कृतीने व्यक्तीची ओळख पटते :
इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानात नुकतेच सुरू झाले होते तेव्हाची गोष्ट आहे. लष्करातल्या काही इंग्रज अधिकाऱ्यांना भारतीयांची वेदविद्या जाणून घ्यावी अशी इच्छा झाली. त्यासाठी संस्कृत शिकायला पाहिजे. नेहमीच्या पोशाखात गेलं तर कोणीही पंडित आपल्याला त्यांची देववाणी संस्कृत शिकवणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी केस कापून घेऊन मुंडण केले. गळ्यात जानवे घातले, धोतर नेसले आणि अनवाणी पायांनी चालत जाऊन एका अधिकाऱ्याने एका पंडिताला गाठले. संस्कृत शिकवण्याची विनंती केली. बरोबर मित्रही येणार म्हणून
सांगितले. दुसऱ्या दिवशी पंडित आपल्या नवीन शिष्यांची वाट पाहू लागला. लांबून चारजणं एका रांगेत चालत येताना त्याला दिसले. थोडे जवळ आल्यावर सर्वजण ताठच्या ताठ चालत आहेत, एका रांगेत पावले टाकत आहेत असे त्या पंडिताला दिसले. बरोबर ठरलेल्या वेळी चारहीजण पंडिताच्या दाराशी पोचले. हा वक्तशीरपणा, चालण्यातील ऐट आणि शिस्त पाहून पंडिताने ओळखले की, हे ब्राह्मणवेषातील फिरंगी आहेत. असे वागणे फक्त इंग्रजांनाच जमेल. अर्थातच संस्कृत शिकण्याचा त्या अधिकाऱ्यांचा बेत फसला. परशुरामांकडे धनुर्विद्या शिकायला गेलेल्या कर्णाची अशीच गत झाली. त्याची सहनशक्ती पाहूनच तो ब्राह्मण नसून क्षत्रिय आहे हे परशुरामांनी ओळखले. आपली प्रत्येक कृती आपले अंतरंग प्रकट करत असते. आपली सहजकृती देखील आपण आत्मसात केलेले विचार प्रकट करत असते.
आचार, विचार आणि प्रचार :
महिन्याभरापूर्वी सर्व सदस्यांसमोर बोलत असताना सर्वांनी प्रबोधिनीपणाचे प्रचारक बनून काम करण्याची गरज सांगितली होती. प्रबोधिनीतून सर्वचजण अनेक गोष्टी घेतात. त्यापैकी विचार घेणे हे सगळ्यात महत्त्वाचे. आपण अनेक विचार ऐकत असतो; परंतु त्या विचाराप्रामणे आपण प्रत्यक्ष वागू शकलो तर तो विचार आपला स्वत:चा झाला. अशा विचारांचाच प्रचार करता येतो; काही थोड्याजणांना भाषणे करून किंवा लेख लिहून प्रचार करता येतो; परंतु विचाराप्रमाणे निष्ठेने आचरण करणे हे अनेकांना जमू शकते. असे निष्ठापूर्वक आचरण हाही प्रचारच आहे. एखाद्या विचाराचे आचरण करणे म्हणजे तो विचार मूर्त स्वरूपात प्रकट करणेच आहे. आणि हजार शब्दांचे काम एक कृती करून जाते. त्यामुळे प्रबोधिनीच्या प्रत्येक सदस्याला आपल्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आचरणाने प्रबोधिनीपणाचे प्रचारक होणे शक्य आहे.
सर्वसाधारण प्रबोधिनीपण :
विनाश्रमाचे घेणार नाही
गुणवत्तेत तडजोड नाही
आजचे काम उद्यावर नाही
आपले काम दुसऱ्यावर नाही
हे सगळे साधेसाधे विचार आहेत. प्रबोधिनीत आणि प्रबोधिनीबाहेरही अशा पद्धतीने वागणाऱ्यांचे आदर्श नेहमीच असायला हवेत. बाहेर याचा आग्रह कमी असेल. प्रबोधिनीत याचा आग्रह आपण मुद्दाम धरतो. असे वागणे प्रबोधिनीत सगळ्यांनाच जमायला हवे. कोणत्याही विभागातील कोणत्याही पदावरच्या कार्यकर्त्याने हे सर्वसाधारण विचार पचवलेले असलेच पाहिजेत. त्याचा प्रचार त्यांनी आचरणाद्वारेच करायचा आहे. या चार नकारयुक्त विचारांबरोबरच काही विधायक विचारही प्रबोधिनीबाहेर आणि प्रबोधिनीत सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजेत.
रोजची उपासना झालीच पाहिजे
प्रत्येक कामात इतरांच्या हिताचा विचार केलाच पाहिजे
रोज नवीन काही सुचलेच पाहिजे
कालच्यापेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे
प्रबोधिनीचा एक एक सदस्य म्हणजे या विचारांचे मूर्तिंत उदाहरण व्हायला पाहिजे. सर्वसाधारण प्रबोधिनीपण असे सकारात्मक आणि नकारात्मक आहे.
सौर श्रावण १, शके १९१७
२३.७.१९९५