नागचंद्रकृत पंप रामायणाचा परिचय

लेख क्र. ५१

२/८/२०२५

१९९७ साली श्री. ग. न. साठे यांनी त्यांचा जवळजवळ ३७१८ ग्रंथे असलेला संग्रह संत्रिकेला दान दिला, त्यात रामचरित्रावर आधारित अनेक ग्रंथ होते. तेव्हा मा. श्री. यशवंतराव लेले व श्रीमती अमृता पंडित यांनी त्या पुस्तकांची सूची तयार केली. नंतर या संग्रहात वेळोवेळी भर पडत गेली. १९ – २२ जानेवरी २०२४ मध्ये अयोध्येत राममंदिर स्थापनेच्या पार्श्वभूमीवर संत्रिकेने रामायण संग्रहाचे ‘अक्षरराम’ प्रदर्शन भरविले. त्यात ३४ भाषा व १८ लिपी असलेले एकूण १९७७ रामायण ग्रंथ होते. या भव्य प्रदर्शनाला प्रतिसादही भरपूर मिळाला. सद्यस्थितीत २००० च्या वर रामायण ग्रंथ संत्रिकेत आहेत. ‘वाल्मीकी रामायण’ हे नाव आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहे. ते सोडून विविध भाषा व लिपीमध्ये असलेली ही रामायण पुस्तके आपल्याला माहितही नसतात. त्यातील काही रामायणांची ओळख व्हावी म्हणून संत्रिकेतील संशोधकांनी सारांशरूपात माहिती लिहिली. आज डॉ. आर्या जोशी यांनी कन्नड भाषेतील ‘पंप रामायणावर’ लिहिलेला लेख व सोबत ध्वनिमुद्रण देत आहोत.

भारतीय धर्म-संस्कृतीत रामायण या महाकाव्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. वाल्मीकी रामायणाचा परिचय आबालवृद्धांना थोड्याफार प्रमाणात असतो. वाल्मीकी रामायणाच्या सर्वपरिचित कथानकाव्यतिरिक्त काहीसे वेगळे कथानक ‘पंप रामायणात’ अनुभवाला येते. रामचंद्रचरित पुराण अर्थात पंप रामायण हे कन्नड साहित्यप्रकारात येते. जैन परंपरेनुसार लिहिल्या गेलेल्या पंप रामायणाचा कर्ता आहे – नागचंद्र. याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते. अभिनव पंप असेही नामाभिधान असलेले हे चम्पू काव्य आहे. चम्पू काव्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही पद्धतीने विषय मांडलेला असतो. भावनात्मक विषय पद्यात आणि वर्णनात्मक विषय गद्यात अशी याची रचना असते. याचे कन्नड नाव रामचंद्र-चरिते पुराण असे नाव आहे. उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनिक आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच प्रसिद्ध पावले.

कथेचा सारांश-

मिथिलेचा अधिपती महाराज जनकाची पत्नी गर्भवती राहिली. पूर्वजन्मीच्या वैमनस्यातून एक निशाचर त्या गर्भाला नष्ट करण्याची वाट पहात होता. राणीने जुळ्या बालकांना जन्म दिला. या बालकांपैकी मुलाचे अपहरण निशाचराने केले. आकाशमार्गाने जात असता पूर्वजन्मीच्या तपस्येचे स्मरण होवून निशाचराने त्या बालकाला कोणतीही इजा न करता, अलगदपणे पृथ्वीवर उतरविले. ते बालक हळूहळू पुढे जात रथनुपुर चक्रवालपुरच्या महाराज इंदुगती यांना मिळाले. आनंदलेल्या राजाने त्या बाळाचे नाव प्रभामंडल ठेवले. जनकाने ज्योतिषांकडून आपले दुसरे बालक सुखरूप आहे असे समजून घेतल्यावर कन्येचे नामकरण केले व तिचे नाव सीता ठेवले. सौंदर्यवती सीता मोठी होवून शास्त्रादी कलांमध्ये निपुण झाली. (वाल्मीकी रामायणात राजा जनकाला सीता शेतामध्ये नांगराच्या फाळाशी सापडली अशी कथा आहे.)

अनेक किरातांकडून होणार्‍या त्रासामुळे पृथ्वीवर अनाचार माजू लागला. या संकटातून सोडविण्यासाठी मदत करायला जनकाने राजा दशरथाला विनंती केली. त्यावेळी तरूण, अत्यंत पराक्रमी असे दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण यांनी त्या किरातांचा पराभव केला. या पराक्रमाने आनंदित झालेल्या जनकाने सीतेचा विवाह रामाशी करण्याचे ठरविले. ही बातमी समजताच नारद उत्सुकतेने पहायला गेले व स्वत:च मोहित झाले. त्यांनी सीतेचे एक चित्र तयार केले व मणीमंडपात ठेवले.

प्रभामंडलाने (निशाचराने नेलेला तिचा जुळा भाऊ) ते सीतेचे चित्र पाहिले व त्याने आपल्या वडिलांना तिला मागणी घालायला सांगितले. जनक राजाने हा प्रस्ताव नाकारला. सीतेचा विवाह रामाशी करायचा असल्याचे जनक राजाने सांगितल्यावर इंदुगती राजा चिडला, त्याने त्याच्या कुलातील वज्रावर्त धनुष्यावर प्रत्यंचा चढवून दाखविण्याचे सामर्थ्य रामात असेल तरच सीतेचा विवाह रामाशी करावा असा युक्तिवाद केला. रामाच्या पराक्रमावर विश्वास असलेल्या जनकाने स्वयंवर योजले. देशोदेशीचे राजे हरले, पण रामाने मात्र हे आव्हान पेलले व सीतेने रामाला वरमाला घातली. सागरावर्त नावाच्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून लक्ष्मणानेही आपला पराक्रम सिद्ध केला. त्यामुळे चंद्रध्वज राजाने आपल्या अठरा कन्यांचे विवाह लक्ष्मणाशी करून दिले. (वाल्मीकी रामायणात लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिचाच उल्लेख सापडतो.)

या पराक्रमामुळे प्रभामंडलाच्या मनात रामाविषयी ईर्ष्या व मत्सर निर्माण झाला. रामावर आक्रमण करण्यासाठी प्रभामंडल निघाला त्यावेळी आपल्या जन्माचे रहस्य समजल्यावर त्याला मूर्च्छा आली. शुद्धीवर आल्यावर त्याला शोक झाला कारण त्याने आपल्या बहिणीचाच लोभ धरला हे त्याला समजले होते! त्यानंतर प्रभामंडलावर राज्य सोपवून राजा इंदुगतीने जैन धर्माची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येस येताना राजा दशरथाने संपूर्ण परिवारासहित भूतहितरत भट्टारकांचे दर्शन घेतले. अयोध्येस आल्यावर दशरथाने रामाला राज्यभार स्वीकारण्यास सांगितले. भरताने विरक्त होवून वडिलांसह तपस्येसाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. ते ऐकून कैकेयी दु:खी झाली व तिने दशरथाकडे भरतासाठी चौदा वर्षांपर्यंत राज्यभार मागितला. हे ऐकून सर्वजण व्यथित झाले, परंतु रामाने चौदा वर्षे दिग्विजयासाठी बाहेर पडण्याचे जाहीर केले. सीता व लक्ष्मणही रामासह निघाले. प्रयाणाला निघताना राम-सीता-लक्ष्मणाने रत्नभवनात जावून जिनदेवांचे आशीर्वाद घेतले. विविध नगरांमधून प्रवास करीत असताना वाटेवर आड आलेल्या शत्रूंचा नाश राम-लक्ष्मणाने केला तर विनयाने सामोरे आलेल्या राजांची मैत्री स्वीकारली. ज्या राजांना यांची मदत झाली त्यांनी राम व लक्ष्मण यांच्याशी आपापल्या कन्यांचे विवाह करून दिले. (वाल्मीकी रामायणात श्रीराम हा एकपत्नी आदर्श पती म्हणून मान्यता पावला आहे.) कर्णध्वज नावाच्या सरोवराकाठी शांतीच्या अपेक्षेने अणुव्रत स्वीकारलेल्या एका गिधाडाला सीतेने आपला पुत्र मानले – हा जटायू!

दंडकारण्यात रहात असताना एक प्रसंग घडला- रावणाची बहीण चंद्रनखी हिचा मुलगा अरण्यात तप करीत होता. अनवधानाने राम-लक्ष्मणाकडून त्याची हत्या झाली. ते ऐकून खर व दूषण रामावर चालून गेले. सीतेला एकटी सोडून जाण्यापेक्षा लक्ष्मणाने युद्ध करावे व गरज भासल्यास लक्ष्मण रामाला बोलावून घेईल असे ठरले. युद्धभूमीवर लक्ष्मण पराक्रम गाजवीत असताना रावणाने एका शक्तीदेवतेला वश केले. लक्ष्मणाच्या मदतीसाठी रामाला खोटी हाक त्या देवतेने मारली व ती ऐकून; सीतेला एकटे सोडून राम युद्धासाठी आले. त्यानंतर राम-लक्ष्मणाला लक्षात आले की कोणी मायावी शक्तीने हा कट रचला होता परंतु तोपर्यंत रावणाने सीतेचे हरण केले होते. जटायूकडून त्यांना ही बातमी समजली. सुग्रीव, जांबुवंत, हनुमान यांच्या भेटीनंतर शोकाकुल राम-लक्ष्मणाने रावणाचे पारिपत्य करण्याचे ठरविले. त्यापूर्वी हनुमानाने लंकेत जावून सीतेची भेट घेतली व स्व-पराक्रमाने लंकेची नासधूस केली. ते सारे पाहून रावण अतिशय रागावला.

नभोगमन-विद्या बलाने राम-लक्ष्मणासह सर्व सैन्य आकाशमार्गे लंकेच्या रणभूमीवर येवून पोहोचले. युद्धात लक्ष्मणाने वीरश्री गाजविली. रावणाने फेकलेल्या सुदर्शन चक्रानेच रावणाचा नाश करण्याची आज्ञा रामाने लक्ष्मणाला केली व त्यानुसार लक्ष्मणाने रावणाचा वध केला! (वाल्मीकी रामायणात श्रीरामानेच दशानन रावणाचा वध केला आहे.)

रावणाच्या वधानंतर त्याची पती मंदोदरी हिने ४८,००० विद्याधर स्त्रिया व आपल्या कुटुंबासह जिनव्रताची दीक्षा घेतली. सीतेसह अयोध्येला सुखरूप परत आल्यावर; राम-लक्ष्मणाने ज्या ज्या कन्यांचे पाणिग्रहण केले होते त्यांनाही अयोध्येला बोलावून घेतले.

एके रात्री सीतेला दोन स्वप्ने पडली. एका स्वप्नात दिसले की दोन बाण तिच्या मुखात प्रवेश करीत आहेत व दुसर्‍या स्वप्नात ती पुष्पक विमानातून खाली पडली आहे. पहिले स्वप्न शुभसूचक असून सीतेला दोन पराक्रमी पुत्र होतील पण दुसरे स्वप्न दु:खरूप ठरेल असे रामाने सीतेला सांगितले.

कालांतराने सीता गर्भवती राहिली. तिच्या मनात जिनपूजेची तीव्र इच्छा जोर धरू लागली. त्याचवेळी काही ग्रामीण लोक रामाकडे आले  व दुराचारी रावणाकडे राहिलेल्या सीतेचा रामाने स्वीकार केल्याबद्दल टीका करू लागले. याविषयी लक्ष्मणाने सीतेची बाजू घेतली व रामाने सीतात्याग करू नये असेही त्याला सुचविले. पण रामाने आपला राजधर्म पाळायचे ठरविले. अयोध्येजवळ असलेल्या सम्मेद पर्वतापाशी असलेल्या जीनालयात सीतेला पूजा करण्यासाठी न्यावे व तेथेच सोडून द्यावे अशी आज्ञा रामाने दिली. अरण्यात पोहोचल्यावर सीतेला हे समजले व ती रडू लागली. पण जिनव्रती असल्याने परलोकप्राप्तीची साधना करण्याचे तिने ठरविले. याचवेळी जिनव्रती राजकुमार वज्रजंघ वनात शिकारीला आला. एकाकी सीतेचा वृतांत समजल्यावर तो तिला आपल्या राज्यात घेऊन आला व तिला त्याने आपल्या बहिणीप्रमाणे सांभाळले. (वाल्मीकी रामायणात त्यागानंतर सीता वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात राहिली असे कथानक आहे.) नवमास पूर्ण झाल्यावर सीतेने लव-कुशांना जन्म दिला. ते यथावकाश मोठे झाले; शास्त्र-कला पारंगत, पराक्रमी झाले. एकदा नारद, लव आणि कुशाला भेटले आणि राम-लक्ष्मण यांचा आदर्श घेऊन त्यांनी कीर्ती प्राप्त करावी असे ते त्यांना म्हणाले. नारदांकडून रामकथा ऐकल्यावर, आपल्या निरपराध मातेचा त्याग केलेल्या रामावर, लव आणि कुश यांनी सैन्य हल्ला चढविला. त्यांच्या पराक्रमापुढे राम व लक्ष्मणही हतबल झाले. त्यावेळी नारदांनी लक्ष्मणाला सांगितले की सीतेवर झालेल्या अन्यायामुळे चिडून युद्धासाठी आलेले हे दोघे रामाचे पुत्र आहेत! हे ऐकून राम व लक्ष्मण आनंदित झाले. त्यांनी लव-कुशाचे प्रेमाने स्वागत केले. पुंडरीकपुरला जाऊन सुग्रीव सीतेला भेटला व तिला अयोध्येला घेऊन आला. आपण अकलंकित असल्याचा पुरावा म्हणून सीतेने अग्निपरीक्षाही दिली! रामाने तिला राजगृही येण्याची विनंती केली पण ती नाकारून सीतेने विरागिनी होवून तपस्या करण्याचे ठरविले. श्रीरामाने सिद्धशैल शिखरावर जिनव्रताची कठोर तपश्चर्या केली व शाश्वत मुक्ती प्राप्त केली.

या रामायणावर जैन परंपरेचा प्रभाव असल्याने या रामायणातील सर्वच पात्रे ही जैन परंपरेचे अनुग्रहित आहेत वा ते त्याप्रमाणे आचरण करतात असे दिसून येते. हे या रामायणाचे वैशिष्टय!