनातून सदाचारास आपण हद्दपार केल्याचे दृष्य का बरे दिसते आहे? रस्त्यावरील गर्दीत तरुणीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळणाऱ्याचा हात धरण्यास भोवतालच्या गर्दीतून कोणीच पुढे कसा येत नाही? त्यात खरा धर्म समजणारा कोणीच कसा नसतो?
‘पुण्य पर-उपकार, पाप ते परपीडा’ हे धर्मवचन आमच्या निधर्मी जीवनास चालत नसावे, कारण पाप-पुण्यासारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी त्यात आहेत. या शिवाय प्रत्येकाच्या अंतर्मनाला जे काही प्रिय वाटतं, आदर्श वाटतं, अनुकरणीय वाटतं तेही धर्माचे लक्षण हे स्मृतिकारांचं मत आहे.
शारीर सुखास पुरुषार्थ पदवी
आमच्या सुखासाठी आम्ही तर रात्रंदिवस धडपडत असतोच ! त्यासाठीच उदंड पैसा मिळवत असतो. आपल्या परंपरेत पैसा मिळवणे यास ‘अर्थ’ पुरुषार्थ व सुखासाठी धडपडण्यास ‘काम’ पुरुषार्थ म्हणून गौरवले आहे.
पण धर्म आणि मोक्ष पुरुषार्थांच्या नियंत्रणात ‘अर्थ-काम’ ही जोडी राहायला हवी अशी आपल्याकडील ‘जुनाट’ विचारसरणी आहे, म्हणून आत्ताच्या निधर्मी जीवनप्रणालीत अर्थ-काम पुरुषार्थांना कायद्याचं नियंत्रण अपेक्षित आहे पण कायद्याचं नियंत्रण हे आम्ही त्यातील पळवाटा शोधून सहजच उधळून देतो, आणि प्रसंगी कार्यपालिका भ्रष्ट होऊन आम्हास साहाय्यच करते. अशा प्रकारे कायद्याचा धाक वाटत नाही हे दिसते. आमच्या आत्म्याचा आवाज ऐकण्यास आम्हाला आमची सुखलोलुप इंद्रिये संधी देत नाहीत. त्यामुळे ‘आत्मनः प्रियम्’ काय तेच आम्हाला समजत नाही. पाप-पुण्याचा विचार करण्यास आम्ही काही अंधश्रद्ध नाही !
प्रवृत्तिप्रधान धर्म
‘यतः अभ्युदय-निःश्रेयससिद्धिः स धर्मः ।’ अशी धर्माची एक व्याख्या आहे. या जगातील आपापला उत्कर्ष म्हणजे ऐहिक प्रगती ! म्हणजेच अर्थकामांची प्राप्ती आणि अंतःकरणाला ज्यामुळे धन्यता वाटते, परमानंद होतो; आपण चांगलं असं काही केल्याची कृतार्थता वाटत राहते त्याला निःश्रेयस म्हणावे. त्यामुळे परलोक (असल्यास) देखील आपल्याला सुखदायक ठरेल असे वाटत राहते. म्हणजे या जगात प्रसन्नतेने, संपन्न संसार अनुभवावा व कृतकृत्यतेने हे जग सोडतानाही ओठावर हास्य विलसावे हे आपल्या परंपराप्राप्त धर्माचे लक्षण दिसते. मग असा हा धर्म आपल्या जीवनातून हद्दपार करून तरी आपण काय मिळवणार? कायद्याला धाब्यावर बसवून मुक्त जीवन जगण्याचा परवाना? त्यापेक्षा स्मृतीतील पुढील वचन व्यवहारात उतरवून वागण्याचे ठरवू तर आपले जीवन समाजालाही उपयोगी होईल.
यत् कर्म कुर्वतोऽस्य स्यात् परितोषोऽन्तरात्मनः। तत् प्रयत्नेन कुर्वीत विपरीतं तु वर्जयेत् ॥
अर्थ :- जे काम करताना आपल्या अंतरात्म्यास खूप समाधान होईल ते प्रयत्नपूर्वक करूया आणि त्या विरुद्ध (म्हणजे अंतरात्म्यास चुटपुट लागून राहील, पश्चात्ताप होईल असे,) जे असेल ते टाळूया; प्रसन्नतेने जगूया, दीर्घायुष्य मिळवूया.
तेजाची उपासना
ऋषयो दीर्घसंध्यत्वात् दीर्घमायुरवाप्नुयुः ॥ प्रज्ञां यशश्च कीर्तिच ब्रह्मवर्चसमेव च ॥
(मोठमोठ्या) ऋषींनी दीर्घकाळ संध्यावंदन केले व प्रदीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले. या मोठ्या काळात त्यांना त्रिकालदर्शी अशी प्रज्ञा मिळाली. जीवनात ते यशस्वी झाले. त्यांना कीर्ती प्राप्त झाली. व अलौकिक तेजाने ते चमकून गेले.
म्हणून आपणही अंधाराचा नाश करीत उदयाचली येणाऱ्या त्या तेजोगोलाची; त्या ऊर्जेच्या मूलस्त्रोताची उपासना करूया. ‘उपासना करूया’ याचा अर्थ क्षणभर त्या सूर्यबिंबाचे चिंतन करीत एकाग्र होऊया, आणि ‘आमच्या बुद्धीसही असे तेज प्राप्त व्हावे’ अशी इच्छा करूया. अन् रोजच्या रोज, वर्षानुवर्षे ही गायत्रीची उपासना चालू ठेवून अलौकिक कांतीने सारं विश्व ढवळून टाकू या. पृथ्वीवरील साऱ्या ऊर्जांचे जे उगमस्थान असे ते सूर्यबिंब आपल्या देहाप्रमाणे बुद्धीलाही तेजस्वी करून टाको ही प्रार्थना विज्ञाननिष्ठ आहे. येथे अंधश्रद्धेचा काही संबंधच नाही. संध्यावंदन करण्याचा अधिकार स्त्रीपुरुष सर्वांना आहे. गायत्री मंत्राचा द्रष्टा विश्वामित्र हा काही ब्राह्मण नव्हे, पण त्याने भारताला दिलेला हा महामंत्र सर्वांसाठीच उपलब्ध आहे. ज्यांना याची ओळख नाही त्यांनी त्यांनी ती करून घ्यावी. विद्याव्रत घ्यावे व देशाला विद्यावैभवाने नटवावे. जातिपंथनिरपेक्षपणे, आर्य समाजात हा मंत्र सर्व इच्छुकांना विधिपूर्वक दिला जातो, त्यास आता १३४ वर्षे झाली. ज्ञानप्रबोधिनीनेही महाराष्ट्रभर या विधीस नवे रूप देऊन शाळाशाळांतून त्याचा प्रसार सुरू केला; हा खरोखरी एक शैक्षणिक संस्कार आहे. त्यामुळे तो भारतभर प्रचलित होण्यासारखा आहे. केरळच्या उच्च न्यायालयाने गायत्री मंत्र हा निधर्मी असल्याचा निर्णय देऊन कैक दशके झाली. त्यामुळे निधर्मी राज्यात त्याला राजमान्यता मिळण्यातही अडचण येऊ नये.
व्यक्तिविकसनासाठी हे विद्याव्रत अपेक्षित असल्याची ज्ञानप्रबोधिनीची भूमिका आहे व व्यक्तिविकसनातून समाजविकसनाचे ध्येय साध्य होणार आहे. महाराष्ट्र शासनाने ‘व्यक्तिमत्त्व विकसन’ हा विषय प्रशालांमध्ये सुरू केलाच आहे. आता विद्याव्रतास शाळांमधून शासकीय मान्यता मिळण्यास फार काळ लागणार नाही. अर्थात् शासनमान्यता लाभो वा न लाभो, गायत्री उपासनेस लोकमान्यता मिळाली की समाजाचं हित झाल्यावाचून राहणार नाही. आपल्या प्रखर बुद्धीस सहजच सन्मार्ग दिसत राहील. तोच आपल्या वैयक्तिक आणि पर्यायाने सामूहिक उत्थानाचा महामंत्र ठरेल ! आपणा सर्वांना हे माहीत असणे आवश्यक आहे की दशसहस्त्र वर्षांपूर्वीचा हा आपला राष्ट्रीय महामंत्र माझी (एकट्याची) बुद्धी प्रखर व्हावी असे म्हणत नाही तर ‘आम्हा सर्वांच्या सर्व जाति-पंथ-स्त्री-पुरुष-श्रमजीवी-बुद्धिजीवी-यांच्या विचारशक्तीस तेजस्वी बनवो अशी कामना व्यक्त करतो आहे.
‘गायन्तं त्रायते’ म्हणजे म्हणणाऱ्या सर्वांना-सर्व समाजाला; देशाला-तारणारा मंत्र, म्हणून हा ‘गायत्री’ नावाने ओळखला जातो. देशात लक्ष लक्ष लोकांनी एका वेळी एका सुरात, अर्थावर लक्ष केंद्रित करत करत या मंत्राचा उच्चार केला पाहिजे. त्यातून समष्टीची शक्ती उत्पन्न होईल ! प्रतिभेची शक्ती तर त्याहून कितीतरी भव्य असेल. देशापुढील साऱ्या समस्यांना तिच्यामुळे उत्तरे मिळतील व भारत ही महाशक्ती बनेल.
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।
या परब्रह्माच्या, देवाच्या, श्रेष्ठ तेजाचे ध्यान करितो, आमुच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो.