अभिमानाने, अनासक्तीने, विश्वासाने, विनयवृत्तीने
एक विचारे, एक मताने, एक आम्ही होऊ ।। ध्रु. ।।
वारस आम्ही मैत्रेयीच्या, सरस्वती विदुषी गर्गींच्या
कणाकणाने ने ज्ञान वेचुनि आत्मोन्नति घडवू ।। १ ।।
शिवसंकल्पे प्रसन्न तन-मन, सजगतेत हो गुणसंवर्धन
उत्कट अस्फुट मनःशक्तीचा शोध नित्य घेऊ ।। २ ।।
लक्ष्मी अहिल्या स्फूर्तिदायिनी, आत्मबलाने बनु तेजस्विनी
पराक्रमाच्या कृति घडविण्या जिद्द मनी जागवू ।। ३ ।।
उंबरठ्याचे बंधन त्यजुनि, स्त्रीसमाज हा जागृत करुनि
किरणशलाका होऊन जगती, ज्ञानदीप चेतवू ।।४।।
स्त्री शक्ति हे शस्त्र बनू दे, अनीतीचा भ्रष्टासूर वधु दे
बुद्धि, शक्ति अन् सामर्थ्याने जगन्मान्य होऊ ।।५।।