मागील महिन्यात सर्वसाधारण प्रबोधिनीपण कशात आहे हे पाहिले. हे सर्वसाधारण प्रबोधिनीपण प्रबोधिनीच्या सर्व सदस्यांच्या दैनंदिन कामातून व्यक्त व्हायला पाहिजे. याशिवाय प्रत्येकाच्या विभागाच्या कामाच्या स्वरूपानुसार जे वेगळेपण असेल ते त्याचे प्रबोधिनीच्या कामातील वेगळेपण आहे. समजत असले पाहिजेत पण आज नाहीत असे जे गुण आहेत केवळ त्यांचाच आग्रह आपण सर्वसामान्य प्रबोधिनीपणामध्ये धरत असतो. परंतु, विशेष प्रबोधिनीपण हे प्रबोधिनीचे समाजाला योगदान आहे. ते इतरांनी घ्यावे अथवा न घ्यावे; परंतु प्रबोधिनीमध्ये आपण त्याचा आग्रह धरणारच. कारण प्रबोधिनीचा जन्मच त्यासाठी आहे.
जे विशेष प्रबोधिनीपण आहे ते सगळ्यांच्या अनेक उपक्रमांचा एकत्रित परिणाम म्हणून दिसते. त्यामुळे प्रबोधिनीतील आपल्या व्यक्तिगत कामाचा किंवा आपल्या विभागाच्या कामाचा परिणाम कसा दिसतो व एकत्रित परिणामामध्ये त्याचे स्थान काय हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पंचामृतामधे पांचपैकी एक जरी द्रव्य नसले तरी ते पंचामृत होत नाही. तसे प्रबोधिनीच्या प्रत्येक विभागाचे आहे. सगळ्यांचा मिळून होणारा एकत्रित परिणाम विशेष प्रबोधिनीपण दाखवतो. एकत्रित परिणामासाठी प्रत्येक विभागाच्या कामातून आपल्याला घेण्यासारखे काय आहे आणि आपल्या विभागाच्या कामातून इतर विभागांना घेण्यासारखे काय आहे याचे भान हवे. भान ठेवून प्रत्यक्ष देवाणघेवाण केली पाहिजे. असा सर्वंकष एकात्मिक दृष्टिकोन येणं म्हणजे आपल्यामधे विशेष प्रबोधिनीपण येणं.
प्रबोधिनीच्या भवितव्यलेखात ज्या दिशांनी पुढचे काम करायचे ठरवले आहे, त्या सर्व दिशांनी होणाऱ्या कामांचा एकत्रित परिणाम म्हणजे वीस वर्षांनंतरचे विशेष प्रबोधिनीपण आहे. या दिशांनी जे प्रकल्प किंवा उपक्रम करायचे आहेत त्यातील कोणते प्रकल्प किंवा उपक्रम आपण आपल्या विभागाद्वारे करू शकू हे ओळखून त्याप्रमाणे आज काम करणे म्हणजे आपल्यामध्ये विशेष प्रबोधिनीपण आले. नमुन्यादाखल कोणता विभाग भवितव्य लेखातील कोणत्या उपक्रमासाठी किंवा उद्दिष्टासाठी काम करू शकेल हे पुढे दर्शवले आहे.
विभाग- – भवितव्यलेखात उल्लेखिलेले किंवा अध्याहृत असलेले उपक्रम कवा उद्दिष्टे
१. प्रशाला – बुद्धिमत्ता विकास मंच
२. नवनगर विद्यालय- परिसरातील आबालवृद्धांचे व्यक्तिमत्व विकसन केंद्र
३.बालविकास मंदिर- औपचारिक शिक्षणावर आधारित संघटन, संशोधन व ग्राम विकसन
४.कृषितांत्रिक विद्यालय- ग्रामीण तंत्रज्ञान संशोधन केंद्र
५.ग्राम प्रबोधिनी- औपचारिक शिक्षणावर आधारीत ग्रामीण क्षेत्रविकास
६.स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र- २० वर्षांत १०० प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड
७.शैक्षणिक उपक्रम संशोधिका- मुक्त विद्या केंद्र
८. युवक विभाग- कार्याक्रत्यांची संख्या वाढवणे
९. युवती विभाग- कार्यकर्त्यांची क्षमता वाढवणे
१०. प्रचीती- राष्ट्रघडणीच्या कामाची नवी क्षेत्रे खुली करणे
११. छात्र प्रबोधन- प्रसार माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे पूरक शिक्षण आणि शैक्षणिक उपक्रमांतून संघटन
१२. ग्रामीण प्रज्ञा विकास योजना- २५ ग्रामीण तरुणांचे जिल्हा स्तरावर नेतृत्व
१३. ग्रामविकसन प्रभाग- राष्ट्र घडणीसाठी समुचित तंत्रज्ञान व सामाजिक सहभागाचे प्रात्यक्षिक
१४. संजीवन रुग्णालय- एकात्मिक उपचार पद्धतीचे प्रात्यक्षिक
१५. आरोग्य योजना- आरोग्य शिक्षणद्वारे आरोग्यरक्षण
१६. यंत्रशाळा- ग्रामीण आद्योगिक वसाहत, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र
१७. क्षणमाप,उद्वाहक व मुद्रण विभाग प्रबोधिनीचे आर्थिक स्वावलंबन, स्वदेशी व्यवस्थापन तंत्राचे प्रात्यक्षिक
१८. व्यवस्थापन महाविद्यालय व सोल्डरिंग स्कूल प्रबोधिनीचे आर्थिक स्वावलंबन, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, प्रशिक्षणाद्वारे संघटन
१९. प्रज्ञा मानस संशोधिका मनुष्य घडणीचे शास्त्र विकसित करणे
२० संस्कृत संस्कृति संशोधिका राष्ट्रीय अस्मिता जागरण, राष्ट्रीय एकात्मता
२२. आयुर्वेद संशोधिका सुलभ आणि अद्ययावत स्वदेशी आरोग्य शास्त्र
आपण भविष्याभिमुख आणि समाजाभिमुख राहून काम करणे हे आपल्या विशेष प्रबोधिनीपणाचे लक्षण आहे. त्याचे नेमके स्वरूप आपल्या विभागाच्या कामानुसार ठरेल. याशिवाय कोणतेही काम करत असताना मुद्दाम नवे सहकारी मिळवत काम करणे, सहकार्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी काम करणे, आपल्या सहकाऱ्यांवर आपले काम सोपवून आपण नवीन कामासाठी मुक्त होणे आणि आपल्या सहकाऱ्यांनाही नवे सहकारी मिळण्याचे कौशल्य शिकवणे हे विशेष प्रबोधिनीपण आहे. हे काम करत असताना आधुनिकातले आधुनिक विज्ञान वापरणे आणि त्याच वेळी आपल्या समाजातील आध्यात्मिक वारशाचा अनादर न करणे हे विशेष प्रबोधिनीपण आहे. नित्य उपासनेने आपल्याला आत्मविश्वास आल्यावर आध्यात्मिक वारशाचा आदर करणे व तो पुढे चालवणे हे विशेष प्रबोधिनीपण आहे.
सर्वसामान्य प्रबोधिनी पाहिले, विशेष प्रबोधिनीपण काय आहे ते पाहिले. हे सर्व दृष्टिकोन आणि विधीनिषेध सुरवातीला केवळ उपचार म्हणून किंवा नियम म्हणून आपल्याला पाळायला लागतील. प्रयत्नपूर्वक असे वागणे सवयीचे होईल. त्यातून असे वागण्याची आवड निर्माण होईल आणि करताकरता आपण प्रबोधिनीपणाचे प्रवक्ते होऊ.