आव्हानांच्या गगनामध्ये
मुक्त आम्ही फिरणार
कर्तृत्वाचे पंख आमुचे
कधीच ना थकणार ।। ध्रु. ।।
अभ्यासाशी दोस्ती करूनी
हिरव्या डोंगरवाटा फिरूनी
चुस्त तनाने मस्त मनाने
गीत नवे रचणार ।। १ ।।
प्रतिभाशाली प्रज्ञा अमुची
ज्योत अंतरी विश्वासाची
शास्त्र कलांची करून साधना
वीरव्रती बनणार ।। २ ।।
असोत रस्ते बिकट, वाकडे
परंपरांची अंध झापडे
जन्मजात भेदांच्या सीमा
उल्लंघून जाणार ।। ३ ।।
एकाकी ही वाट नसावी
सन्मित्रांची साथ असावी
स्वप्न उद्याचे सत्य बनविण्या
शर्थ आम्ही करणार ।। ४ ।।