ज्ञान प्रबोधिनी आयुर्विज्ञान संस्थेचे गॉस्पेल :
खा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीच्या निमित्ताने संजीवन रुग्णालयाच्या उद्दिष्टांबद्दल बराच विचार झाला. खा. अटलजींच्या सकाळच्या भेटीनंतर त्याच दिवशी दुपारी संजीवन रुग्णालयातील आपल्या डॉक्टरांची बैठक लातूरचे डॉ. कुकडे, डॉ. सौ. कुकडे व डॉ. भराडिया यांच्याबरोबर झाली. ‘मेडिसीन इज द राइट हॅण्ड ऑफ गॉस्पेल’ हे घोषवाक्य कै. आप्पा वैद्यकीय सेवेच्या संदर्भात अनेक वेळा वापरत असत. संजीवन रुग्णालयाच्या पत्रकामध्येही या वाक्याचा उल्लेख केला आहे. संजीनव रुग्णालयाचे गॉस्पेल काय ? वैद्यकीय सेवा हे आयुर्विज्ञान संस्थेचे साध्य की साधन ? इ. प्रश्न त्या बैठकीच्या वेळी मनात आले.
प्रशालेतील विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षण उत्तम रीतीने देणे हे जसे साधन आणि या विद्यार्थ्यांध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण करून, देशाचे रूप पालटणे हे जसे साध्य, तसेच रूग्णालयाच्या बाबतीतही आहे. उपचाराच्या निमित्ताने येणाऱ्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा पुरविणे, त्यांना बरे करणे, पुन्हा आजारी पडू नये यासाठी त्यांचे आरोग्यशिक्षण करणे, आजारी पडल्यास मनोधैर्य टिकवून आजाराला तोंड कसे द्यायचे हे शिकविणे हे सर्व आयुर्विज्ञान संस्थेचे कार्यरूप साधन आहे. या कोणत्याही निमित्ताने संपर्कात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना देशसेवेच्या
विविध कामांची आवश्यकता व त्यामध्ये प्रत्येकाने सहभागी होण्याची गरज दाखवून देणे हेच संजीवन रुग्णालयाचे साध्य असायला हवे. कधीतरी संजीवन रुग्णालयातही हिंदुस्थानची चित्रमूर्ती व ‘ॐ’ ची प्रतिष्ठापना व्हावयाल हवी. ‘परब्रह्म शक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्रच संजीवन रुग्णालयाचा गॉस्पेल आहे. साध्य निश्चित असले म्हणजे साधनाच्या उत्तमतेची काळजी घेण्यास काही वेळ लागला तरीही हरकत नाही. साधन उत्तम रीतीने वापरता यायला लागले की, ते ज्यासाठी वापरायचे त्याचा विचार करू असे म्हणून चालणार नाही. रुग्णालयातले वातावरण, तिथल्या
सदस्यांची वर्तणूक, त्यांचे राष्ट्रीय व व्यक्तिगत चारित्र्य या सर्वांतून आपले गॉस्पेल काय हे व्यक्त होत असते.
संजीवन रुग्णालयाच्या निमित्ताने हा विचार मांडला असला, तरी वेगवेगळ्या स्वरूपाचे काम करणाऱ्या सर्वच विभागांच्या सदस्यांध्ये आपले साधन काय व साध्य काय याची स्पष्टता आणली पाहिजे.
सौर भाद्रपद १, शके १९१६
२३.८.१९९४