मोल्ल रामायणाचा संक्षिप्त परिचय

लेख क्र. ५२

९/८/२०२५

रामायणसंग्रहातील अजून एक विशेष रामायण म्हणजे तेलगू कवयित्री ‘मोल्ल’ने रचलेले रामायण. म्हणूनच याला ‘मोल्ल रामायण‘ म्हटले जाते. अशा ह्या एका कवयित्रीरचित रामायणाचा अभ्यास डॉ. सुजाता बापट यांनी करून सामान्यांना या रामायणाची थोडक्यात ओळख करून दिली आहे. या लेखाचे ध्वनिमुद्रणही सोबत जोडले आहे.

श्रीराम कथा ही देश-विदेशांत, विविध भाषांमधून, संस्कृतींमधून, विचारांमधून, साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेली आहे. अशाच एका तेलगू भाषेतील रामायणाचा परिचय ह्या लेखाच्या माध्यमातून करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.  मोल्ल रामायण असे नाव असणारे हे रामायण तेलगू भाषिक असणाऱ्या मोल्ल नावाच्या एका  स्त्रीने लिहिलेले रामायण आहे. तेलगू हा शब्द त्रिलिंगवरुन आला आहे, असे मानले जाते. श्रीशैलावरचा मल्लिकार्जुन, महांकालेश्वर आणि द्राक्षरामम येथील भीमेश्वर ही ती तीन लिंगे होत. तेलगू या शब्दाचा अर्थ मधुर असाही होतो. या भाषेच्या माधुर्यामुळे तिला तेलगू म्हटले जाऊ लागले असावे. संस्कृत, प्राकृत आणि इतर काही भाषा यांच्या समन्वयातून तेलगू ही भाषा उत्पन्न झाली, असे उल्लेख साहित्यात आढळतात. तेलगू भाषेच्या इतिहासकारांनी तिच्या कालखंडाविषयी पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

अज्ञातकाल – इ.स. ५०० ते १०००, पुराणकाल – इ.स. १००० ते १४००, काव्य प्रबंधकाल – इ.स. १४०० ते १६५०, ऱ्हासकाल – इ.स. १६५१ ते १८५०, आधुनिककाल – इ.स.१८५१ ते आजतागायत.

महाभारताप्रमाणेच रामायणाचा अनुवाद हा पुराणकाळात झालेला पहायला मिळतो. भास्कर हा कवी व त्याच्या अनेक शिष्यांनी यांनी मिळून चंपूपद्धतीने रामकथा लिहून पुरी केली. या रामायणाला भास्कर रामायण असेही म्हणतात. आंध्रात घरोघरी आणि मंदिरांमधून हे रामायण वाचले आणि गायले जाते. रंगनाथ या कवीने द्विपद छंदात लिहिलेले रामायण हे रंगनाथरामायण या नावाने प्रसिद्ध आहे. यानेच तेलगूत रामकथेची परंपरा सुरु केली. मोल्ल रामायणाची रचनाकार कुम्मर मोल्ल ही प्रबंधकाळातील प्रसिद्ध कवियित्री आहे, हिने रचलेले हे रामायण हे प्रासादिक आहे. मोल्ल कृष्णदेवरायाच्या कालखंडातील मानली जाते. हिच्याचबरोबर तंजावर येथील रामभद्रांबा, मधुरवाणी, पसुपलेटी, रंगाजन्म या सोळाव्या सतराव्या शतकातील काही कवयित्री देखील उल्लेखनीय आहेत.

दंडक हा काव्यप्रकार संस्कृतातून केवळ तेलगू भाषेत आलेला आपल्याला दिसतो. ७०००० ओळींचे एक दंडकरामायणही तेलगू भाषेत रुपांतरित झालेले आहे.

तेलगू भाषेतील काव्याचे स्वरुप कसे बदलले याचा विचार करता असे लक्षात येते की, या काळातील तेलगू बोलीचा तत्कालीन लोकगीतांत आणि नंतर काही शिलालेखांत गद्य-पद्यरुप उपयोग झाल्याचे दिसते. नन्नया या प्राचीन कवीने तेलगू काव्याचा पाया घातलेला दिसून येतो. सुरुवातीच्या काळात अनुवाद आणि अनुकरण यांच्याकडेच या सर्वांची प्रवृत्ती असलेली दिसून येते. महाभारत, रामायण, भागवत, यांवर अनेकांनी रचना केल्याचे उल्लेख सापडतात. संस्कृतातील अनेक पुराणें तेलगू भाषेत अवतरली. धार्मिक प्रबोधन किंवा प्रचार हे या वाङ्मयाचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यामुळे आशयापेक्षा अविष्कारपद्धतीत काही प्रमाणात प्रयोगशीलता दिसून येते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत तेलगू साहित्य हे बहुतांश पद्यात्मक होते, नंतर मात्र अनेक अंगांनी या साहित्याची वाढ झाली. काव्याचे दोन मुख्य प्रवाह दिसू लागले, एकात जुनीच परंपरा चालू राहिली आणि दुसऱ्यात भाव, भाषा, मांडणी याबाबतीत स्वातंत्र्य आणि नाविन्याचा पुरस्कार केला गेल्याचे दिसून येते. पण मोल्ल रामायणाची रचना मात्र आधीच्या काळातील आहे. हे रामायण काव्यमय, प्रासादिक आणि साधे-सोपे आहे.    

मोल्ल रामायणाची प्रमुख वैशिष्ट्ये – याची रचना कुम्हर किंवा आतुकोरि मोल्ल या एका स्त्रीकडून झालेली आहे. ती कुंभार होती असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. मोल्ल ही तेलगू साहित्यातील प्रथम कवयित्री आहे, जिने अशा पद्धतीची काही काव्य रचना केली आहे. तिचा जीवनकाल इ.स. १३२०-१४०० मानला जातो. पण तिच्या आयुष्याविषयी कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही. ती ब्रह्मचारिणी होती, असे मानले जाते. हिचे पिता शिवभक्त होते आणि ती स्वतः रामभक्त मानली जाते.

मोल्ल रामायणाची रचना करताना मोल्लने कुठेही अलंकारिक शब्दांचा वापर केलेला दिसत नाही, अतिशय साध्या सोप्या भाषेत तिने ही रचना केली आहे. भक्तीतून आनंद देणारे आणि मुक्ती देणारे असे श्रीराम आहेत, त्यांचे गुणवर्णन करायला कोणाला नाही आवडणार? मला जसे काही रामायण समजले, त्याचे वैशिष्ट्य जाणवले, ते लिहिताना जे काही सुचले, त्यातून मी रामायणाची रचना केली आहे, असे मोल्ल नोंदवते. श्रीरामांची भक्ती करताना त्यातून जी प्रेरणा किंवा स्फूर्ती मिळाली त्यावरुन ही रामायणाची रचना करावी असे सुचले, असे ती म्हणते. रामांच्याच प्रेरणेने हे रामचरित गुणगान मी करते आहे आणि त्यांच्याच चरणकमलांवर मी हे कथापुष्प समर्पित करते आहे, असे ती अत्यंत विनयाने सांगते. यावरुन तिचा विनयशील स्वभाव स्पष्ट होतो. वेदांप्रमाणेच ही रामकथा पवित्र आहे. परमानंदाच्या प्राप्तीसाठीच मी ही रचना करते आहे हे सांगायला ती विसरत नाही. एकूण सहा कांडांमध्ये मोल्लने  ही रामकथा मांडली आहे.

बालकाण्ड – पहिल्या बालकाण्डात अयोध्येच्या वैभवाचे वर्णन ती करते आणि दशरथ महाराजांचा उल्लेख महापट्टण असा करते. बालकाण्डाचा शेवट तिने श्रीराम आणि सीता यांच्या (कल्याण वैभवमु) म्हणजेच विवाहाने केला आहे.

अयोध्याकांड – यात श्रीरामांच्या वनवास गमनाचे वर्णन आहे. गुहाच्या अनन्यभक्तीचा उल्लेख येथे लेखिकेने केला आहे. त्यासाठी प्रपत्ति असा शब्द तिने वापरला आहे. अयोध्या कांड हे तुलनेने लहान आहे.

अरण्यकांड – यात सुरुवातीलाच चेंचु जातीच्या आदिवासी स्त्रियांनी वनात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आहे. त्यांना असे वनात पाहून या स्त्रियांना वाईट वाटल्याचा उल्लेख देखील ती करते. शूर्पणखा आगमन, रावणासमोर शूर्पणखेचे सीता सौंदर्य वर्णन, खर दूषण संहार, मारिच राक्षसाचा प्रवेश, सीताहरण, जटायू वर्णन, रामाचा विलाप, लक्ष्मणाकडून सांत्वन, जटायूचे रावण वर्णन आणि पुढे शबरी श्रीराम भेट याचासुद्धा उल्लेख आहे, तिच्या भक्तीचे उदात्त चित्र ‘मोल्ल’ने रंगवले आहे.    

किष्किंधाकांड – यात हनुमान आगमन, श्रीराम-हनुमान भेट, सुग्रीवाशी मैत्री, वाली वध, सुग्रीवाचा राज्याभिषेक आदिंचे वर्णन आहे. सीतावियोगात श्रीराम वर्षाऋतूत देखील परितप्त होत आहेत, असे त्यांच्या मनःस्थितीचे वर्णन मोल्ल करते. सीताशोधासाठी समस्त वानरसेना चारही दिशांना पाठवली जाते आणि हनुमंताजवळ श्रीराम आपली अंगठी त्यांच्या परिचयासाठी जानकीला देण्यासाठी देतात. या कथाभागाबरोबरच हे कांड येथे संपते.

सुंदरकांड – हे कांड  इतर कांडांच्या मानाने विस्तृत आहे. संपातिकडून सीतास्थान माहिती, लंकेचा मार्ग, लंका वर्णन, रावणाची सीतेकडे प्रार्थना, सीतेकडून रावणाची निंदा, श्रीरामांची स्तुती, रावणाचा क्रोध, सीतेला विचार करण्यासाठी काही अवधी, जानकीचा संताप, हनुमंतांचे सीतेसमोर ते कुशल असल्याचे निवेदन, मुद्रिका प्रदान, हनुमानाचे भव्य स्वरुप, हा कथाभाग आहे. माझ्या हृदयात श्रीरामांची प्रतिमा कोरलेली आहे. तिला कोणीच धक्का लावू शकत नाही. मी तुम्हांला उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी श्रीरामांसमीप नेऊ शकतो असे हनुमंत म्हणताच, सीता म्हणते, ‘मला असे चोरासारखे पळून जायचे नाही. मी रामांना सोडून अन्य कोणालाही स्पर्श करु शकत नाही, त्यामुळे मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही.’ यातून सीतेचे बाणेदार व्यक्तिमत्व मोल्ल आपल्यासमोर उभे करते. हनुमंतांचा विक्रम विहार, राक्षसवीरांचा नाश, जांबुवालीचा वध, अक्षयकुमार आणि पवनसुताचा भीषण संग्राम, इंद्रजिताचे हनुमानावर आक्रमण, मेघनादाच्या ब्रह्मास्त्राने हनुमानाचे वश होणे, रावणाची निंदा आणि श्रीरामांचे गुणवर्णन, वालाग्रज्वालांनी त्याचे लंका दहन, दधिवनात वानरांचा उत्साह, अंगदाकडून दधिमुखाचा पराभव, हनुमंताकडून श्रीरामांना सीतेच्या कुशल असण्याविषयीचे निवेदन, सीतेकडून तिचे शिरोरत्न श्रीरामांसाठी देणे आणि शेवटी माल्यवान पर्वतावरुन प्रस्थान या गोष्टींसह हे कांड येथे समाप्त होते.

युद्धकांड – या शेवटच्या कांडात संपूर्ण युद्धाचे, त्याआधीच्या तयारीचे वर्णन, रावणास बिभीषणाचा उपदेश, प्रहस्ताकडून समजुतीच्या काही गोष्टी रावणाला सांगणे, बिभीषणाची शरणागती, रावणाच्या बलसंपदेचा परिचय, नलाद्वारे सेतू निर्माण, लंकेत प्रवेश, युद्धास सुरुवात, वानरांनी मांडलेला उच्छाद, कुंभकर्णाकडून वानरांचा संहार, श्रीरामांकडून त्याचा वध, इंद्रजिताचा वानरसेनेवर हल्ला, हनुमंताने आणलेल्या संजीवनीने वानरांना पुनर्जीवन, नंतर विविध राक्षसांचा वध, खरपुत्र मकराक्षाचा वध, भयभीत झालेला रावण, लक्ष्मणाकडून इंद्रजिताचा वध, रणक्षेत्रात रावणाचे आगमन, रावण-सुग्रीव युद्ध, राम-रावण संग्राम, नंतर रावणाकडून लक्ष्मणाचे मूर्छित होणे, ते पाहताच श्रीरामांचे दुःख व्यक्त करणे, पुन्हा संजीवनीसाठी हनुमंताचे प्रयाण, कालनेमिचे कपट, संजीवनी वनस्पतीची प्राप्ती, माल्यवंताचा मृत्यू, लक्ष्मणाचे शुद्धीवर येणे, रावणाचा शत्रूंजय होम, मंदोदरीचा दीनालाप, राम-रावण संग्राम, रामांसाठी इंद्र रथाचे आगमन, बिभीषणाकडून रावण मृत्यूचे रहस्य सांगणे, श्रीरामांच्या ब्रह्मास्त्राने रावणाचा वध, मंदोदरी विलाप, श्रीरामांची विजयवार्ता सीतेपर्यंत पोहोचणे, तिचा अग्निप्रवेश, ब्रह्मदेवाकडून सीतेची स्तुती, देवतांकडून श्रीराम स्तुती, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचे पुष्पक विमानातून अयोध्येकडे प्रयाण आणि अयोध्या नगरीत प्रवेश, अश्वमेध यज्ञ करुन श्रीरामांचा राज्याभिषेक, या वर्णनासह इथे हे कांड संपते. येथे विशेष नमूद करावयाची बाब म्हणजे संजीवनी वनस्पती दोन वेळा आणली गेल्याचा उल्लेख मोल्लने केला आहे.

या रामायणाची फलश्रुती सांगतांना मोल्ल म्हणते, ज्यांनी या रामायणाचे पठण केले, ऐकले, ते सर्वजण या धरणीवर सुखाने राहतील.  

श्रीविष्णूच्या अवताराची ही कथा सद्-रक्षणाय आणि खलनिग्रहणाय अशी आहे. सुंदरकांडापर्यंत ही कथा थोडी संक्षेपाने सांगून पुढे युद्धकांडाचे वर्णन मोल्लने विस्ताराने केले आहे. काही प्रसंग विस्तृत तर काही त्रोटकपणे सांगितले आहेत. पण तरीही ही कथा प्रवाही झाली आहे, तसेच तिचे स्वरुपही संक्षिप्त राहिले आहे. मोल्लने आधीच्या काही ग्रंथांचा थोडाफार अभ्यास किंवा वाचन केले होते, असे जाणवते. केवट भक्ती प्रसंगात रामचरितमानस मधील प्रसंगाची आठवण येते. येथे गुह मनात म्हणतो की, एखादा दगड जर यांच्या चरणधुळीच्या स्पर्शाने स्त्री बनू शकत असेल तर माझ्या नावेचे काय? तुलसीदासांनी देखील ‘मांगी नाव न केवट आना…. मोहि पदपदुम पखआरन कहहू…’ अशी चौपाई रचली आहे. मारिच राक्षसाची शिकार करुन येणारे श्रीराम तिला कोण्या वन्यजातीतील शिकारी असल्याचे भासतात. ही तिची स्वतंत्र कल्पना असल्याचे जाणवते. कदाचित ती राहात असलेल्या वातावरणाचा तो प्रभाव असावा. भक्ती, करुण, शांत, शृंगार या रसांचे वर्णन तिने सुंदर केलेच आहे, पण वीर, भयानक, अदभूत, रौद्र, आदि रसांचे वर्णनसुद्धा एक स्त्री असून तितकेच समर्थपणे केले आहे. भाषा, संकल्पना, श्रद्धा, भौगोलिक वातावरण, स्वतः ज्या वातावरणात वाढतो, त्याचा प्रभाव यात विविधता आढळते, पण यातच एकतेचे बीज आढळते, असे ही रामकथा वाचल्यावर म्हणावेसे वाटते. कारण श्रीराम तिथेही होते. त्या लोकांचीही रामावर निष्ठा होती. जात, भाषा, पंथ अशा कोणत्याच चौकटीत श्रीराम हे कधीच अडकले नाहीत, असे जाणवते. सर्वांना ते तितकेच प्रिय आणि आपलेसे आहेत. कारण त्याशिवाय रामायण हे नानाविध भाषांमध्ये आढळलेच नसते. जनमनांवर रामकथेचा शुभ संस्कार करण्यात या विविध भाषांमधील रामकथांचा विशेषत्वाने उपयोग झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्वान्त सुखाय अशी रचना जरी मोल्लने या रामायणाची केलेली असली तरी रामकथेचे मूळ सूत्र तिने कुठेच सोडलेले दिसत नाही.