धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग १)

लेख क्र. ४२

१६/७/२०२५

संत्रिकेच्या कामातील पौरोहित्य उपक्रम थेट समाजाला भिडणारा असल्याने त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे. पण याच्याच बरोबरीने विभागात सामाजिक एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता यावरही समांतर म्हणता येईल असे काम चालू होते. डॉ. स. ह. देशपांडे हे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, त्यांच्या पुढाकाराने राष्ट्रवाद अभ्यास मंडळ व्याख्यान मालेचा आरंभ झाला. प्रा. पु. ग. सहस्त्रबुद्धे या थोर विचारवंताच्या टिपण वह्या आजही विभागात आहेत. भारताचा राष्ट्रवाद असे एक महत्त्वाचे पुस्तक डॉ. स. ह. देशपांडे व श्री. यशवंतराव लेले यांच्या चिंतनातून तयार झाले, जे कॉन्टिनेन्टल व ज्ञान प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झाले.
फेब्रुवारी १९८९ मध्ये भारतीय एकात्मता सहचिंतन या विषयावर चर्चासत्र झाली. तसेच १९९८ मध्ये आर्य प्रश्नावर परिसंवाद झाला. आजही कळीचा असलेला एकात्मतेचा विषय तेव्हाही या ज्येष्ठ अभ्यासकांसाठी महत्त्वाचा मुद्दा होता. या व्याख्यान व चर्चात्मक उपक्रमात अनेक विषय चर्चिले तर गेलेच पण विविध विचारसरणीचे लोक खुल्या मनाने इथे व्यक्त झाले. वक्त्यांच्या नावाची व विषयाची यादी जरी पाहिली तरी आपल्याला सामाजिक विषय व वक्ते यातील वैविध्यता समजते.

उदाहरणादाखल राष्ट्रवाद अभ्यास मंडळातील काही व्याख्यात्यांची नावे व विषय येथे देत आहोत –
रावसाहेब कसबे – दलित चळवळीच्या तत्वप्रणालीची बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मांडणी.
सय्यदभाई – मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या हिंदुत्ववाद्यांकडून अपेक्षा
ब. ल. वष्ट – मुस्लिम प्रश्नाचे आंतर-राष्ट्रीय स्वरूप
गिरीश प्रभुणे – भटके-विमुक्त यांचे जीवन अरविंद लेले – धर्मनिरपेक्षता किमान २/३ तास चालणाऱ्या या बैठकींमध्ये जोरदार चर्चा, वाद प्रतिवाद व्हायचे पण सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या जायच्या नाहीत. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय समस्यांवर विचारमंथन झाले. श्री. अरविंद बाळ यांनी निमंत्रक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले.

२००८मध्ये या व्याख्यांनांची दिशा बदलली, व्याख्याने सर्वांसाठी खुली करताना, २००९ ला ‘जनतंत्र उद्बोधन मंच’ असे नामकरण झाले व राजीव साने निमंत्रक झाले.
राजीव साने – व्यक्तिस्वराज्यवाद
प्रदीप रावत – भारतापुढील आव्हाने, आर्थिक विकासातील राजकीय अडथळे
राजश्री क्षीरसागर – चर्चा बहुसांस्कृतिकतेची, संस्कृती निरपेक्षमूल्यांची कॉ. विलास सोनावणे – जाति-अंताचे लढे : फुले विचार आणि आंबेडकर विचार यातील फरक (मुस्लिम आरक्षण प्रश्नाच्या संदर्भात) डॉ. असगर अली इंजिनअर – communal vilonce Bill- 2011 वर व्याख्यान व हिंदू मुस्लिम सदस्यांसह चर्चासत्र
विविध विचारसरणींच्या वक्त्यांनी निर्भीडपणे आपल्या विषयाचे प्रतिपादन करणे ही परंपरा चालू राहिली. मात्र अशा नुसत्या व्याख्यानमाला घेण्यापेक्षा सखोल अभ्यास व्हावा, विषयातील आंतरसंबंध समजत जावेत, प्रबोधिनी मध्ये काम करणाऱ्या सदस्यांची देशप्रश्नाकडे पाहण्याची भूमिका तयार व्हायला हवी म्हणून ‘मासिक वैचारिक योजना‘ सुरू करण्यात आली. यात अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान यांच्याशी निगडीत व्याख्याने होत गेली.
श्री. अजित कानिटकर – बदलता भारत (विशेषत: ग्रामीण भाग) मा. संचालक गिरीशराव बापट – राष्ट्रविचाराला छेद देणारे आधुनिक विचारप्रवाह, राष्ट्रकारणाची विविध अंगे, आध्यात्मिक राष्ट्रयोग ही तीन महत्त्वपूर्ण व्याख्याने झाली. सुरेंद्र ठाकुरदेसाई – एखाद्या भौगोलिक प्रदेशाचा विविध अंगांनी अभ्यास आशुतोष बारमुख – सामूहिक अस्मितेकडे सारे विचारप्रवाह कसे पाहतात?

या सर्व वैचारिक चळवळीच्या निमित्ताने १७५ पेक्षा अधिक विषय व १५० हून अधिक वक्ते ज्ञान प्रबोधिनीच्या म्हणजेच संत्रिकेच्या व्यासपीठावर आले. प्रबोधिनीमध्ये खुलेपणाने विषय मांडता येतात हे पोहोचायला मदत झाली.

राष्ट्रवाद अभ्यास मंडळापासून श्रोता व वक्ता म्हणून सहभागी असलेले मा. श्री. सुभाषराव देशपांडे यांनी १९९७ साली ‘धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था’ या डॉ. स. ह. देशपांडे यांच्या व्याख्यानवर दिलेला अभ्यासपूर्ण प्रतिसाद, देशप्रश्नावर काम करणाऱ्या प्रत्येकाने ऐकलाच पाहिजे असा आहे.